दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं. वार्यावरून पीस उडत यावं, तसं माझ्यापर्यंत आलेलं दश्त-ए-तनहाई, हे फैझ अहमद फैझचे शब्द आणि इकबाल बानोच्या आवाजातील गाणं याच जातकुळीतलं.
दश्त-ए-तनहाई में, ऐ जान-ए-जहां लरझां हैं
तेरी आवाज के साये, तेरे होटों के सराब..
या दोन ओळींत ते एकटेपण, ती वेढून घेणारी आवाजाच्या सावल्यांची हुरहूर आणि आणि ओठांची मृगजळागत खरी वाटणारी स्मृती; इथपासून सुरू होऊन सगळ्या दर्दसकट आत आत घुसणारं हे गाणं. याच्या पूर्ण काव्यपंक्ती इथे पहायला मिळतील.
http://maraahmed.com/wp/2009/11/24/dasht-e-tanhai-by-faiz-ahmed-faiz-eng...
गाणं इथे ऐकता येईल. ( शांत रात्री कानात हेडफोन्स घालून ऐकल्यास उत्तम)
https://www.youtube.com/watch?v=X90RZxCyuJY
याचा थोडक्यात अर्थ सांगणे, हे लखनवी चिकनची गोधडी करायला घेण्याइतकं अरसिक आणि रुक्ष वाटेल. पण तरी तो सांगितल्याशिवाय त्यातल्या मनात रुंजी घालणार्या उपमा कशा बरं पोहोचवता येतील? म्हणून ही पुढची ठिगळं.
एकटेपणाच्या वाळवंटात,
जिवलगा,
अशी थरथर,
तुझ्या आवाजाच्या सावल्यांची,
आणि ओठांच्या मृगजळाची..
एकटेपणाच्या वाळवंटात,
खाक झालेली अंतरे,
त्या राखेत
बहरते,
तुझी सोबत,
जाई अन् गुलाबांची..
कुठेशी जवळच,
तुझ्या श्वासांची आच,
जळू लागते
तिच्याच गंधात,
तेवत राहते..
दूर अस्तंतीजवळ,
दवांत चमकते,
थेंब थेंब,
तुझी नजर..
कुरवाळते,
काळजाची
रेष रेष
तुझी याद..
निरोपाची पहाट,
फुटू लागली तरी,
असं वाटतंय,
की दुरावा मावळतोय,
आणि मीलनाची रात्र,
आलीच आहे..
गोधडी झाली, आता गोधडीत गुरफटल्याचं सुख मला पोहोचवता येईल.
त्या पहिल्या 'लरझां' पासून आत उतरत गेलं हे गाणं व त्यातील शब्द. ज्या नजाकतीने हे शब्द येतात, हुरहूर जिवंत करतात, त्याला तोड नाही. पण ही हुरहूर वियोगाची असली, तरी अपूर्णतेची नाही. प्रेम पूर्ण आहे. प्रेयसाच्या श्वासांची ऊब जवळच आहे, मधल्या जळून, करपून गेलेल्या अंतरांमध्येही जाई आणि गुलाब फुललेले आहेत, आणि क्षितिजावरील दंवातसुद्धा जिवलगाची नजर चमकताना दिसत आहे. आवाजांच्या सावल्या, ओठांचे मृगजळ, हे असे आभास असले तरी त्याची खंत नाहीये. प्रेमाच्या कायमच्या सहवासाची पूर्ती करण्याचा हट्ट नाही दिसत आहे, प्रेमातून आलेल्या तृप्तीचा अनुभव दिसतो आहे. ओढ आहे, पण अट्टाहास नाही. विरहाची पहाट आली, तरी मीलनाची रात्रच आल्यासारखं वाटणार्या या प्रेयसीच्या स्वप्नांनी वास्तवावर मात केलेली आहे, यातच सगळं आलं..
प्रतिक्रिया
19 Mar 2017 - 2:37 pm | गवि
अ प्र ति म...
ही गझल अगदी खोलवर पोचून कायमची वसतीला आलेली आहे फार पूर्वीच. ऐकता ऐकता जगाचा विसर पडतो. इक्बाल बानूची गायकी म्हणजे निव्वळ संमोहित करणारी जादू. किंचित थरथर आणि हुरहूर.
19 Mar 2017 - 2:40 pm | गवि
मैं नजरसे पी रहा हूं.
ना गंवाओ नावक ए नीमकश..
उल्फत की नयी मंजिल को चला..
हीदेखील अवीट.
