खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं.
त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे. आजही इंदौरचे नुस्ते नाव काढले तरी त्या सगळ्या जुन्या आठवणी मनात दाटायला लागतात. त्या काळी इंदौर तसं लहान आणि आटोपशीर गाव होतं. आयुष्य संथ आणि आरामशीर होतं. लोक भयंकर मोकळेढाकळे आणि आपल्याच मस्तीत जगणारे होते. पुलंच्या 'काकाजीं'सारखी माणसं पदोपदी सापडत होती. माझ्या साठी तर ते एक अद्भुतच जग होतं.
पहिल्यांदा इंदौरला गेलो ते १९८३च्या दिवाळीत. तेव्हा मुंबई - इंदौर 'अवंतिका एक्सप्रेस' गाडी नव्हती. खाजगी लक्झरी बसेस मधूनच सगळा प्रवास चालायचा. पवन ट्रॅव्हल्स, विजयंत ट्रॅव्हल्स ही नावं अजूनही आठवतात. मी रात्रभराचा / दूरचा एकट्याने केलेला हा पहिलाच प्रवास. बस मुंबई सेंट्रल मधून संध्याकाळी निघाली की सायन वगैरे करत आग्रा-मुंबई महामार्गाने वेग गाठायची. भिवंडीच्या पुढे पडघा नावाचे एक गाव आहे. ते येईपर्यंत साधारण जेवायची वेळ झालेली असायची. बहुतेक सगळ्या बसेस तिथेच थांबायच्या. ढाबा हा प्रकार पहिल्यांदा तिथेच अनुभवला. मस्त खाटा वगैरे टाकून लोक बसलेले असायचे. त्या खाटेच्या मध्यभागी एक लाकडी फळी आडवी टाकून जेवायचं. तिथली चव तर मला अजून आठवते. एका बाजूला तंदूर असायचा. मस्त गरम आणि कुरकुरीत रोट्या एकामागून एक फस्त व्हायच्या. शक्यतो डायवर / किन्नर साहेबांच्या जवळपास राहायचं म्हणजे बस चुकायची भिती नाही. जेवण वगैरे करून बस तिथून निघायची. त्या वेळी व्हीडीओ कोच हा प्रकार नुकताच सुरू झालेला होता. किन्नर साहेब मग एखादा फर्मास लेटेष्ट असा पिक्चर लावायचे. पिक्चर बघता बघता झोप लागायची. रात्री बस धुळे वगैरे मागे टाकत / कुठे तरी ५ मिनिटं थांबत भरधाव जात राहायची.
सकाळ व्हायची ती 'दुधी' मधे. दुधी हे महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या सीमेवरचं एक छोटंसं गाव. माझ्या माळवी खाद्यजीवनाची सुरुवात खरी झाली ती इथे. पहिल्याच प्रवासात, बस पहाटे थांबली आणि जाग आली. अंधार होता, अजून उजाडायचे होते. काहीतरी ओळखीचा वास येत होता. खाली उतरलो. बघतो तर समोरच एका प्रचंड मोठ्या कढईमधे चक्क कांदेपोहे. तो पर्यंत माझी समजूत हीच की कांदेपोहे ही आपली मराठी माणसाची खास मिजास आहे. माझी मिजास मोडून पडली त्या दिवशी. इतके सुंदर कांदेपोहे क्वचितच खाल्ले आहेत मी. कांदेपोह्यांवर बारीक शेव घालून खायची खोड लागली ती तिथूनच. इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच. बर्याच टपर्यांसमोर रबडीची पण कढई असायची. दुधीहून बस कुठलातरी एक घाट, महू वगैरे करत १० वाजेपर्यंत इंदौर गाठायची
