आशय - भाग ३

किंबहुना's picture
किंबहुना in जनातलं, मनातलं
12 Aug 2016 - 11:50 pm

प्रस्तावना आणि भाग १
आशय भाग २

रत्नगिरीमधील एक प्रसिद्ध कॉलेज नववीच्या मुलांसाठी एक उपक्रम आयोजित करत असे. त्याचे नाव होते विज्ञानमंच. मुलांना विज्ञानाची आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला जात असे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये पात्रता स्पर्धा होत असत. अर्थात एक हुशार विद्यार्थी म्हणून मी देखील या स्पर्धेत भाग घेतला आणि अर्थात पासही झालो.. त्या मुलांचे त्या कॉलेजमध्ये डिसेंबरच्या सुट्टीमध्ये शिबीर होत असे. आम्ही सगळे मित्र त्या शिबिरासाठी रत्नागिरीत आलो. दिवसभर व्याखाने आणि प्रॅक्टिकल वगैरे असे त्या सत्राचे स्वरूप असे. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सगळे जण ४ मिसळ खाऊन २ मिसळ घेतल्या असे सांगत असू. त्याला देखील कळत नसे. सगळी मजा चालू होती.
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर काय असा प्रश्न सोडवणे आम्हाला सोपे होते. कॉलेजच्या ग्राऊंडवर आमचा गप्पांचा अड्डा जमत असे. शाळेत देखील कधी गप्पा मारायला न मिळणारा एक तास इथे मिळायला लागल्यावर आमच्या गप्पा खूपच रंगायला लागल्या.
आमच्या मित्रांमध्ये काही मुलांची मोठी भावंडे त्यांना देखील त्यांच्या मित्रांच्या गप्पांमध्ये सामील करून घेत असत. त्यामुळे त्यांच्याकडे जोक्स चा मोठा साठा होता. विचित्र वय होते ते. त्या वयातले जोक्स आज जर परत ऐकले तर खूप हसायला येते. म्हणजे ते जोक ऐकून नाही, तर कसले कसले जोक ऐकून आपण हसत होतो म्हणून. बेडेकराचे लोणचे काय, रेल्वेचा रूळ आणि पट्टे काय आणि काय सांगू.
नदी, विटी दांडू आणि क्रिकेट, लेडिज सायकलचा दांडा वगैरे अफलातून जोक्स या काळात ऐकायला मिळाले. आता हे सगळे ऐकले तर खूप हसायला येईल. पण आज विचार करताना जाणवते की आमचे शिक्षण करायला त्या काळात होते तरी कोण? रेडे, बैल, कुत्र आणि गाढवे.मग आमच्या मेंदूमध्ये निर्माण होणार्‍या कल्पनादेखील त्याला अनुसरूनच असणार.
अश्या काळातच विज्ञानमंचाचे दिवस संपले आणि गॅदरिंग आणि स्पोर्ट्स सुरू झाले. आम्ही ग्राऊंडवर खेळायचो म्हणजे नुसता धुडगूसच घालत असू. आमच्या शाळेत क्रिकेट खेळायला बंदी होती. तरीदेखील आम्ही चोरून खेळत असू. मग कधी मैदानावर बॉल जप्त करायला सर आले की कुठे कुठे तो बॉल लपवावा लागे. नशीबाने मी एक सभ्य विद्यार्थी असल्यामुळे माझी कधी तपासणी होत नसे.
एकदा गंमत झाली, शाळेत लांब उडी साठी वाळूचा छोटा खड्डा बनवला होता.एकदा आमचा मूड आला आणि आम्ही त्या खड्ड्यावर गेलो उड्या मारायला. पहिल्या १-२ उड्या हळू मारल्यावर आमच्यात कोण लांब उडी मारतो अशी स्पर्धा लागली. रागाच्या भरात मी रनप घेऊन आलो आणि जी उडी मारली ती पूर्ण पार्श्वभाग शेकून आल्यावर कळले की आपण त्या वाळूच्या खड्ड्याच्यापलिकडच्या कठड्यावर आपटलो आहोत. मग हे उद्योग बंद केले. खरे तर चालू ठेवले तर भारताला एखादे ऑलिंपिक पदक मिळवून दिले असतो :) असो.
नशीबाने मला तशी बरीच साथ दिली आहे. क्रिकेट खेळायला परवानगी नाही म्हणून एकदा आम्ही बॉलने कॅच कॅच खेळत होतो. मी बॉल फेकला तो नेमका ग्राऊंडवरून चाललेल्या एका पाठीवर बसला. मुली म्हणजे तश्याच, ती लगेच बॉल घेऊन सरांकडे निघाली. मी जाऊन तो बॉल कसा बसा तिच्या तावडीतून सोडवून आणला. आम्ही परत खेळायला लागलो. पण नशीबात पुढे काय वाढून हे आम्हाला माहीत नव्हते. थोड्यावेळाने आम्ही सुटी संपली आणि वर्गात आलो. तास सुरू झाला, आणि आमच्या शाळेचे कडक उपमुख्याध्यापक आमच्या वर्गावर आले, ते आम्हाला नावाने ओळखत होतेच, त्यामुळे बाकी काही प्रश्नच नव्हता. त्या चोंबड्या मुलीने आमची तक्रार केली होती, त्यामुळे बरोबर खेळणार्‍या सर्वांना उभे करून ते घेऊन गेले, त्यांच्या तासावर. हाय रे दैवा, तो वर्ग माझ्या भावाचा होता. त्यांची ते जगप्रसिद्ध काठी माझ्या डोक्यावर घेऊन मला तासभर उभे केले. माझे नशीब चांगले की तो माझा भाऊच होता. त्याने घरी तोंड उघडले नाही. ते उघडले असते तर घरी माझी उत्तरपूजा झाली असती ती वेगळी.
तर असो, नववीमध्ये कसा कोण जाणे माझा व्हॉलीबालच्या वर्गाच्या टीममध्ये प्रवेश झाला होता. गॅदरिंगमध्ये आमची आणि दुसर्‍यावर्गाची मॅच होती, २-३ गेम झाले आणि माझ्याकडे सर्विस आली. माझ्या हाताची ठेवण कशी आहे मला माहीत नाही, पण माझा हात बॉलवर नेहमी तिरका बसायचा. सर्व्हिस अश्या प्रकारी स्वींग व्हायची की ज्याचे नाव ते. वर्गातल्या मुली देखील ती मॅच बघायला आल्या होत्या. इतर वेळी मुलांशी न बोलणार्‍या मुली त्यावेळी मात्र मला जोरदार चिअर करत होत्या.. मॅच झाल्यावर काहीजणी येऊन अभिनंदन करून गेल्या. एक-दोन दिवस मी पूर्ण हवेत होतो. अर्थात पुढच्या मॅचमध्ये लगेच जमिनीवर आलो, तो भाग वेगळा. पण एक वेगळी फीलिंग मला त्यावेळी अनुभवायला मिळाली.
नववी अश्या प्रकारे चालू होती. शाळेसाठी शहरात राहत असल्यामुळे मला तशी खेळायला बंदी होती. पण मी शाला सुटल्यावर चोरून एका मित्राकडे गोट्या खेळायला जात असे.. साधारण २०-३० मिनिटे गोट्या खेळून झाले की त्याच्या आईकडेच चहा पिऊन मी घरी जात असे. एक दिवस असाच गोट्या खेळायला म्हणून गेलो, आणि गप्पा मारत थांबलो. घरी पोचायला खूप उशीर झाला, मग असा ओरडा पडला की बोलणे कठीण. खरे तर असे झाले होते की मी जिथे रहायचो त्यांनी मला आईस्क्रीम खाताना पाहिले होते. रात्री माझी घरी आल्यावर चांगली झडती घेतली गेली, आणि वर्षभराचा हिशोब देण्याचे फर्मान निघाले. कसाबसा हिशोब जमवला आणि सुटलो.

