उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात. विक्रेत्याने छापील किंमतीपेक्षा दोनचार रुपये जास्त आकारलेले असतात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि कोणी लक्षात आणून दिले तरी "दोनचार रुपयांसाठी कुठे वाद घाला?" असे म्हणून तो विषय तिथेच संपतो. मात्र प्रत्येकाकडून दोनचार रुपये या हिशोबाने त्या विक्रेत्याने दिवसभरात आलेल्या ग्राहकांना शेकडो रुपयांना लुटलेले असते!
सकाळी दूधकेंद्रावर दुधाच्या पिशवीमागे एकदोन रुपये जास्त आकारण्यापासून (विशेषतः मुंबईत) ग्राहकांच्या या लुटीला सुरवात होते. एखाद्या जागरूक ग्राहकाने या जादा आकारणीबद्दल प्रश्न विचारलाच तर दूध, शीतपेय, पाणी इ. थंड ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चापोटी ही आकारणी करावी लागते असे समर्थन केले जाते. वास्तविक वितरकांना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये हे सर्व खर्च अंतर्भूत असतात. (कमिशन कमी असेल तर ते उत्पादकाकडून वाढवून घेणे हा स्वतंत्र विषय आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने त्यातही लक्ष घातले आहे) त्यामुळे या सबबीवर छापील किंमतीपेक्षा जास्त आकारणी करणे हे केवळ असमर्थनीयच नाही तर तर ते वजने व मापे (आवेष्टित वस्तूंचे नियम) १९७४ नुसार बेकायदाही आहे. काही जागरूक ग्राहकांनी अशा तक्रारी ग्राहक न्यायालयांपर्यंत नेल्या असता न्यायालयांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई तर मान्य केलीच, शिवाय अशा बेकायदा व्यवहाराबद्दल विक्रेत्यांना दंडही ठोठावला आहे.
अशा प्रकारे आवेष्टित वस्तूंवर कमाल किरकोळ किंमत (क.कि.किं.) छापणे बंधनकारक करून त्यापेक्षा जास्त किंमतीस विकणे बेकायदेशीर ठरवणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे असे वाचण्यात आले. थोडे मागे जायचे तर डिसेंबर १९९० मध्ये हा नियम अंमलात येण्यापूर्वी उत्पादकांना किरकोळ विक्रीची किंमत व स्थानिक कर अतिरिक्त अशा पद्धतीने किंमत आकारणीचा पर्यायही उपलब्ध होता. परंतु सर्वसामान्य ग्राहकांना स्थानिक करांची माहिती नसते. शिवाय त्याचा हिशोब करणेही कठीण! त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्व करांसहित क. कि. किं. छापण्याची सक्ती झाली . पण म्हणतात ना, "वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो" अशी ग्राहकांची गत झाली आहे. कारण एकतर उत्पादकाने किती क. कि. किं . छापावी यावर कोणतेही बंधन नाही. शासनाला त्यावर कर वसूल झाल्याशी मतलब! त्यामुळे काही वस्तूंच्या बाबतीत थोडी घासाघीस केली तर छापील किंमतीपेक्षा कितीतरी कमी किंमतीस वस्तू मिळते असा अनुभव आहे. त्यामुळे किंमतीची चिकित्सा न करणाऱ्या ग्राहकांचे नुकसान होते. घासाघीस करणाऱ्याचा वेळ जातो, शिवाय आपल्याला योग्य किंमत लावली गेली आहे का याबद्दल साशंकता राहते ती निराळीच! यावर उपाय म्हणून वेष्टणावर वस्तूचे उत्पादन मूल्य छापणे बंधनकारक करावे अशी काही ग्राहक संघटनांनी शासनाकडे केलेली मागणी अजूनतरी मान्य झालेली नाही.
क. कि. किं. शी संबंधित आणखी एक समस्या अशी की मल्टीप्लेक्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ इ. ठिकाणी बहुदा छापील किंमतीपेक्षा जास्त आकार घेतला जातो. या बाबतीत तक्रार करणाऱ्या ग्राहकांच्या बाजूने ग्राहक न्यायालयांनी निर्णयही दिले आहेत. त्यामुळे चलाख उत्पादक आणि विक्रेते यांनी यातून पळवाट काढण्यासाठी specially packed for असे म्हणून वेष्टणावर भरमसाट किंमत छापण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे बाहेर रु. १५/- छापील किंमत असलेली तीच पाण्याची बाटली मल्टीप्लेक्समध्ये ३०/- चे लेबल लावून विकली जाते! त्यामुळे एका प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने असा निर्णय दिला आहे की मल्टीप्लेक्सने ग्राहकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केलेली नसेल तर बाहेरून पाण्याची बाटली आणण्यास प्रेक्षकांना मनाई करून त्यांना आतील महागडे पाणी विकत घ्यायला भाग पाडणे ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अनुचित व्यापारी प्रथा असून ती दंडनीय आहे.
