हिवाळ्याचे दिवस होते. पुण्यात अजून म्हणावी तशी थंडी सुरु नव्हती झाली. अचानक एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये असताना माझा फोन झर झरला (vibrating mode). माझा जिवलग मित्र विन्या कॉल करत होता. कॉल घेतला की तिकडून आवाज आला,
" Party कैसा हे तू ..." , विन्या.
"मोजेमे..." मी.
"Party, सब लोगा गोआ जानेका पिलाना कऱरे".
अचानक मिळालेल्या सुखद धक्यातून सावरत मी त्याला म्हणालो की, " कधी जायचं ? आणि सोबत कोण कोण आहे?"
त्यावर विन्या म्हणाला,
"अरे बरेच दिवस झाले असं अचानक भयानक काही केल नव्हत म्हणून जेव्हा आज सगळे भेटलो तेव्हाच ठरवलं की गोव्याला जायच सगळ्यांनी"
"अरे पण सगळे म्हणजे कोण?", मी.
"मी, खंड्या, पश्या आणि तू", विन्या.
ज्या पद्धतीने हा विन्या बोलत होता त्यावरून मला ह्यांचा प्लॅन fix दिसत होता. आता फक्त प्रश्न होता की ही जनता येणार कधी आणि कशी? तेवढ्यात खंड्या बोंबलला,
"ए बिलंदर (मी) चल गुपचूप, उद्या रात्री तुला घ्यायला येतोय. गाडी पण fix झाली आहे. नवीकोरी गाडी मिळाली आहे ड्राइव्हरसकट".
"अरे पण माझं ऑफिस..."
"गेलं खड्ड्यात, सांग तुझा बॉसला येत नाही मी. गोव्याला चाललोय. का मी येऊन सांगू..."
"नको नको ..." मी जरा दचकूनच बोललो. उगाच हा आला, तर तो काय करेल याचा काही नेम नाही.
"मी सांगतो बॉसला, मिळेल सुट्टी", मी.
असं सगळं बोलणं झाल्यावर मला सगळा प्लॅन सांगितला. मंडळी जालन्याहून संध्याकाळी निघणार होती. मला रात्री ११:३० ला पुण्याच्या राहत्या निवासस्थानी घ्यायला येणार होती आणि तिथूनच थेट गोवा.
"प्लॅन चांगला आहे. पण गोव्यात राहायचं काय?" मी कळीचा मुद्दा उचलला.
"अरे त्यासाठीच तर तुला कॉल केला ना", पश्या केकाटला. "तूच ठरव कुठे राहायचं ते".
झाल, आली का पंचाईत. आता २४ तासांत गोव्यामध्ये बजेट रूम कोण देणार? तेवढ्यात मला आठवल, माझा एका मित्राने मला फार पूर्वी एका हॉटेलचं नाव सांगितल होतं, जे beach पासून जवळ होतं आणि कलंगुट पासून पण जवळ होतं. मग दुसऱ्यादिवशी मी लगेच फोना फोनी करून त्या हॉटेलवाल्याची बेश्ट डील मिळवली.
आता दोन मोठे प्रश्न होते, एक म्हणजे ऑफिसच्या बॉसला पटवण्याचा आणि दुसरम्हणजे घरच्या बॉसला पटवण्याचा. त्यापैकी दुसरा प्रश्न जरा गंभीर होता. अनेक चर्चा,वाटाघाटी, रुसवे-फुगवे आणि आश्वासनांनंतर दुसरा प्रश्न निकाली लागला. लग्नानंतर मित्रांसोबत गोव्याला जायचं किती कठीण असतं हे जाणकार मंडळींना सांगायला नको.
आता 'तो' दिवस आला ज्याची गेल्या १२ तासांपासून मी आतुरतेने वाटपाहत होतो. सकाळी सकाळी ऑफिसमध्ये लवकर जाऊन सगळी कामे भराभरा उरकली. संध्याकाळी निघताना ऑफिसच्या सर्व मित्रांच्या शुभेच्छा घेऊन निघालो. घरी येऊन पॅकिंग करायची होतीच. पण गोवा म्हंटल की असे कितीसे कपडे लागणार म्हणून भरपूर time pass केला.
तेवढ्यात संध्याकाळी ७ वाजता माझा फोन पुन्हा वाजला, तिकडून आवाज आला,
"प्लॅन कॅन्सल... "
सर्व काही शांत झालं. अस वाटलं की वेळ सुद्धा थांबला. पोटात धस्स झाल. पुन्हा आवाज आला,
"ए बिलंदर प्लॅन कॅन्सल...", पश्या .
"*&%#%^$*, नेहमीचं आहे तुमच. लढायची वेळ आली की तुम्ही परसाकडं धावणार", मी वैतागून बोललो.
"Party, तुने पॅकिंग करलीय क्या?", विन्या.
"आता त्या पॅकिंगला चुलीत घालतो. " मी अजूनच वैतागून म्हणालो.
एक तर ऑफिस मध्ये बॉसला पटवा. ते झाल की घरी बॉसला पटवा आणि एवढ करून प्लॅन कॅन्सल म्हंटल, की घरचे पुन्हा आयुष्यभर ऐकवणार, "तुमचे मित्र ऐनवेळेस टांग देतात". प्लॅन कॅन्सल झाल्याचं दुःख नाही हो पण हे टोमणे ऐकायचं म्हंटलं की ... जाऊद्या. मी आपली मनाची तयारी करायला लागलो.
तेवढ्यात खंड्याचा आवाज आला, "बस करा बे".
" ए बिलंदर, निघालोय आम्ही. तयार राहा. ११:३० तुझा घराखालून तुला उचलू".
अंगात नवीन ऊर्जा आली. नवा चैतन्य पसरलं. मनात कुठेतरी वाटत होतच की हे सगळं खोट आहे, पण पूर्वानुभव पाय खेचत होते. पण आता नाही.
आता फक्त गो गोवा...
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 11:43 pm | किसन शिंदे
पयल्यांदा गेलात का गोव्याला?
4 Aug 2016 - 11:54 pm | कपिलमुनी
नवलेखकांना प्रोत्साहन द्या!
5 Aug 2016 - 1:52 am | खटपट्या
माझं प्रोत्साहन आहे...
चांगलं लीवलंय
- कसंबी लीवा पन मराटीत लीवा संगटना
5 Aug 2016 - 1:51 pm | नीलमोहर
मा. संपादकांनी नवलेखकांचे असे पाय ओढलेले पाहून..
आता त्यांनी बिचार्यांनी कुणाच्या तोंडापुढे पहायचं?
छान सुरूवात आहे हो, पुलेशु. फोटोही टाका.
5 Aug 2016 - 3:41 pm | किसन शिंदे
अरेच्चा!! माझ्या प्रतिसादात नवलेखकाचे पाय ओढण्यासारखं काय होतं हे कुणी सांगेल केला?
काही महिन्यांपूर्वी मी ही जावून आलो आणि ते ही पहिल्यांदाच..म्हणून आपलं साधा सरळ प्रश्न केला त्यांना. :)
5 Aug 2016 - 9:15 am | स्पा
अरे वा छानच झाली सुरवात
5 Aug 2016 - 9:53 am | कंजूस
नशीब " मी तुमच्याकरता एक खुमासदार लेखन घेऊन येत आहे लवकरच" छाप निघालं नाही.त्यांचं ठिके दोनदोन बॅासला पटवतील,कपड्यांच्या बॅगेला खुंटीला टाकतील पण आमच्या नेटप्याकला उगाचच भोक पडते ना चारोळी धाग्याने.
ते जाऊदे "मग दुसऱ्यादिवशी मी लगेच फोना फोनी करून त्या हॉटेलवाल्याची बेश्ट डील मिळवली." या वाक्याने आणि एका दिवसात बॅासला पटवून सुट्टी मिळवणार्यांबद्दल फारच आदर वाढला आहे.
5 Aug 2016 - 10:42 am | संजय पाटिल
हेच म्हणतो,
5 Aug 2016 - 10:44 am | पक्षी
त्या पेक्षा जास्त आदर घरच्या बॉस ला पटवल्या बद्दल वाटला... कस काय जमतं बुवा
7 Aug 2016 - 1:02 am | माम्लेदारचा पन्खा
अवलिया माणूस !
5 Aug 2016 - 10:20 am | प्रमोद देर्देकर
लेखन आवडले. पुभाप्र.
6 Aug 2016 - 4:16 am | पिलीयन रायडर
गोव्याचं नाव वाचुन लेख वाचला.
छान लिहीलं आहे! फोन "झरझरला" वगैरे आवडलं!
अवांतर - तुमचं नाव वाचल्यासारखं वाटलं म्हणुन तुमचा आधीचा लेख पाहुन आले. बरंच सुधारलंय तुमचं मराठी टायपिंग :)
7 Aug 2016 - 12:38 am | palambar
आमची गौवा ट्रीप आठवली , पहाटेतुनिघालेलो आम्ही, दहा बारा तासात
पोहोचू अशा भ्रमात, रात्रीचे दहा वाजले तरी पोचलो नाही,
ड्रायह्वर चांगला नव्हता, त्यात गौव्यात प्रवेश करतांना लागणारे पेपर्स
नव्हते, शेवटी मिळेल त्या बसने कसेबसे पोचलो
7 Aug 2016 - 10:45 am | नन्दादीप
गोव्यात प्रवेश करताना कागद्पत्र???
बात कुच हजम नही हुवी.....
कदाचित आमच एम एच ०७ पासिंग असल्यामुळे आम्हाला विचारत नसावेत.
8 Aug 2016 - 9:05 pm | एनिग्मा
सर्व वाचकवृंदांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढील भाग लवकरच प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन.