एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.
जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. इथल्या तरुणांच्या बुद्धीची चमक व कष्ट करण्याची धमक, त्यांचे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रावीण्य, वाढत जाणारी क्रयशक्ती आणि या सर्वामुळे घोडदौड करू लागलेली अर्थव्यवस्था इतर देशांनाही उमगू लागली. बघता बघता अफाट लोकसंख्येच्या या देशाकडे सा-या जगाच्या नजरा वळल्या. अशा या देशाचे नाव अर्थातच ‘भारत.’
न्यूयॉर्कस्थित ‘गोल्डमन सॅक्स’ या जगविख्यात बडया बँकिंग कंपनीने मध्यंतरी सादर केलेला एक अहवाल या विषयी विस्तृत माहिती देतो. या अहवालानुसार वेगाने अर्थव्यवस्था वाढणा-या चीनमधील क्रयशक्ती वाढत जाणा-या शहरी मध्यमवर्गापुरती मर्यादित आहे. चीनच्या तुलनेत भारतात मात्र संख्येने कितीतरी अधिक असलेल्या सर्व प्रकारच्या शहरी लोकसंख्येचा विचार करता ही क्रयशक्ती वाढण्यासाठी अमाप संधी उपलब्ध आहेत.
सदर अहवालात म्हटल्याप्रमाणे सुमारे ४४ कोटी मध्यमवर्गीय आणि इ. स. २००० नंतर जन्मलेले सुमारे ३४ कोटी तरुण भारतीय ग्राहकांच्या कहाणीला आकार देतील. चांगल्या शिक्षणाची जोड मिळाल्यास निव्वळ तरुणांच्या या प्रचंड संख्येमुळे भारतीयांच्या क्रयशक्तीमध्ये अव्याहत वाढ होत राहील आणि हीच वाढ भारतीय ग्राहकांच्या कहाणीला पुढील २० वर्षे जगातील सर्वात प्रभावशाली बनवेल. मात्र भारतापुढे आव्हान असेल, ते या सुशिक्षित आणि बुद्धिमान तरुणांसाठी पुरेशा रोजगार संधी निर्माण करणे.
गोल्डमन सॅक्सच्या अभ्यासानुसार २०१५ साली भारतीयांचे सरासरी दरडोई उत्पन्न सुमारे एक लाख रुपये होते. तुलना करायची झाल्यास ते चीनच्या २००५ सालच्या सरासरी दरडोई उत्पन्नाइतके होते. मात्र येत्या दशकात भारतातील सुमारे १३ कोटी सर्वसाधारण शहरी ग्राहक हे चित्र बदलतील असा सदर कंपनीस विश्वास वाटतो आणि याच मुद्दयावर हे चित्र चीनपेक्षा वेगळे दिसणार आहे, कारण चीनमध्ये २००२ ते २०१२ या दशकात हा प्रभाव फक्त मध्यमवर्गीयांनी पाडला होता, तर भारतात या प्रभावाचा केंद्रबिंदू असणार आहे सर्वसाधारण ग्राहक.
अहवालात पुढे म्हटले की, भारतातील शहरी मध्यमवर्गीयांची संख्या अगदी कमी आहे. वार्षिक उत्पन्न सुमारे अकरा हजार डॉलर्स (साधारणत: सव्वा सात लाख रुपये) असलेल्या कमावत्या भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या अंदाजे दोन कोटी ७० लाख, म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या जेमतेम दोन टक्के आहे. हा आकडा भविष्यात नक्कीच वाढू शकतो, पण या वर्गाला नजरेसमोर ठेवून भारतात गुंतवणूक व मार्केटिंग करू इच्छिणा-या कंपन्यांनी आपला मापदंड तयार करताना पुरेशी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
गोल्डमन सॅक्स म्हणाले की, भारतामध्ये एखाद्या ब्रँडमध्ये गुंतवणूक करणे ही फार मोठी गोष्ट आहे; पण त्याचबरोबर जे पैसे आपण मोजत आहोत, त्याची किंमत पुरेपूर वसूल करण्याची येथील ग्राहकांची जी मानसिकता आहे. तीही गुंतवणूकदारांनी विचारात घेतली पाहिजे. गोल्डमन सॅक्सला खात्री आहे की, भारतातील सर्वसामान्य शहरी ग्राहक केवळ ब्रँडच्या नावाकडे न पाहता त्याची उपयुक्तता खरोखरी किती आहे, त्याचाही विचार करतो.
केवळ एखादा ब्रँड बडा आहे म्हणून हा ग्राहक त्यामागे धावणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या मोटर कंपनीचे व तिच्या एखाद्या मॉडेलचे कितीही नाव असले, तरी तो इंधन क्षमतेबद्दल, म्हणजेच एका लिटरमागे किती ‘रनिंग’ आहे, याचा विचार आधी करेल.
अहवालात पुढे म्हटले आहे की, ‘भारतात चांगला नफा कमावून शिवाय वर त्यात सातत्या राखायचे असेल, तर पॅकबंद खाद्यपदार्थ, लहान मुलांशी संबंधित वस्तू, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित प्रसाधने, स्कूटर्स, हलकी वाहने, दागदागिने, अशासारखी उत्पादने महत्त्वाची आहेत. परंतु या सर्वामध्ये अधिक वेगाने काय ‘चालले’, तर ते एखादे उत्तम रेस्टॉरंट. खरंच आहे ते. आपण सर्वजण महागाई, वाढलेल्या किमती, याबद्दल सतत बोलत असतो, पण रेस्टॉरंट ही अशी एकमेव जागा आहे, की ती कायम भरलेलीच दिसते.
याव्यतिरिक्त मोबाईल व ऑनलाईन व्यापार ही दोन क्षेत्रे येत्या काही वर्षात अतिशय वेगाने प्रगती करतील. पैसे चुकते करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, मालाचा पुरवठा करणारी साखळी, अशा प्रकारची काही आव्हाने आहेत, परंतु ती फार काळजी करण्यासारखी नाहीत. मोबाईलचे जाळे अधिक विस्तारल्यास पुढेमागे घरबसल्या मनोरंजन करणा-या टीव्हीची उपयुक्तता नाहीशी होऊ शकते.
तसे झाल्यास मोबाईलवर सहज पाहता येतील अशी मनोरंजनाची अधिकाधिक साधने उपलब्ध होतील, मोबाईवर खेळले जाणारे खेळही कितीतरी पटींनी वाढतील, आणि यातूनच अधिकाधिक फायदा कमवायच्या संधी उपलब्ध होतील.
पुढील २० वर्षात छानछोकीच्या आणि महागडया वस्तूंच्या खरेदीत किंवा वापरात खूप मोठी वाढ अपेक्षित नाही. सर्वसाधारणपणे भारतीय माणसाला आपल्या संपत्तीचे वा दागदागिन्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे आवडत नाही. दागिने हे लग्नसमारंभ व तशा प्रकारचे घरगुती कार्यक्रम यापुरते घातले जातात.
सुमारे २२-२३ वर्षापूर्वी भारतातील जन्मदर सर्वोच्च होता. याचा विचार करता येत्या पाच वर्षात २२-२३ वर्षापूर्वी जन्मलेली मुले लग्नासाठी योग्य होतील. म्हणजेच साखरपुडा, लग्नसमारंभ यासारख्या कौटुंबिक बाबींमध्ये वाढ होईल. याचाच दुसरा अर्थ अशा समारंभासाठी लागणा-या वस्तूंच्या खरेदीमध्ये घसघशीत वाढ होईल.
या सर्व छान छान वाटणा-या पार्श्वभूमीवर गोल्डमन सॅक्सला चिंता आहेत ती सामान्यांना परवडतील अशा घरांबद्दल. भारतासाठी हे एक खूप मोठे आव्हान आहे असे त्यांना वाटते. याचे स्पष्टीकरण देतांना ते म्हणतात की, नवरा-बायको दोघेही कमावत असतील तरच ते घरासाठी कर्ज घ्यायचा विचार करू शकतात.
२०११ ते २०१४ या वर्षामध्ये गृहकर्जाचे व्याज दर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे होते. ३५ ते ४० वयोगटातील शहरी मध्यमवर्गीय माणसाचे सरासरी वार्षिक उत्पन्न नऊ ते सव्वानऊ लाख रुपये आहे, तर चांगल्या घराची सरासरी किंमत सुमारे सत्तर ते ऐशी लाख रुपये आहे. हे म्हणजे त्या माणसाचा ८-९ वर्षाचा पगार झाला.
याचा दुसरा अर्थ असा की ज्या घरात दोनजण कमावतात अशांची केवळ २० टक्के इतकी कमी संख्या लक्षात घेता, ‘परवडणारी घरे’ ही सर्वसामान्यांसाठी सध्यातरी स्वप्नच राहणार आहे.
गोल्डमन सॅक्सचा हा अहवाल वाचतांना आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल. परंतु एक महत्त्वाची गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे एक ग्राहक म्हणून आपला योग्य सन्मान राखला जाणे, आपण आपल्या हक्कांविषयी तसेच कर्तव्याविषयी पुरेसे जागरूक असणे.
कारण जसजशी ग्राहक संख्या वाढत जाईल तसतसे फसवणुकीचे प्रकारही वाढू शकतील. त्यामुळे मुळातच खरेदी करताना काळजी घेतली की आणि तरीही फसवणूक झाल्यास तक्रार केव्हा, कोठे, कशी करावी याची यथायोग्य माहिती असली की फारशी चिंता नाही.
अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत
दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 11:57 am | इरसाल
एकंदरीत भविष्य उज्ज्वल आहे म्हणायचे .
11 Jul 2016 - 5:35 pm | आदूबाळ
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार?
मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.
13 Jul 2016 - 3:09 pm | खेडूत
ऊपरोल्लेखित गोल्डमनचा अहवाल कुठे मिळेल? दुवा द्याल का? की विकत घ्यावा लागतो?
15 Jul 2016 - 7:47 pm | पुणे मुंग्रापं
खालील लिंक वर काही माहिती मिळू शकेल
http://moneylife.in/article/india-and-rsquo-s-consumer-story-would-be-on...
16 Jul 2016 - 10:54 am | आदूबाळ
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार?
मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.
16 Jul 2016 - 12:00 pm | मोदक
+१११
16 Jul 2016 - 1:19 pm | आदूबाळ
सदर लेख पूर्ण अहवाल वाचून लिहिला आहे की वर उल्लेख केलेलं आर्टिकल वाचून - हेही स्पष्ट केलंत तर बरं होईल.
15 Jul 2016 - 8:30 pm | मंदार कात्रे
०४ जुलै रोजी दुपारी २. ०० च्या सुमारास लाईन व्होल्टेज वाढून २३० चे ३०० च्या वर गेले. त्यामुळे मोडेम राउटर चा चार्जर आणि लॅपटॉप चा चार्जर उडाला .
माझ्याखेरीज अनेक लोकांचे टीव्ही व अन्य उपकरणे जळली आहेत . महावितरण च्या या चुकीबद्दल कन्झ्युमर कोर्टात दाद मागता येईल का?
16 Jul 2016 - 10:20 am | पुणे मुंग्रापं
आपण कोणत्या परिसरात राहता त्या परिसरातील सर्कल ऑफिसकडे अशी तक्रार करता येते. वैयक्तिक तक्रारीपेक्षा समुह तक्रार करावी कारण वैयक्तिक तक्रारीत असा प्रकार महावितरणमुळेच झाला आहे असे समोर आणणे शक्य होत नाही. समुहाचे नुकसान झालेले असल्यास त्या परिसरातील नागरिकांचे झालेले आहे म्हणजे ते अशा दोषामुळे झाले आहे हे मांडता येते. पुणे परिसरातील असल्यास रास्ता पेठ कार्यालयात अशी महावितरणची तक्रार निवारण सुविधा आहे.
16 Jul 2016 - 10:54 am | आदूबाळ
आधीच्या प्रश्नांची उत्तरं केव्हा देणार?
मिपावरच्या प्रश्नकरत्या ग्राहकांना समाधानी करून मग पुढचे लेख टाकावेत ही नम्र सूचना.