एयर फ्रायर पाककृती

केडी's picture
केडी in पाककृती
29 Jun 2016 - 3:10 pm

ह्या लेखात एयर फ्रायर पाककृती आणि गेल्या दोन वर्षांच्या माझ्या अनुभवांन बद्दल लिहिणार आहे. पुढील लेखांन मध्ये एयर फ्रायर पाककृती टाकण्याचा मानस आहे.

वाढते वजन, आणि चमचमीत खाण्याची जिभेची ओढ, ह्याचे गणित केव्हाच चुकलेले होते. टीव्ही वर असंख्य वजन कमी करायचे उपाय, साधने हे घेऊन त्या भंगारात देऊन झाले होते. त्यामुळे जेव्हा एयर फ्रायर बद्दल च्या जाहिराती बघितल्या तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो. पण शेवटी, एकदा घ्यावा बघून, म्हणून मग एकदाचा फिलिप्स कंपनी चा एयर फ्रायर घरी आणला, आणि माझ्या प्रयोगांना सुरुवात केली. जे काही धडे मिळाले, तेच इथे मांडायचा एक प्रयत्न.

एयर फ्रयिंग बद्दल बोलण्या पूर्वी, तळण, किंवा डीप फ्रयिंग ह्या विषयी थोडे जाणून घेऊयात. तळलेला पदार्थ म्हंटल की डोळ्या पुढे सहसा चित्र येते ते म्हणजे तेलकट, तुपकट आणि आरोग्यास हानिकारक! पण खरं बघितलं, तर पदार्थ तळून काढणे ह्या मागे एक शास्त्र आहे, आणि ते अवगत झालं तर तळलेला पदार्थ हा नक्कीच तेलकट किंवा unhealthy होणार नाही. प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट तापमानाला जर तळून काढला, तर तो वरून/बाहेरून छान कुरकुरीत होतो, आणि ह्यामुळे पदार्थाच्या आतील आद्रता (moisture) टिकून राहते, जेणेकरून तो पदार्थ जास्ती तेल पित नाही आणि अर्थातच तेलकट होत नाही.

मग हे अचूक तापमान म्हणजे नक्की काय आणि कसं ठरवायचे? पदार्थ तळण्याचे अचूक तापमान, हे पदार्थाच्या आकारानुसार आणि त्याला शिजायला लागणाऱ्या वेळेनुसार ठरवावे लागते. थोडक्यात सांगायचं, तर तेल खूप तापलेले असेल, तर पदार्थ बाहेरून शिजेल पण आतून कच्चा राहील, पण तेच कमी तापलेल्या तेलात पदार्थ तळला, तर तो तेल पिऊन तेलकट होईल. उद्धरण द्यायचे झाले तर आपल्या सर्वांच्या आवडीच्या फ़्रेंच फ़्राईस! ह्या कढत तेलात तळून घायचा असतात. त्यांच्या एकूण लांबट आणि पातळ आकारामुळे त्या पटकन शिजतात, आणि बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊ शिजतात. ह्या उलट चिकन किंवा मटणाचे तुकडे ह्यांना शिजायला जास्ती वेळ लागतो, आणि अर्थात बाहेरून ब्रेड क्रम्ब्सचं आवरण असेल तर ते खूप गरम तेलांत पटकन जळून जाण्याची भीती असते, त्यामुळे तेलाचे तापमान हे अचूक ठेवायला हवे.

तळण्याचे पण काही प्रकार आहेत; शॉलो फ्रयिंग (पॅन फ्रयिंग), स्टर फ्रयिंग, डीप फ्रयिंग किंवा फ्लॅश फ्रयिंग. पदार्थ च्या आकारांमांना प्रमाणे, ह्यातील सर्वात योग्य ती प्रक्रिया आपण निवडतो. अंडी ही पॅन फ्राय करतो, तर पातळ कापलेल्या भाज्या किंवा चिकन हे आशियाई (चायनीज) पदार्थांमध्ये वॉक वापरून स्टर फ्राय केले जातात.

