दिवाळी
गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय,
अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात
गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड
गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे.
जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे.
धडधड डबे रिकामे होतायत..
सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत...
"दोन किलो आहे,
आईने सांगितलंय भाजणीवरच टाका"
कशावर काय जातंय बघतच नाही काका,
एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे,
इकडून टाकलं कि तिकडून पसार,
काकांची गिरणी लै फास्ट आहे,
पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे?
आपला डबा गिरणीत टाकायला
काका उचलतायत असं पाहून एक ताई म्हणते,
'काका, लाडवाचं आहे बरंका, जरा जाडसर होऊ द्या"
तिचा "...होऊ द्या" संपायच्या आत, पीठ डब्यात आलेलं असतं,
वेड्या गृहिणीला वाटतं, जग जणू तिच्यासाठीच थांबलेलं असतं...
- संदीप
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 9:51 am | महासंग्राम
ज ब र द स्त
संदीपांन्ना एकदम ढगात लायटिंग कविता आवडली आहे !!!!
26 Oct 2016 - 9:56 am | राजेंद्र देवी
छान वर्णन आणी लेखन... दिवळीच्या शुभेच्छा...
26 Oct 2016 - 10:08 am | नाखु
काय, पण काथ्याकुट धाग्यांनाही लागू आहे (एका दगडात अडीच पक्षी) डांगेअण्णा लै भारी.
26 Oct 2016 - 11:57 am | पैसा
:)
26 Oct 2016 - 12:59 pm | पद्मावति
मस्तं!
26 Oct 2016 - 1:14 pm | पाटीलभाऊ
अगदी अशीच दिवाळीची सुरुवात व्हायची..
26 Oct 2016 - 1:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
खल्लास निरीक्षणशक्ती डांगे बुआ! आवडेश