तो गायक होता,
तो गवई होता,
तो रंगिला होता,
तो रसिला होता,
तो दर्दभरा होता,
तो गोड होता,
तो कमालीचा सुरेल होता,
तो लयदार होता,
तो पेचदार होता,
तो अष्टपैलू होता,
तो अवलिया होता,
तो एकमेवाद्वितीय होता,
तो जिनियस होता...!
हम जवान थे उन दिनोंकी बात है! माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचे ते दिवस होते. वर्ष १९८७. असेन बहुधा तेव्हा एफ वाय किंवा एस वाय बी कॉमच्या वर्षाला. केट्या नेहमीच पडत त्यामुळे नक्की कितवीत होतो ते आता आठवत नाही! :) सुरांची आवड अगदी लहानपणापसून.. गाणं ऐकत होतो, मधुकरवृत्तीने टिपत होतो, कुणा भल्या गुणिजन मंडळींच्या पायाशी बसून कधी कधी शिकतही होतो. सूर म्हणजे काय, लय कशाला म्हणतात ही न सुटणारी कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत होतो. दिवस मोठे मजेत जात होते. कालेजच्या उपहारगृहातील माझ्या भसाड्या मैफली, गप्पाटप्पा, सतत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असे मी. भारूनच जाण्याचे दिवस होते ते!
त्या दिवसात अखंड साथ होती ती त्याच्या गाण्यांची! (तशी ती अगदी आजहे आहे म्हणा!)
जाने क्या सोचकर, मंजिले अपनी जगह, मुसाफिर हू यारो, आनेवाला पल जानेवाला है, मे शायर बदनाम, ये क्या हुआ, कुछ तो लोग कहेंगे, किसका रस्ता देखे, रातकली एक ख्वाब मे, पग घुंगरू बांधकर, हम है राही प्यार के, एक लडकी भिगी भागीसी......... यादी खूप मोठी आहे!
दिवसेंदिवस मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडत होतो. आणि बस! ठरवून टाकलं एके दिवशी. साला जायचंच एकदा त्याला भेटायला. एकदा तरी पायावर डोकं ठेवायचं याच्या! बस, ठरलं...!
"आपण जाणार त्याच्या घरी त्याला भेटायला..! जाहीर करून टाकलं दोस्तलोकात!
"तो खूप व्हिम्झिकल आहे", "तिथे तुला कोण ओळखतो? हाकलून देतील...!" इत्यादी बर्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण आपला इरादा पक्का होता. मुंबईत राहून त्याच्यासारख्या फिल्मी हस्तीचा पत्ता मिळणं मुळीच अवघड नव्हतं. जुहूचा पत्ता होता.
तो बहुधा १९८७ सालातला जानेवारी महिना होता. रविवारी ध्वनिमुद्रणं नसतात त्यामुळे साहेब घरी भेटतील असा भाबडा अंदाज बांधून एका रविवारी पोहोचलो एकदाचा जुहूला. जुहूतारा रोडवरील त्याचा बंगलाही अगदी लगेच सापडला. मुख्य द्वार खुलंच होतं. तसाच आत घुसलो. 'तो अत्यंत कंजूष आहे त्यामुळे रखवालदार वगैरे ठेवत नाही..' हे ऐकून होतो ते खरं होतं. दारावर मला अडवायला रखवालदार वगैरे कुणीही नव्हतं. बंगल्याच्या आवारात शिरलो. डावीकडेच 'चलती का नाम गाडी' शिणेमातली "बाबू, समझो इशारे.." या गाण्यातली ती गाडी उभी होती! एका क्षणात 'चलती का नाम गाडी' सिनेमातली काही दृष्य माझ्या डोळ्यासमोरून गेली! मी मनातल्या मनातच त्या गाडीला आदाब केला. कधी काळी त्या गाडीत मधुबालाही बसली होती..!
बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेलो, टकटक केली. आतून कुणा एका अत्यंत तिरसट माणसाने दरवाजा उघडला, तिरस्कार भरल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"क्या है..?" भसाड्या आवाजात जोरात खेकसलाच तो इसम माझ्यावर.
"किशोरदासे मिलना है. मै उनका फॅन हू.."
"वो घरपे नही है...बाद मे आओ.." असं म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत फाडकन दार बंद केलं त्या इसमाने!
झालं! आमची ठाणा ते जुहू ही खेप एका क्षणात फुकट गेली होती. मित्रांच्यात हसं झालं. पण मला या सगळ्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्यावरील माझी श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही! मी त्याच्या घरी गेलो म्हणजे त्याने मला भेटलंच पाहिजे असा काही नियम नव्हता. अक्षरश: करोडो चाहते होते त्याचे, त्यापैकीच मी एक..!
१९८७ सालचाच एप्रिल महिना होता बहुधा. त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं. एका रविवारी पुन्हा एकदा उठलो आणि तडक जाऊन थडकलो जुहूला! परत सगळा तोच सीन. मी बंगल्याच्या दरवाजावर टकटक केली. दोन पाच मिनिटं कुणीच दार उघडलं नाही. पुन्हा एकदा बेल मारली. आणि....
खुद्द आमच्या भगवंतानेच दार उघडलं! मी आनंद, आश्चर्य, इत्यादीमुळे थक्क. हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेतील बादशहा उभा होता माझ्यासमोर! पोशाख - टीशर्ट आणि हाफ प्यॅन्ट! :)
क्षंणभर मला काय बोलावं ते कळेना.
"हम्म! बोलो?"
"आपका फॅन हू. आपसे मिलना था एक बार!" मी अडखळत, बिचकतच पुटपुटलो कसाबसा..!
"हम्म! मिल लिये? बहोत मेहेरबानी आपकी. दुबारा जरूर आना..."
इतकं म्हणून गुरुदेव पुन्हा आत निघून गेले! फरक इतकाच की मागल्या वेळच्या त्या माणूसघाण्या इसमाप्रमाणे यावेळेस माझ्या तोंडावर थाडकन दार नाही लावलं गेलं! आता बाहेर मी पुन्हा एकटाच उभा!
पुन्हा एकदा ठाण्याच्या वाटेला लागलो. पण यावेळेस प्रचंड आनंदात होतो. त्याचं दर्शन झालं होतं! सार्या जगातल्या काही मोठ्या गायकांपैकी एकाला मी भेटलो होतो काही क्षणांपूर्वीच.. त्या आनंदात मी घरी आलो. मित्रांना सगळी हकिकत सांगितली.
"अरे तात्या, काय तू पण? का जातोस त्याच्या घरी असा वारंवार अपमान करून घ्यायला? अरे एक नंबरचा चमत्कारिक आणि व्हिम्झिकल इसम आहे तो. आलेल्या पाहुण्यांवर कुत्रं काय सोडतो, लुंगी नेसून दात घासत घासत रेकॉर्डिंगकरता काय जातो!
अरे त्याच्या व्हिम्झिकलपणाच्या इतक्या कथा प्रसिद्ध असताना तू पुन्हा पुन्हा का जातोस त्याच्या घरी? तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही?"
त्याच्यापुढे कसला आलाय स्वाभिमान? ज्याच्या सुरांनी, लयतालांनी माझ्या आयुष्याचे अनेक क्षण समृद्ध केले त्याच्यापुढे कसला आलाय माझा मान नी अभिमान? होती ती फक्त कृतज्ञतेची भावना आणि भक्ति! त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात असेना का तो चमत्कारिक!
पण मंड़ळी, विश्वास ठेवा, सच्च्या भक्तिचं फळ केव्हा ना केव्हातरी मिळतंच. तो अनुभव मला पुढे लौकरच आला. १९८७ सालचाच जुलै किंवा ऑगस्ट महिना असेल! एका रविवारी आम्ही आपले पुन्हा एकदा जुहूला जायला सज्ज! :)
बंगल्याच्या दारावर टकटक केली. कुणा पोरसवदा नोकराने दार उघडलं. घरात घेतलं. मी काही बोलायच्या आतच दिवाणखान्यात असलेल्या एका सोफ्याकडे बोट दाखवत बसा असा इशारा करून तो पोरगा कुठेतरी आत निघून गेला. मी दिवाणखान्यातल्या त्या सोफ्यावर बसलो. समोरच्याच भिंतीवर दादामुनी, अनुपकुमार आणि किशोरदा या तिघांचाही मनमुराद हसतानाचा एक भलामोठ्ठा कृष्णधवल फोटो टांगलेला होता. साला, तो फोटो पाहूनच आपला दिल खुश झाला. फारच सुरेख फोटो होता तो! समोरच अजून एक सोफा होता. त्यावर एक हार्मिनियम ठेवली होती.
दोनच मिनिटात त्या मुलाने माझ्या पुढ्यात आणी आणून ठेवले, चहाचा कप ठेवला आणि तो मुलगा पुन्हा एकदा अदृष्य झाला! च्यामारी, घरातल्या मालकाप्रमाणेच त्याची नोकरमंडळीही बर्यापैकी व्हिम्झिकल दिसत होती! :)
मी पुढ्यातला चहा संपवला. अर्धा तास तिकडे कुणीच आलं नाही की गेलं नाही. मी आपला तसाच त्या सोफ्यावर बसून होतो. थोड्या वेळाने मात्र माझं भाग्य उजळलं. वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून किशोरदा स्वत:च खाली येत होते. यावेळी झक्काससा अंगरखा आणि लुंगी असा पोशाख होता गुरुजींचा! हातात कागदांची कसली तरी चळत होती. ते कागद चाळत चाळतच गुरुजी खाली उतरले आणि माझ्या पुढ्यातल्या सोफ्यावर येऊन त्या हार्मोनियमच्या शेजारी बसले. पुन्हा पाचदहा मिनिटं तशीच गेली. त्यानंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं.
"बोलो भाई, क्या काम है?"
या वेळेस मूड जरा बरा दिसत होता. मी पुन्हा 'आपका फॅन हू, आपसे मिलने आया हू.." असं म्हणत उठलो अन् डायरेक्ट त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं!
"अरे अरे बस बस.."
"आओ बैठो.." असं म्हणून माझा हात धरत मला उठवलं व सोफ्यावर बसवलं.
तो मगासचा मुलगा पुन्हा एक अवतीर्ण झाला. आता त्याच्या हातात चहाचे दोन कप होते. एक किशोरदांपुढे आणि एक पुन्हा माझ्या पुढ्यात!
"चाय पी लो बेटा..! कहासे आये हो? क्या सुनोगे?" असं म्हणून त्यांनी आता समोरची हार्मोनियम उघडली!
मी अक्षरश: हवेत तरंगत होतो. काहीच उत्तर देऊ शकलो नाही. किशोरदांनी चहाचा एक घोट घेतला. पेटीवर हात टाकला, काही कॉर्डस वाजू लागल्या आणि
"पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका.."
या गाण्याच्या ओळी अत्यंत अप्रतीम गुणगुणू लागले.
"इस पथ पर देखे कितने, सुखदुख के मेले
फूल चुने कभी खुशियोके, कभी काटोसे खेले..
जाने कब तक चलना है मुझे इस जीवन के साथ...!"
मंडळी, खरंच काय वर्णन करू त्या सुरील्या दर्दभर्या आवाजाचं? शब्द अपुरे पडतात! एकच सांगतो मी त्या क्षणी माझ्या पत्रिकेतले सगळे ग्रह, सगळी नक्षत्र, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युत्या, या सगळ्याच गोष्टी फार उच्चीच्या होत्या. अक्षरश: जगभर प्रसिद्ध असलेला किशोरदांसारखा अवलिया गवई त्या क्षणी फक्त माझ्या एकट्याकरता गात होता..!