मी नववीला असताना टायटॅनिक रिली़ज झाला होता. टायटॅनिक मध्ये 'तसला' सीन आहे म्हणून त्याची आमच्या मित्रमंडळात फार हवा झाली होती. मी असाच काहीतरी कारण काढून, पण अधिकृतरीत्या टायटॅनिक बघायला गेलो. पिक्चर सुरू झाला आणि कितीतरी वेळ मी आपला वाट बघत होतो, काही केल्या तसला सीन काही येईना. एक सीन आला नाही म्हणायला, पण नुसते काचेवरचे हात आणि अंगावरचा घाम बघून काय कळणार यांनी काय केलय ते? शेवटी पिक्चर बोगस आहे म्हणून आमच्या मित्रमंंडळात शिक्कामोर्तब झाले.

मी नववीला असताना एका सरांकडे इंग्रजी शिकायला जात असे. त्यांच्याकडे कॉलेजची मुले कॉटबेसिसवर राहत असत. तसेही मी जिथे राहत असे तिथे माझ्या खूप तक्रारी होत्या, त्यामुळे दहावीचे काय करायचे हा मोठा प्रश्नच होता. नेमके त्या सरांचीदेखील माझ्या बाबांशी आणि भावाशी ओळख होती. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी देखील एक जागा त्या सरांकडे बुक केली. तिथेच राहणे, तिथेच क्लास आणि जेवण वगैरे त्यामुळे सगळे जमले. नववी संपली आणि व्हेकेशन क्लाससाठी मी त्या सरांकडे रहायला गेलो.

हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे ठरणार होते.

(क्रमशः)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

13 Aug 2016 - 8:42 am | ज्योति अळवणी

चांगलं लिहिता आहात. विषय बोल्ड असला तरी हाताळणी चांगली आहे.

किंबहुना's picture

13 Aug 2016 - 7:30 pm | किंबहुना

धन्यवाद ज्योतीतै.
खरा बोल्ड विषय अजून यायचा आहे. तेव्हा माझे कसे होणार आहे देव जाणे.

कितव्या भागात येणारे ते बोल्ड वगैरे?

किंबहुना's picture

13 Aug 2016 - 11:49 pm | किंबहुना

इट्स ऑन द वे... आत्ता कुठे मूळ विषयाला सुरुवात होऊ लागली आहे. थोडी कळ सोसा.

आनन्दा's picture

14 Aug 2016 - 12:00 pm | आनन्दा

ह्म्म.. पुभाप्र.