********************
*
जाम कोणी देइ अव्हेरू नये
चुंबनाला "ना" कधी सांगू नये
*
खाक जाळे दु:ख मोठे थेंबही
एकही थेंबा कधी सांडू नये
*
भेटता तू स्वर्ग भेटे या इथे
या क्षणाला दृष्ट मी लावू नये
*
काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे
काळजाशी खेळ हे खेळू नये
*
घोट घेता घात करिते वारुणी
तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
*
वेगळी काही नशा होते जया
जाहिदाचे नाव त्या देऊ नये
*
********************
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 8:37 am | विसोबा खेचर
गझल चांगली वाटली....!
मुख्य म्हणजे बरीचशी समजली! :)
तात्या.
18 Sep 2008 - 8:47 am | धनंजय
लुत़्फ़-ए-मए तुझसे क्या कहूँ ज़ाहिद
हाय कंबख़्त तूने पीही नहीँ ।
विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू?
हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस.
18 Sep 2008 - 8:54 am | विसोबा खेचर
विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू?
हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस.
धन्याशेठ, वरील अनुवाद अगदी उत्तम आहे यात वाद नाही परंतु मूळ भाषेचा डौल आणि नजाकत वरील ओळीत नाही.
'हाय कंबख़्त' च्या ऐवजी 'हत् ! करंट्या' हे कैच्या कैच वाटतं हो! :)
'जाहीद'चं 'विरक्त माणसा' हे ठार मराठी भाषांतर वाचून मला गोळे नावाच्या एका इसमाची आठवण झाली! :)
छ्या! आपली मराठी भाषा रांगडी आहे हेच खरं! :)
आपला,
(ठार मराठी) तात्या.
18 Sep 2008 - 8:57 am | धनंजय
म्हणूनच वरच्या शेरात "जाहिद" घातला. नजाकत उसनी घेतली एक डाव. :-)
18 Sep 2008 - 5:51 pm | नरेंद्र गोळे
धनंजय, "हत् करंट्या" अगदी दाद देण्यासारखेच आहे!
तात्यांच्याच प्रतिसादानेच प्रमाणित होते आहे ते.
18 Sep 2008 - 5:48 pm | नरेंद्र गोळे
तात्या, असल्या सुखद स्मृतीत मला जमा केलेत म्हणून बरे.
त्यामुळे मग, माझ्या मराठीला "ठार मराठी" म्हटल्याचा प्रमादही नजरेआड करता येईल.
18 Sep 2008 - 9:00 am | सुनील
जाम कोणी देइ आव्हेरू नये
चुंबनाला "ना" कधी सांगू नये
क्या बात है!
काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे
काळजाशी खेळ हे खेळू नये
खरयं!
वेगळी काही नशा होते जया
जाहिदाचे नाव त्या देऊ नये
हे खास आवडले..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Sep 2008 - 10:22 am | नंदन
गझल, आवडली.
अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Sep 2008 - 10:29 am | सुनील
अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे.
मान्य. नपेक्षा -
जाम कोणी देता अव्हेरू नये
असेही "चालू"न जायला हरकत नसावी!
(सुधारक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Sep 2008 - 4:48 pm | धनंजय
अव्हेरू, आव्हेरू, दोन्हींच्या मात्रा एकमेकांइतक्याच.
दोष सुधार केला आहे - धन्यवाद :-)
18 Sep 2008 - 11:21 am | विसुनाना
प्रयत्न चांगला आहे.
विशेषतः -
खाक जाळे दु:ख मोठे थेंबही
एकही थेंबा कधी सांडू नये
मधली कल्पना.
अजून येऊ द्या.
दु:ख होता आटतो सागर भरारा
थेंब छोटा एकही सांडू नये
असे म्हणता आले असते काय?
18 Sep 2008 - 11:36 am | रामदास
ही ओळ फार आवडली.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
18 Sep 2008 - 11:45 am | बेसनलाडू
अतिशय छान प्रयत्न; आणि मुख्य म्हणजे मागच्या लेखनाच्या तुलनेत बरीच जलद सुधारणा वाटली.
