ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.
वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती. नंतर एक वर्षांनी आम्ही ती चालण्याइतपत नीट करून घेतली.
१९९५ मध्ये मी ह्या स्कूटरवर पहिल्यांदा चालवण्याकरीता बसलो. त्यावेळी अंधेरीत राहताना तेथील मित्रांनी दुचाकी शिकण्यास मदत केली ती ह्याच स्कूटरवर. त्याआधी एका मित्राने त्याच्या कायनेटीक होंडा वर एक प्रात्यक्षिक दिले होते. पण ते जुजबी. फक्त एक दोन वेळा. बाकी सर्व ह्याच स्कूटरवर. तेव्हाच अभियांत्रिकीत प्रवेश घेतल्याने मग घरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नीट सराव नाही झाला. पण जेव्हा कधी घरी येईल तेव्हा स्कूटर बाहेर काढून शिकणे चालूच होते. १९९६ मध्ये आम्ही रहायला आलो ठाण्याला. पण तेव्हा ही सोबत आणली नव्हती. शेजारीच राहणार्या एका मित्राला आईने ह्या स्कूटरला रंगरंगोटी करावयास त्याच्या ओळखीच्या मेकॅनिककडे द्यायला सांगितले होते. त्यानंतर ती त्याच्याच कडे होती. शेवटी १९९७ मध्ये त्याच्याकडून आणली मस्त रंगवून डागडुजी केलेली गाडी. तोपर्यंत मी ही चालविणे शिकलो होतोच. मग शिकाऊ परवाना घेऊन तयारी चालू केली. परंतु पक्का परवाना काढायला जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पहिला परवाना तर तसाच वाया गेला. मग दुसरा शिकाऊ परवाना काढला तेव्हा कार चालविणेही शिकत होतोच. मग दोन्ही पक्के परवाने एकत्रच घेतले. मग तर काय काहीही काम असले की स्कूटरवरूनच बाहेर जाणे होत होते. मित्राकडे, बाजारात, नुसते फिरणे :D
कॉलेजला होतो तेव्हा विचार केला होता की शेवटच्या वर्षी स्कूटर घेउन जाईन तिकडे. घरून परवानगीही घ्यायची होती. पण स्कूटरच्या कागदांचा गोंधळ होता. आणि ही गाडी नागपूरवरून इतर ठिकाणी नेल्यानंतर त्याची नोंदणीच नव्हती केली. मग १९९९ मध्ये माझ्या आतेभावाकडून नागपूरवरून त्या कागदपत्राची पूर्तता करून गाडी माझ्या नावावर करून घेतली व ती कागदे इकडे आल्यावर ठाण्यातील RTO मध्ये काय ती फी भरून सर्व गोंधळ संपविला. नंतर ह्या स्कूटरची अद्ययावत नोंदणी वही परत घेताना मी विचारले, 'आणखी काही करायचे आहे का?' तेव्हा मला उत्तर मिळाले, 'आता इकडे यायची गरज नाही.' मी ऐकले होते की काही तरी One Time Tax असतो गाड्यांचा. नोंदणी वहीत पाहिले तर तो ही भरला होता. त्यामुळे मग जास्त काही विचार नाही केला आणि बिनधास्त स्कूटरवर हुंदडणे चालू झाले. एवढे करूनही कॉलेजकडे गाडी नेणे जमले नाही. :(
तेव्हा तरी ठाण्यातच गाडी चालविणे होत होते. मग हळू हळू ठाण्याच्या परिघाच्या बाहेरही नेणे चालू झाले. इकडे मुलुंड, मग पवईच्या आयआयटी कॉलेजपर्यंत, तिकडे बेलापूरपर्यंत. नंतर कार्यालयात जायला लागल्यापासून दररोज सकाळी स्टेशन पर्यंत स्कूटरवर जाणे. तिकडे गाडी लावून मग लोकलने दादरला ऑफिस. संध्याकाळी परत आल्यानंतर बस-रिक्षाची कटकट नव्हती. मग एक दोन वेळा दादरपर्यंतही ही स्कूटर नेली.
