डिस्क्लेमर : या लेखाच्या पहिल्या भागात आणि या दुसऱ्या भागात लिहिलेले प्रसंग म्हणजे काही अधिकृत निवेदन नसून जस्ट अनुभव म्हणून दिलेले आहेत. पहिल्या भागात या विषयाबाबत पुष्कळांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या. ग्राहक सुविधा विभाग माझ्याकडे असल्याने त्यांची मी यथाशक्ती उत्तरे दिली आहेत. तथापि अधिक तपशीलवार आणि अचूक माहितीसाठी www.mahadiscom.in हे संस्थळ पाहावे.
मागच्या भागावर काही जणांनी ‘प्रकाशाची’ चोरी या शब्दाला हरकत घेतली होती, की चोरी करणारे प्रकाशासाठी करत नाहीत. खरे आहे, पण त्यांनी चोरलेल्या विजेमुळे इतरांचा प्रकाश नाहीसा होतो अशा अर्थाने मी ते शीर्षक दिले.
झोपडपट्टी भागातील चोरीविषयी कुणीतरी लिहिले आहे. झोपडपट्टी हा सेन्सिटिव्ह भाग असून तिथे जाण्यास वायरमन लोकसुद्धा घाबरतात. तिथली चोरी पोलिसांची मदत घेतल्याशिवाय काढता येत नाही. आणि काढली तरी अतिशय जवळजवळ झोपड्या असल्याने पुन्हा लगेच बेमालूम सुरु करतात.
असो. हा विषय वेगळा आहे.
प्रकाशाची चोरी (२)
विजेची चोरी पकडली गेल्यानंतर नुसती पकडून समाधान मानून चालत नाही तर तिचा हिशेब काढून नेमके किती युनिटचे नुकसान झाले आहे ते निश्चित करणे आवश्यक असते. आणि त्याहीपुढचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मागील फरकाची रक्कम वसूल करणे. इथे फारच यातायात करावी लागे. चोरीबाबतचे नियम कायदे कानून याबाबत बरेच ग्राहक अनभिज्ञ असतात. आपण करत आहोत तो गुन्हा आहे हे त्यांच्या गावीही नसे. मागील फरक चुकता करायचा असतो हेच मुळात माहिती नसे. मग त्यांना दमात घ्यावे लागे. बरीच नाटके करावी लागत. काही मुरलेले लोक मदतीला घेतले तर हे काम अनायास आणि सोपे होऊन जात असे.
एका केसमध्ये खबऱ्या आमचाच वायरमन होता. जाधवमामा मुरलेला अनुभवी वायरमन. त्याच्या भागातल्या सगळ्या ग्राहकांच्या कुंडल्या त्याच्या डोक्यात मांडलेल्या .
बोलावणे गेल्याबरोबर जाधवमामा आले. संशयित ग्राहकाचा तपशील माझ्यासमोर आणला गेला.
‘हां, सांगा मामा , तुम्हाला काय माहिती इथे चोरी आहे ? ‘ वेळ कमी असल्याने मी थेट विषयाला हात घातला.
‘म्हणजे बघा मॅडम , तो हॉटेलवाला आहे. रोजचं शे-दीडशे गिऱ्हाईक हॉटेलला. आधी त्याचं लाईटबिल महिन्याला चार साडेचार हजार येत हुतं. आणि आता गेले चार महिने सहाशे-सातशे. मला संशय आला. परवा खांबावर चढलो आणि उगं जरा न्यूट्रल ढिल्ली केली अन गप जाऊन झोपलो. सकाळी हॉटेलचा पोऱ्या बोलवाय आला, लाईट बंद पडली म्हणून. मग खोलीत जाऊन आसंच मीटरच्या वायरी खालवर केल्या तर गडबड दिसली. ‘
‘मग काय केलं ?’
‘काय करतोय ? चोरी म्हटलो असतो तर राती माझा पाय गुडघ्यातनं काढला असता त्यानं. गप हापिसात आलो अन सायबाला सांगितलं. ‘ जाधवमामांनी काळेसाहेबाकडे बघून मान हलवली.