तूर्तास इतकेच; सविस्तर प्रतिसाद सवडीने
(संक्षिप्त)बेसनलाडू
18 Sep 2008 - 12:03 pm | मदनबाण
जाम कोणी देइ आव्हेरू नये
चुंबनाला "ना" कधी सांगू नये
हे लयं आवडलं बघा..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
18 Sep 2008 - 11:28 pm | ऋषिकेश
गझल आवडली. :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 Sep 2008 - 11:43 pm | प्राजु
घोट घेता घात करिते वारुणी
तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
हे मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Sep 2008 - 3:45 am | टग्या (not verified)
या क्रिप्टिक क्लूचे उत्तर "माशी" असे असावे असे वाटले. बरोबर आहे काय?
- (क्रिप्टिक क्लू-भक्त) टग्या.
माझे लॉजिक असे:
वारुणीच्या चषकात माशी येऊन पडलेली आहे. आता वारुणी जिथे घोट घेतल्यावरसुद्धा घात करते, तिथे तिच्यात गटांगळ्या खाल्ल्यावर त्या बिचार्या माशीचे काय होणार? अर्थात ती मरणार! आता यापुढे विचार करा: दिवसभराच्या पिळवणुकीत मरेपर्यंत (म्हणून "मेलेल्या") कष्ट करून संध्याकाळी घरी आलेला एखादा कामगार किंवा (उर्दू गज़लांमधल्या संकेताप्रमाणे) प्रेमभंग झाल्यामुळे मेल्याहूनही मेल्यागत झालेला एखादा भूतपूर्व प्रेमी येतो आणि आपल्या दु:खांना त्या वारुणीत गटांगळ्या खायला लावण्यासाठी तोंडाला लावायला म्हणून तो चषक उचलतो, आणि पाहतो तर काय? त्यात एक माशी अगोदरच गटांगळ्या खात (मरून) पडलेली आहे. आता तो चषक ती माशी आणि आपल्या हीरोची दु:खे या दोघांनाही सुखाने गटांगळ्या खाऊ देण्यासाठी पुरेसा मोठा नाही. तेव्हा अर्थातच आपल्या हीरोला तो चषक खाली ठेवावा लागतो. तेव्हा ओठी आलेले पोटी जाऊ न शकल्यामुळे (पुन्हा संकेत!) विरस झालेला आपला हीरो काय म्हणणार? की या (माशी मरून पडलेल्या) वारुणीने माझा घात केला! या वारुणीत मरून पडलेल्या ("तीत मेलेल्या") माशीने माझ्या तोंडची वारुणी अशी हिसकावून घेऊन (कामगारी भाषा - तोंडचा घास हिरावून घेणे वगैरे [नशीब पोराबाळांच्या वगैरे म्हटले नाही!] - म्हणूनच अगोदरचे कामगाराचे उदाहरण समर्पक होते. पण संकेत आड येतो!) अगोदरच मेलेल्या मला असे पुन्हा मारायला नको होते ("मेलेल्या पुन्हा मारू नये")!
तात्पर्ये:
१. दारूशी संपर्क माशीस घातक असतो.
२. दारू पिणे प्रकृतीस वाईट. तीत माशी मरून पडलेली असू शकते. माशी आपल्या पायांबरोबर रोगजंतू नेते असे म्हणतात.
