'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.
यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील.
यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडूनही भरून घ्या. तुमच्या माहितीत असे आणखी पालक किंवा पाल्यं असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्वेक्षणाचे दुवे पोचवा.
या प्रश्नावल्यांतून जमा झालेल्या माहितीचं संकलन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष घेऊन आम्ही येऊच!
मदतीसाठी आपले अनेक आभार!
पालकांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=15d-pTRH8Sd83-dn5APxKRLxBuU6fSeormMkNjD...
पाल्यांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=1TsILIyGdbh2iy-O449_8i6XolchjcDfs9wKX2I...
प्रतिक्रिया
12 Jun 2017 - 6:39 pm | खेडूत
मस्त उपक्रम.
भाग घेईनच. अंतिम तारीख काय आहे?
12 Jun 2017 - 6:49 pm | आदूबाळ
धन्यवाद!
अंतिम तारीख अजून ठरली नाही. पुरेसे प्रतिसाद येईपर्यंत त्रास देत राहीन.
12 Jun 2017 - 7:02 pm | मुक्त विहारि
"जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल,"
ये बात कुछ हजम नहीं हुई......
आता हे वय जर मानसिक असेल तर आमच्या माता-पित्यांना भरायला संगतो...
आणि
शारिरीक असेल तर बायकोला सांगतो...
आमच्या मानसिक आणि शारिरीक वयाचे गणित भल्या भल्यांना सुटत नाही.... आनच्या आईचे आणि आमच्या बायकोचे एका बाबतीत ठाम मत, की आमचे मानसिक वय तसे कमीच.
वरील प्रतिसाद हा श्री.आदूबाळ ह्यांनाच आहे. अर्थात ज्यांचे मानसीक वय आमच्या इतकेच आहे, त्यांनी प्रतिसाद दिलात तरी चालेल.....
12 Jun 2017 - 7:13 pm | आदूबाळ
मानसिक वय ७ ते १८ असेल तर फॉर्मही मनातच भरायचा आहे.
12 Jun 2017 - 7:16 pm | मुक्त विहारि
बायकोच्या मदतीने भरतो....
(कुणास ठाऊक तिच्या मते, आमचे मानसीक वय ७च्या पण खाली असावे.उगाच नाही अद्याप ही आम्ही ७च्या आत घरात येत.)
12 Jun 2017 - 7:27 pm | धर्मराजमुटके
प्रश्नावलीत प्रॉब्लेम आहे ! जर मला वाचनाची आवड आहे आणी मला
हा प्रश्न टाळायचा आहे कारण त्याच्यात मला अपेक्षीत उत्तर नाही. तर प्रश्नावली पुढे जाऊ देत नाहिये.
12 Jun 2017 - 7:33 pm | आदूबाळ
धन्यवाद!
परत प्रयत्न करता का? आता त्या प्रश्नात "इतर" असा पर्याय घातला आहे. तिथे तुमचं कारण लिहू शकता.
12 Jun 2017 - 8:00 pm | धर्मराजमुटके
प्रश्नावली भरली आहे ! प्रश्नावली अगदी ढोबळ आहे. होकारार्थी उत्तरेच जास्त येण्याचा संभव आहे. उत्तरे खरी आहेत की खोटी हे तपासणीसाठी काही चेक्स हवे होते असे वाटते. उदा. नुकतेच कोणते पुस्तक वाचले ? आवडता लेखक कोणता ? वगैरे. म्हणजे हेच नाही अशासारखे काही.
असो. उपक्रमास शुभेच्छा ! निकाल कळवा.
12 Jun 2017 - 7:39 pm | प्रीत-मोहर
आबा पण मी पालक ही नाही आणि पाल्य ही नाही त्यामुळे आता सर्वेक्षणाच्या निकालाचीच वाट बघते :)
12 Jun 2017 - 7:53 pm | अभ्या..
पाल्योच्छुक(कींवा वानाबीपालक) वाचकासाठी एक वेगळी प्रश्नावली ठेवाया पाहिजे होती आदूबाळा.
कुठल्याच गटात आपन बसत णाही ही भावणा लै बेक्कार.
12 Jun 2017 - 7:55 pm | प्रीत-मोहर
नको रे बाबा. मला ही भावना णाही!!!!