मी भारवलेल्या अवस्थेतच तेथून बाहेर पडलो!
क्षणभर मान्य करू की सुरवातीला लागोपाठ दोन वेळा माझा त्या घरात अपमान झाला. परंतु त्या दिवशी त्याच घरात माझा जो सन्मान झाला होता त्याचं मोल कशात करणार? :)
पण पुलंनी रावसाहेब रंगवताना लिहूनच ठेवलं आहे. "आमची आयुष्य समृद्ध करणाकरता देवाने दिलेल्या मोलाच्या देणग्या या न मागता दिल्या होत्या, न विचारता परत नेल्या!"
शेवटी त्याप्रमाणेच झालं. बरोब्बर २१ वर्षांपूर्वी "कभी अल्विदा ना केहेना.." असं म्हणणार्या हिंदीसिनेसृष्टीच्या या अनभिषिक्त बादशहाने तुम्हाआम्हाला मात्र शेवटचं अल्विदा केलं! तारीख १३ ऑक्टोबर १९८७...!
किशोरदांना निरोप द्यायला माणसांचा महासागर उसळला होता. त्या गर्दीतच एक मीही होतो...! रडवेला झालेला त्यांचा एक चाहता! किशोरदांनी हार्मोनियमच्या सुरांच्या संगतीत त्यांच्या घरी ऐकवलेलं "पंथी हू मे उस उस पथ का.." हे गाणं मला त्या अफाट गर्दीतही ऐकू येत होतं...!
उद्या केवळ त्यांच्या स्मृतीखातर दोन मिनिटांकरता जुहूला त्यांच्या बंगल्यापर्यंत जाणार आहे, त्यानंतर तिथे समोरच असलेल्या समुद्रावर काही क्षण घुटमळणार आहे. समुद्राकडे पाहात नि:स्तब्धपणे उभा राहणार आहे. तेव्हाही पुन्हा 'पंथी हू मे..' चे स्वर माझ्या कानात रुंजी घालू लागतील. अगदी नक्की....!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
12 Oct 2008 - 6:18 pm | श्रावण मोडक
मी भारवलेल्या अवस्थेतच तेथून बाहेर पडलो!
हे भारावलेपण महत्त्वाचे.
12 Oct 2008 - 9:08 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
12 Oct 2008 - 7:04 pm | गणा मास्तर
तात्या क्या बात है
किती भाग्यवान तुम्ही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
12 Oct 2008 - 7:08 pm | यशोधरा
_/\_
अशी वेडी भक्ती करता येणं पण सोपं नाही!!
12 Oct 2008 - 7:55 pm | कलंत्री
आयुष्यात असे सगुणाच्या आणि निर्गुणाच्या मधे उभे रहायला खरेच मोठे भाग्य लागते. त्या भाग्य श्रीमंत तात्याचे अनुभव ऐकणे नव्हे डोळ्यासमोर साक्षात उभे राहणे म्हणजे एक आनंद सोहोळा आहे.
अश्या सोहोळ्यात तात्याने सर्वच मिपाकरांना सहभागी करुन घेतले हा तात्याचा मोठेपणा आणि आपली सर्वाची पूर्वपुण्याईच.
किशोरदाचे हाल क्या है न पुछो न हुजुरे सनम, जिंदगी के सफर मै गुजर जाते है वो मुकाम, मुसाफिर हु यारो, यह लाल रंग कब मुझे छोडेंगा इत्यादी गाण्याचा मीही अतृप्त असा चाहता आहे.
आमचाही किशोरदा ला सलाम.
12 Oct 2008 - 7:59 pm | रेवती
वाचून अंगावर काटा आला. फार छान लिहिल्या आहेत आठवणी. किशोरदांच्या आवाजाबद्दल लिहायला गेले तर मला आधी शब्द शोधायला लागतील.
रेवती
12 Oct 2008 - 8:41 pm | शितल
तात्या,
अगदी भावस्पर्शी लिहिले आहे. :)
तुमच्या साठी त्यांनी एक गाणे गायले आहे ही खुपच कौतुकास्पद बाब आहे.
आणि ती तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलीत हे देखिल खुप छान आहे. :)
12 Oct 2008 - 11:57 pm | भाग्यश्री
सहमत..!!
12 Oct 2008 - 8:57 pm | रामदास
तात्या प्रत्येकाची इच्छा असते अशी भेट व्हावी पण मनापासून कधी प्रयत्न होत नाहीत आणि नंतर चुटपुट लागते.
तुमच्या लेखनातून तुमच्या रसीकतेचा मागोवा घेणे एव्हढे मात्र भाग्य आहे आमचं.प्लीज
लिहीत रहा अशा गाठीभेटी.
अवांतरः ती ऊसवाली बाई कधी भेटली ते सांगा एकदा.
14 Oct 2008 - 9:52 am | डॉ.प्रसाद दाढे
क्या बात है तात्या! खूपच नशीबवान आहात हो! किशोरदा आमचाही लाडका आहेच.
किशोर नेहमीच अफाट गायलाय पण एस डी कडे जो काही गायलाय त्याला तोड नाही!
12 Oct 2008 - 9:00 pm | प्राजु
कालच गाडीतून जात असताना पल पल दिल के पास गाणं ऐकत होते आणि आठवलं की, १३ ऑक्टोबर आला आहे. आणि मन एकदम उदास झालं.
त्याचं गाणं हे विश्वाच्या पलिकडचं आहे.
आर. डी. बर्मन यांनी सांगितलेली एक आठवण इथे आहे. किशोर दां ना शास्त्रीय संगित येत नव्हत. पण ते गॉड गिफ्टेड त्यांच्याजवळ होतं.. शिवरंजनी रागातलं हे गाणं म्हणजे आर्त आवाजाची कमाल आहे.. आणखी काय सांगू?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Oct 2008 - 9:32 pm | दामुअण्णा
तात्या, आजच तुमचा ब्ळॉग वाचला.
त्यात तुम्हि पं. फिरोज द्स्तुरांना भेट्ल्याचं लिहीलय. त्याविषयी च तुमच्या भाग्याचा हेवा वाट्त होता. त्यात नविन भर !
दोन भिन्न स्वरूपाची गायकी गाणारे ! एक म्हणजे रागदारीत आकंठ बुडालेला तर दुसरा ह्रदयाला पीळ पाड्णारी अनेक गाणी गाउनही ''त्याला आलाप , ताना येत नाहीत'' चा शिक्का माथी बसलेला.
पण '' गोपाला'' काय किंवा ''फुलोंके रंग से '' किंवा ' मंझिले अपनी जगह '' काय , सूरांची आर्तता तीच ! एकाग्र चित्तानं ऐकलं तर डोळ्यात पाणी आणण्याची ताकद दोघांचीही सारखीच!
या दोन्ही विभुतींना तुम्ही त्यांच्या घरी जाउन भेट्लात. याबद्द्ल तुमच्या भाग्याचा हेवा करण्यापेक्षा तुमच्या निश्चयाला , निर्धाराला दाद द्यावीशी वाट्ते.
पं.संजीव अभ्यंकर हे माझं दैवत. त्यांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या पायांवर डोकं ठेवण्याची अनमोल संधी मला मिळाली होती. त्या आठवणी जाग्या झाल्या.
12 Oct 2008 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहात या बद्दल आमच्या मनात शंका नाही.
आपली आजची आठवण अशीच भावस्पर्शी आहे, काय लिहावे, लेख आवडला.
-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा जूना फॅन)
12 Oct 2008 - 10:03 pm | घाटावरचे भट
हृदयस्पर्शी लेखन!!! तात्या, तुम्ही भाग्यवान खरे...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
13 Oct 2008 - 7:18 am | सहज
तात्या अनुभव व शब्दांकन आवडले.
हा लेख पेपर मधे छपून यावा अशी खूप इच्छा. प्राजु जमल्यास तात्याच्या नावाने पाठव सकाळला, प्रमोदकाका मटाला पाठवा. अगदी तात्या नाही म्हणाला तरी कारण सर्वांनी वाचावा असा आहे.
13 Oct 2008 - 8:21 am | विसोबा खेचर
धन्यवाद सहजराव..
कुणाला पाठवायचा असल्यास अवश्य पाठवा, माझी काहीच हरकत नाही. परंतु मी मात्र माझे लेखन, जिथे कुणा दुसर्याची अनुमती लागते अश्या कुठल्याच ठिकाणी पाठवत नाही. सकाळ किंवा मटाचे संपादक मंडळ असते. म्हणजेच, माझे मोडकेतोडके लेखन हे प्रसिद्ध करायचे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार जेव्हा कुणा इतर व्यक्तिकडे असतो तिथे मी लेखन पाठवत नाही. तो अधिकार मी कुणालाही देऊ इच्छित नाही.. :)
त्यांना गरज असेल तर येतील मागायला! नायतर राहिलं! मी आपला स्वान्तसुखाय लिहितो.. :)
केवळ याच कारणास्तव उपक्रमच्या दिवाळी अंकात खूप इच्छा असूनही मी लेख पाठवू शकलो नाही! आणि केवळ याच कारणास्तव मिपाचा दिवाळी अंकही मी इच्छा असून काढू शकत नाही. कारण दिवाळी अंक म्हटला की संपादन मंडळ, निवड समिती असले काही प्रकार येणे साहजिक आहे. म्हणजेच एखादा लेख नाकारला जाण्याची, किंवा त्यात काही काटछाट होण्याची शक्यता असते. परंतु ही वेळ कुणाच लिहिणार्यावर येऊ नये असे एक लिहिणारा म्हणून मला वाटते!
असो,
तात्या.
13 Oct 2008 - 8:43 am | संदीप चित्रे
कुठल्या रूपात घडावं असं कुठे लिहून ठेवलंय?
च्यायला... साक्षात किशोरदांनी तुला एकट्याला समोर बसून गाणं ऐकवंलय :) काहीही झालं तरी तो सोनेरी क्षण आता तुझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.
अभिनंदन तात्या !
13 Oct 2008 - 8:55 am | विसोबा खेचर
च्यायला... साक्षात किशोरदांनी तुला एकट्याला समोर बसून गाणं ऐकवंलय
असं नाही म्हणता येणार! त्यांच्या हाताशी हार्मोनियम होती आणि मी लकिली समोर होतो इतकंच! :)
बहुधा त्यांना गायचा अचानक मूड आला असणार! "क्या सुनोगे?" असा प्रश्न विचारून उत्तरासाठी ते थांबलेच नाहीत. त्यांनी लगेच 'पंथी हू मै...' सुरू केलं. कलाकार हा स्वान्तसुखाय असावा, त्याने त्याच्या मूडप्रमाणेच गावं, स्वत:करता गावं! लोकांकरता गाऊ नये..
किशोरदांनीही त्या दिवशी तेच केलं. "पंथी हू मै.." ते स्वत:करताच गात होते आणि म्हणूनच ऐकायला ते खूप सुरेल, खूप छान वाटत होतं!
तात्या.
13 Oct 2008 - 9:00 am | चतुरंग
'आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो!' तुम्ही ती जिंदगी त्या काही पल मधे अनुभवता, नव्हे ती तुम्ही अनुभवलीत!! तुमच्या अशा मनस्वितेला लाख सलाम!!
चतुरंग
13 Oct 2008 - 9:06 am | विसोबा खेचर
'आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो!'
