जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना श्रध्दांजली........
जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे (वय ८३) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता निधन झाले.
गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे मुलगा कॅप्टन सनत कुमार, सुन शमा असा परिवार आहे. दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहिणीताईंनी नेत्रदान केले होते.
पंडिता रोहिणी यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
महाराष्ट्र राज्य पुरस्कारासह (१९७७) अनेक पुरस्कारांच्या रोहिणीताई मानकरी ठरल्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९७७), नृत्य-विलास (१९८०), नृत्य-गंध (१९८६), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), गोदावरी गौरव पुरस्कार (१९९४), केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची फेलोशिप (१९९४), प्राईड ऑफ पुणे (१९९५) आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.
कथक नृत्याचे पैलू उलगडून दाखविणारे संशोधनपर लेखन त्यांनी केले. लेखक, अनुवादक, वक्ता, शिक्षक आणि नृत्यांगना असा रोहिणीताईंच्या कर्तृत्वाचा विविधांगी पट होता.
स्त्रोत - ई-सकाळ
प्रतिक्रिया
10 Oct 2008 - 11:37 am | शेखर
एक चांगली नृत्यांगना हरपली. देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.
शेखर
10 Oct 2008 - 2:19 pm | मृगनयनी
रोहिणीताई, वयाच्या ४०व्या वर्षी "कथक " शिकल्या. खरोखरच नृत्यकला शिकण्याची एवढी जिद्द आणि आत्मीयता रोहिणीताईंकडे होती.
खरंच आज आपण एका गुणवान 'कलावती' ला मुकलेलो आहोत.
रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....
10 Oct 2008 - 2:18 pm | यशोधरा
रोहिणीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!....
10 Oct 2008 - 2:42 pm | mina
नृत्याला अनुकूल असणार्या संगीताच्या साहित्याच्या प्रगल्भ अभ्यासामुळे,जाणिवेमुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे अस्सल कलेच्या घेतलेल्या ध्यासामुळे जगप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांनी नृत्यात उंची गाठली. त्यांना मागच्या वषी पु.ल.देशपांडे पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिनंदनासाठी त्यांच्या घरी फोन केला. प्रथम त्यांच्या स्नुषा बोलल्यात.परिचय दिल्यावर रोहिणीताई फोनवर आल्यात.प्रथम त्यांचे अभिनंदन केले.मी विचारले काय वाटते आहे याक्षणी... अगदी आनंदाने अभिनंदन स्वीकारत त्या म्हणाल्या, माझ्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणजे पु.लं च्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे मला पुन्हा काम करण्याची नवी उमेद मिळाली आहे.नृत्य करणं वयोमानाने शक्य नाही म्हणून मी नृत्याशी जोडलेले लेखन करणार आहे.मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नृत्याची अखंड साधना करिन..
रोहिणीताईंच्या जाण्याने आज त्यांच्या अखंड साधनेला पूर्णविराम मिळाला असला तरी नृत्यभारतीच्या रूपात त्यांनी जोपासलेली कला अखंड कार्यरत राहील.त्यांच्या या कार्याला मनस्वी अभिवादन करुन
जेष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करते........
10 Oct 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर
रोहिणीताईंना माझीही श्रद्धांजली...!
एकदा एका सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते रोहिणीताईंचा सत्कार करण्यात आला होता तेव्हा त्या सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या होत्या,
"आजपर्यंत अनेक ठिकाणी सत्काराचे योग आले परंतु भीमसेनांच्या हस्ते सवाईगंधर्व महोत्सवातील हा सत्कार म्हणजे माझ्या माहेरचा सत्कार आहे असं मी समजते.."
तात्या.