त्यापेक्षा आबा ला मदत नाही करता आली ही भावना होती
12 Jun 2017 - 9:07 pm | mayu4u
-अजूनही बालसाहित्य आवडीने वाचणारा ३१ वर्षांचा घोडा.
12 Jun 2017 - 7:59 pm | राही
प्रश्नावली सर्वसमावेशक आहे. पण ती न भरता काही सर्वसाधारण निरीक्षणे :
दहा वर्षांपर्यन्तच्या मुलांना निवड करता येते का?मला वाटते पालकांना त्यांच्या लहानपणी आवडलेली पुस्तके जसे फास्टर फेणे वगैरे पालक आणून देतात. त्याहून लहान मुलांना सुंदर चित्रे असलेली पुस्तके आवडतात. आशयाशी संबंध नसतो. किशोरवयीन अभ्यासू मुले शाळेतल्या ग्रंथालयात असलेली पुस्तके वाचतात. पण इतर किशोरवयीन मुले मात्र त्यांची आवड आणि त्या ठिकाणची पुस्तका़ची उपलब्धता यावर निर्णय घेतात. क्रिकेट, चित्रपट आणि इन्ग्लिश माध्यमातली किशोरवयीन मुले टिंकल कॉमिक्स, स्पोर्ट्स मॅगॅझिन्स, (अजूनही)हार्डी बॉयिज आणि सीक्रेटस,सस्पेन्स वगैरे वाचतात. सोळासतरा वयाच्यापुढे मात्र चोरून वाचण्यासारख्या मजकुराचे आकर्षण वाढते.
उत्तरांमध्ये शहरी/ग्रामीण/ महानगरी/दूर अंतर्गत अश्या भौगोलिक विभागांनुसार प्रचण्ड विविधता येऊ शकते. अशी विविधा माहिती संकलित होत आहे हे खूप छान आहे. उपक्रम आवडला आणि शुभेच्छा.
12 Jun 2017 - 8:36 pm | आदूबाळ
धन्यवाद राहीताई. वय आणि निवड यात परस्परसंबंध आहे का हे विश्लेषणातून समजेलच. आणि विविधता पहायची आहेच.
तुमच्या माहितीत कोणी पालक-पाल्यं जोडी असेल त्यांना या लिंका नक्की पाठवा!
12 Jun 2017 - 8:00 pm | आदूबाळ
अभ्या, प्रीमो - असं नै.
गेला काही वर्षात वाचनसवयी कशा बदलल्या हे जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. त्यासाठी "पूर्वी" आणि "नंतर" हे दोन बिंदू पाहिजे होते. त्यासाठी "पालक" आणि "पाल्य" अशी योजना आहे. म्हणजे जनांच्या प्रवाहातलं हे ओंजळभर पाणी आहे, सँपल आहे. पाल्योच्छुक/वानाबीपालकांना वगळायचा डाव नाहीये.
हा सर्व्हे कायम चालू ठेवू. मग कोणत्याही गटात मोडायला लागलात की पहिलं काय करायचं तर येऊन सर्व्हे भरायचा ;)
12 Jun 2017 - 8:08 pm | अभ्या..
बेस्ट..
लाभता पालकपण बरवे
आधी येऊन भरावा सर्व्हे
=))
.
=))
12 Jun 2017 - 8:36 pm | खेडूत
लाभता पालकपण बरवे
आधी येऊन भरावा सर्व्हे
तो भरता आदूबाळ ठर्वे
कश्या असती वाचनसवयी ..
12 Jun 2017 - 8:54 pm | प्रीत-मोहर
लोल :P
13 Jun 2017 - 1:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ अभ्या.. आणि खेडूत,
लै भारी शीघ्रकाव्यप्रतिभा (की, प्रसुती) ! =))
12 Jun 2017 - 9:49 pm | वीणा३
सर्व्हे ऑफिस मध्ये असल्यामुळे भरता येत नाहीये पण घरी जाऊन नक्की भरेन.
माझे स्वतःचे थोडे मराठी बालसाहित्याचे प्रॉब्लेम्स सांगते. अवांतर वाटले तर काढून टाका प्लिज.