‘मग, काळे तुम्ही काय केलं ?’ मी.
‘या आठवड्यात चेकिंग करणार होतो मॅडम..’
‘कधी ? आज शनिवार, आठवडा संपला की !’
‘.....’
‘जाधवमामा, काय करायचं ? जायचं का चेकिंगला ?’
‘चला की ! पण मी तुमच्याबरोबर नाय येणार.’
‘मग ?’
‘असं करायचं, तुमी तिथं जाऊन मला फोन लावायचा. आणि बलवून घ्यायचं.’
‘बरं...’
‘आणि मग बेजान झापायचं... काय गडबड हाय मीटरमधे, तू बघतो का नाही, कुठं ध्यान आसतंय....’
‘हा: हा:..’
‘व्हय, मॅडम !! लई झापायचं ! आणि त्या ग्राहकासमोर. म्हंजे त्याची बोलती बंद होते आन मुकाट चोरीचं बिल भरतो...आणि उद्या जवा आमी परत वसुलीला जाऊ तवा आमच्याव ताव बी काढीत नाही !
मी काळे, हाताखालचा आणखी एक इंजिनिअर आणि एक दुसरा एक वायरमन आमचे चार लोकांचे पथक नवीन मीटरचे पॅक्ड बॉक्सघेऊन स्पॉटवर म्हणजे हॉटेलवर जाऊन पोचले. धना ड्रायव्हरने गाडी थेट हॉटेलच्या दारातच नेऊन लावली आणि कर्कश्श आवाज करत ब्रेक दाबला. मॅनेजर आणि दोघे तिघे धडपडत दारातून डोकावले.
‘लाईट मीटर चेक करायचे आहे. दाखवा.’
‘कुलपात है. किल्ली मालकांच्याकडे है.’
‘मालकांना बोलवा.’
‘गावाला गेल्यात ‘
‘फोन लावा.’
मग काळेंनी त्या हॉटेलमालकाला मोबाईलवर हग्या दम दिल्यावर म्यानेजरला किल्ली सापडली एकदाची !
आम्ही मीटररूममध्ये गेलो. मीटर रूम मध्ये अंधुकच उजेड. एक मिणमिणता सीएफएल तेवढाच. बाहेरून चेक केले तेव्हा संशयास्पद काहीच दिसले नाही. मग सील तोडून मशीन लावून चेक केले.
‘मॅडम, मशीनच्या आणि मीटरच्या युनिट्समध्ये ६० टक्के फरक आहे.’
‘बाप रे !’
.... मीटरमध्ये प्रत्यक्षापेक्षा ६० टक्के युनिट्स कमी येत होते !!
लगेच काळेंनी म्यानेजरला बोलावले.
‘काय हो हे ?’
‘काय झालं ?’
‘हे मीटर रीडिंग कमी कसं दाखवतंय ?’
‘आम्हाला काय म्हाईत ? तुमचा माणूस येऊन रीडिंग घेऊन जातो !’
‘हे बघा. इथलं रीडिंग आणि तुमच्या मीटरचं रीडिंग.’
‘काय की बॉ. आमी काय मीटरला हात लावायला जात नाही कधी.’
मग मी म्हणाले, ‘काळे, कोण वायरमन आहे हो या भागात ? बोलवा त्याला.’
काळेंनी जाधवमामांना फोन लावला. ते जवळपासच होते. लगेच हजर झाले.
‘काय मामा, कामं करता का हजामती करता ?’
‘काय झालं मॅडम ?’
‘हे बघितलं का ? मीटर टेंपरिंग ! तुमचा भाग आणि तुम्हाला काहीच खबर नाही ? कुठं ध्यान असतं, डोळे झाकून काम करता काय ? काय आपलं पगार मिळाला की झालं ?...’
मी जाधवमामांना ठरल्याप्रमाणे लेकी बोले न्यायाने झाप झाप झापले !!
