आठवणी दाटतातः माझी मुंबई

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
25 Dec 2016 - 10:14 am

.inwrap
{
background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26...);
background-size: 100%;
background-repeat: repeat;
}

माझी मुंबई
जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं.

मुंबई हे माझं जन्मस्थळ,शाळा इथेच,महाविद्यालय इथेच,सासरही इथेच.परळ,दादर,माहीम परिसर पायाखालचा.शिवाजीपार्क म्हजे अंगणच जणू,शाळेचा खेळाचा तास शिवाजीपार्कतच. आता मात्र इथे उद्यान गणेशाचे प्रस्थ खूप वाढले आहे,मीनाताई ठाकरेंचा पुतळा आला आहे,बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे.वसंत देसाई यांचे स्मृतीशिल्प आले आहे. शिवाजीपार्क जिमखान्याचा विस्तार झाला आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे तिथे पूर्वी मिळणारा चविष्ट वडापाव आता मिळत नाही.त्याची कसर पावसकरांच्या भजीपावाने भरून काढली आहे.

पूर्वीच्या बादल,बिजलीचा परिसर म्हणजे आमची वाडी.बैठी घरं,मागे,पुढे भरपूर मोकळी जागा.काय नव्हतं तिथे! पेरू, चिकू, आंबा,सीताफळ,रामफळ,शेवगा,भेंड,बदाम,मद अशी झाडं, देव्चाफा, सोनचाफा, सोनटक्का, अनंत, मोगरा, चमेली, गुलाब गुलबक्षी,अशी फुलझाडं,प्रत्येकाच्या दारात असत.पडवळ,दोडकी,तोंडली,काकड्या यांचे मांडव असत. नळ होते पण एक भली मोठी विहीरही होती.एक कढीपत्त्याची बाग होती. घरटी एक सायकल होती.आताचा मनोरमा नगरकर रोड आणि ज.कृ.सावंत मार्ग जिथे एकमेकाला छेदतात तिथे एक मोठं मैदानही होतं,तिथे चालायचे कबड्डीचे सामने.सायकलस्वरांचे विक्रम.वाडीची होळीही तिथेच पेटायची. आता तो परीसर पाहणाऱ्या कोणाला खरंसुद्धा वाटणार नाही की,आता तिथे असलेले स्टार सिटी चित्रपटगृह आणि त्याला जोडून असलेली इमारत याच्या खाली जिवंत झरे असलेली विहीर आहे नि अजूनही वापरात आहे.मनोरमा नगरकर मार्गावर एखाद दुसरी गाडी जात असे. तिथेच रस्ता क्रॉस करण्यासाठी पाच पाच मिनिटं थांबावं लागतं..माझ्या माहेरच्या सर्व शेजाऱ्यांकडे चार चाकी आल्या आहेत..

मागे युनायटेड हाउसच्या तळमजल्यावर,जिथे आता अशोक हांडेंच्या चौरंगचे ऑफिस आहे तिथे चक्क एक क्लब होता. निवासी इमारतीत पण तिथे पत्ते खेळायला येणाऱ्या लोकांचा इतरांना काही त्रास नसे आणि त्याच बिल्डींगमध्ये शेवटच्या मजल्यावर गदिमांचे वास्तव्य होते काही काळ.त्यांना भेटायला येणाऱ्यांना निरोप देण्यासाठी ते घरगुती वेशात म्हणजे बंडी आणि धोतर अशा वेशात असत.पाहुण्यांशी तासंतास गप्पा मारत उभे राहिलेले असत.आधी माहित नव्हते ते कोण आहेत,पण एकदा ते कोणाशी तरी गप्पा मारत होते आणि आईबरोबर मी कुठून तरी आले. आईने त्यांना नमस्कार केला.मलाही नमस्कार करायला लावला,त्यांनीही आशीर्वाद दिला,माझे नाव विचारलं. आईने मग त्यांच्याबद्दल सांगितले,"थोर लेखक आहेत ते. त्याचं नाव गजानन दिगंबर माडगूळकर,त्यांना सगळे अण्णा म्हणतात.”त्यानंतर कधीही दिसले तर नावाने हाक मारून चौकशी करायचे.पण त्यावेळी त्यांचा थोरपणा कळण्याचं वयच नव्हतं.