19 Mar 2017 - 2:41 pm | पद्मावति
अप्रतिम!! अजुन काय बोलू?? निशब्द!!
19 Mar 2017 - 8:58 pm | सानझरी
+1111
19 Mar 2017 - 2:52 pm | गवि
गझलचे सर्व शेर पूर्ण देता का इथे. उलगडायला आवडेल.
इस कदर प्यार से ऐ जान-ए-जहाँ रख्खा है
दिल के रुखसार पे इस वक्त तेरी यादने हाथ..
यूँ ग़ुमाँ होता है गरजे है अभी सुबह-ए-फिराक
ढल गया हिज्रका दिन आ भी गयी वस्ल की रात ..
19 Mar 2017 - 3:22 pm | पिशी अबोली
धन्यवाद!
ही पूर्ण गजल
दश्त-ए-तनहाई में ऐ जान-ए-जहाँ लरजाँ हैं
तेरी आवाज के साये, तेरे होटों के सराब
दश्त-ए-तनहाई में दूरी के खस-ओ-ख़ाक तले,
खिल रहे हैं तेरे पहलू के समन और गुलाब
उठ रही हैं कहीं कुर्बत से तेरी साँस की आंच
अपनी खुशबू में सुलगती हुई मद्धम मद्धम
दूर उफ़क पार चमकती हुई कतरा कतरा
गिर रही हैं तेरी दिलदार नज़र की शबनम
इस कदर प्यार से ऐ जान-ए-जहाँ रख्खा हैं
दिल के रुखसार पे पे इस वक्त तेरी याद ने हाथ
यूँ गुमान होता हैं गरचे हैं अभी सुबह-ए-फ़िराक
ढल गया हिज्र का दिन आ भी गयी वस्ल की रात
19 Mar 2017 - 7:34 pm | पिशी अबोली
धन्यवाद, गवि व पद्माक्का! :)
ही दुसरी गजलपण ऐकली. :)
19 Mar 2017 - 8:39 pm | ज्ञान
अप्रतिमच आहे गझल..
19 Mar 2017 - 9:19 pm | मि अँडरसन
या नज्मच्या शब्दातून अंतरंग उलगडलं आहे आणि
निसर्गदर्शन हि घडवलं आहे ..
19 Mar 2017 - 10:26 pm | प्रीत-मोहर
क्लास!!( as usual)
20 Mar 2017 - 1:49 am | एस
क्या बात है! सुभानल्ला!
20 Mar 2017 - 6:45 am | पैसा
आयडी सार्थ केलास!!! जबरदस्त लिहिलंस!!!
20 Mar 2017 - 11:28 am | पिशी अबोली
धन्यवाद :)
20 Mar 2017 - 12:54 pm | अजया
अ प्र ति म !
20 Mar 2017 - 1:14 pm | वेल्लाभट
काय सुरेख लिहिलंयत !
वाह. उर्दू भाषेची मजाच वेगळी आहे. ग़ुलाम अलीची पहिलीच, पहिल्यांदाच ऐकलेली ग़ज़ल सुद्धा इतकी पोचली की जणु त्यात भाषा नव्हती फक्त भाव होते जे ऐकणार्या कुणालाही कळावेत.
उर्दूतले ते खोल भाव तुम्ही मराठीतही सक्षमपणे उतरवलेत. सुरेख.
(फक्त ते याद, आणि खाक हे मराठी नसलेले शब्द खटकले. दोनही भाषा श्रेष्ठ पण सरमिसळ पहिल्यापासूनच आवडत नाही.)
20 Mar 2017 - 1:23 pm | जागु
छानच.
26 Mar 2017 - 10:48 pm | पिशी अबोली
खूप धन्यवाद! :)
27 Mar 2017 - 9:01 pm | यशोधरा
क्या बात पिशी! तुला हवं ते पुस्तक माझ्याकडून बक्षीस मुली :)
28 Mar 2017 - 10:53 am | तिमा
खूपच आवडला. उलगडून सांगण्याची तुमची स्टाईल आवडली.
शीर्षकावरुन, गुलाम अलींची
'दश्त-ए-तनहाईमें खुशबु-ए-हिना किसकी थी' ही गज़ल आठवली. तीही मला खूप आवडते. त्याविषयीही लिहा.
28 Mar 2017 - 2:05 pm | तिमा
सॉरी, ते दस्त-ए- तनहाई नसून, जख्में तनहाईमें, असं आहे.
31 Mar 2017 - 9:06 pm | पिशी अबोली
धन्यवाद! :)