इकडे म्यानेजर आधीच निम्मा खलास झालेला, तो पुरता गारद झाला !
मग काळेंनी सोबत आणलेले नवीन मीटर जोडले आणि संशयास्पद मीटर ताब्यात घेतले.’ बाहेर उजेडात नेऊन पाहिल्यावर टेंपरिंग केलेले दिसलेच. लगेच पहिला मीटर बॉक्समधे घातला, सील करून सह्या-बिह्या घेतल्या. सील केलेला मीटर बंदोबस्तात गाडीत नेऊन ठेवला. नवीन मीटर जोडून रीडिंग घेतले.
मग जाधवमामांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे, मी ताडताड चालत गाडीत जाऊन बसले. इकडे मामांनी म्यानेजरला कोपच्यात घेतले.
‘म्याडम लई तापट हायती. उद्या हापिसात या आणि फरकाचं बिल भरून मोकळं व्हा. नायतर केस झाली तर मी नाय बा मधी पडणार !’
मग म्यानेजरसाहेबमजकूर हळूच गाडीच्या खिडकीशी येऊन उभे राहिले आणि भीत भीत बोलले,
‘मॅडम, चला ना आत, काही थंड घेणार ?’
‘सॉरी मला चालत नाही.’
‘मग चहा ?’
‘मी चहा पीत नाही.’
‘आत तरी या, पाणी बिणी प्या जरा....’
‘त्यावर मी एकदा त्याच्याकडे भेदकपणे पाहून पुन्हा मान काटकोनात वळवली. मग त्याने थंडगार बिस्लेरी माझ्यासमोर धरली.
‘मला थंड पाणी चालत नाही.’
मग नॉर्मल पाणी बाटली मागवण्यात आली. पाणी पिल्यावर ,त्याच्या दृष्टीने, मी जरा थंड झाल्याचे पाहून तो पुन्हा अदबीने म्हणाला ‘मॅडम, उद्या येऊ का ऑफिसात, जरा कोटेशन देताना कृपा करा, लै झाडून काढू नका ...’
‘पण मी नाही उद्या, जिल्ह्याला जाणार आहे..’
‘मग परवा ?’
‘परवाचा कार्यक्रम फिक्स नाही अजून !’
....त्याने बऱ्याच मिनत्या केल्यावर अखेर मी कमीतकमी फरक काढून उद्याच बिल द्यायचे कबूल केले !
‘हम्म.. बघूया, तुम्ही जाधवांना घेऊन या सकाळी नऊ वाजता, करू कायतरी !’
हॉटेलमालकाने दोन दिवसात फरकाचे बिल भरले हे सांगायलाच नको.
आमची मोहीम मुद्देमालासकट फत्ते झाली !!
आणखी एकदा मी, माझे दोघे कनिष्ठ सहकारी जिल्ह्याच्या गावी मिटिंग करून आमच्या गावी परत येत होत. मध्ये सबस्टेशनमध्ये एका वायरमनला काही साहित्यासह गाडीत घ्यायचे होते. त्याला घेऊन मुख्य रस्त्यावर वळताना सहज वायरमनमामा बोलून गेले. ‘त्या कोपऱ्यावरच्या घरात दोन कनेक्शन हायेत मॅडम. पण बिल एकाचंच निघतंय, दुसऱ्याचं शून्य वापराचं निघतं. मला जरा डाऊट हाय बघा !’
‘असं म्हणता ? चला की बघू !’ मी म्हटले.
चेकिंगचं साहित्य काहीच बरोबर नव्हतं. पण म्हटलं पाहणी तरी करू.
घर म्हणजे पुढे मोठी वर्कशॉपची शेड आणि मागे दोन खोल्या वॉचमनसाठी. वर्कशॉपचं दार बंद होतं. दरवाजा आणि खिडक्यांच्या तावदानावर बोट बोट धूळ साठली होती. कित्येक महिन्यात उघडले नसावेत.
