प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे...
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना...
उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं!
'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..'
या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते..
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..
क्या बात है.. एक सुंदर, तरल अर्थ असलेली ओळ. 'त्या' या अक्षरावर संगीतकाराने पंचमाची अतिशय हळवी जागा ठेवली आहे. आणि गायकानेही तिला खूप चांगला न्याय दिला आहे.
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..
बरं मग पुढे काय? तर,
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..!
क्या बात है!
पहिल्या ओळीने सुरू केलेल्या संवादाचं, दुसर्या ओळीतल्या 'त्या' या अक्षरावरच्या अत्यंत हळव्या जागेमुळे खूप छान उत्तर मिळतं! पंचमाला सुंदर स्पर्श करून आलेली 'त्या' या अक्षरावरची जागा एखादं सुंदर फुलपाखरू उडून एखाद्या मनमोहक फुलावर अलगदपणे लँड व्हावं त्याप्रमाणे 'फुलापाशी थांब ना..'तल्या षड्जावर येऊन अलगद विसावते! क्या केहेने..!
या दोन ओळीतच हे गाणं आवडून जातं, हृदयाला भिडतं!
सये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि...
या ओळीत पुन्हा एकदा सुरावट टेक ऑफ घेते ती थेट 'सये' शब्दातल्या तार रिखभापर्यंत!
'रमुनी सार्या या जगात' या ओळीत तार शुद्ध गंधाराला हलकासा स्पर्श करून येणारी अवरोही अंगाची ही सुरावट फारच सुरेख आहे. 'सार्या' शब्दातला तार षड्ज खूप समधान देऊन जातो. 'रिक्त भाव असे परि' मधली खास यमन रागातली पंचमावर न्यास असणारी सुरावट यमनचं नैसर्गिक सौंदर्य दाखवून जाते. 'भाव' हा शब्द गायकाने खूपच सुंदर गायला आहे!
कैसे गुंफु गीत हे ?
हे बाकी एकदम कॉन्ट्रास्ट, अनपेक्षित बरं का..! या ओळीतील शुद्ध मध्यमावरचा प्रश्नार्थक न्यास गाण्याची दिशाच बदलतो.. पण संगीतकाराने अगदी थोडाच वेळ हे अनपेक्षित वळण ठेवलं आहे. अगदी 'कैसे गुंफु गीत हे '' हा छोटास्सा प्रश्न विचारण्यापुरतंच म्हणा ना! :)
त्यानंतर लगेच 'धुंद होते शब्द सारे'..' ह्या षड्जावर न्यास असणार्या ओळीने तो संवाद पूर्ण केला आहे.
मंडळी, एक गोष्ट आपल्या लक्षात आली का? गाण्याच्या सुरवातीला 'धुंद होते शब्द सारे' या ओळीचा शुद्ध गंधारावर न्यास आहे, परंतु 'कैसे गुंफु गीत हे?' चा संवाद पूर्ण करण्याकरता संगीतकार 'धुंद होते शब्द सारे' हीच ओळ षड्जावर न्यास ठेऊन पूर्ण करतो.. यावर माझं मत मी इतकंच नोंदवेन की संगीतकाराने या कवितेवर, या गाण्याच्या चालीवर बर्यापैकी विचार केला आहे, चिंतनमनन केलं आहे. आमच्या अभिजात संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर संगीतकाराची उपज खूप चांगली आहे असं म्हणता येईल! :)
मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
या दोन्हीही ओळी फार सुंदर आणि अर्थपूर्ण. 'बरसला मल्हार हा' आणि 'बहरला निशिगंध हा' या दोन्ही सिमिट्रिकल सुरावटीतल्या 'पनीरेग' संगतीमुळे हंसध्वनीची आठवण करून देणारी एक वेगळीच मजा येते आणि मी वर म्हटल्याप्रमाणे 'संगीतकाराची उपज फार चांगली आहे' याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो!
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
या ओळी पुन्हा मूळ चालीचा संदर्भ घेत आपल्यापुढे येतात.
'का कळेना काय झाले, भास की आभास सारे'
पंचमाचा आधार घेऊन विचारलेल्या वरील दोन प्रश्नांना संगीतकाराने तीन तर्हेने उत्तरं दिली आहेत याचं मला कौतुक वाटतं! 'जीवनाचा गंध हा' तल्या उत्तरांगप्रधान अंगाने, 'विश्रांत हा' हे यमनी अंगाने, आणि 'शांत हा' हे पुन्हा मगासच्यासारखं शुद्धमध्यमाची 'गमग' ही संगती घेऊन दिलेलं अनपेक्षित उत्तर! क्या बात है...
असो, मंडळी मला हे गाणं जसं दिसलं, तसं मी लिहिलं आहे. यातलं मला जे मनापासून भावलं ते लिहिलं आहे. एखादं गाणं म्हणजे काय, तर शब्दानुरूप विविध स्वरावलींची केलेली ती एक गुंफण! मला स्वरांची किंचित तोंडओळख असल्यामुळे या गाण्यातले स्वर मला कसे दिसले ते मी लिहिलं आहे. कुणी याला गाण्याचं डिसेक्शन केलं आहे असंही म्हणू शकेल किंवा इतरांना हे गाणं आणखी वेगळं दिसू शकेल, भावू शकेल!