माळव्यातली थंडी / गरमी दोन्ही बघितली. थंडीच्या दिवसात संध्याकाळी ६-६.३० च्या सुमारास लोकमान्य नगरातून गावात जायला बाहेर पडायचं, मस्त भटकायचं. जेल रोड, छप्पन दुकान, रेल्वे स्टेशन जवळचा बाँबे पावभाजी वाला (त्या वेळी आख्ख्या इंदौर मधे हा एकमेव पावभाजी वाला होता) अशी सगळी ठरलेली ठिकाणं होती. राजवाड्यावर मस्त 'पानीपतासे' (पाणीपुरी) मिळायचे. कचौरी तर इंदौरचीच. तळहाताएवढी मोठी. त्यात व्यवस्थित अनमान न करता भरलेलं सारण. त्याच्यावर हिरवीगार मिरचीची चटणी किंवा 'खटाई'... स्वर्गिय. त्यावेळी राजवाड्यावर जी.एफ. कचौरीवाला म्हणून एक प्रकार होता. हे साहेब संध्याकाळी ७-७.३० ला एका गाडीवर कचौरीचे दुकान थाटत असत. बरं त्यांचा माज आपल्या चितळ्यांपेक्षाही मोठा. त्यांचा ठेला ठराविक वेळच तिथे असे. ही कचौरी कशाकरता प्रसिध्द तर, तिखटपणासाठी. दोन कचोर्या खाऊन दाखव म्हणून पोरांच्या पैजा लागत. (जी.एफ. म्हणजे काय ते कळले नसेल तर गरजूंनी व्य. नि. करावा ;) ) उनाडक्या करत / खादाडी करत मनसोक्त भटकायचं आणि मग शेवटी सराफ्यात जायचं. घट्टंऽऽऽ रबडी (बरेच वेळा ती रबडी घरी वगैरे हाताने खाल्ली आहे आणि प्रत्येक वेळी साबण लावून हात धुवावे लागले आहेत तेव्हा कुठे हाताचा ओशट पणा कमी व्हायचा, जात नसेच पूर्णपणे) आणि इतर मालमसाला हादडायचा आणि त्या थंडगार हवेत, वार्यात कुडकुडत 'टेंपो' मधे बसून परत लोकमान्य नगर.
गरमी (आपल्याकडे उन्हाळा म्हणतात, इंदौरला मात्र गरमीच असते) मधे दुसरीच मजा. 'मधुशाले'ची. जागोजागी, कोपर्या कोपर्या वर मधुशाला. आधी कळलंच नाही हा काय प्रकार आहे ते. मधुशाला म्हणजे उसाच्या रसाचं दुकान. आणि तो रस सुद्धा एक माणूस तो चरक हाताने फिरवणार आणि दुसरा तो रस गोळा करत करत गिर्हाईकांना देत राहणार. आम्ही रात्री जेवण झालं की लोकमान्य नगराच्या गेट पाशी एक मधुशाला होती तिथे तासन् तास बसायचो. फक्त ४० पैशात एक मोठ्ठा बंपर भरून रस मिळायचा. आम्ही १-१ २-२ तास सहज तिथे टवाळक्या करायचो. माझे मित्र, ताईच्या मैत्रिणी कधी कधी मोठे लोक नाहीतर आम्ही सगळे पोरंपोरीच असे १५-२० जण तरी असायचो. माळव्यातली गरमी कडक असली तरी मुंबईसारखं उकडत नाही आणि रात्री हवा खूपच छान असते.
आम्ही मुंबईचे (माझ्या बाबांना शेजारपाजारचे लोक बंबई वाले सेठ म्हणायचे) त्या मुळे भाज्यांच्या किंमती वगैरे मुंबईच्याच सवयीच्या. नविन असताना एकदा दुपारी दारावर भाजी वाला आला. आईला काहितरी हवं होतं म्हणून आईने त्याला हाक मारली. भाव विचारले, टोमॅटॉ ५० पैशे किलो म्हणाला. आई फक्त आनंदाने नाचली नाही एवढंच. तिने चक्क ५-६ किलो टोमॅटो घेतले. मस्त सॉस करू वगैरे. शेजारच्या काकू त्यांच्या घराच्या ओट्यावरून बघतच होत्या. त्यांची लगेच कॉमेंट, 'तुम्ही काय बाई, मुम्बई वाले, परवडतं तुम्हाला.' आईला काही कळेना. तेव्हा काकूंनी खुलासा केला, 'अहो, गावात / मंडईत जा, ३०-३५ पैश्याच्यावर कोणी घेणार नाही. तुम्ही चांगले ५० पैशे देऊन घेतले चक्क.' आमचा सगळा आनंद एका क्षणात वार्यावर उडून गेला. इंदौर मधे असे पर्यंत आईने कोथिंबिर / आलं वगैरे कधी विकत घेतलं नसेल, भाजी घेतली की बचकाभर कोथिंबिर न मागता पडायचीच पिशवीमधे.