त्यावेळी बरीच मोठी माणसं,त्या सगळ्या भागातून पायी फिरताना दिसायची,सुधीर फडके,यशवंत देव अशा मंडळीना मी रस्त्यावर,शिवाजीपार्कमध्ये,अगदी गोपी टँक मासळी मार्केट मध्ये आशाताईंनाही मासे घेताना पाहिलंय! कित्येकदा पाहिलंय.टीव्ही आल्यावर हे लोक ओळखीचे झाले.यशवंत देवांच्या प्रथम पत्नी विजयालाक्ष्मी देव या माझ्या आईसोबत समाज शिक्षण समितीच्या शिक्षण विभागात काम करत असत. माझी आई शिवण,भरतकाम,विणकाम शिकवत असे तर त्या गाणं शिकवायच्या. त्याचा पुतण्या माझ्या भावाचा वर्गात असल्याने ही ओळख वाढली, त्यांच्या घरी बरेचदा जाणेयेणे व्हायचे,यशवंत देव आमचे काका झाले.देव पतीपत्नी आमचे खूप लाड करत.

क्रिकेटमध्ये खूप पैसा आला तो आता.पण फावल्यावेळात पैसे मिळवण्यासाठी विजय मांजरेकर टॅकसी चालवत असत हे किती जणांना माहीत आहे? आता जिथे आस्वाद आहे त्या तिथे एकदा मी आणि आई चाललो असता एका टॅक्सीतून,’अग,जया',अशी हाक आली आणि आईही,”अरे,तू?”असं आश्चर्याने म्हणत पुढे गेली”बस बस” म्हणत त्यांनी दार उघडलं.आमच्या घरी येईपर्यंत,त्यांनी माझ्या वडिलांची,मामांची चौकशी केली. मोकळा असलो तर मित्राची टॅक्सी चालवतो असं सांगितलं,त्याचं ते,”पैसे पुरत नाहीत ग,”हे वाक्य मला अजूनही जसंच्या तसं आठवतं. उतरल्यावर आईने त्यांना दोन रुपये दिलेलेही आठवतात. अरे,बोहनी नाय झाली न अजून मग लक्ष्मीला नाय म्हणून नको, असं लटकं रागवत त्यांना ते घ्यायला लावले होते, मग उतरताना अगं हा विजयमामा अशी ओळख करून दिलेली,त्यावर मोठ्याने हसत ते म्हणलेले,”ए पोरी!मी तुझा काकापण लागतो हां.’अगं ही नूतन ना! रामाने ठेवलं ना हिच नाव नूतन! आम्हा दोघांची आवडती नटी, तिच्यावरूनच हिचं नाव ठेवलाय त्याने.”अशा माझ्या नामकरणाचा इतिहास माहित असलेला माणूस विजय मांजरेकर हे महान फलंदाज होते समजण्याचं वय नव्हतं. त्याची टॅक्सी गेल्यावर कोण ग हा विजयमामा असं विचारल्यावर कळलं, कि ते विजय मांजरेकर, इंडियाकडून क्रिकेट मॅचमधून बॅटिंग करतात.

सध्या अमर वैद्य व्यवस्थापन पाहत असलेल्या यंग महाराष्ट्र क्रिकेट क्लबचे,माझे दोन मामा,श्री शंकर राव भोसले आणि शशी रामनाथ भोसले,माझे वडील श्री नारायण मोरे,माझ्या वडिलाचे एक आतेभाऊ श्री श्री शिरधनकर आणि अण्णा वैद्य यांचे मोठे भाऊ आणि अमर वैद्यचे काका श्री. परशुराम वैद्य (परशा वैद्य म्हणून ते ओळखले जात.).मूळ संस्थापक.त्यामुळे बरेच क्रिकेटपटू माझे मामा आणि काकांना ओळखत असत.इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवून आलेल्या टीमची शोभायात्रा पाहायला आम्ही उभे होतो.दिलीप सरदेसाई गाडीच्या बॉनेटवर बसलेले होते. तेही आमच्याच भागातले,त्यामुळे मोठा जल्लोष चाललेला.आणि दिलीप सरदेसाई उडी मारून खाली उतरून,”अरे, नारायण आम्ही त्यांना त्याच्या गल्लीत जाऊन मारला रे,”म्हणत मिठी मारलेलीही.आजूबाजूचे सगळे लोक कौतुकाने माझ्या वडिलांकडे पाहत होते.आणि ते पाहून कॉलर टाईट झाल्याची भावना अजूनही आठवते.त्यानंतर बऱ्याच वर्षांनी गोवा पोर्तुगीजामध्ये नवरा मी जेवायला गेलो असता त्यांची गाठ पडली.मी नमस्कार करून ओळख सांगित्ल्यावर त्यांनी जिव्हाळ्याने माझ्या वडिलांची विचारपूस केली आणि पत्नीला माझी ओळख करून देताना,ते म्हणालेले,’ अग,ही नारायणची मुलगी. .काय बॉल वळवायचा तो.पहिल्या बॅालवर,मला,विजयला आउट करायचा,पण नशीब नाय,गॉडफादर नाय’त्यामुळे पुढे नाय गेला’.’ नवरा तर चाटच झालेला हे ऐकून आणि वडिलांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांचे चमकलेले डोळे अजून आठवतात.

भाजीवाला,माळी-माळणी,मीठवाला,कल्हईवाला,लोणीवाला दारावर येत असत,लोणीवाला तर पाव किलो लोणी आम्हाला वाट्या आणायला सांगून तसेच खायला घालत असे.आई रागावली तर तिलाच रागावत असे.चीकवालाही चीकाची परीक्षा करण्यासाठी वाटीभर चीक तसाच देत असे.आता कुठला चीक न कुठली चीकाची परीक्षा!

मनोरमा नगरकर रोड म्हणजेच पूर्वीचा टायकलवाडी रोड आणि आमची वाडी म्हणजे टायकलवाडी.हो, तीच ती अंकुश चित्रपटातली गाजलेली टायकलवाडी. दिग्दर्शक एन.चंद्रा यांनी इथल्या रहिवासाचे ऋण फेडले आहे. ”ए, आsssवाsssssssज” कुठूनही, कोणत्याही वेळी कानावर पडायचा. मग आम्हाला घराबाहेर पडण्याची मनाई असायची. हळूहळू परिस्थिती बदलली.शिक्षणाने बदल घडून यायला लागला.बादल-बिजली होण्याआधी आमच्यासाठी इमारत बांधून तयार झाली. बादल-बिजली झाल्यावर मात्र काहीजण तिकिटांचा काळाबाजार करत असत. त्यावेळी आमचे बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी चित्रपट हाउसफुल असेल तर ओळखीने तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न करत असत.

त्यावेळच्या हिंदी चित्रपटातील नायक हे कपडे घालत ,नायिका ज्या साड्यात त्या फॅशनच्या साड्या लगेच बाजारात येत आणि मध्यम वर्गातल्या बायका त्या नेसू शकत.राजेश खन्नाचा गुरुशर्ट,अभिताभच्या शर्टाची गाठ,नीतूसिंगच्या बेलबाॅटम आणि आखूड शर्त कोलेजमध्ये सर्रास दिसत..छोटीसी बात मध्ये विद्या सिन्हाने नेसलेली पॅचवर्क केलेली साडी,मी ऑफिसात नेसून गेलेली आठवते.त्याच चित्रपटातले अमोल पालेकर घालत तसे कपडेही लोकप्रिय होते.त्यांच्याप्रमाणे केशभूषा केलेले लोक सर्रास दिसत.राजेश खन्ना कट,अमिताभ बच्चन कट,लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डेचा कटही बऱ्याचदा दिसत असे.साधना कटही मी लहान असताना खूप लोकप्रिय होता.शर्मिला टागोरची आराधना मधली केसांना अंतर अंतरावर रबर बँड लावण्याची पोनीटेल, जया भादुरीचा अंबाडा, नीतू सिंगची भूवईच्या टोकापर्यंत येऊन कानामागे गेलेली बट आणि मागे मोकळे सोडलेले लांब केस. आताच्या नायिका जशी डोळ्यावर एक बट आलेली घेऊन फिरतात तशी घेऊन फिरलं तर चकणेपणाच येईल.

फूटपाथ रस्त्यांइतकेच रुंद असत. आमच्या मनोरमा नगरकर रोडचे दुसरे टोक राजा बढे चौकात लेडी जमशेटजी रोडवर. या रस्त्यावरचे दोन्ही बाजूचे फुटपाथरस्त्याच्या रुंदी इतकेच होते. आता याच नाही तर मुंबईतल्या इतर रस्त्यांवरच्या फुटपाथची रुंदी तर कमी झालीच आहे पण काही ठिकाणी फुटपाथच कैलासवासी झाले आहेत.

त्यावेळी मुंबईत डबलडेकर बस असत.बारा वर्षाखालच्या मुलांना पाच पैसे तिकीट असे.डबलडेकर बसच्या वरच्या मजल्यावरच्या पहिल्या सीटवरून जी गम्मत मुंबई फिरताना यायची ती आता बिनटपाच्या मुंबैदर्शनच्या बसमधून येत नाही.सुटीच्या दिवशीही बसेसना गर्दी नसे.अपोलो बंदर,हँगिंग गार्डन,राणीचा बाग,म्युझियम.गिरगाव चौपाटी, जुहू बीच, नॅशनल पार्क,सायन फोर्ट या ठिकाणी ‘वन डे पिकनिक’ व्हायच्य.त्याही बसमधून.

गणपतीच्या काळात बसमधून परळला उतरून,लालबाग-परळ,पायी पालथे घातले जायचे.तेजुकाया मॅन्शन,रंगारी बदक चाळ,गणेश गल्ली.इथले फिरते देखावे पाहायला रांगा लागत.पण रांगेत उभे न राहताही मांडवाच्या समोरच्या बाजूने दर्शन घेता यायचे.कारण आतासारखे तेव्हा गणपती पडद्यात नसत.लालबागच्या राजापेक्षा इथे गर्दी असे.त्यावेळी त्याला लालबाग मार्केटचा गणपती म्हटले जतचे.कालांतराने नव्वदच्या दशकात व्यवस्थित मार्केटिंग करून त्याच्या राज्याचा विस्तार झाला.असो.

गणपतीच कशाला,बांद्र्याच्या मोतमावलीला,माहीमच्या मखदूम बाबाचा उर्साला तितक्याच भक्तिभावाने हजेरी लागायची.मोतमावलीची आता माऊंटमेरी झालीय न दर्गा हे शक्तिस्थळ झाले आहे.जिथे फक्त मोह्रर्रमचे जुलूस निघायचे तिथे आता दर ईदला मग्रूर मिरवणुका निघतात.

एकदा ट्रामचा प्रवास केला आठवतोय,दादर ते भायखळा असा राणीच्या बागेत जाण्यासाठी.तो पहिला न शेवटचा.कारण नंतर त्या बंदच झाल्या.दादरच्या खोदादाद सर्कलमध्ये बॉम्बेसेंट्रलहून सुटलेल्या एस्टीचा थांबा होता.त्या गोलाकारात रस्त्याच्या बाजूला तोंड करून त्या उभ्या असत.एसटी येताना दिसली की,बोर्ड पाहणाऱ्या लोकांची धावपळ होई ,न उभी राहिली की पोचवायला आलेल्या माणसांची लगबग होई.आता तिथे सुरेख फुलबाग आहे आणि जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाचा मध्यभाग,मुंबईतला पहिला उड्डाणपूल म्हणजे पेडररोडचा उड्डाणपूल.या पूल बांधला गेला तेव्हा सुदैवाने लताबाई भारतरत्न नव्हत्या.आता मुंबईत उड्डाणपूलांचे जाले झाले आहेच पण समुद्रातूनही उड्डाणपूल बांधला गेला आहे.

लालबाग-परळ म्हणजे गिरणगाव.पण आता सगळया गिरण्या बंद पडल्या आणि उंच उंच इमारती त्या जागी उभ्या राहिल्यात.फिनिक्स पक्षी हा राखेतून जन्म घेतो म्हणतात,पण मुंबईतला चमत्कार म्हणजे,फिनिक्स मिलमधून फिनिक्स मॉल उभा राहिला आह!! जिथे काम्गारवर्गाच्या घामाने कर्मसोहळा साजरा होत असे ,तिथेच वातानुकूलित दुकानातून मालदारवर्गाच्या पैशाने खरेदीसोहळा पार पडतो आहे.

एकेकाळी मुंबईत पाच माजली इमारती म्हणजे डोक्यावरून पाणी.पहिला उंच इमारतीचा मन मिळवला तो ‘उषाकिरण’ या इमारतीने पटकावला होता,बरीच वर्ष तिचा हा तोरा टिकला होता.पण आता चाळीस पन्नास मजल्यांच्या इमारतींच्या घेऱ्यात ‘उषाकिरण’सुबक ठेंगणी दिसायला लागली आहे. त्याबरोबरच मुंबईतून दिसणाऱ्या आभाळाचे क्षेत्रफळ कमी होऊ लागले आहे.उंच उंच इमारतीमुळे,दिवसाच्या कोणत्याहीवेळी कित्येक रस्त्यांवर उन्हे नसतातच मुळी. .या उलट शिवसेनाभवनच्या समोरच्या कोहिनूर टॉवरच्या काचांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या परावर्तनामुळे समोरच्या सावलीच्या फुटपाथवर उन्हाचे कवडसे पडून तापमान वाढतच असते. कित्येक घरातून दिसणारे सूर्योदय,सूर्यास्त दिसेनासे झाले आहेत.इतकेच काय पण,पण मुंबईतल्या हवामानाचा विचार न करता ,काचा वापरून बांधल्या जाणाऱ्या इमारतीमुळे मुंबईचं तापमान वाढत चाललंय,.पूर्वी मुंबईत दिवाळीला येणारी थंडी पळून गेली आहे.

माझी मुंबई बदलते आहे तिचे वर्णन करायला बहिणाबाईच्या ‘दिसामासा व्हाय वाढ,रोपं झाली आता मोठी,आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी’ या शब्दात थोडासा बदल करून म्हणता येईल ‘दिसामासा व्हय वाढ,मुंबई झाली आता मोठी,आला इमारतींना बहार झाली रस्त्यांमधी दाटी.’ मुंबईतली वाहतूक इतकी वाढली आहे की,मुंबईच्या प्रगतीचा वेग वाढला असला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्याची गती कमी झाली आहे.

या सगळ्या बदलांचा परिणाम मृतांवरही झाला आहे शिवाजीपार्कच्या भागोजी कीर स्मशानभूमीला लागून चैत्यगृहात जाणाऱ्या मार्गाची भिंत आल्याने दशपिंडांची कार्ये आता समुद्रकिनारी करता येत नाहीत.बिचाऱ्या कावळ्यांना आता स्मशानात यावे लागते.किनारही चिखलाने भरलेला असतो. असे असले तरीही माझी शेवटची यात्रा मात्र मला इथूनच सुरु करायला आवडेल.

मुक्तकजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

25 Dec 2016 - 10:45 am | स्पार्टाकस

अप्रतिम आठवणी जागवल्यात जुन्या मुंबईच्या!
माझ्या आठवणीत इतकी जुनी मुंबई नसली तरी डबलडेकर बसला पुढे इंजिनसारखी ड्रायव्हरची केबिन असलेली अजून आठवते, तसंच रुईयाच्या गल्लीतलं इराण्याचं हॉटेलही!

आ युष्कामी's picture

25 Dec 2016 - 10:51 am | आ युष्कामी

Lekh vachun maja aali.

Aani kahi kahi chimte far surekh kadhle(jamle) aahet
(Indic keybord chalat naslyamule asa pratisad dyava lagla)

बोका-ए-आझम's picture

25 Dec 2016 - 11:55 am | बोका-ए-आझम

मी टायकलवाडीतच लहानाचा मोठा झालो. ५वी ते १०वी जरी डोंबिवलीत झाली असली तरी टायकलवाडी आणि शिवाजी पार्काशी संबंध सुटला नव्हता. जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!

पाचेक वर्षांपूर्वी मुंबईला जाणे झाले तेव्हाची मुंबई आणि मी लहानपणी पाहिलेली मुंबई यात जवळपास कसलीच ओळखखूण दिसत नव्हती.

असो. अप्रतिम नोस्टॉजिया जागविला तुमच्या लेखाने. रामदास साहेब जर वाचत असतील तर त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2016 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य मनोगत ! मुंबईत राहिलो नसलो तरी अनेक दशके जाऊनयेऊन असल्याने बर्‍याच गोष्टींनी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषतः मुंबईची ट्रॅम. याशिवाय, अजून जुनी आठवण म्हणजे गॅसवर चालणारे रस्त्यावरचे दिवे.

एक नंबर! फारच छान लिहिलं आहे.

पद्मावति's picture

25 Dec 2016 - 4:18 pm | पद्मावति

अप्रतिम लिहिलंय. सुरेख अगदी.

सर टोबी's picture

25 Dec 2016 - 4:45 pm | सर टोबी

मीही भगत लेन मधील इमारतीत २ वर्ष राहिलो आहे. भगत लेन मनोरम नगरकर रस्त्याला जेथे मिळते त्याच्या समोर एक पिठाची गिरणी असल्याचे आठवते. तो गिरणीवाला सकाळीच जात्याला टाके मारण्याचे काम करायचा. त्याच्या आवाजाने जग येत असे. मनोरम नगरकर रस्त्याच्या एका टोकाला पार्टी नावाचे थोडेसे महागडे हॉटेल होते. कधी मधीं चैन म्हणून तेथे जेवलो आहे.

अप्रतिम लेख सु ताई.लाडक्या मुंबईच्या किती आठवणी जाग्या केल्यास!

प्रचेतस's picture

25 Dec 2016 - 10:29 pm | प्रचेतस

सुरेख लेख.

पैसा's picture

25 Dec 2016 - 10:49 pm | पैसा

खूप मनापासून लिहिला आहे हे जाणवतंय!

स्मिता चौगुले's picture

26 Dec 2016 - 12:45 pm | स्मिता चौगुले

खूप छान लेख

पियुशा's picture

26 Dec 2016 - 1:58 pm | पियुशा

मस्त लिहिले आहेस ताइ !!

पूर्वाविवेक's picture

26 Dec 2016 - 3:34 pm | पूर्वाविवेक

अप्रतिम, मनाला भिडणार लिहिलं आहेस.
तुझ्याइतकी जुनी नाही पण मुबई अनुभवली आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
माझे काही नातेवाईक सुतारगल्ली, भोईवाडा, कुंभारवाडा, ताडदेव आणि तुमच्या बादल-बिजली जवळच्या चाळीत राहायचे.
खरंच आता खूप बदल झालाय.

रायनची आई's picture

26 Dec 2016 - 5:01 pm | रायनची आई

मी लग्न झाल्यापासून शिवाजी पार्क एरियात राहते आहे--७-८ वर्षापासून..खूप बदललय आता सगळ. नाही म्हणायला थोडीफार नारळाची झाडं आणि विहिरी आहेत..खूप पुर्वी सिद्धीविनायकाचं इतकं प्रस्थ नव्ह्त ना? आणि ६ डिसेंबरचं सुद्द्धा..कोहिनूर स्क्वेअर तर कशाला बांधली आहे कळत नाही.उंचच्या उंच सुळका.आणि आतातर त्या बिल्डिंगचं काम पण अर्धवट पडलं आहे खूप वर्षं.

हो मी सिध्दिविनायक मंदिरा शेजारी राहतो पुर्वी तिथे आम्ही खेळत असू. छोटेखानी देऊळ बाहेर भरपुर मोकळी जागा. संध्याकाळी विभागातले वरिष्ठ नागरिक वगैरे गप्पा मारत बसत असत आणि बच्चे कंपनी, पकडापकडी, विष-अमृत, लंगडी असे खेळ खेळत असत. सिध्दिविनायकला प्रसिध्दी मिळाली ती राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यामुळे आणि नंतर मग गर्दी वाढू लागली. आता तर पुर्ण देवाचा बाजार केला आहे. त्यामुळे मी गेल्या दहा-बारा वर्षापासून तिथे गेलेलो नाही.

सिरुसेरि's picture

28 Dec 2016 - 6:04 pm | सिरुसेरि

अप्रतिम आठवणी . दादर , टी टी , शिवाजी पार्क , हिंदु कॉलनी , शिवाजी मन्दीर नाट्यगॄह , क्रिकेटचे किट खांद्यावर बाळगत शिवाजी पार्क मैदानावर जाणारे छोटे सचिन अशी चित्रे डोळ्यासमोर आली .

खूप सुंदर लेख..फार आवडला.

अनुप ढेरे's picture

29 Dec 2016 - 9:51 am | अनुप ढेरे

फार सुंदर लिहिलं आहे.

मी तुमच्याच शेजारी म्हणजे बरखा थियेटरच्या पलीकडे गुडविल बिल्डिंगमध्ये राहायचो (साठ पासून त्र्याऐंशी सालपर्यंत)

माझे सगळे मित्र बालमोहन शाळेत असल्यामुळे संदीप पाटीलबरोबर मैत्री होती. (तेव्हां अर्थात संदीप पाटील 'संदीप पाटील' नव्हता.) त्याचा सायकलवर कंट्रोल जबरदस्त होता. मजा म्हणून तो सायकल धावत्या ट्रकसमोर घालायचा आणि शेवटच्या क्षणी कच्कन् बाजूला काढायचा. ट्रकवाला दातओठ खाऊन ब्रेक मारायचा.

हे धोकादायक तर होतंच, आणि मुख्य म्हणजे चूक होतं पण त्या वयात भारी वाटायचं! ट्रकच्या मागच्या दोन्ही कोपर्यांना कित्येकदा साखळ्या असतात त्यातल्या डाव्या साखळीला धरून सायलवाले 'लिफ्ट' घ्यायचे. ट्रक कचकन् थांबल्यावर हा सायकलवाला आधीच्याच वेगात जाऊन संदीपवर धडकला आणि दोघंही ट्रकच्या डाव्या टायरपुढे रस्त्यावर पडले! नशिबानी ट्रक पूर्णपणे थांबला होता! तेव्हांपासून ही हीरोगिरी बंद झाली.

नरेश माने's picture

29 Dec 2016 - 3:12 pm | नरेश माने

खुप छान लिहिलंय. बालपणीचा काळ सुखाचा असे आपण नेहमीच म्हणतो पण खरंच माझ्या बालपणी पाहिलेल्या मुंबईत आमचा काळ खरंच सुखाचा होता. वाड्या, चाळी यात राहणारी सर्व सामान्य माणसे पण कितीही रूसवे-फुगवे, तंटे-बखेडे असले तरी कठिण समयी मदतीला सर्वच तत्पर. एखाद्या घरातला सोहळा म्हणजे अख्या वाडीचा किंवा चाळीचा कौटुंबिक सोहळा असे. आजच्या सारखी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नाही, ट्रेनमध्ये दुपारी गर्दी नाही. त्याकाळात मनोरंजनाची साधने तशी कमीच त्यामुळे भजन, किर्तन, भारूड असे प्रकार दत्तजयंती, हनुमान जयंती, रामनवमी याप्रसंगी होत. त्याचवेळी रस्त्यावर दाखवले जाणार चित्रपट म्हणजे मोठी पर्वणीच.

जुइ's picture

30 Dec 2016 - 3:12 am | जुइ

सुरेख लिहिलय!

स न वि वि's picture

30 Dec 2016 - 1:10 pm | स न वि वि

मस्तच ! सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मी सुद्धा सिटीलाईट चीच. शिवाजी पार्कात समर्थ व्यायाम शाळेत अर्धे बालपण गेले. शाळा प्रख्यात बालमोहन विद्यामंदिर! लग्नानंतर गोरेगावात शिफ्ट झाले पण दादर, माहीम, शिवाजी पार्क सारखी सर नाही बाबा. नवरा सुद्धा माहेरच्या विभागाच्या प्रेमात पडला. सहसा असे खूप कमी च होते ना .... पण आपले पार्कचं आहे ना तसे. कोणीही प्रेमात पडेल असे.

इडली डोसा's picture

30 Dec 2016 - 1:40 pm | इडली डोसा

मला मुंबईचा काहीच अनुभव नाही पण लेख आवडला.

थोड्याफार फरकाने सगळ्या शहरांचा आणि गावांचा असाच चेहरा मोहरा बदललेला आहे असं वाटतं.

रघुनाथ.केरकर's picture

30 Dec 2016 - 1:41 pm | रघुनाथ.केरकर

खुप छान लिहीलय..... आज काल आधीची मुम्बै फक्त जुन्या सिनेमातुनच दीसते...

सतिश गावडे's picture

30 Dec 2016 - 2:06 pm | सतिश गावडे

जुन्या मुंबईची छान ओळख करुन दिली आहे.

वरुण मोहिते's picture

30 Dec 2016 - 3:34 pm | वरुण मोहिते

सगळीकडे फिरलो असलो मुंबईत तरी आपण त्या काळात नव्हतो ह्याचे दुःख वाटते असे काही लेख वाचून , घरातल्या मोठ्यांच्या आठवणी ऐकून . छान लेख

गायत्री अभिजीत's picture

2 Jan 2017 - 11:22 am | गायत्री अभिजीत

प्रत्यक्षात मुंबईला 4-5 वेळाच जाणे झाले आहे परंतु हा लेख वाचल्यावर त्या काळातील मुंबईचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले , अत्यंत सुंदर लेख !

आदिजोशी's picture

3 Jan 2017 - 3:00 pm | आदिजोशी

मुंबई म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. लेख अप्रतीम आहे. जुन्या मुंबईच्या आठवणीने आजही मुंबईकराला भरून येतं म्हणतात ते उगाच नाही :) आणि प्रत्येक मुंबईकर जुना झाला की त्याच्या तरूणपणीच्या मुंबईची आठवण काढतोच काढतो :)