या गाण्याचं एरेंजिंग, ताल-ठेका, त्यातला हृदयाला हात घालणारा बासरीचा वापर इत्यादी सगळं अगदी सुरेख जमून आलंय. चित्रिकरण तर केवळ अप्रतीम! शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यां समर्थ कलाकारांनी आपल्या सहजसुंदर वावरामुळे या गाण्याचा प्रसन्न मूड अगदी छान राखला आहे.
असो, एका सुरेख गाण्याचं दान माझ्या पदरात घातल्याबद्दल कवी कौस्तुभ सावरकर, संगीतकार अमार्त्य राहूल आणि गायक रवींद्र बिजूर यांचा मी ऋणी आहे.. या तिघांचंही मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा देतो. या गुणी मंडळींकडून अशीच काही चांगली दानं पदरात पडावीत हीच इच्छा! :)
ऍन्ड लास्ट बट नॉट लीस्ट, या सुरेख गाण्याची फर्माईश करून चार ओळी लिवण्याची संधी दिल्याबद्दल प्राजूदेवींचेही आभार मानतो..! :)
आपला,
(वार्यासंगे वाहायला आवडणारा) तात्या.
प्रतिक्रिया
29 Sep 2008 - 11:14 pm | मनिष
इतक्या सुरेख गाण्याची ओळख करून दिल्याबद्द्ल तात्यांचे आभार!!! माझेही अतिशय आवडते गाणे आहे हे!
29 Sep 2008 - 5:55 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
बरें बरयता मुरें तुं विसोबा.
29 Sep 2008 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते
छान गाणं....
तात्या, एक छान गाणं आणि छान रसास्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. हा चित्रपटच खूप छान आहे. तात्याला भरीला घातल्या बद्दल प्राजूताईंचे खास आभार.
बिपिन.
29 Sep 2008 - 6:21 pm | ऋषिकेश
नेहेमीप्रमाणे ओघवते वर्णन .. खूप छान..
आता घरी गेल्यावर नेहेमीप्रमाणे गाणं ऐकत पुन्हा लेख वाचला पाहिजे. तेव्हा पुन्हा एक प्रतिक्रिया देईनच :)
फक्त तात्या, फुलपाखरू "लँड" होणे खटकले.. इंग्रजी शब्द नकोत असे नाहि पण फुलपाखरू फुलावर बसतंय या कल्पनेत लँड होणे म्हणजे एकदम दातात सुपारी अडकल्यागत झाले. :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Sep 2008 - 6:22 pm | स्वाती दिनेश
गाणं आणि त्याचा रसास्वाद आवडला तात्या,
स्वगत-आता उत्तरायण कुठे मिळतो ते पहायला हवं..
स्वाती
29 Sep 2008 - 8:00 pm | प्राजु
तात्या, हे गाणं मी जेव्हा पहिल्यांदा यू ट्यूब वर पाहिलं ना तेव्हा मी त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. मन उधाण वार्याचे नंतर पहिल्यांदा ऐकताक्षणी आवडलेलं हे गाणं. तरल शब्द आणि मनाचा ठाव घेणारं संगित आणि तितकाच प्रभावी आवाज यांनी या गाण्याने मनात घर केलं. खूप वेळा ऐकलं. यमन रागात आहे हे आणि इतकंच समजलं. पुढे काय करावं समजत नव्हतं. आणि म्हणून तुम्हाला त्रास दिला.
ऍन्ड लास्ट बट नॉट लीस्ट, या सुरेख गाण्याची फर्माईश करून चार ओळी लिवण्याची संधी दिल्याबद्दल प्राजूदेवींचेही आभार मानतो..!
माझे आभार कसले तात्या, मला जर तुमच्या इतकी अक्कल असती गाण्यातली तर मीच नसतं का लिहिलं रसग्रहण?? तुमचीच मी आभारी आहे की माझ्या विनंती वजा हट्टाचा तुम्ही मान राखलात.. धन्यवाद तात्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Mar 2010 - 10:14 am | चेतन
तात्या, हे गाणं मी जेव्हा पहिल्यांदा यू ट्यूब वर पाहिलं ना तेव्हा मी त्या गाण्याच्या प्रेमातच पडलो.
बर्याच दिवस हे गाण माझ्या मोबाईलची टोन होती.
गाण्याच्या शेवटी येणारे संवाद सुद्धा सुरेख आहेत
चला पुन्हा एकदा एकतो
चेतन
29 Sep 2008 - 10:51 pm | सुवर्णमयी
लेखन आवडले. गीत तर फार सुरेख आहे!
सोनाली
29 Sep 2008 - 11:04 pm | यशोधरा
रसग्रहण आवडले. हे गाणे खूप आवडते, आज रसग्रहण वाचल्यावर आता अजूनच आवडेल. धन्यवाद तात्या आणि प्राजू.
1 Oct 2008 - 8:20 am | सखी
असेच म्हणते.
1 Oct 2008 - 5:24 pm | विसोबा खेचर
आपुलकीने प्रतिसाद देणार्या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार.. :)
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
आणि हा लेख बरी-वाईट, कोणतीच प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचा न वाटल्यामुळे कोणताही प्रतिसाद न दिलेल्या चोखंदळ व संगीततज्ञ वाचकांचेही अनेक आभार.. :)
तात्या.
23 Mar 2010 - 6:57 pm | सिद्धार्थ ४
=)) =)) =)) =))
ता. क : आजचे मि. पा. चे मुखपृठ खुपच छान आहे......
-------
सिद्धार्थ
23 Mar 2010 - 7:10 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु
1 Oct 2008 - 5:46 pm | मीनल
तात्या, मागे तुम्ही असेच एक रसग्रहण लिहिले होत.
`कभी अलविदा ना केहेना` तील `मितवा`
मी तेव्हा काहीच लिहिले नाही फारसे त्यावर.
पण आता सांगते -
तो सिनेमा मला खूप आवडला होता.पण त्या गाण्याची खरी ओळख म्हणावी ती तुम्हीच करून दिलीत.
ते गाण मी इतके वेळा यु ट्युबवर पाहिले ,एकले,म्हटले की मला माझे यजमान म्हणायला लागलेकी तुला हे एकच गाण येत का?
मग मी मनातच मजेत म्हणायाला लागले.
त्या गाण्यातला रस `ग्रहण` करायला तुम्ही शिकवलत.आभार.
पण आता `धुंद होते शब्द सारे`चा रस थोडा कमी गोड वाटला.
प्राजु ने सांगितल्या सारख मन उधाण वार्याचे वर लिहा.
रसाची गोडी पूर्णपणे चाखायची आहे.
गाण खूप आवडत एवढेच माहित आहे.
का ते तुम्ही लिहा, प्लिज
मीनल.
1 Oct 2008 - 6:15 pm | विसोबा खेचर
पण आता `धुंद होते शब्द सारे`चा रस थोडा कमी गोड वाटला.
शक्यता आहे. मी त्या गाण्याचं केवळ सांगितिकदृष्ट्या विवेचन केलं आहे म्हणून असेल कदाचित..
असो,
तात्या.
1 Oct 2008 - 9:33 pm | संदीप चित्रे
आता गाणं लेखाच्या दृष्टीने पुन्हा ऐकतो :)
------
तात्या -- 'मल्हारवारी' ह्या गाण्याबद्दल काही लिहिणार का ? :)
23 Mar 2010 - 12:26 am | शेखर
तात्या, एक सुंदर गाणं आणि त्याची हृदयाला हात घालणारे रसग्रहण...
23 Mar 2010 - 1:37 am | पिंगू
अतिशय हृदयस्पर्शी गाणे आहे..
23 Mar 2010 - 6:14 am | हर्षद आनंदी
हे शास्त्रीय विवेचन नेहमीच भांग विस्कडुन जाते... प़ण गाणॅ पहिल्यांदा ऐकले तेव्हाच "सदाबहार" यादीत समाविष्ट झाले होते.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
29 Apr 2010 - 12:38 pm | अमोल केळकर
सुंदर रसग्रहण
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
23 Mar 2010 - 10:26 am | अविनाशकुलकर्णी
गाणे खुप गोड आहे..
23 Mar 2010 - 1:40 pm | वाहीदा
मला स्वरांची किंचित तोंडओळख असल्यामुळे या गाण्यातले स्वर मला कसे दिसले ते मी लिहिलं आहे.
याला म्हणतात Modesty...
तात्या,
स्वर अन संगीतचे अगाध न्यान असूनही ईतकं सहज पणे सांगत आहात की तुम्हाला स्वरांची किंचित तोंडओळख आहे ?? #:S याला किंचीत म्हणतात का ?? तात्या तुम्ही खरंच Modest आहात . =D>
असो ,
नितांत सुंदर गोड गाणे अन हळूवार मनाला हेलावून टाकणारे संगीत
अमिर खानचा 'पहेला नशा ...पहेला खुमार ' आवडणार्या आमच्या पिढीला ही या गाण्याने फुलपाखरासारखा अलगद स्पर्श केला अन उत्तरायण खरंच भावले
तात्यांच्या विवेचनाने तर अजूनही सुंदर झालर लावली गाण्याला
अप्रतिम !!
~ वाहीदा
23 Mar 2010 - 7:50 pm | वाटाड्या...
रसग्रहण छानच..उत्तरायण मधील एक कविता फारच छान...
कोठेतरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी... अज्ञात ठिकाणी,
स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे, प्रेमही मानी, तेथे चल राणी ....तेथे चल राणी..
केवळ अप्रतिम...
- वा
29 Apr 2010 - 12:34 pm | मराठी मावळा
- Tejas !
29 Apr 2010 - 1:19 pm | सुधीर१३७
आम्हाला संगीतातलं ओ की ठो कळत नाही, पण गाणे कानाला आवडले की बस ................ :?