मात्र हॉटेलमध्ये खाण्याबरोबर पाणी मागवल्यास बाटलीमागे दहाएक रुपये तरी जास्त लावले जातात आणि त्याचे बिलही दिले जाते. हे कायद्याला धरून आहे. Federation of Hotels and Restaurants Association of India ने दिल्ली उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निर्णय असा होता की हॉटेलमध्ये ग्राहकांना पुरवलेली पाण्याची बाटली ही विक्री नसून ती सेवा असते. कारण ग्राहक हॉटेलमधील अन्य सुविधांचा लाभही घेत असतो. त्यामुळे हॉटेलमधील पाणी, शीतपेय इ. पुरवणे या व्यवहारास आवेष्टित वस्तूंचे नियम लागू होत नाहीत. थोडक्यात ,त्यासाठी छापील किंमतीपेक्षा जास्त आकार लावता येईल. या विषयावरील case law बराच व वैविध्यपूर्ण आहे. या लेखाच्या मर्यादेत त्याचा आढावा घेणे अशक्य आहे. तूर्तास आपण आवेष्टित वस्तू, विशेषतः पाणी, शीतपेय, एनर्जी पेये इ. विकत घेण्यापूर्वी त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देण्यास नकार देण्याचा निश्चय करूया. कारण प्रश्न आपल्या दोनचार रुपयांचा नसून आपण एका बेकायदा व्यवहाराला आणि अनुचित प्रथेला हातभार लावण्याचा असतो. इथे म्हातारी मेल्याचे दुखः तर आहेच पण काळ सोकावण्याचा धोका अधिक आहे, खरे ना?
ललिता कुलकर्णी
मुंबई ग्राहक पंचायत , पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
30 May 2016 - 1:16 pm | अत्रन्गि पाउस
मेलेलीय ...आणि काळ तर आधीपासूनच सोकावलाय
गप्प बसून राहणे किंवा वेळ असल्यास डोके लावणे एवढेच पर्याय...
30 May 2016 - 3:23 pm | माम्लेदारचा पन्खा
शिवाय इन्स्पेक्टर राज असल्यामुळे वजन माप विभागाचे लोक फक्त पैसे खाण्यातच धन्यता मानतात …कुंपणानेच शेत खाल्लं तर करायचं काय ?
मुख्य समस्या अशी आहे कि कायदेशीर प्रक्रिया किचकट असल्यामुळे त्याच्या वाटेला जायलाच नको वाटतं लोकांना !
30 May 2016 - 3:36 pm | अभ्या..
पाण्याच्या बाटल्याचे हिशोब खतरनाक असतात, 10 बाटल्याचा बॉक्स 75 ते 85 पर्यंत विक्रेत्यांना मिळतो. बाकी सारे रेफ्रिजरेशन चार्जेस प्लस मार्जिन. आमच्या इथला एक स्नॅक्स सेंटर वाला बोर्ड लावून पाणी 10 ला चिल्ड बॉटल विकतो. त्याला परवडते म्हणजे पहा.
30 May 2016 - 4:38 pm | मराठी कथालेखक
याबाबत चटकन तक्रार करता येईल अशी काहीतरी सोय हवी किंवा शक्यतो पोलिसांनीच अशा तक्रारीची त्वरित दखल घ्यावी असा कायदा व्हायला हवा. दोन-चार रुपयासाठी न्यायालयात जाणे, गुन्हा सिद्ध करणे म्हणजे ग्राहक तसेच न्यायालयीन यंत्रणा या संगळ्यानाच त्रासदायक.
काही वेळा थंड करण्याचे कारण नसूनही विक्रेते MRP पेक्षा जास्त किंमत आकारु पहातात
शहरातले, मुख्य वस्तीतले दुकानदार अशी चिंधीचोरी सहसा करत नाहित. मला दूध, सोडा, शीतपेये इ साठी छापील किमतीप्रमाणेच पैसे द्यावे लागतात. पण पर्यटन स्थळी हे विशेषकरुन पहायला मिळते.