घरगुती मीटर आणि औद्योगिक मीटर एकाच फळीवर लावलेले होते. वापर नाही हे स्पष्टच दिसत होते. तरीपण आल्यासारखे एक नजर टाकू म्हणत आम्ही बाजूच्या रिकाम्या पॅसेजमधून मागील बाजूस गेलो. घराच्या दारावर वायरमनने थाप मारली.
दोन तीन थापा मारून आणखी एकदा ‘कोण आहे का ?’ असा जोरदार हाकारा घातल्यावर नऊवारी लुगडे नेसलेल्या एका बाईने दार उघडले. युनिफॉर्मवाली माणसे पाहून तिने आत जाऊन कुणालाशी हाक मारली. एक मिशी अन धोतरवाला बाप्या डोळे चोळत बाहेर आला.
‘काय ओ सायेब ?’
‘मीटर चेक करायचय.’
‘मग करा की. ते काय तिकडं भिताडावर हाय.’
‘शेडचं कुलूप काढा.’
‘ते कशापायी ?’
‘वायरिंगबी बघावं लागतंय’
‘हां.’
मग त्याने आत जाऊन किल्ली आणली. कुलूप काढलं.
मीटरची सील्स तर व्यवस्थित होती. भिंतीतून वायरींचा एक भलाथोरला लळालोंबा सुस्त अजगरासारखा लोळत वर्कशॉपमध्ये गेला होता. तिथे वायंडिंग मशीन, लेथ मशीन अशी सताठ प्रकारची मशीन्स जमिनीवर अस्ताव्यस्त पसरली होती. आणि अजगराच्या चिंध्या फाडून त्या प्रत्येक मशीनच्या पोटात खुपसल्या होत्या. मुख्य म्हणजे वर्कशॉपला आणखी एक दरवाजा होता, जो मागच्या घरात उघडत होता. या दरवाजावर धूळ नव्हती.
‘’अगागा, ह्या वायरी म्हणायच्या का बकासुराच्या पोटातले जंत ?’ वायरमनने अचंबित होऊन प्रश्न केला.
वायरमनच्या त्या उपमेवर आम्हीच काय, तो धोतरवाला मामाही मिशा फेंदारून हसू लागला.
ते अजब वायरिंग बघून आमची डोकी चक्रावली.
‘काय मामा, मशनी सुरु हाईत का ह्या ?’
‘नाय बॉ !’ मामा मख्खपणे उत्तरले. ‘सगळं बंद हाय बघा.’
‘खटकं कुठं हाईत सगळं ?’
‘त्ये काय तिथं फळीवर.’
त्या अजगराच्या पोटाशी जमिनीवर एक फळी पडली होती. तिच्यावर सगळे स्विचेस दिसत होते.
माझ्या सहकाऱ्याने बाहेर मीटरपाशी जाऊन दोन्ही मेनस्विच ऑफ केले. मग वायरमननं फळीवरचे सगळे खटके धडाधड चालू केले.
....अन काय गम्मत ! सगळ्या ‘मशनी’ खाडखाड सुरु झाल्या की !
‘काय ओ मामा ? मशनी बंद हाईत म्हणला नव्हे तुम्ही ?’
‘आता तुमी चालू केल्यावर हुणार की चालू ! नायतर बंदच असत्यात ! माझा भाचा चालवतो वर्कशॉप. ’ निरागस मामा.
‘बोलवा की त्याला.’
तपासून पाहिलं तर मामानं मीटरच्या बाहेरून परस्परच अजगराला सप्लाय दिला होता !
झालं. लगेच पंच बोलावले, पंचनामा केला.
मामा मख्खच होता. इतक्यात भाचा आला. हा सुशिक्षित दिसत होता. परिस्थिती बघून त्यानं रागरंग ओळखला.
‘सॉरी मॅडम, हे वायरिंग खरं म्हणजे दुरुस्त करायचं होतं. पण कोण वायरमन मिळेना.’ तो कसंनुसं बोलला.