इंदौरची भाषा हाही काही एक औरच प्रकार आहे. ना धड हिंदी ना धड मराठी. एकदा आमच्या शेजारचा मुलगा संध्याकाळी आला आणि माझ्या आईला म्हणाला 'काकू, आई है क्या? बाबा आये है ऑफिसमेसे.' :) भाषिक ठेचा तर पदोपदी लागत होत्या. एखादा अत्रे / करमरकर नावाचा पोरगा अतिभयंकर आणि अतिशय कष्टाने मराठीत बोलत असेल हे माझ्या साठी काहितरी विचित्रच होतं. सवय झाली हळूहळू पण सुरुवातीला मात्र भयंकर वाटायचं. बरं त्या बोलीवर खास माळवी संस्कार आहेत. कोणताही इंदौरी माणूस 'हो' म्हणणार नाही. त्यांच्या भाषेत 'हाव' म्हणतात. (हा शब्द उच्चारात 'हाव' आणि 'हाउ' या मधे कुठेतरी येतो). 'मे आ रिया था / जा रिया था' असे सूरमा भोपाली छाप उच्चार.
अशा या इंदौरने एक खूप मोठा ओरखडा पण दिला आहे मनाला. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. पूर्ण देशात हिंसाचार भडकला. असं म्हणतात दिल्लीच्या खालोखाल इंदौर मधे शीखांचं शिरकाण झालं. इंदौर मधे शीखांची वस्ती खूपच आहे. एक खूप मोठा आणि सुंदर गुरुद्वारापण आहे तिथे. त्या दिवशी आई आणि ताई गावात गेल्या होत्या. अचानक गडबड सुरू झाली. लवकर घरी जाऊया म्हणून त्या गुरूद्वारापाशी टेंपो पकडायला म्हणून आल्या. त्याना हे शीखांचं वगैरे माहितच नव्हतं. त्या तिथे पोचेपर्यंत एक मोठा जमाव पण तिथे जाळपोळ करत आला. त्या भागात बरीच दुकानं शीखांची असावित. तो जमाव ती दुकानं जाळत होता. अचानक त्यांच्या ताब्यात एक शीख सापडला. त्या जमावाने त्याला खूप मारलं आणि शेवटी त्याच्या गळ्यात टायर टाकून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळला. तो पळायला लागला तर त्याला काठ्यानी ढकलून ढकलून पाडलं. मी नंतर नुसतं ऐकलं तर खूप त्रास झाला. प्रत्यक्ष बघणार्यांची अवस्था तर कल्पनेपलिकडे झाली होती.
पण हा प्रसंग एक सोडला तर माझ्या मनावरचं इंदौर नावाचं गारूड कायम राहिल शेवटपर्यंत. आता इंदौरला जाणं होतं क्वचित. ओळखूसुध्दा येणार नाही इतकं बदललं आहे. ते आता एक शहर झालं आहे. सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. जिथे आम्ही रहात होतो तो भाग तर आपला वाटतच नाही आता. १०-१५ मिनिटं गल्ल्यागल्ल्यातून फिरलो तेव्हा घर सापडलं. दुसरेच कोणीतरी रहात होते तिथे. एकदा वाटलं दार वाजवावं, घर आत जाऊन बघावं पण पाऊल पुढे नाही पडलं. जे माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं घर आहे ते मला तिथे दिसणार नाही याची खात्रीच होती. माझ्यापुरतं माझं इंदौर माझ्याजवळ आहेच की. लोकांसमोर काय हात पसरायचे.
जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.
*****
आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.
आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 12:13 pm | यशोधरा
खूप छान लिहिलय बिपिन भौ...
17 Oct 2008 - 2:33 pm | टारझन
कालचं बिप्पीन भौंनी आम्हाला हा लेख ताजा ताजा वाचायला दिला होता .. पोहे गरम होते, मस्त कुरकुरीत बारीक शेव टाकलेले लिंब पिळल्याले पोहे .. आणि एक मसालेचहाचा घोट .. आहाहा !! चियर्स विजाभौ .. झकास आवडले .. पहिले वाचक आम्हीच पण मिपा गंडल्यामुळे प्रतिक्रियेस उशीर झाल्याबद्दल सॉरी शक्तिमान !!!