31 May 2016 - 7:28 pm | नमकिन
हल्ली उच्च उपहारगृहात सेवा कराच्या आधी सेवा शुल्क लावण्याचा चोरी छुपे पैसे उकलण्याचा जो प्रकार चालला आहे तो पण जास्तीचे (५,१०,१५,२०%) आहे.
मागील रविवारी ठाणे कोरम मॅाल येथे घास फूस नामक उपहार गृहात हा अनुभव सोसला.
उपहार गृहाच्या प्रवेशद्वारावर पदार्थ-दर सूची व Axis bank कार्ड वापरणा-यास १५% सूट असा दर्शनी नमूद फलक होता.
जेवण झाले असता बिलात सेवा शुल्क १०% बिलाच्या एकूण रकमेंवर लावले वर सेवा कर ५% आहेच.
व्यवस्थापक साळसूद पणे "येस सर" एनी प्रॅाब्लेम असे विचारु लागला. आम्ही पृच्छा केली की सेवा शुल्क कसले, देणार नाहीं. तेव्हा व्यवस्थापकाने ही तर आमची सर्वमान्य रीति रिवाज आहे या आविर्भावात सांगितले की आम्ही नमूद केलेय मेन्यूकार्डवर. तपासून पाहिले असता "Taxes & Service charge extra" असे बारीक अक्षरी उभे पानावर खालील कोप-यात सापडले. (शुल्क व कराचा दर नमूद नव्हता हे विशेष, पण तेव्हा लक्षात आले नाहीं) तर त्याने अजून १ लॅमिनेटेड रंगीत A3 आकाराचा कागद आणून त्यात सोदाहरण आम्ही कसे लुबाडतो ते दाखवले होते. त्याही पुढे जाऊन वरील डाव्या कोप-यात "issued in public interest" व तळाला "Service &Excise Dept " चा लोगो सजवलेला होता. जेणेकरुन पहाणा-याचा आवाज बंद होईल. पण मी बधलो नाहीं व ठामपणे सांगितले की हे लूटमार आहे व त्याने मान्य केले की हा आक्षेप बरेच ग्राहक घेतात परंतु कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय व संगणकात हाच विहीत नमूना असल्याने आम्ही बदलू शकत नाहीं. तरी दर्शनी भागात अथवा दर- सूचीत ठळक पणे वा नंतर दाखवलेला बोगस रंगीत कागद प्रवेशद्वाराशी लावायला पाहिजे (जशी सूट जाहिर लावली होती) अशी सूचना केली, अभिप्राय लिहून दिला (छापील सुट्टा कागद) कार्डावरील सवलत वजा करुन १६५ रु सेवा शुल्क सहित पैसे अदा केले व पुन्हा कधीही फसवून घेण्यास परत येणार नाहीं असे जाहीर करुन व इतरही बरेच काही बोलून निघालो. साधारण २० इतर ग्राहकहोते पणकुणी फारसे लक्ष दिले नाहीं ( रोख रकमी भरायचे असते तर कदाचित नेमके भरता आले असते.
हल्ली लेखाचा विषय व अनुभव पाहता आपण शिक्षित बावळट/मूर्ख आहोत व हे व्यापारी आपल्याला लुबाडतायत तेही राजरोस, उजळ माथ्याने व (सर्वमान्य) मिळून पद्धतशीर मार्गाने.
पुढे कधी असा प्रसंग आल्यास इतरांनी खाणे मागवून १५ मिनिटाने जाहीर करावे (कुटुंब/सोबती यांना विश्वाात घेऊन) की सेवाशुल्क किती आहे व ते भरण्यास नम्रपणे नकार द्यावा. काय करतात तेच बघूया.
1 Jun 2016 - 10:43 am | अत्रन्गि पाउस
जाऊ यात व एकदा हे करूयात .... ६-७ जण मिळून जाऊयात ... काय म्हणता ?
1 Jun 2016 - 11:08 am | सस्नेह
अन्न वेष्टनावर पॅकिंग तारीख दिली नसेल तर काय करावे ?
विशेषत: तयार इडली पीठ, इंस्टंट भाज्या इ.
2 Jun 2016 - 9:08 am | नमकिन
मी वेष बदलून येईन :))