...अरे हो, हे पुस्तक बघ. तुला नक्की आवडेल.
डिसेंबर महिन्यात एका काकाच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बराच वेळ गप्पा, जेवण आणि इतर विषय बोलून झाल्यानंतर काकाकडे असलेले कैलास मानस सरोवर यात्रेवरील एक पुस्तक वाचून संपवले. रात्री झोपण्याआधी काकाने अचानक एक पुस्तक हातात ठेवले.
भरभक्कम वजनाचे ते पुस्तक बघून आणि विशेषतः त्यातील अनुक्रमणिका बघून झोप उडालीच. अनुक्रमणिका जेआरडी टाटांपासून सुरू झाली होती. लता मंगेशकर, पंडीत भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर असे भारतरत्न.. संगीत, कला, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज तसेच फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्यासारखे ग्रेट लोकंही होते.
पुस्तक नीट बघितल्यावर काकाला सांगितले की हे पुस्तक त्याने अत्यंत चुकीच्या वेळी दाखवले आहे. आता रात्रीची झोप पूर्ण होणार नव्हतीच आणि उद्याच्या प्रवासाचे वेळापत्रकही कोलमडणार होते (..आणि झालेही तसेच. दुसर्या दिवशीचा मुक्काम वाढवून पुण्याला एक दिवस उशीरा पोहोचलो.)
नंतर सुरू झाला या पुस्तकाचा शोध.. पहिला अडथळा होता ते पुस्तक कुठे मिळेल याचा. कारण त्या पुस्तकावर ठळक अक्षरात लिहिले होते,
"फक्त वैयक्तीक वितरणासाठी"
मिपाकर बोकाशेठलाही विचारले कारण त्यांच्या पूर्वीच्या बॉसच्या बायकोचे नांवही ऋणनिर्देशात झळकत होते, बोकाशेठनीही 'प्रकाशकांकडेच चौकशी करा' असेच सांगितले.
मग प्रकाशकांचा शोध घेतला आणि न संपणार्या फोनाफोनीला सुरूवात झाली...
(प्रकाशक म्हणजे एक मोठे मूवी प्रॉडक्शन हाऊस होते.)
ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग...
(हल्ली फोन असे वाजत नाहीत पण कळावे म्हणून दिले आहे - तसेच संभाषणही इंग्रजीतूनच झाले होते.)
पुस्तक प्रकाशकांच्या कार्यालयात फोन लागला
पुप्र (पुस्तक प्रकाशक) - हॅलो.
मी - हॅलो.. तुम्ही अमुक अमुक नावाचे एक पुस्तक प्रकाशीत केले आहे, त्याची माहिती हवी आहे.
पुप्र - आम्ही पुस्तके प्रकाशीत करत नाही.
मी - नाही हो.. या नावाचे पुस्तक आहे. या साली प्रकाशीत केले आहे.
पुप्र - हो का..? बरं, तुम्ही यांच्याशी बोला. (असे म्हणून एका मॅडमचे नांव सांगितले)
मी - ओके, फोन जोडून द्या.
पुप्र - त्या मॅडम अजून आल्या नाहीत. थोड्या वेळाने फोन करा.
या नंतर सलग तीन दिवस वेगवेगळ्या वेळी फोन करूनही या मॅडम फोनवर सापडल्या नाहीत.
पुढच्या आठवड्यात एकदाच्या सापडल्या. त्यांना सगळी माहिती सांगितली.. त्यांनी सुरूवातीलाच सांगितले की "आंम्ही पुस्तके पब्लीश करत नाही" पण त्यांनी हे ही कबुल केले की त्या शोधाशोध करतील.
नंतरचे संभाषण असे झाले...
डिसेंबर महिना.. वेगवेगळ्या वेळी..
मी - मॅडम कांही अपडेट आहे का..? मी मुंबईला येऊन पुस्तक घेऊन जाईन आणि जी असेल ती किंमत द्यायलाही तयार आहे.
पुप्र मॅडम - नांही मोदक, मला माहितीच मिळत नाहीये, बघते कांही माहिती मिळाली तर..
...नंतर पुन्हा कधीतरी..
मी - मॅडम कांही अपडेट आहे का..?
पुप्र मॅडम - नांही, कांहीच अपडेट नाहीये.. ते पुस्तक नक्की आंम्हीच पब्लीश केले आहे का..?
मी - हो तुम्हीच पब्लीश केले आहे.
पुप्र मॅडम - ठीक आहे.. मी बघते. पण फार कांही माहिती मिळत नाहीये.
मी - ओके.. धन्यवाद मॅडम.
...नंतर जानेवारी च्या शेवटी..
या महिन्याभरात त्यांच्याच वेबसाईटवरून एक प्रेस रिलीज शोधून काढली ज्यात पुस्तकाचे नांव आणि बाकी सगळी माहिती होती. ती प्रेसनोट त्या मॅडमना मेल केली.
फायनली फेब्रुवारी महिन्यात त्यांनी मला फोन केला.
त्यांचा नंबर मोबाईलवर झळकलेला बघून एकदम "आईलाऽऽ जुही चावलाऽऽ" टाईप चेहरा झाला असावा. कारण पुस्तकाबद्दल नक्की कोणतातरी अपडेट मिळणार होता.
पुप्र मॅडम - हॅलो मोदक.. गुड न्यूज. ते पुस्तक आंम्हीच पब्लीश केले आहे.. आणि मी त्या टीमशी बोलले आहे. त्यांच्याकडून अप्रूवल मिळाले की त्या पुस्तकाची कॉपी आमच्या ऑफिसमधून घेऊन जा.
मी त्यांचे १० वेळा आभार मानले.
मार्च आणि एप्रिल महिन्यात एकेकदा फोन करून चौकशी केली मात्र फार कांही प्रगती झाली नव्हती.
एप्रिल महिन्याच्या शेवटी मुंबईतील फुटपाथवरील दुकानांमध्ये शोधाशोध करताना विक्रेत्याला हे पुस्तक विचारले.. त्याने सुरूवातीला स्वच्छ शब्दात नकार दिला. नंतर त्याच पुस्तकावर अडून बसल्यानंतर आणि मी नक्की पुस्तक घेईन अशी खात्री पटल्यावर त्याने पुस्तक काढून दिले.
सर्वप्रथम पुस्तक प्रकाशनवाल्या मॅडमना फोन केला, "पुस्तक मिळाले" ही बातमी दिली आणि त्यांचे (मला सहन केल्याबद्दल!) आभार मानले. त्यांनीही अभिनंदन केले.
एका अप्रतीम पुस्तकाचा शोध संपला होता.
अवालिया..
***********************
१) पुस्तकाचा फोटो ओंकार देशमुख यांच्या सौजन्याने (कारण माझे पुस्तक अजुनही मुंबईतच आहे.)
ओंकार देशमुख यांनी गौतम राजाध्यक्षांच्या आठवणींचा एक श्रद्धांजलीपर लेख लिहिला आहे - आवर्जून वाचावा.
२) इतर फोटो गौतम राजाध्यक्ष यांच्या चेपु फॅन पेजवरून साभार..!
***********************
प्रतिक्रिया
7 May 2017 - 3:17 pm | आदूबाळ
मस्त हो मोदकराव! या पुस्तकाबद्दल ऐकून होतो - एवढं दुर्मिळ असेल याची कल्पना नव्हती.
(काकाकडून झेरॉक्स का घेतली नाही असा प्रश्न मनात आला होता, पण पुस्तकाचं नाव पाहिल्यावर मावळला.)
7 May 2017 - 5:20 pm | राघवेंद्र
मस्त रे मित्रा !!!
दोन प्रती होत्या का त्याच्याकडे ??? एक मला पण हवे होते :)
7 May 2017 - 6:03 pm | पैसा
तू पुस्तके गोळा करत रहा. पुण्याला तुझ्या घरी एक भेट ठरलेली आहे दरवेळी.
7 May 2017 - 6:41 pm | एस
स्व. गौतम राजाध्यक्षांचे 'चेहरे' तुम्ही मिळवलंत? _/\_
हे कॉफीटेबल बुक खरंच लिमिटेड एडिशन होतं. माझ्या कॅमेऱ्याला किती जळजळ वाटत आहे हे सांगू शकत नाही! :-(
7 May 2017 - 10:23 pm | इरसाल
या पुस्तकाबद्दल आधि वाचले होते. मिळाले तर उत्तमच
8 May 2017 - 3:44 am | रुपी
अरे वा. मस्तच.
हे पुस्तक सुदैवाने होस्टेलमध्ये असताना पहायला मिळाले होते. एका मैत्रिणीच्या वडिलांचे होते आणि तिने आम्हांला काही तासांसाठी दिले होते. लिमिटेड एडिशन आहे वगैरे तेव्हा माहीत नव्हते. माधुरी, काजोल या गौतम राजाध्यक्षांच्या आवडत्या. आणि त्यांचे बरेच फोटो या पुस्तकात आहेत. पण तेव्हा तरी मला सर्वात सुंदर फोटो हेमामालिनीचा वाटला होता.
त्यातल्या आणि त्यांच्या इतर फोटोंचे पुण्यात जेव्हा प्रदर्शन होते, तेव्हा ते पाहता आले. त्यातला सचिनचा फोटोही अप्रतिम होता.
9 May 2017 - 3:40 pm | मोदक
धन्यवाद मंडळी.. या पुस्तकात आपण नेहमी पाहतो ते अनेक फोटो आहेत. नकळतपणे जपले गेलेले फोटोही आहेत पण ते फोटो गौतम राजाध्यक्षांनी काढले आहेत हे नव्याने कळाले आणि त्या फोटोमागची गाथाही कळाली.
उदा - "कीनोट" या पुस्तकावर जेआरडींचा पुढील फोटो आहे. नंतर कधीतरी जेआरडींची एक ओम्नीबस एडीशन घेतली; त्यामध्येही "कीनोट" हे पुस्तक आहेच. पण अप्रतीम मुखपृष्ठामुळे पहिले पुस्तक संग्रहातून काढावेसे वाटले नाही.
9 May 2017 - 3:42 pm | मोदक
बादवे.. गौतम राजाध्यक्षांनी वेगवेगळ्या लोकांचे काढलेले तुमचे आवडते फोटो या धाग्यावर टाकता का..? एक वेगळा संग्रह तयार होईल.
24 Jul 2017 - 12:30 am | मोदक
फ्लोराफाऊंटनला ओरिएंटल बिल्डींगच्या पायथ्याशी सुरेश नामक एक पुस्तकवाला आहे. आज त्याच्याकडून "चेहरे" च्या आणखी दोन प्रती आणल्या. (किंमत प्रत्येकी १७००/-रू.)