असो .. यावेळीही बिप्पीनभौ आमच्या टिकाकार नजरेतून वाचलेले आहेत.. अभिनंदन .. भाउ .. अपेक्षा अंमळ आहेत बरकां आता !! पाणचट लिखाण केल्यास माझा भलामोठा प्रतिसाद पचवायची ताकद ठिवा .. पुन्हा म्हणाल काउंटर ऍटॅक विदाऊट वॉर्निंग. :)
उत्तम लिखाणाकरता शुभेच्छा!!!
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
17 Oct 2008 - 12:16 pm | मनिष
बिपिनभौ - झकास लिहून राहिलात तुम्ही! और आने दो! :)
17 Oct 2008 - 12:17 pm | रामदास
माळव्याची ख्यातीच आहे, पग पग रोटी डग डग नीर.
तीळाच्या पट्ट्या आणि मावाबट्टी राहीलीच की.
17 Oct 2008 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो हो ना...
तीळपट्ट्या तर राहिल्याच पण 'गजक' पण राहिले लिहायचे. तसा माझा गोडाकडे जराकमीच कल. आणि काय काय लिहिणार हो... कितीही लिहिलं तरी कमीच आहे.
बिपिन.
17 Oct 2008 - 12:56 pm | गणा मास्तर
लै भारी लिहलय लेका जाम आवडल
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
17 Oct 2008 - 1:07 pm | नंदन
लेख, अतिशय आवडला.
>>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.
-- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Oct 2008 - 8:33 pm | कोलबेर
इंदोरची सफर खूपच आवडली. 'खीर कदम' हा गोडाचा प्रकार इंदोरचाच ना? इंदोरी शेव देखिल मस्त असते.
17 Oct 2008 - 1:07 pm | नंदन
लेख, अतिशय आवडला.
>>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.
-- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Oct 2008 - 1:32 pm | झकासराव
बिपीन भाऊ मला एक शंका आहे. तुम्हे एवढ छान लिहिता तर आधीच का नाही सुरवात केली. :)
खाद्ययात्रा छान आहे.
तुम्ही लिहिलेला ओरखड्याने मन शहारल. खरच त्यावेळी मानसिकता कशी असेल जाळणार्याची?? :(
मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. :(
इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच>>>>>>>>>
अशा टपरीवर खाल्लेल्या पोह्यांची चव घरात केलेल्या पोह्यांपेक्षा किती तरी सरस का असते ह्याच उत्तर मला जुन देखील नाही मिळालेले.
अवांतर : एष्टी ष्टँडाजवळ अनेक टपर्या असतात. त्यातल्या कुठल्याही टपरीवर जावुन सकाळी सकाळी पोहे खाण्यात काय मजा असते राव. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Oct 2008 - 2:17 pm | भोचक
बिपीन भाऊ
अतिशय 'चविष्ट' लेख. तुम्ही पाहिलेलं त्या काळातलं इंदूर वाचून मजा आली. आता इंदूर खरोखरच बदललं आहे. ते इंदौर झालं आहे. इंदूरच्या खाद्ययात्रेबद्दल काय बोलायचं. (तो विषय बोलण्याचा नाही खायचा आहे:) माझ्या लेखाने तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला यातच लेख लिहिल्याचं समाधान. लेखाचं 'भरतवाक्य' तर खासच. बाकी त्यातल्या मनावर ओरखडा उमटवणार्या घटनांनी शहारा आणला. इंदूरमध्ये जातीय दंगलीचं प्रमाण अजूनही आहे. काही दिवसांपूर्वीच जोरदार दंगल झाली. त्यावेळी शहर पाच दिवस कर्फ्युने बंद होतं. बाहेर जाण्याचेही वांधे झाले होते.
बाकी इंदूरच्या खाद्ययात्रेवर लिहिलेला हा लेख कृपया जरूर पहा. काळ कितीही गेला तरी इंदूरची स्वादिष्ट ओळख आजही कायम आहे. याचा हा पुरावा:)
http://bhochak.mywebdunia.com/2008/09/24/1222237320000.html
17 Oct 2008 - 2:30 pm | विजुभाऊ
सर्राफ्यावर मिळणारे शिकंजी राहिली भौ.
तिथे "पाउस आला या ऐवजी पानी आया " असे ऐकुन मी बुचकळ्यात पडलो होतो.
17 Oct 2008 - 2:39 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो, मी शिकंजी नाही प्यायलो कधी. वर म्हणलं तसं गोडाकडे कल कमीच जरा. आणि राहूनच गेलं.
इंदौरला आभाळ भरून आलं की 'बद्दल पानी जैसे हो गये' म्हणतात. बोलीभाषेची सहजता, अतिशय श्रीमंत उपमाशब्द खूपच मस्त आहेत माळव्यातले.
17 Oct 2008 - 2:39 pm | आनंदयात्री
सुरेख लिहलय बिपिन .. तुमचे लेखन वाचायला मजा येते. कधीच कंटाळवाणे निरस नसते.
17 Oct 2008 - 2:41 pm | सहज
बिपीनभौ तुमचे लेखन भारी चविष्ट आहे.
खूप मजा येते वाचायला. लिहत रहा.
17 Oct 2008 - 8:55 pm | प्रमोद देव
बाकी सहजभौंशी सहमत!
17 Oct 2008 - 7:10 pm | प्राजु
आणि प्रकाशित करा वर टिचकी मारल्यावर ठ्ण ठ्ण गोपाळ..
बिपिनदा,
हा तुझा लेख म्हणजे आठवणींचं गाठोडं आहे. इतक्या सुंदर आठवणी, टोमॅटो स्वस्त.. मधुशाला, रबडी.. पोहे विथ शेव... खासच. हे पोहे विथ शेव.. हे तू म्हणतोस तस्म दूधीच्या थांब्यावर पहाटे पहाटे आम्हीही खाल्ल आहे हो. अफलातून इतकंच म्हणेन. आणि ती शेव... मीरे घातलेली आणि तिखटसर अशी मस्त लागते.
माझ्या जावेचे वडील... "कसे आहात काका?" असं विचारलं की, "एकदम बढीया" असं सांगतात. हा बढिया शब्द मी इंदौरमधे किती वेळा ऐकला त्याला काही मोजमाप नाही.
तुझा लेख खूप आवडला. लेखाचा शेवट मात्र उदास करून गेला रे. असं व्हायला नको होतं....
पुन्हा तुझ्या त्या बालमैत्रीणीबद्दल वाचूनही खूप वाईट वाटलं. असो...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Oct 2008 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खोबरागढ़चे बिपीनचंद्रराजे, लय भारी लिहिलं आहे, एकदम बढीया!
खरंच तुम्ही एवढे दिवस, आठवडे, महिने तुमची लेखणी, आपलं कीबोर्ड फक्त प्रतिसादांपुरताच मर्यादित का ठेवला होतात?
17 Oct 2008 - 10:19 pm | भाग्यश्री
अगदी सहमत.. इतके दिवस कुठे होतात?? :-?
हल्ली मी नवे लेखन मधे फक्त नावं वाचते कुणी कुणी काय लिहीलंय... त्यात तुमचं नाव दिसलं की ते सगळ्यात आधी वाचायला घेते..
यावरून समजा काय ते! :)
18 Oct 2008 - 11:13 pm | मेघना भुस्कुटे
अगदी असंच म्हणते.
खूप दिवसांनी वेळ मिळाला, म्हणून तुमचे बरेच लेख आत्ता एकदम वाचले. आता लिहिल्यावाचून राहवेचना. कुठे लपला होता?
17 Oct 2008 - 7:31 pm | दत्ता काळे
इंदौरच चित्र डोळ्यासमोर उभ राह्यलं
17 Oct 2008 - 7:45 pm | रेवती
बिपिनभाऊ,
मस्त लिहिलं आहे. मलाही इंदौरला नेहमी जावेसे वाटते. माझी वहिनी इंदौरची असल्याने तिच्याकडून वर्णन ऐकले आहे. कचोरी, पोहे व त्यावर शेव असं सगळं तिच्याकडून ऐकले आहे. इंदौरला जायचा योग अजून आला नाही.
मी हैदराबादला असताना, तिथेही भाजी घेतल्यावर कोथिंबीर व कढीपत्ता जास्तीचा द्यायचे. कढीपत्त्याचे झाड बर्याच लोकांच्या दारात असते तसे माझ्याकडेही होते (घरमालकांनी लावलेले). मला त्याचं इतकं अप्रुप होतं.
रेवती
17 Oct 2008 - 9:09 pm | पांथस्थ
इंदोरच्या खाद्य संस्कृतीचे वर्णन एकदम फक्कड आहे. लेख इतका खमंग खुसखुशीत रसरशीत चटकदार झालाय कि तो वाचला नाहि तर खाउन टाकला असे म्हणावे लागेल!