वा वा! हे गाणं तर त्याने क्लासच गायलं आहे! :)
आपला,
तात्या गोस्वामी.
13 Oct 2008 - 10:58 am | भोचक
काही गोष्टी नशीबातच असतात. (आणि नशीब आपण घडवू शकतो.) तात्या, तुमच्या नशीबाला आणि ते घडविणार्या तुम्हाला आणि अर्थात किशोरदालाही सलाम.
प्रधान पार्कच्या एकांड्या रूममध्ये किशोरच्या गाण्याची गोडी लावणार्या माझ्या मंजूताईलाही सलाम.(आम्ही किशोरची दुर्मिळ गाणी शोधण्यासाठी आणि त्याच्या कॅसेट्स करण्यासाठी नाशिकचे रेकॉर्डिंगवाले पालथे घातले होते.)
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
13 Oct 2008 - 11:01 am | झकासराव
तात्या...
भारीच लिहिल आहे.
साक्षात किशोर ला बघण्याच भाग्यच किती मोठं.
आणि ऐकण्याच भाग्य............................ :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Oct 2008 - 11:07 am | मनस्वी
जिंदगीके सफरमें गुजर जाते है जो मकाम
वो फिर नहीं आते.. वो फिर नहीं आते..
मस्तच अनुभव आहे तात्या, शब्दांकनही सुंदर.
मनस्वी
13 Oct 2008 - 12:50 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो तात्या .. अत्यंत सुरेख शब्दांकन केल आहे अनुभवाचे.
13 Oct 2008 - 11:33 am | अरुण वडुलेकर
तात्या,
तुमचा हेवा वाटतो. अम्हीही एकदा ओ.पी. नय्यरचा असाच पिच्छा पुरवला होता.पाचव्यांदा साहेबांनी घरात घेतले. पण माझ्या सदर्याचा रंग त्यांना आवडला नाही म्हणून मला घराबाहेर काढले. (ओ.पी. नय्यरना केवळ पांढरा रंग आवडतो हे मला माहित नव्हते.)
त्या क्षणी माझ्या पत्रिकेतले सगळे ग्रह, सगळी नक्षत्र, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युत्या, या सगळ्याच गोष्टी फार उच्चीच्या होत्या. अक्षरश: जगभर प्रसिद्ध असलेला किशोरदांसारखा अवलिया गवई त्या क्षणी फक्त माझ्या एकट्याकरता गात होता..!
हे मात्र खरे.
13 Oct 2008 - 12:26 pm | स्वाती दिनेश
असे क्षण हीच तर आठवणींच्या सुगंधाची कुपी.. हवी तेव्हा उघडावी आणि मनसोक्त गंध घ्यावा..तो तू इतरांनाही घेऊ दिलास.. व्वा.. अजून काय लिहू?
स्वाती
13 Oct 2008 - 4:43 pm | नंदन
आहे. आपल्या दैवताला प्रत्यक्ष पाहणे, त्याच्याशी जुजबी का होईना पण बोलता येणे; ही गोष्ट, हा सगुण संवाद मोठा भाग्याचा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Oct 2008 - 5:19 pm | छोटा डॉन
>> आपल्या दैवताला प्रत्यक्ष पाहणे, त्याच्याशी जुजबी का होईना पण बोलता येणे; ही गोष्ट, हा सगुण संवाद मोठा भाग्याचा.
+१
असेच म्हणतो ...
बाकी तात्यांना हे सद्भाग्य नेहमीच लाभते हे त्यांचे नशिब ...
लेख आवडला. अजुन असेच अनुभव मिपावर लेखाद्वारे येऊ द्यात ...
मागे "आण्णांची" अशीच एक आठवण लिहली होती, त्याची आठवण झाली ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
13 Oct 2008 - 2:27 pm | सुमीत भातखंडे
क्या बात है तात्या.
सुन्दर अनुभव कथन.
खरच तुमचा हेवा वाटतो.