१. यूट्यूब वरचे लहान मुलांच्या गोष्टींचे विडिओ
पंचतंत्र / रामायण / महाभारत / हनुमान / घटोत्कच - ह्या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये प्रचंड हिंसा , लबाडी , कपट , एकमेकांवर कुरघोडी , फसवणूक , खोटेपणा इ गोष्टी दाखवल्या आहेत. उदा. हनुमान सूर्याला पकडायला गेल्यावर सूर्य त्याच्यावर अस्त्र सोडतो - मुलाचा प्रश्न => त्याने लहान मुलाला का मारलं समजावलं का नाही (वय वर्ष ५). महाभारत, पंचतंत्र समजावताना वाट लागली.
कितीतरी ऍनिमेटेड विडिओ मध्ये कोणीतरी शेवटी मरतो, आणि ते अक्षरशः रक्त इ दाखवून सांगतात.
२. मराठी पुस्तक - इथेही भरपूर प्रमाणात हिंसा , लबाडी , कपट , एकमेकांवर कुरघोडी , फसवणूक , खोटेपणा इ गोष्टी दाखवल्या आहेत. सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे चित्र अतिशय कमी. इसापनीती च्या मराठी पुस्तकात जवळपास एकही चित्र नाही, तेच इंग्रजी पुस्तकात प्रत्येक १/२ पान चित्र आणि १/२ पान गोष्ट. लहान मुलांना चित्र जास्त आवडतात, नुसती अक्षरं बघून कंटाळतात. मी अप्पा बळवंत चौकात १५-२० दुकानात वेग-वेगळ्या प्रकाशनाची पुस्तक बघितली, मला तरी एकपण भरपूर चित्र असलेलं पुस्तक दिसलं नाही (अगदी नाही म्हणायला १-२ मिळाली :प, पण खरंच १-२नच )
कधी कधी मराठी पुस्तकं बघून असं वाटतं कि १ ते ५-६ या वयोगटाचा विचारच केलेला नाहीये. या मुलांची एकाग्रता, एका जागी बसायची तयारी खूप कमी असते. मला मुलाला मराठी शिकवायची इचछा असूनही मला ते पुस्तक - विडिओ माध्यमातून एवढ्यात तरी करता येणार नाही.
३. तुलनेने मराठी गाण्याचे विडिओ छान आहेत.
४. सध्यातरी स्वतः अभिनय करून गोष्टी सांगणं सुरु आहे
13 Jun 2017 - 3:09 am | इडली डोसा
१.
मुलांच्या अवती भवती जे घडतय त्या बद्दलच्या गोष्टी त्यांना या वयात जास्त रिलेट करता येतात. त्यामुळे रामायण महाभारत या वयोगटातली मुलं रिलेट करु शकणार नाहित अस वाटतं.
२.
>> माधुरी पुरंदरेंची पुस्तकं चांगली आहेत, पण या सारख्या अजुन पुस्तकांची गरज आहे.
४.
हे उत्तम >> व्हिडिओ करुन टाकला तर आमची पण सोय होईल =)
13 Jun 2017 - 12:56 am | मयुरा गुप्ते
'बदलतं "मराठी" बालसाहित्य' ह्या विषयासाठी माझा पास. माझी लेक (वय १२) अक्षरशः धो धो, बकाबका ईंग्रजी बालसाहित्य वाचते. त्यामध्ये अनेक विषयांना वाहिलेल्या पुस्तकांचा समावेश करता येईल पण मराठी बालसाहित्य नाहि.
ह्या सर्व्हे मध्ये हॅरी पॉटर विषयी एक दोन प्रश्न दिसले व ईंग्रजी भाषा हा हि पर्याय दिसला. त्याला अनुसरुन सर्व्हे भरला तर चालेल का?
ह्या सर्व्हे मधुन नक्कि काय अपेक्षित आहे?
मदती ऐवजी मी प्रश्नच जास्त विचारले.
-मयुरा.
13 Jun 2017 - 9:34 am | आदूबाळ
हो, अगदी जरूर भरा. तुम्हीही भरा आणि लेकीलाही सांगा.
13 Jun 2017 - 2:59 am | इडली डोसा
पाल्य अजुन वय वर्ष ४ असल्यामुळे सर्वेत भाग घेऊ शकणार नाही.