तुम्ही म्हणाल, आता स्कूटरच आहे ती. एवढ्या ठिकाणांपर्यंत नेली तर एवढे काय? अहो, ह्यात मुद्दा आहे की ह्या गाडीकडे पाहून लोकांचा पहिला प्रश्न असतो, 'केव्हाची ही गाडी?' माझे उत्तर असते, '१९७१'. माझ्यापेक्षाही वयाने भरपूर मोठी आहे ही स्कूटर. त्यामुळेच कधीही कुठे ती न्यायची म्हटले तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की ही गाडी जाईल का? बाकी गाडीमध्ये काही अडचण नाही हो. (काय ते 'टचवूड' म्हणतात ते ही करतो आता ;) ) मध्ये २/३ वेळा रस्त्यातच बंद पडली होती तेव्हा तिकडे जवळच असलेल्या मेकॅनिककडे ठेवून मग घरी आलो होतो. पण अर्थात त्यात चुकी माझीच होती. नीट काळजी नाही घेतली तर असे त्रास होणारच. माझे वडील तर दर रविवारी स्कूटर उघडून साफ करायचे. पण मला काही ते जमत नाही. तरीही मेकॅनिकला सांगून दर ३/४ महिन्यांनी डागडुजी करून घेतो. बाकी वडील वापरायचे त्यापेक्षा मी गाडीची वाटच लावली आहे.:(
तर ह्याच सर्व परिस्थितीत म्हणजे लोक गाडीच्या चालण्यावरून शंका घेत असताना, मी गेल्या वर्षी ही स्कूटर पुण्याला नेण्याचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे की नाही हे कोणाला नीट माहित असेल असा प्रश्न आल्याने मग मी थेट रस्त्यावर चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनाच त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, 'RC बुक, PUC व विमा एवढेच पाहिजे, आणि काय तो कर भरलेला असला पाहिजे'. महाराष्ट्रातच गाडी असल्याने 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची भानगड नाही. मित्रांसोबत ह्याबाबत बोललो की मी नेतोय गाडी पुण्याला, ते ही स्वत: चालवत. तेव्हा एक मित्र बोललाही की ,'स्वत: नको नेऊस म्हणून. घाटात पहिल्या गेअर मध्ये ही त्रास होऊ शकतो.' पण मी जिद्दीला पेटलो तेव्हा त्यानेच रस्त्याची नीट माहिती दिली व सांगितले की मध्ये गाडी घाटात चढली नाही तर काही Towing वाले असतात त्यांना सांगायचे, ते गाडी उचलून आणून देतील. त्याच्या दुसर्या दिवशी मी सकाळी ७ ते ११ असा ४ तास प्रवास करत माझी ही स्कूटर पुण्य़ापर्यंत पोहोचविली. घाटात पहिल्याच काय दुसर्या गेअर मध्येही नीट चालली. तेव्हा मग लक्षात आले, ह्या गाडी अजूनही पुढे मला साथ देईल. मग एक वर्ष पुण्याचीही रपेट ह्या स्कूटरवरून केली. तिथेही मित्रांचे म्हणणे होतेच, 'किती जुनी ही गाडी' :)
आता गेले २/३ महिने आणखी एक प्रश्न समोर आला, १५ वर्षांवरील गाडीची नोंदणी दर ५ वर्षानी पुन्हा करावी लागते. ह्याबाबत मला माहित नव्हते. २ आठवड्यांपुर्वी गाडीचे सर्व कागदपत्रे पुन्हा नीट जमा केली व क्षेत्रिय वाहतूक कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवली व विचारले की साहेब, ह्यात काय काय करावे लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की 'काही नाही. गाडी अधिकार्याकडून तपासून घ्या व १६० रू भरून पुनर्नोंदणी करून घ्या'. दुपारी त्यांनी सांगितलेल्या दुसर्या कार्यालयात गेलो. तेव्हा कळले की २ वाजता अर्ज व फी भरणे बंद होते. मला शनिवार शिवाय बाकी दिवस वेळ नसल्याने पुन्हा २ आठवडे थांबणे आले. दरम्यान कळले की गाडीची