आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 5:57 pm | शंतनु _०३१
मुद्दा पटला, आशयाशी सहमत
5 Apr 2016 - 8:34 pm | मेघना भुस्कुटे
आक्षेप पटला. वास्तवात काय असतं ते तपासणं जाहिरातीसाठी पुरेसं नसतं, नसावंही. उदाहरणार्थ बबन येरमामे किंवा भीमराव कांबळे असं नाव असलेला माणूस बाय डिफॉल्ट अडाणी असलेला दाखवला (दर्शवला), तर आपल्याला चालेल का? आपण ते चालवून घ्यावं का? वास्तवात अनेक दलित व्यक्ती बरेचदा कमी शिकलेल्या आणि / किंवा कष्टकरी समाजातल्या आणि / किंवा गरीब असतात. त्याला सणसणीत अपवादही असतात. पण म्हणून आपण अशा प्रकारची जाहिरात चालवून घेऊ का? नाहीच घेणार आणि तेच योग्य आहे. कारण जाहिरातींमध्ये फक्त वास्तवाचं प्रतिबिंब असतं असं नाही. वास्तवावर त्यांचा प्रभावही पडत असतो.
बाकी मराठीपणाचा अभिमान वगैरे ठीकच आहे. पण माझ्या मते 'पॉलिटिकली करेक्ट' असणे जाहिरातींसाठी जास्त आवश्यक आहे. निदान तसा प्रयत्न तरी असावाच.
6 Apr 2016 - 12:50 am | रमेश भिडे
काय ठरतंय शेवटी???
साडी ऑर नो साडी?
कार्ड ऑर नो कार्ड?????
6 Apr 2016 - 9:42 am | PIYUSHPUNE
What that poor chap can do in this case? He can only escalate the matter to higher authorities. It's sad and funny that people don't know anything how retail sector works. There are processes for many things!!! Raising voice doesn't provides you with immediate solution.
6 Apr 2016 - 11:44 am | तर्राट जोकर
It's sad and funny that people don't know anything how retail sector works. There are processes for many things!!!
>> थेन योउ टेल्ल होव इत वोर्क्स.
6 Apr 2016 - 9:47 pm | विवेकपटाईत
हिंदीत एक कहावत आहे, एक नूर आदमी, दस नूर कपडा. अर्थात १०% प्रतिभा आणि ९०% पोशाख. देशातील मोठ्या परीक्षेच्या साक्षात्कारला सुद्धा हि बाब लागू होते. (आजकाल अधिकाऱ्यांचे स्तर खालावत का जात आहे, त्याचे हेच कारण).
6 Apr 2016 - 10:01 pm | कपिलमुनी
तुम्ही जाहीरातीमधे अडाणी बाई / पुरुष आणि सुशिक्षित व्यक्तीं कशा दाखवाल ( फोटू मधे )?
7 Apr 2016 - 12:09 pm | तुषार काळभोर
हाच प्रश्नः ज्यांना त्या जाहिराती आक्षेपार्ह वाटल्या त्या सर्वांना. (तिथे बायोडाटा लिहिता आला असता, पण जाहिरात ही काही क्षणात क्लिक होणे अपेक्षित असते, असं आपलं मला वाटतं.)
Hungry Kids असं गुगलमध्ये इमेज सर्च केलं तर काय रिजल्ट्स येतात?
मग गुगलच्या मॅनेजरवर ओरडून किंवा मिपावर धागा काढून त्याचा निषेध करावा काय?
7 Apr 2016 - 2:33 pm | अभ्या..
ह्याच लेखात ३ दिवस आधीच हा प्रश्न मी विचारलाय. जर मला उत्तर द्यायचे असेल तर ते "दोन पुर्या दाखवा. एक तुपात अन एक तेलात तळलेली" अशा टाइपच्या प्रश्नाचे उत्तर ग्राफीकली कसे देणार?
ग्राफीक्स हे सिम्प्लीफाइड आणि सर्वांना समजेल असे असावे. त्याने कम्युनिकेट करावे हा उद्देश असतो. अडाणी आणि सुशिक्षितामधला फरक मी अंगूठाछाप आणि लफ्फेदार सही करताना दाखवू शकेन पण ते समजायला कीती समजेल. आणि ती साक्षरता अभियानाची जाहिरात वाटेल हाही मुद्दा आहेच.
जाहीरातीतले मॉडेल काय वाटते किंवा काय रिप्रेझेंट करते ते महत्त्वाचे. तो छोटासा रोल केल्यासारखा असतो. त्या रोलमध्ये आपण कन्सीडर करायचे असते. तशा हिशोबाने सन्नी देवल ट्रक्टरची जाहीरात करुन शेतकरी नसतो की डीश वॉशिंग सोपची जाहीरात करणारी माधुरी दिक्षीत भांडेवाली नसते.
बघणार्याला काय वाटते ह्याचा हिशोब मास नुसार करतात. उद्या कसलेही मॉडेल अडाणी बाई म्हणून दाखवले तरी विरोध करायचा ठरवला तर करता येईल. अगदी अॅक्चुअल अडाणी बाई दाखवली तरी.
सो असे आक्षेप जास्त इचार नाही करत.
8 Apr 2016 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लास.
-दिलीप बिरुटे
8 Apr 2016 - 1:31 pm | संदीप डांगे
एखाद्या व्यक्तीचं 'अडाणी' असणे हे सापेक्ष असते. ज्या कोणाला ढोबळ अर्थाने सुशिक्षित लोक अडाणी मानतात, त्याचीच दुसरी बाजू बघितली तर ते तथाकथित अडाणी लोक सुशिक्षितांना 'एवडी बुकं शिकलं तरी अडाणीच' असे म्हणतांना दिसतात.
अडाणी म्हणजे अज्ञानी. हा झाला सरळ अर्थ.
समाजात रुढ अर्थ आहे अशिक्षित, गावंढळ, कुठे कसं वागावं, बोलावं याची जाण नसलेला, फारसं तंत्रज्ञान, विज्ञान समजत नसलेला, देवभोळेपणा असलेला असा काहीसा अर्थ जनमानसात रुढ आहे.
सध्या एवढंच, नंतर उदाहरणांसह सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
गुडीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
8 Apr 2016 - 2:23 pm | अत्रे
त्यापेक्षा दोन वेगवेगळ्या वेशभूषेतल्या स्त्रिया दाखवल्या, साइड बाय साइड, आणि खाली लिहिले, आम्हाला वापरायला एकदम सोपे जाते, तर?
कोण अडाणी, कोण सुशिक्षित ते सांगण्याच्या फंदातच पडायचं नाही. लोकांना काय समजायचं ते समजू देत.
7 Apr 2016 - 9:08 am | दा विन्ची
8 Apr 2016 - 3:33 pm | तुषार काळभोर
त्या दोघांनी उत्तरभारतीय नोकरांची भूमिका केलीय ना?
8 Apr 2016 - 6:11 pm | आजानुकर्ण
खरं तर विस्ताराने लिहायचं होतं. पण कामाच्या गडबडीत थोडक्यात मतप्रदर्शन करतो.
मराठी माणसाला अडाणी म्हणून का दाखवतात ते ही चर्चा वाचून कळतं! अगदी साधी जाहिरात आहे. दोन वेगवेगळ्या पोशाखातील, किंवा सामाजिक पार्श्वभूमीतील बायकांनी 'स्टार बाजार'चे कार्ड का वापरावे यासाठी दोन चित्रं वापरलीत. यातील एक स्त्री समकालीन पोशाखातील आहे. आधुनिक गोष्टींचा तिला सोस असावा असं प्रथमदर्शनीच वाटतं. कार्ड हे पेमेंटचे आधुनिक साधन आहे. त्यामुळे कार्ड वापरण्यात तिला अडचण वाटत नाही उलट कार्डमुळे नवरा सोबत नसला तरी शॉपिंग करणं सोपं झालंय असा (स्टीरिओटाईप) संदेश तिने दिलाय.
उलट दुसरी बाई ही थोड्या पारंपरिक पोशाखातील आहे. त्या स्त्रीला समकालीन पोशाखांऐवजी पारंपरिक साडी सोयीस्कर वाटते. कदाचित तिला समकालीन कार्ड ऐवजी कॅशही सोयीस्कर वाटत असावी. त्यामुळे तिलाही कार्ड वापरणं अगदी सोपं, सोयीचं आहे हे जाहिरातदारांना ठसवायचं आहे. त्यासाठी त्यांनी ती ओळ टाकली आहे.