त्याला दमात घ्यायची गरजच पडली नाही. त्यानं मुकाट्यानं पंचनाम्यावर सह्या केल्या अन फरकाचे बिल ताब्यात घेतले. दोन दिवसात पैशाची जुळणी करून बिलाचा भरणा करण्याचे त्याने मान्य केले.
आणि आम्ही परत ऑफिसच्या वाटेला लागलो. जाता जाता एक मोठी चोरी अनायासे पकडली गेली होती आणि कंपनीचा मोलाचा महसूल भरून आला होता.
--------*--------
प्रतिक्रिया
5 Aug 2016 - 11:59 am | मार्मिक गोडसे
छान.
5 Aug 2016 - 12:15 pm | नाखु
दुसर्या प्रकरणात मामाचाच "मामा" झाला म्हणायचा की?
मापात मारणारा.
जाधवमामांसारखी माणसं खात्यात प्रर्त्येक वरिष्ठांसाठी उपयोगी असतात हे जकात खात्यात अनुभवले आहे.
पुभाप्र.
5 Aug 2016 - 12:22 pm | संदीप डांगे
वाह!!!
5 Aug 2016 - 1:10 pm | निर्धार
हा लेख देखील आवडला.
5 Aug 2016 - 1:11 pm | अमितदादा
मस्तच..आणखी अनुभव येऊद्यात..बारा गाव बारा भानगडी...
5 Aug 2016 - 1:16 pm | एस
रोचक अनुभव! भारी लिहिताय. पुभाप्र.
5 Aug 2016 - 1:20 pm | यशोधरा
स्नेहातै, समजा आमच्या शेजार्यांचा वीज मीटर नंबर आमच्या बिलावर व आमचा नंबर त्यांच्या बिलावर छापला गेला असेल तर काय करावयाचे? मग बिले पण चुकली असणार ना? दोघांपैकी एखाद्याला भुर्दंड असेल तर तो ग्राहकाने का भरावा? ही चूक/ हलगर्जीपणा मंडळाकडून नाही का?
नेमके कधीपासून असे सुरु आहे हे ठाऊक नाही, ते बिलांवरुन पाहता येईल म्हणा, पण ह्यात आता नक्की काय करावे?
5 Aug 2016 - 2:38 pm | सस्नेह
खरड करते. चालेल ?
5 Aug 2016 - 3:11 pm | यशोधरा
Please, वाट बघते
5 Aug 2016 - 1:29 pm | आतिवास
जाधवमामा आवडले.
अशी खूप चांगली माणसं असतात तळागाळात काम करणारी - त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते.
5 Aug 2016 - 1:32 pm | मोहनराव
रोचक अनुभव!!
फरकाच्या बिलाबरोबर दंड आकारत नाहीत का?
5 Aug 2016 - 2:39 pm | सस्नेह
दंडाची रक्कम नंतर ठरते.
5 Aug 2016 - 1:41 pm | किसन शिंदे
मस्त आणि रोचक किस्से आहेत. अजून येवू द्या
5 Aug 2016 - 3:00 pm | जगप्रवासी
एकदम भारी किस्से,
मी जाधवमामांना ठरल्याप्रमाणे लेकी बोले न्यायाने झाप झाप झापले !!>> हे तर कहरच
5 Aug 2016 - 4:26 pm | संत घोडेकर
छान!आपल्या लेखामुळे बरेच गैरसमज दूर होतायेत.नाण्याची दुसरी बाजू समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
5 Aug 2016 - 4:37 pm | यशोधरा
हे सगळे अनुभव गोळा करून एक पुस्तक काढ स्नेहाताई, खरेच रोचक आणि उद्बोधक!
5 Aug 2016 - 4:37 pm | अजया
स्नेहा स्टाईल असे अनुभव वाचायला नेहमीच मजा येते! पुभाप्र!!
5 Aug 2016 - 4:43 pm | विनायक प्रभू
आवड्या
5 Aug 2016 - 4:44 pm | मराठी_माणूस
जाधवमामांची हुशारी आवडली.
दुसरी घटना ही एक प्रकारची वीज चोरी आहे , ह्यात क्रिमिनल केस होउ शकत नाही का ?
