उत्तर (कथा)

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 10:29 pm

"आता निघालं पाहिजे म्हणजे थोडा वेळ फ्रेश होऊन नाईटसाठी येता येईल" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तिच्या मनात विचार आला. नेहेमीप्रमाणे वॉर्डमधल्या नर्सला सगळ्या सूचना देऊन ती निघाली. गाडी तिने ए ऐवजी बी विंगकडे वळवली. आशिषचं असं झाल्यानंतर अंजलीचे आईवडील तिच्याच सोसायटीमध्ये राहायला आले होते. अंजलीच्या मुलीची, रियाची सगळी काळजी ते घेत होते. रियालाही आजी आजोबांबरोबर राहायला आवडत होतं. सगळं सोयीचं असलं तरीही मुलीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत या विचाराने अंजलीला फार अपराधी वाटत असे. आशिषचं दुःख विसरण्यासाठी तिने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. आणि तिचा पेशाही तसाच होता. डॉक्टरच्या व्यक्तिगत आयुष्याची ओढाताण ही ठरलेलीच! त्यात अंजलीच्या संसाराची गाडी तर एकाच चाकावर चालली होती.

अंजली घरी आली तेव्हा आजोबा रियाला सोसायटीच्या कंपाउन्डमधे खेळायला घेऊन गेले होते. आईने अंजलीच्या हातात चहाचा कप आणि उपमा ठेवला. मायलेकींच्या गप्पा सुरु झाल्या. "अगं हो, सकाळी रियाच्या टीचरशी मीटिंग कशी झाली?" आजीने उत्सुकतेने विचारलं. "काही विशेष नाही गं, नेहेमीचंच , सगळं छान छान आहे. मी म्हटलं त्यांना की ह्यांना जास्त अभ्यास का नाही देत! मला रियाच्या वयाचं असताना केवढ्या अभ्यासाची सवय होती. रिया तर अर्धा तासही धड बसत नाही", अंजलीने काळजीने म्हटलं. "अगं ते दिवस वेगळे होते,आता नवीन पद्धती वेगळ्या आहेत"
"हो गं, पण शेवटी तिला जर प्रोफेशनल करिअर करायचं असेल तर मेहेनतीची सवय नको का आतापासून?" अंजलीने नाराजीच्या सुरात म्हटलं. "राहूदे आता. त्या पाच वर्षाच्या मुलीच्या अभ्यासाची उगीच चिंता करू नकोस, तुला निघायचंय ना लगेच, मग थोडा आराम कर" अंजलीचं मन भरून आलं. आशिष अकाली गेला असला तरी तिच्या आईवडलांचा तिला केवढातरी आधार होता.

आज रात्री अंजली हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डला होती. नेहेमीप्रमाणे एक दोन रोड ऍक्सिडंट केसेस, एखादं सिव्हिअर इन्फेकशन, लहान सहान दुखणं खुपणं , तापाने फणफणलेलं एक लहान मूल ..... घड्याळाचे काटे सरकत होते. बाहेर थोडा गलका झाला. हॉस्पिटल जवळच एक झोपडपट्टी होती. तिथले बरेच पेशंट्स या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधेच येत असत. आताही तिथून एक बाई आली होती. सोबत तिथली अजून लोकंसुद्धा होती. बाईचं अर्ध्याहून अधिक शरीर भाजलं होतं. ती दुःखानं विव्हळत होती. तिची अवस्था बघवत नव्हती. अंजलीने बर्न्स वॉर्डच्या डॉक्टरना कळवायला सांगून लगेच ट्रीटमेंट सुरु केली. नेहेमीप्रमाणे सासरच्या लोकांचं म्हणणं होतं की स्टोव्हचा भडका उडाला होता. बहुतेक स्टोव्हबर्नच्या केसेस प्रमाणे याही केसमध्ये लग्नाला चार वर्ष होऊन घरात पाळणा हलला नव्हता. पेशंटला बर्न वॉर्डमध्ये ट्रान्स्फर करायला अंजली स्वतः गेली. ट्रान्सफर प्रोसिजर तिने पूर्ण केली. पण डॉक्टर प्रधानांचा चेहरा बघूनच पेशंटच्या जगण्याची फारशी आशा नाहीये हे तिला कळून चुकलं . अंजली खरंतर अशी हळवी नव्हती पण आशिष अचानक गेल्यापासून मृत्यूला असं अचानक समोर पाहून तिला हतबल, हताश वाटायचं .

पोलीस आले. एफआयआर लॉज झाला. रात्री तीन वाजता कोण चहा पिणार होतं आणि स्टोव्ह का पेटवला ह्या प्रश्नांना काहीतरी थातुरमातुर उत्तरं मिळणार आहेत हे आता अनुभवातून अंजलीला चांगलंच माहीत होतं. गेल्या एक दोन वेळी हॉस्पिटलच्या चीफ मेडिकल ऑफिसर (CMO) बरोबर तिची याबद्दल मीटिंग झाली होती. CMO सुद्धा अतिशय चांगले गृहस्थ होते पण सगळ्या फॉर्मालिटीज मुळे त्यांना फार काही करता येणार नव्हतं.