पण 'पुणेरी गावरान शेंग' ते 'आमच्या आळीचा गणपती रांगेत कितवा' याचा अभिमान बाळगणाऱ्या आम्हाला ताबडतोब जाहिरातीत न दाखवलेल्या काही गोष्टी खटकल्या.
१. साडीतील बाई ग्रामीण, अडाणी वाटते. (कुठेही ती ग्रामीण अडाणी आहे असे लिहिलेले नाही पण आम्हाला वाटले बॉ.
२. महाराष्ट्रीय पोशाखातील बाई अडाणी दाखवली आहे. त्यामुळे मराठी लोकांचा अपमान झालाय. (शिववडा झिंदाबाद!).
३. मोलकरीण म्हणून कायम मराठी बाईच का दाखवतात. (हे कसं काय दिसलं बॉ?)
तर या आक्षेपांना वर विठाकाकांनी उत्तरं दिलीच आहेत. साध्या जाहिरातीला अस्मिता - अभिमान चिकटवल्यामुळे काय विचका होतो ते इथं दिसलंय.
दोन अनुत्तरित आक्षेपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न.
१. कमीत कमी शिकलेली दाखवण्याचा एकमेव मार्ग पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का?
चित्रात दाखवलेली साडी हा फक्त महाराष्ट्रीयन पोशाख आहे का? कर्नाटकातल्या बायका काय घालतात? आंध्रातल्या बायका काय घालतात? मध्य प्रदेशातल्या बायका काय घालतात? आणि पंजाबी ड्रेस हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख का नाही म्हणे? महाराष्ट्रातल्या गावापासून शहरापर्यंत सगळ्या शाळाकालेजातल्या तरुणी पंजाबी ड्रेसच घालतात. का नावात पंजाबी आलं म्हणून तो 'आपला' पोशाख नाही?
२. मराठी लोकांचा अपमान!
आजकाल मराठी माणसाची अक्कल शिववड्यावर पोसली जात असल्यामुळे हे असं सुचतंय. नक्की कसलाकसला अभिमान बाळगायचा? कपड्यांनाही अस्मिता चिकटवायची का? मग साडीच कशाला, वल्कलांचाही अभिमान बाळगूया! तिथून सुरुवात करुन मग येऊ नऊवारी, पैठणीपर्यंत. ज्या प्रतिष्ठित मराठी लोकांना खरंच 'महाराष्ट्रीय पोशाखांविषयी' कळकळ आहे त्यांनी असं निषेध व्यक्त करण्याऐवजी आता कॉलेजात, इन्फोसिस-टीसीएसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, मस्तपैकी साड्या घालून पोशाखाला खरंच प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यावी ना. आम्हीच 'लाज वाटते', 'सोयीस्कर वाटत नाही', वगैरे काहीतरी कारणे देऊन हे पोशाख समारंभांपुरते मर्यादित केले आहेत. त्यात स्टार बाजार किंवा जाहिरातदारांचा काय दोष.
8 Apr 2016 - 6:40 pm | lgodbole
छान
10 Apr 2016 - 12:07 pm | हेमंत लाटकर
इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा मुंडासं फेटावाला खेडेगावातला दिसणारा पुरुष दाखवला असता आणि यालाही कार्ड वापरता येतं असा उल्लेख असता तर तितकाच खटकला असता का?
स्त्री म्हणून खटकला. सध्या सगळीकडे स्त्रियांची दबंगगिरी चालू आहे.
10 Apr 2016 - 10:38 pm | जिन्क्स
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
इथेच वाद मिट्वायला हवा होता.
संपादित
सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.
11 Apr 2016 - 11:47 am | हेमंत लाटकर
नाही. स्त्री म्हणून खटकला कारण सध्या सगळीकडे स्त्री दबंगगिरी चालली आहे.
12 Apr 2016 - 2:30 pm | शलभ
२०० बद्दल अभिनंदन. सत्कारसमिती किधर हय.