(इंदोरची चव चाखलेला) पांथस्थ...
17 Oct 2008 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे
बिपीनभौ इंदौर ला एकदम सुंदौर करुन टाकलस. आवाल्डा लेख
प्रकाश घाटपांडे
17 Oct 2008 - 9:22 pm | स्वाती दिनेश
बिपिन,इंदौरची सफर आवडली.. मस्त लिहिले आहेस.
(पण जरा ते खोबारला सरकव की पुढे..:))
स्वाती
17 Oct 2008 - 10:06 pm | शितल
मस्त लिहिले आहे.
:)
17 Oct 2008 - 11:06 pm | चतुरंग
बिपिनभौ, तोडलंत! एकदम झकास.
आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.
आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....
अहो शंकाच नको! हा लेख तुम्हाला स्फुरलेलाच आहे. आठवून वगैरे असं भन्नाट लिखाण होत नसतं. ते असं एकदमच येतं, दूध उतू गेल्यासारखं.
इंदौरची महती ऐकत आहे गेली कित्येक वर्ष पण आज मात्र ठरवून टाकले पुढच्या भारतभेटीत इंदौर नक्की!
चतुरंग
18 Oct 2008 - 9:10 am | विसोबा खेचर
बिपिनकाका,
इंदुरातली तुमची खादाडीची सफर अत्यंत विलोभनीय आहे! :)
आपला,
(इंदुरी) तात्या.
18 Oct 2008 - 10:54 am | जैनाचं कार्ट (not verified)
जबरा ! विपीन !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
18 Oct 2008 - 11:13 am | संजय अभ्यंकर
मानसिक यातना दिल्याबद्दल बिपिनभाऊंचा निषेध!
आमचे मूळ गांव देवास.
माझ्या बालपणची काही वर्षे उज्जैन मध्ये गेली.
इंदूर, धार, देवास, शाजापूर येथे नातेवाईक असल्या मुळे कधीमधी ह्या गावांनाही भेटी देत असू.
भल्या पहाटे उठून ढाब्या वरची गरमागरम जिलबी दुधात बुडवून खाणे ह्याचा आनंद काय वर्णावा!
एकंदर माळव्याची खाद्य संस्कृती हा एक संशोधनाचा विषय आहे.
त्या वरची चर्चा माळ्वी लोकही (खाता खाता ) करित असतात.
विविध चवींचे पदार्थ खाणे हया बाबत माळ्वी लोक
आताही माळव्यात गेलो की रोज विविध पदार्थांवर धाड टाकीत असतो.
बिपिनभाऊंचा लेख वाचून वाटले कि आता उठावे आणी इंदूरला जावे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
18 Oct 2008 - 2:54 pm | ऋषिकेश
तोडलंस मित्रा!!
अतिशय सुरेख लेखन!!! खूप खूप खूप आवडलं..
-(बिपिनच्या लिखाणाचा नवा पंखा) ऋषिकेश
18 Oct 2008 - 4:46 pm | वल्लरी
डोळ्यासमोर इंदोर चे चित्र उभे राहिले .
अफलातुन वर्णन...........अतिशय सुरेख लेख!!!!!!!!!
नम्बर १..L)
19 Oct 2008 - 1:26 am | बैल्र रिकामा
छान....वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....अहो, हा बैल रिकामा मूळचा इंदौरीच की हो भौ.....
आम्हाला इंदौर सोडून आता तिसावर वर्षं झाली....पण पुणं, मुंबई, दिल्ली वगैरेच्या मानानं अजुनहि इंदूर आणि इंदूरकर मस्तच आहे राव....म्हणजे ते म्याक्डोनाल्ड आणि पिझा हट वगैरे आलं, तरी खास इंदौरीपणा पण पदोपदी जाणवतोच....असो....
19 Oct 2008 - 1:40 am | भडकमकर मास्तर
चित्रदर्शी लेखन...
मस्त जमलाय लेख...
.... अजून लिहीत रहा.. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Oct 2008 - 1:50 am | धनंजय
इंदौरला खूप लहानपणी गेलो होतो. त्याची थोडीच आठवण आहे - तुमचा लेख चित्रदर्शी आहे, त्यामुळे आता तुमच्याबरोबर फिरून आलो.