5 Aug 2016 - 5:00 pm | अभ्या..
खरोखरीच कोर्ट केसेस पर्यंत जातात का? का मांडवली ऑर फाईनवर थांबते?
ह्याची टीप द्यायची तर कशी द्यावी लागते?
त्यात काही बक्षीस वगैरे असते का?
टीप देणार्याची सिक्रसी मेन्टेन होते का? नसल्यास सूड उगवायला चांगला तरीका आहे.
6 Aug 2016 - 10:39 am | सस्नेह
छोटे चोर दंड भरणे पसंत करतात. धनदांडगे कोर्टात जातात.
http://www.mahadiscom.in/power-theft-winner_english_001.shtm इथे इन्फॉर्म करा.
बक्षिसाची रक्कम एकूण वसुलीच्या १ टक्का असते. सीक्रसी गॅरंटेड आहे. तसे संस्थळावर वरती दिलेल्या लिंकमध्ये स्पष्ट नमूद केले आहे.
5 Aug 2016 - 6:55 pm | ५० फक्त
याची दुसरी बाजु अनुभवली आहे, पण व्यावसायिक मर्यांदांमुळे लिहिता येत नाही, जेंव्हा या धंद्यातुन बाहेर पडेन तेंव्हा लिहु शकेन.
6 Aug 2016 - 10:39 am | सस्नेह
अवश्य लिहा. :)
5 Aug 2016 - 7:21 pm | १.५ शहाणा
महाराष्ट्रात ग्रामपंचायती हद्दीत बहुतेक सर्व ठिकाणी किमान २५ ठिकाणी १४ W चे CFL हे कोणत्याही मीटर शिवाय थेट उपरी तार मार्गावर जोडलेले असतात व त्यास कोणतेही बटन नसते. ते २४ तास चालू असतात जर ढोबळ हिशोब केला तर महाराष्ट्रात 1०००० ग्रामपंचायती विचारात घेतल्या म्हणजे १००००*२५*१४*२० तास* २५ दिवस = १७५० दशलक्ष युनिट प्रती माह हे कोणाचा खात्यात जातात .
6 Aug 2016 - 10:43 am | सस्नेह
ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र स्ट्रीट लाईट फेज असते. त्याची मीटर्स वेगळ्या ठिकाणी असतात. प्रत्येक बल्बला स्वतंत्र मीटर नसते.
6 Aug 2016 - 1:58 pm | १.५ शहाणा
प्रत्येक बल्बला स्वतंत्र मीटर नसते. हे महित आहे. पण ग्रामपंचायती क्षेत्रात एकाचा रोहित्र वरून / एकाचा मीटर वरून विजा पुरवठा होत नाही . अनेक वाड्या वस्तीवर थेट उपरी तार मार्गावर कोणताही मीटर /नियंत्रणाशिवाय विज पुरवठा होत आसतो वरील विदा हा एका ग्रामपंचायतीत केवळ २५ cfl प्रती १४ W दिवे गृहीत धरून ढोबळमानाने दिला आहे. जर आपणही ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर फेर फटका मारल्यास दिसून येईल. थेट दिव्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते .
5 Aug 2016 - 7:36 pm | १.५ शहाणा
१००००*२५*१४*२० तास* २५ दिवस = १.७५० दशलक्ष युनिट प्रती माह हे कोणाचा खात्यात जातात .
5 Aug 2016 - 8:16 pm | Jack_Bauer
खूप मस्त अनुभव आहेत. अजून येऊद्यात.
5 Aug 2016 - 10:42 pm | खटपट्या
लै भारी..अजून येउद्या
5 Aug 2016 - 11:25 pm | रातराणी
भारी!
5 Aug 2016 - 11:42 pm | इडली डोसा
अश्या चोरी उघडकीला आणुन देणार्या वायरमनकाकांना काही इंसेंटिव्ह/अप्रेजल मिळतं का कंपनी कडुन?
8 Aug 2016 - 10:16 am | सस्नेह
डिपार्टमेंटल असतील तर बहुधा कॅश + मानपत्र मिळते पण बरेचदा जाहीर करत नाहीत.
6 Aug 2016 - 7:54 am | मुक्त विहारि
अजून असे किस्से असतील तर येवू द्या.
6 Aug 2016 - 8:13 am | १.५ शहाणा
अश्या चोरी उघडकीला आणुन न देणार्या वायरमनकाकांना/मीटर वाचक ना इंसेंटिव्ह लोकांकडून भरपूर मिळतो .
9 Aug 2016 - 10:33 am | साहेब..
+1.5
6 Aug 2016 - 8:46 am | भंकस बाबा
उत्तम , अजुन वाचण्यास उत्सुक,
6 Aug 2016 - 9:40 am | साती
मस्तं आहेत एकेक अनुभव!
6 Aug 2016 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार
दुसरा भागही मस्त लिहिलाय ...
जाधवमामांना नमस्कार,
त्यांच्यासारखी माणसे मिळणे नशिबात असावे लागते,
पैजारबुवा,
6 Aug 2016 - 11:02 am | चतुरंग
जाधवमामा आवाल्डे!
असलं फील्डवर्क करायला थ्रिलिंग वाटत असेल नाही, अर्थात तेवढंच धोक्याचं सुद्धा असणार! :)
(एक सूचना - तुम्ही प्रत्यक्ष वायरमनची खरी नावं लिहीत नाही आहात ना? असाल तर कृपया नाव बदलून लिहा आजकाल माहिती कुठून कशी कुठे पोचेल सांगता येत नाही! चांगल्या माणसांना उगीच नसता ताप नको..)
6 Aug 2016 - 11:11 am | सस्नेह
होय, मी खरी नावे दिलेली नाहीत.
व्यवहार्य सूचनेसाठी धन्यवाद :)
6 Aug 2016 - 11:12 am | चतुरंग
:)
6 Aug 2016 - 1:01 pm | सतीश कुडतरकर
डोंबिवलीच्या आसपासची गाव वर्षानुवर्षे चोरी करून फुकृट वीज वापरतात.वीज मंडळात तिथलेच गावकरी कामाला. गावकर्यांची भयंकर दादागीरी. यांच्या चोरीचा भुर्दंड कित्येक वर्षे ईतर ग्राहकांवर जातोय. या चोरांना कुणीच अडवणारा नाही.
6 Aug 2016 - 1:16 pm | नीलमोहर
एकापेक्षा एक किस्से आहेत,
त्या डिटेक्टिव्ह अस्मिता सारखं सहकाऱ्यांची गँग सोबत घेऊन खलनायकांच्या अड्ड्यांवर छापा टाकणाऱ्या
स्नेहाताई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
6 Aug 2016 - 1:20 pm | सस्नेह
=))
6 Aug 2016 - 2:04 pm | मराठी_माणूस
हे प्रकरण मुंबईतील आहे
http://bollywood.indiaeveryday.in/fullnews-soborsquos-power-hungry-rich-...
6 Aug 2016 - 6:23 pm | पैसा
पण सहज जाता जाता अशा चोर्या सापडतात म्हणजे उघडकीला न येणार्या किती असतील. :(
7 Aug 2016 - 5:13 pm | अभिजीत अवलिया
हा भाग पण आवडला.
8 Aug 2016 - 5:47 am | निखिल निरगुडे
म्हणजे वीज चोरी पकडायला टेक्निकल बरोबर मॅनेजरिअल स्किल्स उत्तम वापरल्या आहेत!!
8 Aug 2016 - 9:56 am | सुबक ठेंगणी
झालंच तर जाधव मामांच्या चातुर्याला आणि कर्तव्यदक्षतेला पण सलाम.
चोरी पकडली गेल्यामुळे अपमान होऊन्/डिवचले जाऊन काही वेडंवाकडं घडवून आणल्याचेही प्रकार होतात का हो ताई? त्याला कसं तोंड देता तेही वाचायला आवडेल.