बाकी वाचायला शिकत असलेल्या आणि नुकत्याच वाचन सुरु केलेल्या मुलांसाठी मराठीत मला जास्त साहित्य आहे असं वाटत नाही. लेकिसाठी माधुरी पुरंदरेंची पुस्तकं आणली आहेत पण ती वाचुन आठवडाभरातच पाठ झाली आणि आता नविन पुस्तकं शोधावी लागतील. (मी लहान असताना चंपक, ठक ठक अशी कॉमिक्स वाचत असे पण ते सुद्धा पहिली पासुन पुढे.)
13 Jun 2017 - 10:25 am | कलंत्री
किशोर, चांदोबा, लहानमुलांच्या गोस्टीची पुस्तके, रविवारचा लोकसत्तातील बालरंग आणि गावकरील बालगोस्टी हे वाचताना लहानपण खर्याअर्थाने रम्यच झाले.
पूढे पूढे तर भेळीच्या कागदावर काहीतरी वाचायला मिळते हे समजले आणि पुस्तकांचा शोध घेण्याचा शोध थांबला.
प्रश्नावली भरतोच.
13 Jun 2017 - 11:07 am | जागु
चांगला उपक्रम आहे.
13 Jun 2017 - 1:23 pm | आदूबाळ
नमस्कार, आणि सर्वांना धन्यवाद. बरेच प्रतिसाद आले आहेत, अजूनही येताहेत.
पालकांच्या प्रतिसादाच्या तुलनेत पाल्यांचे प्रतिसाद कमी येताहेत. एक विनंती - तुम्ही तुमच्या / तुमच्या ओळखीच्या पाल्यांना सर्व्हे पाठवू शकता का? पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरू होतील, त्यामुळे कदाचित त्यांना पकडणं मुश्किल होऊ शकेल.
13 Jun 2017 - 2:22 pm | किसन शिंदे
या सर्वेक्षणाचे निकाल रोचक असतील बहुदा. गेल्या १५ वर्षात बालसाहित्याची व्याख्या पूर्णपणे बदललेली दिसत्ये. सर्वेक्षणाचा निकाल इथे टाकायला विसरू नको.
13 Jun 2017 - 2:25 pm | आदूबाळ
नक्की टाकणार!
किंबहुना सगळा अंकच वेगवेगळ्या अर्थाने रोचक असेल (अशी आशा आहे.)
13 Jun 2017 - 5:10 pm | रायनची आई
माझा मुलगा 5 वर्षाचा आहे..मागील वर्षी मिपावरच जागतिक पुस्तक दिनानीमित्त लेखामाला झाली होती. ती वाचल्यानंतरच मी मुलाला वाचण्याची आवड लागण्यासाठी इंग्लिश, मराठी गोष्टींची पुस्तके आणून वाचून दाखवू लागले. इंग्लिश मधे स्टोरी बुक्स चे खूप पर्याय आहेत. पण दुर्दैवाने मराठी मधे खुपच कमी बालसहित्य आहे. दादर च्या आयडियल बुक डेपो मधे जाउन पण 1-2 च पुस्तके मिळाली.
एकनाथ आव्हड म्हणून एक लेखक आहेत. त्यांची काही चांगली पुस्तके बाजारात आहेत. बाकी लोकसत्ता च्या रविवार च्या पुरवणीत सुंदर गोष्टी येतात त्या वाचून दाखवते..
बाकी वर वीणा हिने म्हटल्याप्रमाणे पंचत्ंत्र मधे तरी प्रचंड हिंसा आहे..वाचताना आपल्यालाच वाटते की हे काय मुलाला वाचून दाखवत आहोत.. .
30 Sep 2017 - 12:57 pm | आदूबाळ
नमस्कार.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वांचे खूप खूप आभार.
सर्वेक्षणाचं विश्लेषण आणि निरीक्षणं, निष्कर्ष येथे वाचता येतील.
'रेषेवरची अक्षरे'चा बालसाहित्य अंक येथे वाचता येईल.
या लेखावरच्या (आणि संपूर्ण अंकावरच्या) प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
2 Oct 2017 - 5:39 am | कंजूस
बालसाहित्य अंक पिडिएफ येण्याची वाट पाहतो आहे
5 Oct 2017 - 4:44 pm | vcdatrange
वावात्ट बध्नोय
5 Oct 2017 - 5:52 pm | सिरुसेरि
अंक वाचनीय आहे . गणेश मतकरी यांचा लेख आवडला .