या द्विपदीची एक सौंदर्याची जागा म्हणजे यात (थोडेसे हायकूप्रमाणे?) एकाच अभिव्यक्तीसाठी प्रत्येक आस्वादकास वेगळी सौंदर्यपूर्ण अर्थनिष्पत्ती होऊ शकते. त्यामुळे कवीस द्विपदी स्फुरली त्या क्षणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता हे समजणे कठीण जाते. किंबहुना कवीस अभिप्रेत असणारा अर्थ काही काळानंतर विचारल्यास त्या क्षणी खुद्द कवीस त्यातून वेगळी अर्थनिष्पत्ती झाल्यास आश्चर्य वाटू नये, तिथे इतरेजनांचे काय? (चषकभर वारुणी अथवा साधारणतः तितक्याच प्रमाणात तत्सम अमली द्रव्याचे सेवन केल्यास वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात ही उक्ती सर्वश्रुतच आहे. चषकभर वारुणीवरील द्विपदींना ही उक्ती लागू झाल्यास नवल ते काय? द्विपदी तीच, कल्पना वाटेल तेवढ्या, हाच काय तो फरक.)
या द्विपदीत याची प्रचीती वारंवार येते. 'घोट घेता घात करिते वारुणी' या पंक्तीत वारुणी घात नेमका कोणाचा करते, माशीचा, चषक उचलणार्याचा, कवीचा की आस्वादकाचा (म्हणजे गज़लेच्या आस्वादकाचा; वारुणीच्या आस्वादकाचा नव्हे!), याचे उत्तर हे ज्याच्यात्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे वेगळे मिळू शकते. तसेच 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' ही पंक्ती पहा. या पंक्तीची फोड 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' अशी करावी की 'तीत मेलेल्या, पुन्हा मारू नये' अशी करावी, यावरून दोन वेगवेगळे अर्थ निष्पन्न होतात. (शिवाय दुसरा अर्थ घेतल्यास मेलेली माशी ही पुल्लिंगी असावी, अशी अतिरिक्त माहिती मिळते. [पहा: 'मेलेल्या'. हे संबोधनाचे पुल्लिंगी रूप.] यावरून कवीच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!)
वरील दोन पंक्तींपैकी प्रत्येकीच्या भिन्न अर्थांच्या भिन्न योजना (अर्थात पर्म्यूटेशने-काँबिनेशने) लक्षात घेता त्यांतून नुसते भिन्न अर्थच नव्हेत, तर अर्थावली निर्माण होऊ शकते, हीच या द्विपदीमागची ताकद आहे.
20 Sep 2008 - 4:01 am | धनंजय
हा अर्थ निघू शकतो खरे.
कवीच्या हातातून गेली की कविता अर्थ लावण्यासाठी वाचकाची होते. काव्यवाचन ही वाचकाची प्रतिभा आहे.
पद्य हे मिताक्षरी असल्यामुळे संदिग्ध असते. (असंदिग्धतेसाठी कायद्याची "जेणेकरून-तमुक-नियमान्वये..." भाषा वापरावी लागते. मिताक्षरी गद्यही संदिग्ध असते.) त्यामुळे त्याचे अनेक अर्थ निघणे स्वाभाविक आहे. किती अर्थ काढता येतात, ते वाचकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. यातून कित्येकदा वाचनाचा सौंदर्यानुभव मिळतो.
(जोवर सौंदर्यानुभव मिळतो आहे तोवरच वाचक वेगवेगळे अर्थ घोळवत राहातो, असे मला वाटते. त्यामुळे कंटाळा आल्यानंतर विरस होईल असा अर्थ काढायचा प्रयत्न सहसा होणारच नाही, असा माझा अर्थशास्त्रीय विचार आहे. ज्या अर्थी कष्ट घेऊन अर्थ काढला, त्या अर्थी ती प्रक्रिया रोचक असली पाहिजे, आणि खूप वेळ रोचक विचार उद्युक्त करण्यात कवितेला यश आले, असे वाटते.)
20 Sep 2008 - 8:26 am | चतुरंग
छान गजल!
काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे
काळजाशी खेळ हे खेळू नये
*
घोट घेता घात करिते वारुणी
तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
हे दोन्ही शेर भावले!
(खुद के साथ बातां : परीक्षानळीतून, छानशा किटलीत गजल प्रवेशकर्ती झाली आहे! (मला गालिच्याच्या कडेला नाजुक सुरई अंधुकशी दिसते आहे!)
चतुरंग