अपवाद

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
7 Oct 2008 - 12:20 am

वोक हार्ड रुग्णालयातील वैद्यकिय तपासणीचा दिवस. आमच्या आस्थापनेत सर्व कर्मचार्‍यांना वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणीचा आग्रह असतो, न गेलात तर तुमची मर्जी.

साहेब म्हणाले, जा; आम्ही गेलो. एकट्याला फार वैताग येतो तेव्हा बरेचजण दोघे-तिघे ठरवुन एकत्र जातात. मीही माझ्या एका वरिष्ठ सहकार्‍यांबरोबर संधान साधले होते आणि आम्ही सकाळीच दाखल झालो. नेलेले उत्सर्जनाचे नमुने देणे, रिकाम्या पोटीचे रक्त, मग भरल्या पोटी रक्त, श्वसनपरिक्षा, उदरपोकळीची लहरचिकित्सा, फुफ्फूसांच्या कार्यक्षमतेची चाचणी, रक्तदाब, हृदयाची तपासणी, द्विमित आलेख, दमणुकीनंतरची हृदयपरिक्षा, नेत्रचिकित्सा......आणि सगळ्यात उच्छाद म्हणजे दोन तपासण्यांमधले रिकामपण. शेवटी समारोपाला डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट म्हणजे आपण तपासणी अहवालात जे काही वाचेलेले असेल तेच त्यांच्या तोंडुन ऐकायचे.

बर्‍याचश्या तपासण्या संपत आल्या होत्या. एक वाजून गेला होता. इथे तपासणी निमित्त न्याहरी भरपेट झाल्याने तशी भूक जाणवत नव्हती. मघाशी नेत्रचिकित्सा झाल्यावर मला नेत्र विषयक सल्ल्यासाठी त्याच नेत्रतज्ज्ञ डॉक्टरीणबाईंची भेट हवी होती, ती वेळ ठरवून घेतली होती. मला दिडला त्यांना भेटायचे होते. मग दोन वाजता अखेरचा सोपस्कार - डॉक्टरांची भेट. मा़झ्या बरोबर असलेल्या वरिष्ठांचा हृदयविषयक काही भाग बाकी होता, तिकडे ते गेले. मी तिसर्‍या मजल्यावर नेत्र रूग्णालयात येऊन थांबलो. गर्दी विशेष नव्हती, नेहेमीप्रमाणेच मोतीबिंदु वा अन्य वयपरत्वे येणार्‍या नेत्रविकारासाठी आलेले काही ज्येष्ठ तेथे बसलेले होते.

अचानक कुणीतरी मुसमुसल्यासरखे वाटले. मी जरा आतल्या भागात डोकावलो. नेत्रविभागात शिरताच समोर स्वागत कक्ष वजा प्रशासन विभाग. सरळ पुढे प्रतिक्षा करणार्‍या रुग्णांसाठी आसनव्यवस्था व काटकोनात वळले की डॉक्टर लोकांच्या खोल्यांकडे जाणारी मार्गिका. त्या मार्गिकेत भिंतीलगत असलेल्या खुर्च्यांमध्ये त्या माय लेकी बसलेल्या होत्या. त्या बाई साधारण पन्नाशीकडे झुकणार्‍या तर मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असावी. ती मुलगी आईच्या खांद्यावर डोके टाकुन मुसमुसत होती. उजव्या डोळ्याला भली मोठी गिरदीसारखी पट्टी. कुतुहलाने विचारता असे समजले की डोळ्याला बारिक खडा लागला होता, डोळा कालपासून सुजला होता. अर्थातच मलमपट्टी केल्यामुळे तो बंदच केला होता. एकुण अंदाज आला. जखमेपेक्षा भवितव्याच्या चिंतेची वेदना अधिक असावी. आणि ते अगदी स्वाभाविकच होते. समोर आयुष्य पडलाय आणि ऐन उमेदीच्या काळात, सगळी कारकिर्द बाकी असताना डोळ्यावर आपत्ती म्हणजे भेडसावणारी बाब होती.

मी थोडेसे मोकळे होत त्यांना म्हणालो, 'हात्तिच्या! कशाला उगाच घाबरताय?'. मग त्या मुलीला, नीताला म्हणालो ' अग तुला पाहिल्यावर महाविद्यालयात असतानाचा तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला बघ'

नीताने आईच्या खांद्यावरचे डोके उचलले व मला एकवार बघितले. आईही जरा मागे सरकली, बराच वेळ अवघडलेले बसून रग लागली असावी.

मी पुढे सांगु लागलो. 'अग मी तुझ्याच एवढा असेन तेव्हा. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी. शाळा संपवुन महाविद्यालयात दाखल झाल्याने जरा हवेत होतो. वर्गात न बसता उनाडता येते हा ऐकीव अनुभव प्रत्यक्षात उतरल्याने मोकाट सुटलेले. बरे इथे शाळेसारखे बंधन नाही. रोज नवा उद्योग, नवा चाळा.'

