नाही; माझा प्रॉब्लेमच आहे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
11 Apr 2017 - 11:11 pm

ब्लॉग दुवा

रोजची गर्दी, रोजचा प्रवास, कटकट करत मी ऑफिसला येतो
कंपनी ची कॉन्फरन्स, गोव्याला जायचं, आनंदाचा माहोल असतो
हो काय? मी साशंक होतो. कसला तरी विचार करतो
आता मिळाला ना ब्रेक ! मग यावं नाही का आनंदाला उधाण! मी म्हणतो
उलट इथे मात्र मनालाच कसलातरी ब्रेक लागतो
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

कसं जायचं? विमानाने? की कोकण रेल्वेने? चर्चा चालू
ए कॅमेरा आण हं... स्विमिंग कॉश्चूम आहे का एक्स्ट्रॉ? जुळवाजुळव चालू
मी आजच स्टॉक आणतो आपला! बेत आखणं चालू
सहकर्मचारी मित्र होतो आणि प्रत्येक जण जणु गोव्यात पोचतो
आणि मी? त्यापेक्षा घरच्यांबरोबर गेलो असतो असा विचार करतो.
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

विमानात बसल्यावर गप्पा सुरू होतात. हॉटेल कुठे, बीच कुठला
खेळायचं कधी, फिरायचं कधी, शॉपिंग करायला स्पॉट कुठला
विमान उडतं, खाण्यापिण्यात, गप्पात सगळे गुंग होतात
आणि मी? मी खिडकीतून एक टक खाली बघत बसतो
कर्नाळा दिसतोय का, रायगड दिसतो का, लिंगाणा दिसतो का
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

हॉटेल येतं, खोल्या, बिल्डिंग, लॉन बघून सगळे थक्क होतात
मला मात्र वाटेत लागलेलं पोर्तुगीज शैलीतलं घर आवडलेलं असतं.
समुद्रावर जाऊन सगळे चिंब ओले होत असतात आणि..
सेल्फी !!! सगळे मोबाईलमधे आपले चेहरे बघत हसतात
आणि मी? मी आपला वाळूत बसून शिंपल्याचा क्लोजअप काढत असतो.
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

फाईव्ह कोर्स डिनर बरं का, पण मला आठवणार चुलीवरची भाकरी
बेड टी, हाय टी पीत मी म्हणणार, नथिंग बीट्स चहाची टपरी
समोर ना ना तर्‍हेची पेय असताना, लिंबू सरबताची तल्लफ यावी
पुडिंग, कस्टर्ड, ब्राउनीलाही गाजर हलव्याची सर न यावी
समोर असतं ते सोडून जे नसतं तेच हवंसं वाटतं
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

दुसर्‍या दिवशी प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन झडू लागतात
आपापला नंबर येताच लोक माईकवर बडबडू लागतात
मग एक कुणीतरी बोलता बोलता गुलज़ारांचा शेर सांगतो
आणि माझ्या मनाचा घोडा ग़ज़लांच्या मळ्यात जाऊन थांबतो
मग तिथे स्ट्रेंग्थ्स वीकनेसेस चालू आणि मनातल्या मैफिलीत मी....
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

मग नाच गाणी धांगडधिंगा, खाणं पिणं फुल टू धमाल
आणि मला आठवला शाळेचा सेंडॉफ, जेंव्हा धरला होता बाकावर ताल
वर्ग नाचला होता वेड्यासारखा, जसे इथे सगळे जण नाचत होते
फक्त इथे डीजे वेगळा होता, शाळेत डीजे आमचेच होते
झालं? म्हणजे वाजत होतं झिंगझिंग झिंगाट, आणि मी आठवणीतच सैराट
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

डेव्हिड गेटा चं गाणं लागलं, की मला बॅकस्ट्रीट बॉइज ऐकावे वाटले
बॅक्स्ट्रीट बॉईज लागलं, की युफोरिया चे शब्द आठवले
'व्हेन आय सॉ यू स्टँडिग देअर' वाजलं की 'तुला पाहिले नदीच्या किनारी'
आणि 'प्रिटी वूमन' वाजलं की 'अलबेली नार प्यारी'
त्या डीजेवर मी नाचलो का ठाऊक नाही, पण मन मात्र इतस्ततः नाचलं
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

परतीचं विमान उतरलं खाली, गोवा सफर संपन्न झाली
फोटो पाठवा रे घरी जाऊन! निरोप झाले वचनं झाली
टॅक्सीला जेंव्हा ट्रॅफिक लागला, आलो मुंबईत! बाजूचा म्हणाला
इथ्थे मला गोवा आठवलं. मी म्हटलं 'काय सही होतं ना रे गोव्याला!'
पुन्हा तेच. तिथे असून तिथे नव्हतो, इथे असून इथे नाही.
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

बाकी सगळ्यांना आवडली हं ट्रीप, पुढचे अनेक दिवस चर्चा झाल्या
याने काय केलं, तो कसा नाचला.. कुणाकुणाच्या पार्ट्या झाल्या
मला माझंच कळत नव्हतं, माझा प्रॉब्लेम कुठे झाला
जे जे झालं, जे जे केलं, सगळ्यांनी त्याची मजा घेतली
मी मात्र रमलोच नाही, मी प्रत्येक वेळीच रजा घेतली
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.