13 Oct 2008 - 2:33 pm | मराठी_माणूस
तुमच्या धैर्याचे खुप कौतुक वाटते. असेच बर्याचशा आवडीच्या कलाकारांना भेटावेसे वाटते पण हिम्मत होत नाहि.
13 Oct 2008 - 2:44 pm | अनिल हटेला
सहमत !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
13 Oct 2008 - 5:15 pm | प्रमोद देव
किकु आणि तात्या हे दोघेही कलंदर वृत्तीचे आणि त्यांची एकमेकांशी घडलेली साक्षात भेट ही माझ्या दृष्टीने साधी घटना नाही.
ती बहुधा विधिलिखित असावी. ह्या ठिकाणी फक्त एक कमी जाणवली. मैफिल फारच लवकर आटपली. किकुने निदान अजून दोनचार गाणी गायला हरकत नव्हती. मी तात्याच्या जागी असतो तर नक्कीच फर्माईश केली असती....कुछ तो लोग कहेंगे...ची! आणि त्याच्या सुरात सुरदेखिल मिसळला असता. :)
13 Oct 2008 - 7:54 pm | लवंगी
नशीब लागत अश्या आठवणी गाठिशि बांधायला..
13 Oct 2008 - 8:43 pm | मिसळ
तात्या, छान लिहिले आहेस.
13 Oct 2008 - 9:50 pm | देवदत्त
मस्त एकदम...
हृदयस्पर्शी लेखन!!! तात्या, तुम्ही भाग्यवान खरे...
अशी वेडी भक्ती करता येणं पण सोपं नाही!!
माझेही हेच म्हणणे आहे :)
13 Oct 2008 - 10:01 pm | सुनील
खुद्द किशोरजींच्या घरात, त्यांच्या आवाजात गाणे ऐकायले मिळाले तुम्हाला. भाग्यवान आहात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Oct 2008 - 10:15 pm | धनंजय
+ प्रयत्नांती परमेश्वर.
13 Oct 2008 - 11:50 pm | विसोबा खेचर
आत्ताच घरी येतो आहे जुहूहून...
किशोरदांच्या बंगल्यापाशी दोन-पाच मिनिटं घुटमळलो आणि नंतर एकटाच निवांतपणे समोरच्या समुद्रावरील पुळणीवर जाऊन बसलो होतो..
पण मी एकटा नव्हतो. किशोरदा होते माझ्यासोबत, त्यांच्या अजरामर गाण्यांनी जुहू चौपाटीवरच्या त्या कोलाहालात साथ केली माझी!
आपला कुणी चाहता आज २१ वर्षांनंतरदेखील आपली याद काढत असा चौपाटीवर एकटाच बसला असेल हे कळलं असेल का हो किशोरदाला? :)
तात्या.
14 Oct 2008 - 12:51 am | बिपिन कार्यकर्ते
तात्या,
कसला विलक्षण अनुभव आणि किती सहजसुंदर शब्दांकन. छानच.
खूपच चांगले चांगले गायक गायिका खूप होऊन गेले आपल्याकडे. पण माझ्या पुरतं बोलायचं तर, दोन चार ओळीतच डोळ्यातून टचकन् पाणी काढणारा हा एकमेव गायक. आयुष्यभर कलंदर पणा केला, स्वतःच्या मर्जीने जगला. खूप दु:ख पण सोसलं असणार... मधुबाला सारखी बायको दुर्धर आजाराने साथ सोडून गेली. काही कमी दु:ख झालं असेल? रसिकांना आनंद देत राहिला आपल्या गाण्यातून, अभिनयातून. देवदूतच तो.
बिपिन.
14 Oct 2008 - 9:18 am | मराठी_माणूस
मधे एका मित्राने ही लिंक पाठवलि होति. कदाचीत काहींना आधी पासुन माहीत ही असेल.
ह्यातली बरीच गाणी पुर्वि कधी ऐकलेली नव्हती.
http://songs.kishorekumar.org/