ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणार्या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे
नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू. दोघींच्या राहणीत अंतर असले तरी दोन महिला शेजारी बसल्यावर त्यांचे बोलणे सुरू होणार हे अपेक्षित होते, पण त्या दिवशी मावशीबाईंच्या मनात कांहीतरी डुचमळत होते आणि ते कुणाला तरी भडाभडा सांगून
टाकल्याखेरीज त्यांना चैन पडली नसती. त्यामुळे त्यांनीच सुरुवात केली.
"ही बस लवकर मिळाली ते बरं झालं हो बाई. मला आता आधी सिध्दीविनायकाचं दरसन घ्येऊन विक्रोळीच्या मुलीलाबी भेटून यायाचे हाये."
"कां, आज कांही खास दिवस आहे कां? "
"म्हंजी, तुमाला कायबी ठावं न्हाई? अवं उद्याला समदं जग जळून खाक व्हनार हाय म्हनत्यात! फकस्त आजचा दीस हाय आपल्याकड़े."
"असं कसं होईल? असं कुणी सांगितलं तुम्हाला ?"
"अवं, आजच्या प्येपरात छापून आलंय म्हनं, तुमी त्ये वाचलं न्हाई का?"
ताईंना स्वतःचीच थोडी शरम वाटली. त्या कधीकाळीच्या चांगल्या 'डबल एम्मे' असल्या तरी आता शंभर टक्के 'कर्तव्यदक्ष गृहिणी' झाल्या होत्या. त्यांना रोजच्या त्याच त्या राजकारणातल्या बातम्या वाचण्यात रस नव्हता. खून, बॉंबस्फोट अशी सनसनाटी किंवा सिनेनटीच्या लफड्या कुलंगड्यासारखी चविष्ट बातमी पहिल्या पानावर नसेल तर ते पान लगेच उलटून ताई नाटक सिनेमा किंवा साड्यांचा सेल वगैरेंच्या बातम्यांच्या पानाकडे वळत असत. सायन्स या विषयाशी त्यांचे कधीच सख्य नव्हते. त्यामुळे त्या विषयावर ठळक मथळा दिला होता त्याकडे तुच्छतेने पाहून त्यांनी ते पान उलटले होते. त्या म्हणाल्या,"अहो, आज मला बाहेर जायचं होतं ना, त्यामुळे पेपर वाचायला वेळच मिळाला नाही बघा. त्यात असं काय छापून आलंय्?"
"ते लोक लंढनला कसला इस्फोट करणार हायेत म्हनं, त्यात यवढी मोठी आग तयार व्हईल की ती समदं जग जाळून टाकनार हाये."
"पण असं केलं तर ते लोक पण मरतील ना? ते कशाला असं करतील?
"कायकीबाई! पन त्यांनी कायबी चूक केली तर ते सोताबी मरतील आनि आपनबी खलास होऊन जानार. जगातलं अक्षी सगळं कांही जळून खाक होनार हाय म्हनत्यात."
"हो का, मला मेलीला हे माहीतच नव्हतं. आता सिद्धीविनायकाला जाताच आहात तर त्यालाच कायतरी गार्हाणं घाला."
"त्यासाठीच तर म्या तकडं चाललेय्, पन लेक आनि नातवंडांनाबी येक डाव पाहून येईन, पुन्हा नदरंला पडतील की न्हाय कुणास ठावं."
"बरोबर आहे" असे म्हणत ताईंनी पर्समधून मोबाईल काढला आणि चौकशी करण्यासाठी नवर्याचा नंबर लावला.
..................................
Large Hadron Collider (LHC) या महाप्रयोगाबद्दल एका उच्चशिक्षित आणि आदरणीय अशा सद्गृहस्थाची प्रतिक्रिया:
विश्वातल्या सर्वात सूक्ष्म अशा कणाचा शोध घेण्यासाठी या लोकांनी आजवर तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रसामुग्रीपेक्षा मोठी अशी विशालकाय उपकरणे निर्माण केली आहेत. वैदिक काळातल्या आपल्या ऋषीमुनींना हे सारे ज्ञान फक्त ध्यानधारणेतून प्राप्त झाले होते.(!!!)
यावर आता मी काय म्हणणार?
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यांना रोजच्या त्याच त्या राजकारणातल्या बातम्या वाचण्यात रस नव्हता. खून, बॉंबस्फोट अशी सनसनाटी किंवा सिनेनटीच्या लफड्या कुलंगड्यासारखी चविष्ट बातमी पहिल्या पानावर नसेल तर ते पान लगेच उलटून ताई नाटक सिनेमा किंवा साड्यांचा सेल वगैरेंच्या बातम्यांच्या पानाकडे वळत असत.
काय मस्त हाणलाय?
विश्वातल्या सर्वात सूक्ष्म अशा कणाचा शोध घेण्यासाठी या लोकांनी आजवर तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रसामुग्रीपेक्षा मोठी अशी विशालकाय उपकरणे निर्माण केली आहेत. वैदिक काळातल्या आपल्या ऋषीमुनींना हे सारे ज्ञान फक्त ध्यानधारणेतून प्राप्त झाले होते.
अहो, काही भौतिकशास्त्रज्ञांनाही या गोष्टी आधीच कळल्यात, ध्यानधारणा नाहीतर, कविकल्पना किंवा, सैद्धांतिक अभ्यास करून! आता प्रश्न उरतो काही शंकासुरांचा! त्यांना कोणावर विश्वासच नसतो जोपर्यंत गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाह्यलाशिवाय! मग काय, लागतात जग नष्ट करायच्या मागे! ;-)
(अशाच शंकासुरांपैकी एक) अदिती
अवांतरः LHC मुळे जरी जग नष्ट झालं तरी आग लागणार नाही.
18 Sep 2008 - 11:27 am | आनंद घारे
हे मला माहीत आहे, पण मावशीबाईंना ब्लॅकहोल वगैरे कसे कळणार? त्यांची ऊष्णतेची व्याख्या आगीपर्यंतच मर्यादित असणार. त्यांना फ्रान्स आणि स्विट्झर्लंडसद्धा 'लंढन'मध्ये आहेत असेही वाटले.
18 Sep 2008 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> हे मला माहीत आहे, पण मावशीबाईंना ब्लॅकहोल वगैरे कसे कळणार?
मिडीया! मावशीबाईंच्या घरी टी.व्ही. असायला आणि त्यांच्या घरी कोणीतरीतरी न्यूज चॅनल बघायला अजिबातच हरकत नसावी. कितीतरी वेळा कंठशोष करून तेच लोक म्हणत होते ना जग नष्ट होणार? मावशींनी त्यांच्या परीने त्या बातमीचा "अनुवाद" केला एवढंच!
>> त्यांची ऊष्णतेची व्याख्या आगीपर्यंतच मर्यादित असणार. त्यांना फ्रान्स आणि स्विट्झर्लंडसद्धा 'लंढन'मध्ये आहेत असेही वाटले.
मावशीतर सोडाच, अजून माझ्या काही नातेवाईकांना मी "लंडन"ला होते असंच वाटायचं आणि कंटाळून मी त्यांना "नाही, मी मँचेस्टरला होते," हेही सांगणं बंद केलंय! अजूनही अनेक लोकांना लंडनच्यापुढे युरोप आहे याची कल्पना नाही, मावशीबाईंनी किमान खंडतर नाही चुकवला. मला तर त्या मावशींचं खूप कौतुक वाटतंय.