सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं
फार विचार न करता गपचूप राहायचं!
आधाशी आणि नालायक लोकांची होर्डिंग्स शहराला विद्रुप करतात
सणांच्या नावाखाली थिल्लर गाणी वाजतात
स्पीकरच्या भिंती कानाचे पडदे फाडतात
पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं
फार विचार न करता गपचूप राहायचं!
बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं शहराला विळखा घालतात
कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी ओसंडून वाहतात
खड्ड्यांमध्ये अधूनमधून दिसणारे रस्ते दुर्मिळ होतात
पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं
फार विचार न करता गपचूप राहायचं!
अस्मितांची भांडणं लावली की राजकीय मार्ग सुकर होतात
रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे मग बाजूला पडतात
दर पाच वर्षांनी निरर्थक भावनिक वाद व्यवहारावर मात करतात
पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं
फार विचार न करता गपचूप राहायचं!
नियमित टॅक्स भरणारे दररोज ट्रॅफिकच्या धुळीत सरपटत असतात
किमान काही सुविधा मिळतील का अशी भाबडी आशा बाळगतात
या टॅक्सवर शेफ़ारलेले आणि सुजलेले दररोज पंचतारांकित मजा करतात
पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं
फार विचार न करता गपचूप राहायचं!
- निखिल वेलणकर