आईचा तिळगूळ

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
14 Jan 2017 - 7:06 pm

सकाळची कामं आटोपून, मस्त आल्याच्या चहाचे घोट घेत, वर्तमानपत्र हातात घेतलं. आजचच आहे ना बघण्यासाठी तारीख बघितली, १३ जानेवारी २०१७ (आम्ही इतके शिस्तीचे नाही बरं, कुठल्याही तारखेचं वर्तमानपत्र हाती येऊ शकतं) अरे बापरे! म्हणजे उद्या १४ जानेवारी, मकर संक्रांत! तिळगुळ करायचा राहुनच गेलाय अजून. आळस झटकून मी उठले. तिळगुळाचं साहित्य साटपपणे कध्धीच आणुन ठेवलं होतं पण परिक्षेचा अभ्यास कसा आदल्या दिवशी, ताजा ताजा करायचा असतो, मी तिळगुळही तसाच करते, अगदी ताजा ताजा.

तर मग मी तयारी सुरू केली. साहित्याची मांडामांड केली. एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली, उलथणं काढुन ठेवलं, पाव किलो पॉलिश तीळ एका भांड्यात ओतले. यात बोटं फिरवुन जीवजंतू नसल्याची खात्री करुन घेतली. वाटीभर शेंगदाणे घेतले. बरेच जण डाळं आणि सुकं खोबरही घेतात थोडं (म्हणजे अर्धी वाटीभर.पण आमच्या कडच्या मंडळींना ते फारसं आवडत नाही म्हणुन कटाप.) तीळ, दाणे झाले आता ....आता चिक्कीचा गूळ, तोही पाव किलो घेतला आणि तुपची लोटी, वेलची पुडीची डबीही काढुन ठेवली.

मुख्य सामग्री झाली, आता दुसर्‍या फळीतील तयारी करायला हवी. भाजलेले दाणे गार करायला एक ताटली, तिळासाठी खोलगट, पसरट पाटी, मिश्रण तयार झाल्यावर ठेवण्यासाठी मायक्रोवेव्ह सेफ काचेचं भांडं, लाडू ठेवायला स्टीलचा थाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याने अर्धी भरलेली वाटी. अहो ही वाटीच तर आपली निर्णायक, भविष्यकर्ती आहे. अहंहं, भुवया आक्रसू नका. याचा अर्थ तुम्हाला लवकरच समजेल.

चला, पाकयज्ञाची सिद्धता तर झाली. आता विधींना सुरूवात करायला हरकत नाही. देवाला मनोमन नमून मी कढई चुलीवर ठेवली. अर्थातच चूल पेटवून. विस्तव मंद ठेवून प्रथम शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले. वासच किती छान येतो खमंग भाजले गेले की! आणि मग ते ताटलीत जरा गार करत ठेवले. गार झाले की सालं छान निघतात. दाणे गार होइपर्यंत तीन भागात तिळही मंदाग्नीवर खमंग भाजून घेतले. डोळ्यांनी पाहिलेला तांबूस रंग, आणि नाकाने अनुभवलेला खमंग वास, या दोन कसोट्यांवर पास करून तीळ पाटीमधे काढुन घेतले. इकडे शेंगदाणेही निवले होते. मग जरा गाणं गुणगुणत प्रेमानं शेंगदाण्यांची सालं काढली आणि सोललेल्या दाण्यांची दोन शकलं करून तिळात घातली. असं करण्याचं काय कारण? सौंदर्यवृद्धी की परंपरा, ठाऊक नाही. पण तरीही मी तसच केलं. सगळे दाणे तिळात मिसळले. वर एक छोटा चमचा वेलची पूड घालुन मिश्रण सारखं केलं.

इथवर सगळं ठिक जमलं. खरी परिक्षा आता पुढेच होती. पुन्हा एकदा कढई पेटत्या चुलीवर चढली. पुन्हा एकदा मंदाग्नीवर, कढईत एक चहाचा चमचा तूप आणि पाव किलो चिकीचा गूळ घातला आणि उलथण्यानं हलवत राहिले. तुपाच्या जोडीने गूळ विरघळु लागला. पाकाचे बुडबुडे येऊ लागले. दोन मिनिटे तसेच बुडबुडे येऊ दिले आणि आंच बंद केली. आता लॅबोरेटरी टेस्ट सुरू! पाकाचे दोन थेंब वाटीतल्या पाण्यात टाकले. हाताने गोळा होतो का ते पाहिले. गोळा तोडून पाहिला, अहं! आई म्हणायची तसा कटकन तुकडा नाही पडला. पुन्हा एकदा गॅस पेटवला आणि आणखी दोन मिनिटं पाक होउ दिला. पुन्हा एकदा लॅबोरेटरी टेस्ट! यावेळी मात्र छान तुकडा पडला. तातडीने गॅस बंद केला, आता आणखी आंच मिळाली तर बांधकाम एकदम पक्कं! तीळ दाण्यांचं मिश्रण पाकात घालून, ढवळून, छान गोळा केला. तो मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या भांड्यात ठेवला.

व्हिडीओ गेम सारखी आता आणखी कठिण लेव्हल पार करायची होती - 'गरम मिश्रणाचे लाडू वळणे'. हे लाडू हात भाजतच वळावे लागतात. दोन्ही हातांच्या तळव्यांना तूप लावलं आणि पहिला लाडू वळला. लाडू गोल करता करता मनही आवर्ती झालं आणि भूतकाळात जाउन पोचलं. तिळगूळ ही माझ्या आईची खासियत. लाडू वळताना डोळ्यांसमोर लहानपणीची दृश्यं तरळत होती आणि मनात आईची आठवण. लाडू वळला की ताटात टाकायचा. 'अस्सा खण्णकन वाजला पाहिजे!' हे वाक्य आणि आईचा आवाज कानात घुमला. माझ्या हातांनी प्रतिक्षिप्त क्रियेने लाडू थाळ्यात टाकला, आणि आवाज आला की तस्साच! मी खुश! लाडू वळता वळता चटक्यांनी हात लालबुंद झाले होते. लहानपणी हात भाजले तरी आईबरोबर बसून तिळगुळाचे लाडू वळायची कोण हौस! पण आई मात्र गरम पणाचा पहिला वार सोसायची आणि अर्धवट वळलेला लाडू मला उगाच वळायला द्यायची. वर पुन्हा लाडू गोल वळल्याचं श्रेय माझंच असायचं. आईच्या हातांना बसणारे चटके आता जाणवतात. अशीच असते ना आई!

अर्धे अधिक लाडू वळले आणि मिश्रण गार होऊ लागलं. लाडू वळेनासे झाले. इथे मदतीला आलं नवीन तंत्रज्ञान. काचेचं भांडं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून केवळ २० सेकंद 'हाय' वर गरम केलं. आणि मिश्रण पुन्हा लाडू वळण्यायोग्य झालं. कित्ती ही सुलभता! पूर्वी गॅसवर पुन्हा गरम करायचं म्हणजे कधी धूर तर कधी अपुरी उष्णता. जर भांडं लागलं तर खरवडण्याचा व्याप. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विजय असो! भराभर उरलेले लाडू वळले. थाळ्यातील लाडू अधून मधून जरा कुरवाळले, ज्यामुळे एकेमेकांना चिकटले असतील तर ते लाडू सुटे व्हावे. माझ्या या साहित्यात चांगले पन्नास लाडू झाले. कशावरुन? अहो मोजले ना मी डब्यात भरताना.

हुश्श! सगळ्या प्रकरणात दीड दोन तास गेले. पण मस्त वाटत होतं. खरंतर ती चहाची वेळ नव्हती पण तरीही पुन्हा एकदा चहाचं आधण चढलं. आता आरामखुर्चीत बसून, गरम चहाचे घुटके घेत, निवांतपणे, वर्तमानपत्रातील गावच्या बातम्या वाचायला आता मी मोकळी होते.

मी जे 'निर्णायक', 'भविष्यकर्ती' असं काहीतरी म्हणाले होते ना? तर, त्या वाटीतल्या पाण्यात पडलेला तुकडा कटकन तुटला तर यशाची हमी आणि म्हणूनच 'जमणार की बिनसणार?' याचं भाकित करणारी म्हणून ती 'निर्णायक' वा 'भविष्यकर्ती'!

माझे लाडू छान जमले. आता आल्या गेल्याला, पै पाहुण्याला, मित्र मैत्रिणींना, अगदी तुम्हालाही तोंडभर हसून म्हणेन, 'तिळगूळ घ्या, गोड बोला'.

1

पाकक्रियामौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

कौशी's picture

14 Jan 2017 - 9:04 pm | कौशी

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!'तिळगूळ घ्या, गोड बोला'.

यशोधरा's picture

14 Jan 2017 - 9:22 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे. आवडलं. आमच्याकडे काल बनवले लाडू.

पैसा's picture

14 Jan 2017 - 10:43 pm | पैसा

मस्त लिहिलंय! पाकृ पण खणखणीत! मला मात्र मऊ तीळगूळ आवडतो.

अनिंद्य's picture

6 Jan 2022 - 3:57 pm | अनिंद्य

...... मन आवर्ती झालं आणि भूतकाळात जाउन पोचलं.....

तंतोतंत !

आज घरातून निघतांना तीळ-शेंगदाणे यांचाच सुवास येत होता सकाळी... म्हणजे संक्रांत जवळ आली :-)