रात्र कशीबशी संपली होती. उद्विग्न , हताश मनाने अंजली गाडीत येऊन बसली. गाडीबरोबर तिच्या मनाची चाकंसुद्धा गरागरा फिरू लागली. "काय करतोय आपण? मी इथे असले काय आणि नसले काय..... त्या भाजलेल्या पेशंटसारख्या कितीजणी मरायच्या त्या मरतातच. आणि मी काहीच करू शकत नाही. आणि या कामांमध्ये पोटच्या गोळ्याकडेसुद्धा दुर्लक्ष होतंय. आशिष नाही म्हटल्यावर खरंतर आपण रियाला दुप्पट वेळ द्यायला हवा. ते तर राहिलंच, बाकीच्या ऑफिसला जाणार्या बायकांएवढाही वेळ मी तिला देऊ शकत नाही. आणि आई, बाबा, ते म्हणत नाहीत पण त्यांचं वय झालय. या वयात मी त्यांना सांभाळायचं तर उलट माझ्या मुलीला सांभाळायचं काम मी त्यांना लावून दिलंय ! आयुष्यभर मी किती चांगली स्टुडन्ट होते. मग अशी कशी अवस्था झाली माझ्या आयुष्याची....... आशिष तू कसा रे गेलास !!!"

लिफ्टच्या आरशात बघून तिने चेहरा ठीकठाक केला. तिला रडताना बघून रिया बावरली असती. घरात शिरली तर रिया होमवर्क करत बसली होती. "रिया स्कूलबॅग भर. मी मम्माला चहा घेऊन येते" म्हणून आजी आत गेली. अंजली हायपाय धुऊन रियाच्या बाजूला येऊन बसली. रियाला तिने मांडीवर घेतलं. एका हाताने रियाला धरून दुसर्या हाताने तिने तिची होमवर्कची वही घेतली. रियाचा होमवर्क ऑलमोस्ट पूर्ण झाला होता पण त्यात बर्याच चुका होत्या. ते पाहून तिला थोडं टेन्शन आलं. तिचं स्वतःचं सगळं काम बिनचूक असायचं. पण तिला रियाला दुखवायचंही नव्हतं. रियाला जवळ घेऊन ती म्हणाली, "अगं सोनू तुझ्या होमवर्क मधे खूप चुका आहेत अजून, टीचर ओरडणार नाही का?" रियाने हसून तिचे हात मम्माच्या गळ्यात घातले आणि म्हणाली "मम्मा टीचरने सांगितलंय Don't worry, Just give your best shot" आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चिमण्या पिल्लाच्या एका वाक्यात आहेत असं अंजलीला वाटलं. तिने एक मोकळा श्वास घेतला आणि रियाला जवळ घेऊन हसून म्हणाली "बरोबर सांगितलंय टीचरने"

(आनन्दिनी)
डॉ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

23 Feb 2017 - 10:34 pm | एस

कथा आवडली.

जेपी's picture

23 Feb 2017 - 10:56 pm | जेपी

+1

स्रुजा's picture

24 Feb 2017 - 6:13 am | स्रुजा

छान...

बापु देवकर's picture

24 Feb 2017 - 6:43 am | बापु देवकर

+1

रुपी's picture

24 Feb 2017 - 6:45 am | रुपी

मस्त!

एक एकटा एकटाच's picture

24 Feb 2017 - 7:32 am | एक एकटा एकटाच

कथा खरच खुप छान आहे

पैसा's picture

24 Feb 2017 - 7:37 am | पैसा

कथा आवडली

Jabberwocky's picture

24 Feb 2017 - 10:43 am | Jabberwocky

जबरदस्त शेवट.....

गिरिजा देशपांडे's picture

24 Feb 2017 - 11:27 am | गिरिजा देशपांडे

मस्त कथा. आवडली.

जव्हेरगंज's picture

24 Feb 2017 - 2:57 pm | जव्हेरगंज

गुड वन!!

लिहीत रहा!!

स्वप्नीलदमाळवे's picture

24 Feb 2017 - 5:43 pm | स्वप्नीलदमाळवे

अप्रतिम लिहिलय....

सस्नेह's picture

24 Feb 2017 - 10:18 pm | सस्नेह

छान कथा !
शेवटही सुरेख.

aanandinee's picture

25 Feb 2017 - 1:06 am | aanandinee

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार .

भिंगरी's picture

25 Feb 2017 - 1:32 am | भिंगरी

मस्त!

ज्योति अळवणी's picture

25 Feb 2017 - 4:36 am | ज्योति अळवणी

जबरदस्त कथा. खूप आवडली

रेवती's picture

25 Feb 2017 - 7:22 am | रेवती

कथा आवडली.

रातराणी's picture

25 Feb 2017 - 11:33 am | रातराणी

मस्त कथा!