"हा मनुष्य जे काही सांगतोय त्याच्याशी आपला काय संबंध?" हे त्या दोघींच्या चेहेर्‍यावरचे भाव मला स्पष्ट दिसले.

मग मी थेट मुद्द्यावर आलो. 'त्या दिवशी अशाच टवाळक्या चालल्या होत्या. आमच्या चमूतल्या पम्याच्या खिशातली सायकलची चावी आन्याने नकळत काढली आणि ते त्याच्या लक्षात येताच पटकन दुसर्‍याला दिली. झाले. पम्या चावी घेण्यासाठी धावुन जाताच त्याने आणि कुणाकडे फेकली. मग चावी ,चावीचा पाठलाग करणारा पम्या आणि त्याला चुकवुन पळणारे यांचा धुमाकुळ सुरू झाला. मी खरेतर यात नव्हतो; मी बाजुला उभा होतो. अचानक तो घोळका मी असलेल्या दिशेने सरकला व कुणीतरी "ए पक्कड" असे म्हणत भिरकावलेली चावी पापणी लवायच्या आत माझ्या डोळ्यावर लागली'.

मी नकळत हात डोळ्यावर ठेवला. 'मग? काय झाल तुमच्या डोळ्याला?' - नीता.

'काही विचारू नकोस. ब्रह्मांड आठवल. भयंकर घबरलो होतो. डोळ्यापुढे अंधार आला होता. भितीपोटी दुसरा डोळाही किलकिला होत होता'. 'बाप रे' - नीता.

कुणीतरी उपाहारगृहातुन बर्फ आणला आणि आपल्या रूमालात घालुन तो 'अरे शेक म्हणजे बरे वाटेल' असे सांगत पुढे केला. तेवढ्यात कुणा शहाण्याने शंका काढली की बर्फ दाताला सूज आली तरच वापरतात, डोळ्याला लागल तर गरम वाफारा बरा, बर्फ अजिबात नको. 'ईथे माझा बर्फ झाला होता' असे म्हणताच नीताला थोडे हसु आले.

आता मायलेकी कुतुहलाने माझी हकिकत लक्ष देउन ऐकु लागल्या. मग घरच्यांची तारांबळ, टोळक्याला बसलेलाला ओरडा, प्राद्यापक वर्गाचा हस्तक्षेप, मग माझी डॉक्टरवारी, तपासणी, चार दिवस मलमपट्टी -औषधोपचार आणि अखेर माझा पूर्ण बरा झालेल डोळा हे ऐकुन त्यांना बरे वाटले. मी एखाद्या डॉक्टरच्या थाटात नीताच्या डोळ्याकडे पाहिले आणि निर्वाळा दिला 'हॅ - हे तर काहीच नाही. माझ्या डोळ्याचा सुजुन बटाटा झाला होता'. नीताला हसु आवरले नाही. नीताची आई म्हणाली, ' हो, आम्हाला सुद्धा डॉक्टर म्हणाले, काळजी करु नका; पण चैन पडत नाही हो. आता तुम्ही सांगताय की तुम्हालाही असेच झाले होते व बरेही वाटले, तर थोडा धीर आला. आमचेही असेच थोडक्यात निभावले म्हणजे मिळविले' मग त्या नीताला समजावु लागल्या आणि नीताही बरीच सावरली होती. इतक्यात त्यांच्या नावाचा पुकारा झाला आणि लगबगीने त्या मायलेकी डॉक्टरांच्या खोलीच्या दिशेने चालु लागल्या.

मी स्वतः शीच नकळत हसलो. 'खोटे कधी बोलु नये' हे खरे पण एखाददा थोडे खोटे बोलल्याने जर दुसर्‍याला बरे वाटणार असेल तर काही हरकत नसावी. नियमाला अपवाद असतोच.

वावरजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

7 Oct 2008 - 12:24 am | यशोधरा

:)

असं कोणाला निरलस मदत करायच्या उद्देशाने खोटं बोलायला हरकत नसावी!

प्राजु's picture

7 Oct 2008 - 12:28 am | प्राजु

प्रत्येक ठि़काणी अपवाद असतोच आणि हा अशा पद्धतीचा असेल तर मनालाही समाधान होतं.
आपलं अभिनंदन. एका मुलीच्या मनाचं समाधान करू शकलात आणि एका आईच्याही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 12:32 am | बिपिन कार्यकर्ते

साक्षीजी... साक्षात भगवान कृष्णानेच म्हणले आहे, "हेतू शुध्द असेल तर कृती कोणतीही चालते." (खरंच म्हणलंय हो... संदर्भ वगैरे विचारू नका.) पण तुम्ही जे केलेत ते खरंच आवडलं.

आपल्याला नेहमी अश्या कथा ऐकायला मिळतात. मागे मी रिडर्स डायजेस्ट मधे एक गोष्ट वाचली होती. एका माणसाची गाडी एका सुनसान हायवे वर बंद पडते. तिकडून एक म्हातारा जात असतो. तो गाडी थांबवून वगैरे त्याला मदत करतो. गाडी दुरूस्त करायला मेकॅनिकही घेऊन येतो. थोडीफार आर्थिक मदत करतो कारण याच्याकडे पुरेशी रोख रक्कम नसते. जेव्हा हा धन्यवाद म्हणतो आणि नाव गाव विचारतो (त्याला पैसे परत करायचे असतात) तो म्हातारा म्हणतो, 'पोरा, मला काही नको. पण एक वचन दे की तू पण कोणाला तरी अशीच मदत करशील, कमीत कमी एकदा तरी, आणि ती सुद्धा विनामूल्य. मलाही कोणीतरी एकदा मदत करून अशीच अट घातली होती.'

बिपिन.

मृदुला's picture

7 Oct 2008 - 4:32 am | मृदुला

विचार सुचून त्यावर अमल करण्याचा वेग आवडला.

सहज's picture

7 Oct 2008 - 7:01 am | सहज

साक्षीजी हा अपवाद आवडला.

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 7:25 am | अनिल हटेला

साक्षीजी !!!

अपवाद आवडला !!!

थोडे खोटे बोलल्याने जर दुसर्‍याला बरे वाटणार असेल तर काही हरकत नसावीच !!!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केशवराव's picture

7 Oct 2008 - 7:35 am | केशवराव

वपुंची ' संवेदना' नांवाची कथा आठवली. एका मुलीला धीर देण्याचा वेगळा पण छान प्रयत्न. आपले कौतूक!

विसोबा खेचर's picture

7 Oct 2008 - 8:03 am | विसोबा खेचर

साक्षिदेवा,

सुंदर कथन...! अगदी हटकून मराठी शब्द वापरले आहेस याचे कौतुक वाटले. "उत्सर्जनाचे नमुने" हा शब्द तर खासच! :)

असो,

ईश्वर करो आणि नीताला उत्तम बरे वाटो हीच प्रार्थना...

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2008 - 8:13 am | प्रभाकर पेठकर

साक्षीजी,

आवडला अपवाद. आपण खरंच त्या मुलीला आणि तिच्या आईला, अत्यंत आवश्यक असा, मानसिक आधार दिलात. हा तुमचा गुण इतरांनी शिकण्यासारखा नक्कीच आहे. (मराठी भाषेच्या आग्रहा इतकाच).
अभिनंदन.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

साक्षीजी,
खरंच तुमचा अपवाद आवडला. आणि योग्य वेळी योग्य गोष्ट सुचणंही महत्त्वाचंच ...

मराठी भाषेच्या आग्रहा इतकाच
किंवा काकणभर जास्तच, पण कमी नाही.

आगाऊ कार्टा's picture

7 Oct 2008 - 12:59 pm | आगाऊ कार्टा

तुमचे प्रसंगवधान आणि हजरजबाबीपणा खूप आवडला....
आणि याला खोटे बोलणे म्हणत नाहीत, समोरच्या व्यक्तीला धीर देण्याचा तो एक मनापासून केलेला प्रयत्न असतो.

अवांतरः आपण शाळेत केलेले उपद्व्याप यासंबंधी एखादा नवीन धागा सुरु करायला हरकत नाही..... मंडळी तुम्हाला काय वाटते??

अवलिया's picture

7 Oct 2008 - 1:04 pm | अवलिया

क्या बात है!

साध्य महत्वाचे.
साधन नाही.
साधन शुचितेपायी साध्य भरकटता कामा नये.
असो.

उत्तम लेख.

नाना

स्वाती दिनेश's picture

7 Oct 2008 - 1:29 pm | स्वाती दिनेश

अपवाद आणि त्याच बरोबर प्रसंगावधान आवडलं. त्याक्षणी त्या मुलीला मानसिक आधाराची जी गरज होती ती त्यातून पूर्ण झाली.
स्वाती

राम दादा's picture

7 Oct 2008 - 3:08 pm | राम दादा

आपण असे जगावे ..कि आपल्यामुळे दुसर्‍यांना आनंद मिळावा..त्रास कधी होऊ नये..

तुम्ही त्या मुलीला जो धीर दिला ..तो अप्रतिम प्रयत्न आवडला...

राम दादा..

मनाने एखाद्या गोष्टीचा विश्वास धरला की शरीर त्यामागे जाते ह्या सूत्राचा प्रसंगावधानाने केलेला वापर स्तुत्य!

(खुद के साथ बातां : रंग्या, हवे असलेले सगळेच्या सगळे मराठी शब्द आठवले की कसलं मस्त वाटतं ना? ;) )

चतुरंग