इतर तळण्याच्या पद्धती आपल्याला माहिती आहेत, फ्लॅश फ्रयिंग बद्दल आता थोडी माहिती घेऊयात. खूप तापलेल्या तेलात पदार्थ पटकन तळून काढणे ह्याला फ्लॅश फ्रयिंग म्हणतात. ह्याला चायनीज मध्ये "बाओ" म्हंटले जाते. फ्लॅश फ्रयिंग मुळे पदार्थाच्या आतील आद्रता (आणि अर्थात फ्लेवर किंवा चव ) टिकून राहते. ह्याचे उत्तम उद्धरण म्हणजे वांगी! वांगी जरुरी पेक्षा जास्ती तळली तर ती तेल शोषून घेतात आणि अत्यंत तेलकट आणि मऊ होतात. पण हीच वांगी फ्लॅश फ्राय केली असता ती बाहेरून छान कुरकुरीत पण आतून मऊ आणि व्यवस्थित शिजतात. (कढईत तेल घेऊन, त्यातून थोडा धूर यायला लागला की वांग्याचे काप आत टाकून २ ते ३ मिनिटात काढून घेतले की ते असे मस्त फ्लॅश फ्राय होतील). मोठ्या कमर्शियल किचन मध्ये फ्लॅश फ्रायर वापरले जातात (मॅकडोनाल्ड मध्ये फ़्रेंच फ़्राईस तळायला वापरतात, हे ह्याचे उत्तम उदाहरण). हल्ली घरी वापरायला असे छोटे इलेकट्रीक फ्लॅश फ्रायर सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पदार्थ तेलात टाकला की तेलाचे तापमान खाली घसरू न देता, हे फ्लॅश फ्रायर योग्य त्या तापमानाला पदार्थ तळून घेतात, ज्यामुळे अर्थातच तो कमी तेलकट आणि जास्ती कुरकुरीत होतो.

मग एयर फ्रायिंग म्हणजे नक्की काय?

थोडक्यात सांगायचे तर एयर फ्रायर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा ओवन. ह्या मध्ये एका हॉट कॉईल ने तापमान नियंत्रित करता येते, तर गरम हवा सगळीकडे पसरावी म्हणून एक पंख बसविलेला असतो. एयर फ्रायर च्या विशिष्ट आकार आणि बांधणी मुळे ही गरम हवा पदार्थाच्या सगळीकडून फिरते आणि तो पदार्थ नीट शिजला जातो. पण मग ह्याला एयर फ्रॅयिंग असा का म्हणतात? कारण ह्यात आपण पदार्थ साध्या ओव्हन सारखाच शिजवतोय की! ह्यात तळण, ही प्रक्रिया कुठे होते आहे?

एयर फ्रायर मध्ये शिजवलेला पदार्थ एका विशिष्ट उच्च तापमानाला सगळीकडून नीट शिजल्यामुळे, तो तळलेल्या पदार्थ सारखाच वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतो. (म्हणजे थोडक्यात फ्लॅश फ्रॅयिंग, पण डीप फ्रयिंग न करता).

ह्याला कारणीभूत आहे मैलार्ड प्रक्रिया. १९१२ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ/केमिस्ट लौई मैलार्ड ह्याने ह्याचा शोध लावला. जास्ती खोलात न जाता, ह्या प्रक्रियेमुळे पदार्थातले अमिनो ऍसिड आणि साखर ह्यात एक रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होते, आणि पदार्थाचा रंग आणि स्वाद बदलतो. हे व्हायला मात्र तापमान अचूक आणि जरा जास्ती लागते. ह्याच रासायनिक प्रक्रियेमुळे ब्रेड, बिस्कीट ह्यांना तो छान चॉकलेटी रंग येतो.

तेलाचा अगदी अल्प उपयोग करून, एयर फ्रायर हा डीप फ्रयिंग ला एक अत्यंत चांगला पर्याय आहे.

कुठला एयर फ्रायर घ्यावा?
सध्या बाजारात बऱ्याच कंपनींचे एयर फ्रायर उपलब्ध आहेत. सगळे थोड्या फार फरकाने सारखेच आहेत. कुठल्याही एयर फ्रायर मध्ये असेलेले बेसिक फीचरस म्हणजे तापमान आणि वेळ नियंत्रित करता येणारे कंट्रोल्स. पदार्थ शिजवायला ठेवायची एक जाळीची बास्केट, आणि त्याखाली अतिरिक्त तेल गळून जायला असेलेला ड्रीप ट्रे. बहुतेक सगळ्याच एयर फ्रायर मध्ये अधनु मधून हातानेच बास्केट हलवून पदार्थ तर काही नवीन एयर फ्रायर मध्ये मात्र ते देखील ऑटो मोड मध्ये होऊ शकते.

पहिला एयर फ्रायर फिलिप्स ह्या कंपनीने बाजारात आणला, म्हणून मी त्या कंपनीचं यंत्र निवडलं. माझं अर्थात जुनं मॉडेल असल्यामुळे ऍनालॉग आहे, तर सध्या त्यात डिजिटल मॉडेल उपलब्ध आहे (LCD पॅनेल).

माझ्या एयर फ्रायर मॉडेल चे चित्र.

Philips Air Fryer

एयर फ्रायरची घायावायची काळजी
एयर फ्रायर ची बाहेरील बाजू ही ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. आतील फूड बास्केट आणि ड्रीप पॅन मात्र साबणाच्या पाण्याने स्वच्छ घासून पुसून कोरडा करून मगचं परत ठेवावा. फूड बास्केट च्या जाळीत अन्नकण अडकतात, म्हणून ती एखाद्या जुन्या दाताच्या ब्रश ने घासून साफ करत राहावे. ड्रीप पॅन हा नॉन-स्टिक असल्यामुळे त्यावर धातूंची घासणी अजिबात वापरू नये!

लागणारं अजून काही साहित्य (accessories)
एयर फ्रयिंग म्हणजे अजिबात तेलाचा वापर नाही करायचा का? तर तसं नाही. एयर फ्रयिंग करताना थोडं तेलाचे बोट, किंवा ऑईल स्प्रे वापरावा. ज्यामुळे पदार्थाची चव ही मूळ तळून घेतलेल्या पदार्थ च्या जवळ पास नक्कीच पोचते, आणि अतिशय कमी तेलात काम भागतं.

एयर फ्रयिंग साठी मी अशी ऑईल स्प्रे बाटली विकत घेतली आहे. अमेरिकेत (किंवा हल्ली भारतात आणि इतर देशात सुद्धा) पॅंम किंवा तत्सम स्प्रे बाजारात सहज उपलब्ध आहेत, पण माझ्या अनुभवानुसार त्या तेलांना एक विशिष्ट वास येतो. त्याउलट ह्या बाटलीत आपल्या नेहेमीच्या वापरातील तेल भरून बाटली वरचे टोपण ५ ते १० वेळा पपं केले की उत्तमरित्या स्प्रे करता येतो.

Spray Bottle

एयर फ्रयिंग कसे करायचे?
एयर फ्रयिंग करताना घायवायची काळजी म्हणजे बास्केट वर ऑईल स्प्रे मारून मगच पदार्थ आत ठेवणे. ह्याने पदार्थ चिकटण्याची शक्यता कमी होते. पदार्थ अगदीच चिकट असेल तर जाळीवर फॉईल लावून मग त्यावर ऑईल स्प्रे मारणे. पदार्थ अधून मधून हलवून, किंवा उलट सुलट करून तो सगळ्या बाजूने शिजतोय का नाही हे चेक करणे. डीप फ्रयिंग पेक्षा एयर फ्रयिंग चा हा एक मोठा फायदा आहे. एकदा तापमान आणि टायमर सेट केला की उभा राहून सारखा लक्ष द्यावे लागत नाही.

एयर फ्रायर वापरून मी केलेल्या काही पाककृतींची छायाचित्रे देत आहे.

पुढील लेखातून ह्या आणि इतर अनेक पाककृती बद्दल मी लिहिणार आहेच! भेटूया मग लवकरच, एयर फ्रयिंग च्या दुनियेत!

Masala green Peas  Crispy Chicken Wings

वद  shelled Peanuts

Stuffed Pomfret

मिपा वर पूर्वी ह्यावर एक लेख आलाय त्याचा दुवा इथे देत आहे.

प्रतिक्रिया

उल्का's picture

29 Jun 2016 - 3:23 pm | उल्का

पुलेशु!

केडी's picture

29 Jun 2016 - 3:48 pm | केडी

.....

झकास रे... पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!

केडी's picture

29 Jun 2016 - 3:55 pm | केडी

......मोदकराव. पुढचे भाग टाकतो लवकरच.

नपा's picture

29 Jun 2016 - 3:35 pm | नपा

हो नाही करता करता घेतला एकदाचा...तुमच्या या लेखामुळे अजून माहिती मिळाली
आता प्रयोगांना सुरुवात करेन...अर्थात पहिला प्रयोग यशस्वी झालाय कचोरीचा
पुलेशु

स्वाती दिनेश's picture

29 Jun 2016 - 5:23 pm | स्वाती दिनेश

चांगली माहिती,
अधिक माहितीसाठी हवा के साथ साथ.. वाचा
स्वाती

Maharani's picture

29 Jun 2016 - 5:46 pm | Maharani

Chan lekh...sopya bhashet agadi.

अजया's picture

29 Jun 2016 - 5:55 pm | अजया

वा.मस्त.पुभाप्र

पगला गजोधर's picture

29 Jun 2016 - 5:57 pm | पगला गजोधर

और आंदो ...

किरण कुमार's picture

29 Jun 2016 - 5:59 pm | किरण कुमार

आता येवू द्या एखांदी चमचमीत रेशिपी फोटूसकाट

किरण कुमार's picture

29 Jun 2016 - 5:59 pm | किरण कुमार

आता येवू द्या एखांदी चमचमीत रेशिपी फोटूसकाट

सामान्य वाचक's picture

29 Jun 2016 - 7:49 pm | सामान्य वाचक

वाट पहात आहे

मस्तच. माझ्याकडेपण हाच फिलिप्सचा एयर फ्रायर आहे. मी सुद्धा खुप पदार्थ ह्यात ट्राय केले आहेत. सामोसे, कचोरी, पाणीपुरी, चिकन फ्राय, स्प्रिंग रोल्स, चिकन लॉलिपॉप, साबुदाणा वडा, कुरकुरी भेंडी आणि फ्रेंच फ्राईज.

लेखन आवडले. स्वातीताईच्या लेखाची आठवण झाली.

डश's picture

30 Jun 2016 - 3:46 pm | डश

मस्त लेखन

NiluMP's picture

1 Jul 2016 - 1:45 am | NiluMP

If I have air fryer will there be need of microwave oven, I means one should buy both or only Air Fryer will do microwave oven's job too.

इरसाल's picture

1 Jul 2016 - 1:10 pm | इरसाल

भारी ना भेंडी.
कधीचा विचार करत होतो हा घ्यावा की नाही. आता घ्यावाच लागेल.
धन्यवाद केदार, लै भारी !!!!!!

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 5:46 pm | विशाखा राऊत

मस्त लिखाण

माहिती सांगताना ऊपयोग होईल तुमच्या लेखाचा! स्वत: न वापरल्याने व्यवस्थित सांगता येत नव्हतं.
किती प्रश्न असतात वेगवेगळे.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2016 - 6:13 pm | मुक्त विहारि

तुम्ही रेसीपी नक्कीच द्याल, ह्या अपेक्षेने आधीच रेसिपीचे धन्यवाद, देवून ठेवतो.

पूर्वाविवेक's picture

2 Jul 2016 - 5:57 pm | पूर्वाविवेक

उत्तम माहिती दिली आहे, पाककृतींच्या प्रतीक्षेत.
जाळीवर डिश ठेवून भजी किंव्हा वडे करता येतील का?
तुम्ही 'कोबीच भानवल' आणि 'गुजराती हांडवो' करून पाहिलं आहे काय?
माझी अजून एक शंका आहे. एफ.बी. वर एका ग्रुप मध्ये मी चर्चा वाचली होती कि हे पदार्थ फ्राय केलेले लागत नाहीत तर बेक केलेले लागतात शिवाय क्रंची होत नाहीत तळल्याप्रमाणे. काही म्हणत होत्या कि पदार्थ आतून कच्चे राहतात. हे खरय का?
प्रत्येक पदार्थासाठीचा वेळ कसा ठरवायचा? ओव्हन प्रमाणे त्याचा चार्ट किंवा डेमो मिळतो का?

स्वाती दिनेश's picture

2 Jul 2016 - 8:27 pm | स्वाती दिनेश

बटाटेवडे हे पहा
स्वाती

केडी's picture

4 Jul 2016 - 12:29 pm | केडी

सदृश काही करायचे असल्यास एयर फ्रायर साठी असा एक बेकिंग ट्रे मिळतो. त्यात असे बेक्ड पदार्थ करता येतात

baking tray

भारीच केडी शेठ. मलापण एक एयर फ्रायर विकत घ्यायचा आहेच. तेव्हा पुढील धाग्याबद्द्ल जास्तच उत्सुक आहे.

पैसा's picture

13 Jul 2016 - 7:00 pm | पैसा

छान लिहिताय!

केडी's picture

15 Aug 2016 - 8:21 pm | केडी

आज मऊ पडलेली गोल भजी, एयर फ्रायर मध्ये पुन्हा ठेऊन गरम आणि कुरकुरीत करून घेतली.
२०० ला ५ मिनिटे प्रि-हिट करून मग फक्त 4 ते 5 मिनिटे भजी बास्केट मध्ये ठेऊन गरम केली. भजी छान कुरकुरीत झाली.

भजी

तेजस आठवले's picture

15 Aug 2016 - 10:00 pm | तेजस आठवले

ह्या विषयाशी संबंधित धागे बघून घ्यावासा वाटतो आहे.फिलिप्स चा एअर फ्रायर साधारण 9/10 हजारांपर्यंत उपलब्ध आहे असे दिसते. किंमत उतरण्याची वाट पाहतोय कधीपासून.

जवळजवळ सर्वच धाग्यांतले पदार्थ फिलिप्स चा एअर फ्रायर वापरून केलेले दिसताहेत. केनस्टार (सुमारे ६ हजार रु.) आणि फिलिप्स (१०-१२ हजार रुपये) यांव्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांचे एअर फ्रायर्स उपलब्ध दिसतात जे बरेच स्वस्त आहेत. फिलिप्स सोडून इतर उत्पादनांचा कुणाला काही अनुभव आहे का? केनस्टार फ्रायर आधिक आकारमानाच्या भांड्याचा आणि आधिक लांब वायर असलेला असूनही किंमतीने फिलिप्स मॉडेलच्या जवळपास निम्मा आहे. कुणी वापरलाय का?

पगला गजोधर's picture

16 Aug 2016 - 3:53 pm | पगला गजोधर

उषाचा हॅलोजन ओव्हन वापरतोय (एअर फ्रायर म्हणून देखील), चांगला वाटतोय, टेम्प २५० सेंटी पर्यंत ठेवता येते. टायमर आहे. प्री सेट फंक्शन आहेत. पूर्ण पक्षीसुद्धा बार्बेक्यू करता येतो. सेल्फ क्लिनिंग आहे. आतमध्ये काय होतंय हे सुद्धा दिसते (ग्लास बॉडी).

रॉजरमूर's picture

28 Aug 2016 - 10:35 pm | रॉजरमूर

उषा हॅलोजन ..
अमेझॉन /स्नॅपडील वर याचे कस्टमर रिव्युज बहुतांशी निगेटिव्ह आहेत प्रॉडक्ट फंकशनॅलिटी आणि आफ्टर सेल्स सर्विस च्या बाबतीत .
तुमचा अनुभव कसा आहे या बाबतीत , किती दिवसापासून आणि किती प्रमाणात वापरताय आपण ?
पदार्थ होतात का पाहिजे तसे विशेषतः नॉन-व्हेज .

ट्रेड मार्क's picture

25 Nov 2016 - 11:51 pm | ट्रेड मार्क

एअर फ्रायर मध्ये बटाटे वडे, भजी ई करता येतात का?

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2017 - 3:38 am | पिलीयन रायडर

एयर फ्रायर सर्च केल्यावर बजाजचा हा छोटा ग्रिल दिसतोय. ह्याचाही वापर एयर फ्रायर सारखा होतो का? हा घ्यावा का?

http://www.amazon.in/Bajaj-Majesty-1603-Toaster-Grill/dp/B009P2KRAW/ref=...

केनस्टार, बजाज ह्यांचे रिव्ह्युज कसे आहेत?

सासरी आणि माहेरी, खादाड पण डायबेटीक म्हातार्‍यांना गिफ्ट म्हणुन पाठवावा असा विचार आहे. तर आई-बाबा लोकांना वापरायला सोप्पा हवा.

तुम्ही लिंक दिली आहे ती OTG ची आहे. तिथे "air fryer philips digital " सर्च करून बघा
Air Fryer Philips Digital

राघवेंद्र's picture

24 Apr 2017 - 10:12 pm | राघवेंद्र

एअर फ्रायर चा सगळ्यात मोठी कमी हि त्याची क्षमता.
१-२ समोसा तळायला १५ मिनिटे लागत असतील तर ४ पाहुणे आले तर काही उपयोगायाचे नाही.
त्यामुळे भारतात वापरायला अवघड वाटते.

पिलीयन रायडर's picture

24 Apr 2017 - 11:54 pm | पिलीयन रायडर

हो, हे वाचलं मी सुद्धा. की वेळ फार लागतो ह्यात. विचार चालु आहे.

@केडी - एयर फ्रायर सर्च केल्यावरच ती लिंक मिळाली. तेच विचारते आहे की ह्याचा वापर एयर फ्रायर सारखाही होतो का?

तो माइक्रोवेव्ह अवन च्या ऐवजी वापरतात.