स्थितीही चांगली पाहिजे. त्यामुळे मग काल मेकॅनिककडे घेउन गेलो. त्याला सांगितले की 'असे असे आहे, बघ काही करायचे बाकी आहे का?' त्याकडून दिव्यांची डागडुजी करून घेतली. तो म्हणाला की 'बहुधा १६० रूपयांमध्ये होणार नाही. ७००/७५० रू जातील'. मी म्हटले, 'जेवढे आहेत तेवढे, बघुया.' :) सकाळी अर्जात वाचले की Chassis क्रमांक ही ते तपासतात. आता वाहन नोंदणी वहीत त्याची नोंद होती त्यामुळे अर्जात लिहायला त्रास नाही झाला. पण अधिकारी ते तपासणार म्हणजे? त्या मेकॅनिककडे गेलो. तो नव्हता. त्याच्याच दुकानातील दुसर्या व्यक्तीने सांगितले की एवढ्या जुन्या गाडीचा पत्रा सडल्याने तो क्रमांक आतापर्यत निघूनही गेला असेल. म्हटले आता आली का पंचाईत? शेवटी काय निकाल लागायचा तो लागू दे म्हणून गाडी घेउन गेलो. तिकडे अधिकार्यांकडे सांगायला गेलो की ,'साहेब, गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे आहे'. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 'chassis क्रमांक दिसतो का?' :( म्हणालो, 'नक्की माहित नाही.' ते म्हणाले, 'आधी ते पाहून ये'. गाडीकडे गेलो. शोधायचा प्रयत्न केला. त्या माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला की, 'डीकीच्या खाली साफ करून बघ, तिथे असेल'. नाही मिळाला. तेव्हा मग तिकडच्या एका एजंटला मदत मागितली. त्याने सांगितले की 'हा इथे आहे, नीट साफ केला की दिसेल'. झाले काम. पुन्हा गेलो. अधिकारी म्हणाले फी भरून ये. फी भरली. एका अधिकार्याने पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ३०+१००= १३० व दंडाचे १००. कारण १९९९ नंतर २००४ मध्ये मी नूतनीकरण करायचे होते ते नाही केले. ह्या गाडी तपासणार्या अधिकार्यांकडे गेलो ते म्हणाले, १३० नाही १६० रू. पुन्हा जादा ३० रू भरून आलो. मग पाहिले तर चेसिस क्रमांकाचा पेन्सिलीने ठसा अर्जावर उमटवायचा आहे. तो उमटविला. शेवटी त्यांनी पूर्ण तपासून स्कूटरच्या नोंदणीच्या नूतनीकरणावर सही व शिक्का मारला. हुश्श्श्श्श. आता पाच वर्षे चिंता नाही. फक्त गाडी नीट ठेवणे,चालविणे व PUC दर सहा महिन्यांनी करत रहायचे.
अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, 'विकून टाक ही स्कूटर आता.' पण मी म्हणतो, 'चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?' आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय, 'जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.'
चल मेरी वेस्पा :)
प्रतिक्रिया
5 Oct 2008 - 12:41 am | शितल
आमच्या ऑफिस मध्ये ही कॅशिअरची स्कुटर होती आणी ती स्कुटर इतकी जुनी होती की ते एकदम रुबाबदार आणि ती स्कुटर त्यांना अजिबात शोभायची नाही, म्हणुन आम्ही त्यांना सांगितले सर
तुम्ही ही इतकी जुनी स्कुटर का बरे घेऊन फिरता, अजिबात शोभत नाही तुम्हाला तर त्यांनी जे उत्तर दिले त्यावर आम्ही परत त्यांना हा प्रश्न केलाच नाही. ते म्हणाले माझी बायको ह्या स्कुटरच्या मागच्या सीट वर बसली आहे आता ती ह्या जगात नाही पण तीच्या आठवणी आहेत ह्या स्कुटरशी संबंधीत म्हणुन मी स्कुटर वरून फिरतो .
5 Oct 2008 - 1:02 am | फटू
मस्त लिहिलं आहेस एकदम !!!
असते अशी मनाची गुंतवणूक आपल्या जुन्या गाड्यांमध्ये.... आमच्या घरीही एम ८० आहे... मी दहावीला असताना घेतलेली... खुप फिरवलं बाबांनी आम्हाला तिच्यावरून... हरीहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, पाली, खोपोली, वाळण खोरे, शिवथर घळ... जवळ जवळ आख्खा रायगड... पुढे मी जेव्हा व्यवस्थित स्थिरावल्यावर पॅसियन प्लस घेतली, तेव्हा घरामध्ये एम ८० विकण्याच्या गोष्टी होऊ लागल्या... तेव्हा मी एम ८० विकायची नाही असं निक्षून सांगितलं... मग आता ती कोण चालवणार या प्रश्नाला माझं उत्तर होतं... मी चालवेन एम ८०....
असो, जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
5 Oct 2008 - 1:06 am | प्राजु
माझ्या मामाचीही वेस्पा आहे आणि गेली २५-३० वर्षे तो नीट चालवतो आहे आणि तीही निट चालते आहे.
काही काही गोष्टींशी अनेक आठवणी जोडलेल्या असतात. आणि त्या पुसल्या जात नाहीत.
तुमची स्कूटर आणखी बरिच वर्षे तुम्हाला अशीच साथ देत राहो..
आवांतर : शितल, प्रतिसाद आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Oct 2008 - 1:21 am | टुकुल
जुन्या गोष्टींबरोबर बर्याच आठवणी जोडलेल्या असतात आणी त्या अमुल्य असतात.
5 Oct 2008 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> जुन्या गोष्टींबरोबर बर्याच आठवणी जोडलेल्या असतात आणी त्या अमुल्य असतात.
अगदी! फक्त त्या "आठवणी" बनण्याच्या आधी त्यांची फारशी किंमत नसते, पिडाकाकांनी कवितेत लिहिलंय तसंच!
5 Oct 2008 - 12:19 pm | ऋषिकेश
अगदी फक्त दिड दिवसाचा गणपती घरातून हलला तर घर रिकामं वाटू लागतं ... ह्या आश्या वर्षानूवर्षे टिकणार्या गोष्टीबरोबर म्हणजे तर माणसांसारखे ऋणानुबंधच जुळतात.... अश्या भावनिक गुंतवणूक असलेल्या वस्तु टिकवण्यातील मजा काहि औरच!
आमची एम८० 15-20 वर्षे होती. तिची नंबर प्लेटही "मॅड" होती म्हणजे MAD XXXX :).. नंतर तीनेच बिचारीने "बास! खूप फिरले मी.. मी आता चालू शकणार नाहि" घोषित केलं आणि आम्हाला नाईलाजाने बाई़क आणावी लागली.
वेस्पा टिकवल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
-(नॉस्टॅल्जिक) ऋषिकेश
5 Oct 2008 - 11:08 pm | देवदत्त
प्रतिक्रिया आणि आपले अनुभव, आठवणी सांगितल्याबद्दल धन्यवाद. खरं तर माझ्या स्कूटरबद्दल लिहायचे गेल्या महिन्यापासून वाटत होते.
काल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वतः घेतलेल्या अनुभवानंतर वाटले की आता लिहतोच. म्हणून तो भाग ही जरा तपशिलवार आला. पण एक सांगायचे राहिले. तिथे वाहन तपासणी अधिकार्यांपैकीही एक मला म्हणाले होते की, "एवढी जुनी गाडी कशाला ठेवता? काढून टाका स्क्रॅपमध्ये." मी म्हणालो,"चांगली चालते हो अजून", ते म्हणाले, "उगाच पोल्युशन वाढवत असेल" मी म्हणालो, "नाही, पीयूसी च्या मर्यादेतच आहे." मग काही म्हणाले नाहीत :)
(ठाणेकरांना ही गाडी कुठे उभी दिसली की समजा मी जवळपासच कुठेतरी आहे. तेवढाच आणखीन एक छोटा कट्टा ;) )
--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
5 Oct 2008 - 11:39 pm | अनिरुध्द
माझ्याही हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या स्कुटरलाही. आपली 'वाटचाल' सुखाची होवो. :-)
6 Oct 2008 - 12:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवदत्ता,
वेस्पा स्टोरी आवडली.
