अक्षय्य तृतीया

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 6:28 pm

अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात.

ह्या दिवशी कुठलंही झाड लावलं तर ते उत्तम येतं असं बाबा म्हणायचे. चैत्र-वैशाख मध्ये तापलेली जमीन आणि पुढे दीड महिन्याने सुरु होणारा पावसाळा हे त्यामागील शास्त्रीय कारण असेल कदाचित. तेव्हा मात्र शुभ मुहूर्तावर झाड लावलं कि छान येतं असंच वाटायचं.
अक्षय्य तृतीयेच्या काही दिवस आधी बाबांबरोबर पुण्याच्या मंडईत जाऊन घोसाळ्याच्या बिया आणायच्या. वाटीत पाणी घेऊन २ दिवस त्यात ठेवायच्या. ह्या २ दिवसात आऊट हाऊस च्या मागच्या बाजूची जमीन; कुदळ फावड्याने उकरून तयार करायची. जवळच्या गोठ्याजवळ पडलेलं शेण आणून तेही खत म्हणून घालायचं. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ४-५ बिया ‘तयार’ जमिनीत लावायच्या. रोज सकाळी उठलं कि 'अंकुर फुटले का?' बघायची घाई.

४-५ रोपांमधली २ चांगली रोपं ठेवायची आणि त्याला आधार देऊन छतावर चढवायची. वेल वाढत असताना आधारासाठी आधी तो 'स्प्रिंग्स सोडतो' आणि मग पानं येतात ती प्रोसेस बघायला खूप छान वाटायचं. घोसाळ्याचा वेल फार 'वेळ' ना घेता भराभर वाढतो.

एकदा घोसाळी यायला सुरुवात झाली कि मग फारंच उत्साह यायचा. सकाळी उठून शिडीने छतावर जायचं. 'तयार झालेली' घोसाळी सुरीने कापून घेऊन यायची.
एक दिवसाआड किमान ४-५ घोसाळी तरी मिळायची. मग ती घोसाळी सोसायटी मधल्या लोकांना आणि नातेवाईकांना वाटायची. घोसाळी हा प्रकार फारसा लोकप्रिय नसल्याने एकदा घोसाळी देऊन झाली सगळ्यांना कि मग काय करायचं? हा प्रश्न. मग कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याशी Barter Exchange. घोसाळ्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडची इतर भाजी द्यायचा.

कितीही नीट बघितलं तरी नजर चुकवून २-३ घोसाळी एकदम मोठी झाल्यावरच पानांमागून डोकवायला लागायची. मग त्यांना काढून न टाकता तसंच वाढू द्यायचं. पूर्ण वाढलेली घोसाळी उन्हात वाळवून मग आतल्या बिया पुढच्या अक्षय्य तृतीयेसाठी ठेवायच्या. वाळलेल्या घोसाळ्याचं आवरण काढून 'सुगरणीच्या घरट्या सारखं' दिसायचं. मग ते दारातल्या आवळ्याच्या झाडावर लटकवायचं.

ह्या वेलाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे भुंगे आणि फुलपाखरं बघायला मिळाली. पूर्ण उन्हाळा छतावर वेलाचं कव्हर असल्याने उन्हाळा देखील सुसह्य वाटायचा.

लोकांना स्वप्नातलं घर म्हणजे टुमदार बंगला आणि दारात गुलमोहोराचं झाड असं असतं. मला मात्र छोटयाश्या घराच्या दारात आवळ्याचं झाड आणि छतावर घोसाळ्याचा वेल अधिक भावतो.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Apr 2017 - 9:20 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय. सद्ध्या माझ्याकडे कारल्याची वेल अशी वाढतेय, स्प्रिंग्ज सोडत. आवळीचं झाड होतं कधीतरी.

पैसा's picture

28 Apr 2017 - 9:48 pm | पैसा

छान लिहिलंय!

एस's picture

28 Apr 2017 - 11:31 pm | एस

छान आठवणी!

रुपी's picture

29 Apr 2017 - 1:53 am | रुपी

छान लिहिलंय.

पिलीयन रायडर's picture

29 Apr 2017 - 2:54 am | पिलीयन रायडर

लेख आवडला!

समाधान राऊत's picture

29 Apr 2017 - 8:18 am | समाधान राऊत

आवडलय बरका !!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2017 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा

वाचताना लै गारगार वाटलं मनाला . मससससस्त.

फारच सुरेख लिहिलंय!
धन्यवाद!

संजय पाटिल's picture

30 Apr 2017 - 1:40 pm | संजय पाटिल

छान लिहीलय..
मला घोसाळी म्हंटल्यावर त्याची भजी आठवतात .....