आणि बाकी कुणाचीच कशालाच हरकत नव्हती...
नाही; माझाच प्रॉब्लेम आहे.

हो म्हणजे, यायला हवं ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं..
नाही; माझा प्रॉब्लेम आहेच.

- अपूर्व ओक

भावकवितामुक्त कविताशांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

रुपी's picture

11 Apr 2017 - 11:25 pm | रुपी

छान!

सत्यजित...'s picture

11 Apr 2017 - 11:30 pm | सत्यजित...

बहुतेकदा माझाही 'असाच' प्राॅब्लेम असतो!
'शिंपल्याचा क्लोजप' आणि 'गझलांचा मळा' तर माझे अनुभवच!
अगदी सहज सुंदर झालिये कविता,आवडलीच!

पद्मावति's picture

12 Apr 2017 - 12:48 am | पद्मावति

अतिशय सुरेख लिहिलंय. खूप खूप आवडलं. सहजसुंदर.

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2017 - 1:55 am | पिलीयन रायडर

हो म्हणजे, यायला हवं ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं..

आणि खरंच नाही जमत हे... समजतं की हे जे ह्या क्षणी चालु आहे ते परत मिळणार नाही, आत्ता इतर कशाची तरी इच्छा मनात धरण्याला अर्थ नाही.. पण नाही रमत मन कधी कधी..

स्रुजा's picture

12 Apr 2017 - 3:16 am | स्रुजा

हाहा ... मार्मिक ! छान लिहीलयेस , अगदी ओघवतं.

बर्‍याच गोष्टींशी रीलेट करता आलं.

प्राची अश्विनी's picture

12 Apr 2017 - 7:52 am | प्राची अश्विनी

अगदी खरं. आवडली कविता.

पैसा's picture

12 Apr 2017 - 8:26 am | पैसा

:)

वेल्लाभट's picture

12 Apr 2017 - 10:52 am | वेल्लाभट

धन्यवाद रूपी, पैसा, प्राची, पद्मावती
धन्यवाद स्रुजा, कमी अधिक प्रमाणात असावा असा स्वभाव प्रत्येकात माझ्यामते.
धन्यवाद पिरा, हो खरंय नाही रमत मन अनेकदा.
धन्स सत्यजित, बरं वाटलं ऐकून कुणाचातरी माझ्यासारखाच प्रकार असल्याचं.

_/\_ :)

चिनार's picture

12 Apr 2017 - 11:53 am | चिनार

छान जमलीये वेल्लाभाऊ!
मी ही त्यातलाच !

मितान's picture

12 Apr 2017 - 11:56 am | मितान

छान कविता !
तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाचं होत असावं. अपवाद 'वर्तमानात जगणारे जीव' ;)

प्राची अश्विनी's picture

12 Apr 2017 - 2:09 pm | प्राची अश्विनी

ते कोण ते इथं सगळ्यांनाच माहीत आहे.;)

अनन्त्_यात्री's picture

12 Apr 2017 - 12:01 pm | अनन्त्_यात्री

सुन्दर!
हे मुक्तक वाचून पुढील ओळ आठवली...
"If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer". .... (Henry David Thoreau)

मस्त. अगदी आमच्यासारखेच की..
वेगळ्या प्रकारची कविता-मुक्तक जे काही आहे ते खूप आवडले. !

प्राध्यापक's picture

12 Apr 2017 - 3:37 pm | प्राध्यापक

छानच लिहिलय... अगदी सहज सोप्या शब्दात.... लिहित रहा.

राघव's picture

13 Apr 2017 - 9:44 pm | राघव

सुंदर लिहिलेत! पु.ले.शु. :-)

रेवती's picture

14 Apr 2017 - 7:09 am | रेवती

आवडलं.

वेल्लाभट's picture

14 Apr 2017 - 10:45 am | वेल्लाभट

धन्यवाद चिनार, मितान, अनंतयात्री, खेडूत, प्राध्यापक, राघव, रेवती :)

अत्रे's picture

14 Apr 2017 - 1:15 pm | अत्रे

मस्त! यावर उपाय काय पण ..

आगाऊ म्हादया......'s picture

16 Apr 2017 - 8:15 am | आगाऊ म्हादया......

बायकोला वाचून दाखवली तर ती म्हणे तूच लिहीलीयस का?? हा सगळा तुझाच प्रॉब्लेम आहे.
मस्त जमलीय. जियो.

लालगरूड's picture

16 Apr 2017 - 9:49 pm | लालगरूड

असं वाटलं माझीचं परिस्थिती मांडली :'( :'( :'(

वेल्लाभट's picture

18 Apr 2017 - 2:49 pm | वेल्लाभट

म्हाद्याभौ, लालगरूड.... मनापासून धन्यवाद :)