व्हलीचे पाच दिवस आगोदार व्हलीला सुरवत व्हायची.....
गावान जर एकी आसंल त तरणी पोरा एक व्हवून बैलगारी घेऊन रानात लाकरा आनाय जायाची. महामूर लाकरा आसायची म्हून व्हलीचे दिवसापरेत बारकी व्हली पेटायची. व्हलीचे दिवस सांचे ज्याची त्यानी लाकरा बिदीव आनून टाकायची. खरा म्हजे कुर्हाडीन फुटत नसतील आसं लाकराचं वंडं लोखा लय करून व्हलीला दियाची. म एक-दोन बैलगार्या जुपून व्हलीचे खासरान लाकरा पोचती व्हयाची. व्हलीचे दिवस राच्चे 8-9 वात्ता बाया नटून-थटून व्हलीव आरती घेऊन जमा व्हयाच्या. दरम्यान देवलान भजन सुरू असायचा. नंतर भजने भजन करीत-करीत व्हलीव जानार. व्हली पेटवायचा मान मातर गावचे पोलीस पाटलाचाच असायचा. व्हली रचून व्हलीत टोकराचे काठीला कोंबरीचा पिलू बांधला, ना पाटलीनीने व्हलीला का मग गावातल्या सगल्या महिला व्हलीला आरती करणार. आरती केली का पोलीस पाटील व्हली पेटवणार, मग आख्खे वर्षात नवीन लगीन झालेलं जोरपी व्हलीला पाच फेर्या मारणार. नटून थटून आलेलं जोरपा गावाच्या कौतुकाचा इषय. नवर्याला खांद्याव घेऊन फेर्या मारने म्हजे नवर्याची हवा टाईट व्हयाची. कारन खांद्यावं घेनारा जर का टाईट आसंल त तो कुठं कोसलवील याचा भरोसा नय. त्यामुले खांद्याव घेनारांपासून नवरा मुलगा चार हात लांबच. पन त्याला एकदा का गाठला, ना व्हलीला पाच फेर्या मारल्या त त्याचेकून कचकून पोसत वसुल केलाच समजा.
ना बाया व्हलीवरून घरी गेल्या का मग व्हलीच्या हाका (फाका) दिया सुरवात.....
सुरवात अर्थात पोलीस पाटला पासून त पार शेजारचे गावापरेत.
व्हली रं व्हली.....
पुरनाची पोली....
अशी हाक आली का समजा आथा...हाक देनाराला काय पोसत कबुल नय करीत तिथ परेत पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांचा उध्दार ठरलेलाच...
पन या हाका देन्याचा कोनालाच राग यायचा नय....
व्हलीनी बेस पेट घेतला का व्हलीची काठी कोसलायचे बेतावं यियाची. व्हलीची काठी उंगवंतला कोसलली त बरा. आसा म्हतारी मानसा सांगायची. व्हलीची काठी कोसलाय आली का. व्हलीचे काठीच्या काड्या घिया लोखांची ही गरदी. तो एक टोडगा आसायचा. या काड्या हेलं चढवाय वापरायची लोखा.
ना व्हलीचा पिला जगला त त्या वारा चंगला करतंय अशी समजूत. म्हून त्याच्याव चूंब परनार.
इकरं व्हलीत टाकलेलं आरतीचं नारल काढायला पोरांची सुरवत...
मग पोलीस पाटलाकून व्हली जागावाचा पोसत घेतला का मग आख्खी रात व्हली जागलीच म्हून समजा.
सौताची साखरगाठी शर्टान लपवायची. ना दुसर्याला सांगायचा चल आपन भेटू. भेटता-भेटता गाठीची पुतली तोरून खायाची.
मजा आसायची सलगी....
पन टोपल्या खाल ढाकलेलं गावातल्या कोंबर्या बाकी रातोरात लंपास व्हयाच्या. अशी व्हलीचे रातीला आख्खा गाव भांडना इसरून एक येनार.....
दुसरे दिवस सकालीच गावातले बाप्ये बैलगारीला ना नांगराला लागनारं खिलं भुजायला व्हलीला हजर.....
असा व्हलीचा सन आख्खा गाव एकत्र येवून साजरा करीत असल्याने त्याची वेगलीच मजा.
मिपावर मराठी भाषा दिन साजरा हिट असताना एक गोष्ट मनाला लागत होती आणि ती म्हणजे माझ्या मातीतली बोली भाषा यात नव्हती. अर्थात माझ्या परिसरातील कोणीही मिपावर नाही असे मला वाटते आणि मीही अजून तेवढा चांगला लिहीत नाही. त्यातही थोडा जास्त व्यस्त असल्यामुळे तोडकं मोडकही लिहू शकलो नाही. पण आज होळीचे मेसेज व्हाट्सअप वर यायला आणि प्रेरणा मिळाली. खरंतर साजेसा विषय मिळाला. मग हे एवढाच खरडलं.
शब्दार्थ:
बिदीवं : मोकळ्या जागेत, पटांगणात.
वंडं : ओंडके
बेस : बऱ्यापैकी, चांगला
लोखा : लोक, गावकरी
खासर : जिथे होळी पेटवली जाते ते शेत
टोकराला : बांबूला
उंगवंतला : पूर्वेला
वारा करणे : पैदास वाढवणे
चुंब पडनार : गर्दी जमणार
प्रतिक्रिया
12 Mar 2017 - 12:36 am | जव्हेरगंज
कुंच्या गावची बुली म्हणाय्ची ही?
12 Mar 2017 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंच्या गावची बुली म्हणाय्ची ही?
संपादक लक्ष घालतील काय ? =))
-दिलीप बिरुटे
12 Mar 2017 - 8:36 am | इरसाल कार्टं
खरंतर पालघर जिल्ह्यात अनेक बोली भाषा आहेत त्यापैकी आमाचा कुणबी समाज हि भाषा बोलतो.
12 Mar 2017 - 9:25 am | इरसाल कार्टं
एकट्या पालघर जिल्ह्यात कुणबी, वारली, कोळी, आगरी आणि वंजारी या समाजाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. त्यातही डोंगराळ भागात आणखी विविधता आहे.
12 Mar 2017 - 9:43 am | पैसा
या बोलीत लिहीत राहा! कळते आहे.
12 Mar 2017 - 10:10 am | संदिप रमेश धुरी
आपल्या पारंपारिक भाषा आणि बोली जपल्या पाहिजेत.
12 Mar 2017 - 10:43 am | एस
वा! फारच छान!
12 Mar 2017 - 1:22 pm | मार्मिक गोडसे
ओळखीच्या बोली भाषेत वाचताना मजा आली. लिहीत रहा.
12 Mar 2017 - 1:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लिहिलं रे....! अन भाषा आवडली.
-दिलीप बिरुटे