6 Oct 2008 - 9:17 am | विसोबा खेचर
अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, 'विकून टाक ही स्कूटर आता.' पण मी म्हणतो, 'चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?' आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय, 'जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.'
वा! सुंदर लेख, सुंदर आठवणी...
आपला,
(बजाज चेतक प्रेमी) तात्या.
6 Oct 2008 - 9:54 am | अनिल हटेला
अगदी फक्त दिड दिवसाचा गणपती घरातून हलला तर घर रिकामं वाटू लागतं ... ह्या आश्या वर्षानूवर्षे टिकणार्या गोष्टीबरोबर म्हणजे तर माणसांसारखे ऋणानुबंधच जुळतात.... अश्या भावनिक गुंतवणूक असलेल्या वस्तु टिकवण्यातील मजा काहि औरच!
खर आहे !!!
म्हणुन तर आमची ही एम -८० अजुनही टकटकीत आहे !!!!
( आम्ही प्रेमाने तीला विमान म्हणतो )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
7 Oct 2008 - 5:38 pm | घाशीराम कोतवाल १.२
नाय बा माझ्याकड गाडी पण लेख मात्र आवड्ला
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
7 Oct 2008 - 5:51 pm | चतुरंग
"आपण तिची (पक्षी: गाडीची;)) काळजी घेतली तर ती आपली काळजी घेईल!" ह्या ब्रीदावर विश्वास असणारा तूही निघालास.
पुणे, हैद्राबाद अशा सगळ्या ठिकाणी मला साथ देणारी माझी पहिली खरेदी, बजाज प्रिया स्कूटर, पुण्यात आहे. ह्या तुझ्या लेखाने तिच्या आठवणी जाग्या केल्या!
चतुरंग
10 Oct 2008 - 8:31 pm | baba
"आपण तिची काळजी घेतली तर ती आपली काळजी घेईल!"
+१
...बाबा
7 Oct 2008 - 6:38 pm | प्रभाकर पेठकर
काही काही वस्तुंमध्ये इतकी भावनिक गुंतणूक असते की त्या वस्तुंची नोंद आपल्या 'आप्त-स्वकियां'मध्येच होते.
माझ्याकडे असा 'फेड-३' नांवाचा रशियन, TLR कॅमेरा आहे. १९७६साली माझा आख्खा बोनस देऊन तो मी ७०० रुपयांना विकत घेतला होता. माझ्या अव्यवहार्य हौसेबद्दल त्या वर्षी घरून बरीच बोलणीही खाल्ली होती. अजूनही तो कॅमेरा माझ्याजवळ आहे. जेंव्हा जेंव्हा तो मी उघडतो, मांजराच्या पिल्लाला कुरवाळावं तसं कुरवाळतो. त्या कॅमेरावर मी माझ्या छायाचित्रकलेचे पहिले धडे गिरविले होते.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Oct 2008 - 1:01 pm | विजुभाऊ
राहुल बजाज ना जेंव्हा त्यांच्या या उत्पादना बद्दल विचारले तेंव्हा ते म्हणाले की बाजारात ऑन मनी देउन विकत घेतली जाणारे ते वाहन सर्वसामान्य लोकांना परवडणारे होते. बाजारात ओनमनी देउनही लोक बजाज प्रिया ( व्हेस्पा) घेत असताना बजाज ने वाहनाची किम्मत वाढवली नव्हती
10 Oct 2008 - 1:18 pm | यशोधरा
लेख वाचला होता, प्रतिक्रिया लिहायचे राहून गेले.
मस्त लिहिलेय!
10 Oct 2008 - 1:51 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
10 Oct 2008 - 8:30 pm | baba
आवडला..
..बाबा
11 Oct 2008 - 12:47 am | संदीप चित्रे
लेखाबद्दल धन्यवाद !
माझ्या वडिलांची बजाज १५० आठवली. चार - पाच वर्षांचा असल्यापासून स्कूटरच्या फूटबोर्डवर उभा राहून फिरलो. नंतर मग वडिलांच्या मागे.
स्कूटर चालवताना अप्पा हाताने मागच्या सीटवर चाचपून बघायचे की मी जागा आहे की वारा पिऊन झोपलो :)
कॉलेजमधे गेल्यावर ती स्कूटर चालवायलाही मिळाली.
अप्पांसारखा सज्जन आणि जगन्मित्र माणूस जी गाडी चालवायचा त्या गाडीवर आता त्यांचे चिरंजीव 'शायनींग' करू लागले होते !!
('चिरंजीव' हा खास आमच्या अप्पांचाच शब्द. वयाने त्यांच्याहून लहान सगळ्यांना ते 'चिरंजीव' किंवा 'कन्या' म्हणायचे :) )
--------
अप्पांनी स्कूटर चालवताना ती कधी रिझर्व्हवर येऊ दिली नाही आणि आम्ही स्कूटर चालवताना कधीही रिझर्वपेक्षा जास्त पेट्रोल भरलं नाही :)
11 Oct 2008 - 3:43 am | चतुरंग
अप्पांनी स्कूटर चालवताना ती कधी रिझर्व्हवर येऊ दिली नाही आणि आम्ही स्कूटर चालवताना कधीही रिझर्वपेक्षा जास्त पेट्रोल भरलं नाही :)
हे बाकी जबराट!! :D
(का कोण जाणे पण ही खोड मलाही आहे! मी अजूनही कारला कित्येक वेळा शेवटच्या थेंबापर्यंत पेट्रोल वापरतो, इतके की आता बायको गाडीत बसायच्या आधी विचारते "पेट्रोल आहे? नसेल तर भरुन या मग जाऊयात!" B) )
चतुरंग
11 Oct 2008 - 11:05 am | देवदत्त
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
अगदी फक्त दिड दिवसाचा गणपती घरातून हलला तर घर रिकामं वाटू लागतं ... ह्या आश्या वर्षानूवर्षे टिकणार्या गोष्टीबरोबर म्हणजे तर माणसांसारखे ऋणानुबंधच जुळतात.... अश्या भावनिक गुंतवणूक असलेल्या वस्तु टिकवण्यातील मजा काहि औरच!
सहमत.
"आपण तिची (पक्षी: गाडीची;)) काळजी घेतली तर ती आपली काळजी घेईल!"
इक हाथ ले इक हाथ दे यही है दस्तुर :)
काही काही वस्तुंमध्ये इतकी भावनिक गुंतणूक असते की त्या वस्तुंची नोंद आपल्या 'आप्त-स्वकियां'मध्येच होते.
खरंय एकदम काका. बाकी आमच्या घरात आणखीही जुने सामान आहे. कपाटे, सोफा, पलंग. सर्व अस्सल सागवानी लाकडाचे, घरी बनविलेले. कमीत कमी ४० वर्षे जुने. घरात एखाद्या जागेवर नीट बसविण्यासाठी ह्यात थोडेफार बदल करतानाही उगाच कसेतरी वाटते. म्हणून काही वस्तू जशाच्या तशाच ठेवल्या आहेत.
अप्पांनी स्कूटर चालवताना ती कधी रिझर्व्हवर येऊ दिली नाही आणि आम्ही स्कूटर चालवताना कधीही रिझर्वपेक्षा जास्त पेट्रोल भरलं नाही .
=))
माझे थोडेसे वेगळे आहे. गाडी रिझर्ववर आली की लवकरात लवकर जाऊन पेट्रोल भरून घेतो. गाडी नेहमी 'ऑन' वर ठेवायची हा नियम :)
-------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
11 Oct 2008 - 11:57 am | झकासराव
लेख मस्त आहे.
एवढी जुनी गाडी छानच ठेवली आहे तुम्ही. :)
अप्पांनी स्कूटर चालवताना ती कधी रिझर्व्हवर येऊ दिली नाही आणि आम्ही स्कूटर चालवताना कधीही रिझर्वपेक्षा जास्त पेट्रोल भरलं नाही .>> :))
बाकी "एका मित्राची स्कुटर घेवुन ती चालवायचा शिकण्याचा प्रयत्न केला असता आधी मी आणि नंतर स्कुटर असे दोघेहि रस्त्यावर आडवे पसरलो होतो" ही एवढीच ओळख अजुन स्कुटर नाही चालवली कधी. प्रयत्न केला पाहिजे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao