एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा
साहित्य
२ माध्यम आकाराचे पापलेट, साफ करून, दोन्ही बाजूने सारण/मसाला आत भरता येईल अश्या चिरा मारून
२ चमचे तेल किंवा स्प्रे
माश्याचा वास कमी करायला
१ लिंबाचा रस
२ चमचे बेसन
माश्याला लावायचा मसाला
1 चमचा हळद
१ चमचा मिरची पावडर
१/२ चमचा मीठ
भरायचा हिरवा मसाला
१ कप किसलेले खोबरं
१ इंच आल्याचं बोट
३ ते ५ हिरव्या मिरच्या
८ ते १० लसूण पाकळ्या
१ मोठी मूठ कोथिंबीर
मीठ, चवीनुसार
कृती
बऱ्याच लोकांना मासे खायचे असतात, पण माश्यांचा वास सहन होत नाही किंवा चालत नाही. मुंबई किंवा कोंकण सोडलं तर इतर ठिकाणी (देशावर) ताजे फडफडीत मासे (समुद्रातले, गोड्या पाण्याचे मासे मी फारसे खात नाही) मिळणं तसं कठीण. मग बर्फावर ठेवलेल्या "ताज्या" माश्यांवर भागवावं लागतं. पण ह्या अश्या मासळीला बऱ्याचदा एक विशिष्ट वास येतो. खरं तर मासे ताजे आहेत हे ओळखायचे एक उत्तम पद्धत म्हणजे त्यांचा वास घेणे. इंग्रजीत म्हणतात तसे "A fish is fresh when it smells like the sea!". (हा अनुभव मी हर्णै बंदरावर घेतला आहे. ताज्या मासळीला अजिबात वास येत नाही).
तर ह्या बर्फावरच्या मासळीचा तो वास घालवायला ही पद्धत एकदा वापरून बघा. ह्याला इंग्रजीत "deodorizing" म्हणतात.
मासे संपूर्ण बुडतील एवढ्या पाण्यात एका लिंबाचा रस घाला. असे मासे लिंबाच्या पाण्यात साधारण ३० ते ४५ मिनिटे ठेवा. मासे स्वच्छ पाण्यात साफ करून घ्या. आता माश्यांना आतून बाहेरून बेसन लावून अजून ३० ते ४५ मिनिटे ठेवा. ह्या नंतर मासे नळाखाली धुऊन कोरडे करून घ्या.
माश्यांना हळद, तिखट आणि मीठ लावून घ्या. मासे मुरत असे पर्येंत हिरवा मसाला/वाटण करून घ्या. हिरव्या मसाल्याचे सगळे साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्या. शक्यतो पाणी वापरू नका.
माश्यांमध्ये दोन्ही बाजूने हिरवा मसाला भरून घ्या. एयर फ्रायर २०० डिग्री वरती ३ ते ४ मिनिटे प्रि -हिट करून घ्या. माश्यांना दोन्ही बाजूने ब्रशने तेल (किंवा ऑईल स्प्रे) मारून, मासे एयर फ्रायर मध्ये ठेऊन (बास्केटला तेल लावायला विसरू नका, नाहीतर मासा चिकटेल), साधारण १० ते १५ मिनिटे फ्राय करून घ्या. ७ ते ८ मिनिटांनी एकदा मासा अलगद पलटून घ्या म्हणजे दोन्ही बाजूने शिजेल.
लिंबाच्या फोडी बरोबर हा भरलेला पापलेट सर्व करा!
एयर फ्रायर नसेल तर ओव्हन मध्य बेक करून घ्या, किंवा तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
प्रतिक्रिया
19 Jul 2016 - 8:40 pm | मोदक
केडी सर... अहो कशाला अत्याचार या वेळी?
19 Jul 2016 - 8:46 pm | केडी
एकदा पाऊसाळा सरु द्या मग कोकणात सायकल राईड काढू, मासे खायला. :-)
19 Jul 2016 - 8:50 pm | मोहनराव
निव्वळ जळजळ!!
19 Jul 2016 - 9:05 pm | सामान्य वाचक
बाकी मासे खात नसल्याने पास
20 Jul 2016 - 9:17 am | पिंगू
पनीर / सोयाबीन वापरा..
20 Jul 2016 - 7:59 am | Bhagyashri sati...
छान माहिती
20 Jul 2016 - 9:06 am | पिंगू
केडी, बेसनाएवजी तांदळाचे पीठ वापरुन बघ.
- (पूर्वाश्रमीचा मासेखाऊ) पिंगू
20 Jul 2016 - 11:12 am | केडी
....म्हणताय त्याप्रमाणे वास घालवायला वापरून पाहीन नक्की
20 Jul 2016 - 1:33 pm | किरण कुमार
पावसाळ्यात "जळवा" - फार त्रास देतात
20 Jul 2016 - 4:44 pm | केडी
किरण भाऊ, वज्राई च्या ट्रेक ची आठवण काढलीत....:-)
20 Jul 2016 - 1:52 pm | वेदांत
मस्त... कधी बोलवता जेवायला ?
20 Jul 2016 - 3:17 pm | बाप्पू
छान पाक कृती. :) तोंपासु :)
पापलेट फ्राय किंवा भरलेले पापलेट नेहमीच आवडतात. परंतु पूर्ण पापलेट फ्राय केल्यावर जेव्हा तव्यातून प्लेट मध्ये ठेवतो तेव्हा थोड्या वेळाने त्याच्या विरुद्ध बाजूला ओलसर पण येतो. यासाठी काय करावे ??? त्यामुळे खाण्याची सर्व मजाच निघून जाते. कोणाला याबद्दल काही उपाय माहिती आहे का ???
20 Jul 2016 - 5:19 pm | कपिलमुनी
एवढा वेळ वाया ग्घालवु नये ! लगेचच फडशा पाडावा
20 Jul 2016 - 7:36 pm | केडी
अगदी, एवढा धीर धरवत नाही हो, आमच्या ताटात फक्त काटेच उरतात. :-)
20 Jul 2016 - 4:08 pm | जागु
वॉव. तोंडाला पाणी सुटले.
20 Jul 2016 - 4:41 pm | केडी
तुमच्या सगळ्या मासळी बद्दलच्या धाग्यांना वाचून काढलाय. अतिशय उत्तम पाकृ आणि माहितीपूर्ण.
20 Jul 2016 - 4:12 pm | यशोधरा
ताज्या माशाची कातडी चमकदार असते. डोळ्यांकडचे कल्ले जरा उचलून पाहिले तर तर लाल रंगाचे असावेत, काळपट असले तर मासा शिळा.
फोटो मस्त.
20 Jul 2016 - 4:45 pm | केडी
बरोबर, हे देखील पाहूनच मासे घ्यावे.
20 Jul 2016 - 4:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
के डी सर, एक नंबर पाककृती आहे ही, तुमचे लेखन (एअरफ्रायर संबंधी) वाचून मी एक एअरफ्रायर घ्यायच्या निर्णयाप्रत पोचलो आहे बघा!! आता नेक्स्ट सुट्टी मध्ये तो कार्यक्रम अन ह्या रेसिपी असा जंगी कार्यक्रम आखतो आहे!
अवांतर :- जागु ताई ची कौतुकाची कॉमेंट म्हणजे तर अगदी एका पट्टीच्या गवयाने दुसऱ्या गवयाच्या सुंदर लकेरीवर दाद द्यावी तसे भासले!
20 Jul 2016 - 4:37 pm | केडी
आणि जागु ताईंच्या प्रतिसादाबद्दल +१०००! त्यांच्या मासळीच्या पाकृ म्हणजे तोंडांतून धबधबा असतो आमच्या. आणि त्यांचं मासळी बद्दलचं ज्ञान अफाट आहे. त्यांच्या पाकृ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे.
20 Jul 2016 - 4:29 pm | शिद
मस्तच...ताजे पापलेट मिळायला भाग्य लागतं. आत्ता पावसाळ्याच्या दिवसांत सगळा कोल्ड स्टोरेजचा माल येतो.
बाकी, तुम्ही सगळ्या चखण्याच्याच रेसिपी बनवताहेत एफ्रामध्ये असं दिसतंय. ;)
20 Jul 2016 - 4:39 pm | केडी
लोल..... :-))
20 Jul 2016 - 4:40 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
20 Jul 2016 - 4:50 pm | केडी
....
20 Jul 2016 - 7:52 pm | सप्तरंगी
तुमच्यामुळे एकदम प्रेरित होऊन मी पण airfryer घेतलेच, अवघ्या ३ दिवसात पोटॅटो वेजेस, मार्केट मध्ये मिळणारे तयार व्हेज बॉल्स, ratatouille (ग्रिलड व्हेज्जीज) आणि साबुदाणा वडाही केला. मस्त झाला. आज कांदा भजी किंवा तुमचे मटार चखणा try करेन.
पापड केले , अगदीच वाया नाही गेले पण छानही नाही झाले .
20 Jul 2016 - 8:01 pm | सुबोध खरे
सप्तरंगी
पदार्थ तळल्या सारखेच लागतात का? की थोडे तळल्या आणि थोडे भाजल्या सारखे?
कोणत्या कंपनीचा फ्रायर घेतला?
20 Jul 2016 - 8:22 pm | सप्तरंगी
मी PHILIPS Airfryer Viva HD9230/20 (डिजिटल) घेतला. १५० युरो ला मिळाला. मी अगदीच नवीन आहे यात. पण मी ३० साबुदाणा वड्यासाठी जास्तीत जास्त १/२ टेबल-स्पून (एकूण) तेल वापरले असेल. वडा अगदी तेलात तळल्यासारखा एकदम कुरकुरीत नव्हता (वरचा भाग), पण कलर, दिसायला, चवीला एकदम परफेक्ट सही होता. पण आलेल्या लोकांना मी सांगितले तेंव्हा कळले की हा तेलात तळला नाहीये ते. सगळे इतके पटकन संपले की फोटो काढायचा राहून गेला.
तेलकट म्हणून मी सहा महिन्यात एकदा पण काहीही fry करत नाही, आता नक्की करू शकते असे वाटते आहे. मुलांना आपले आपण बनवायला पण छान वाटतो आहे airfryer.
20 Jul 2016 - 8:30 pm | केडी
उत्तम,आणि दमदार सुरवात आहे तुमची! प्रयोग सुरू ठेवा आणि तुमच्या पाकृ पण नक्की शेयर करा.
पापडांचे नक्की काय बिघडले ते सांगाल का? उडदाचे पापड बरे होतात, थोडं दोन्ही बाजूने तेलाचं बोट लावलं कि, पोह्याचे मात्र एवढे नाही चांगले लागत, हा माझा अनुभव.
20 Jul 2016 - 8:47 pm | सप्तरंगी
पापड फ़ुललेच नाहीत व्यवस्थित, मी उडिद, नाचणी, कुरोड्या , साबुदाणा, पोह्याचे पापड सगळे करून पाहिले. त्यातल्यात्यात पोह्याचे बरे झाले. आम्ही नावे ठेवत संपवले तो भाग वेगळा पण काही मजा नाही आली.
अरे हो, मी ३-४ पाणीपुरी (रेडिमेड ) ठेवून पहिल्या त्या मात्र मस्त टकाटक फुगल्या, कुरकुरीत पण झाल्या होत्या, तेल तर ना के बराबर लावलेले !