ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता.
..
आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं. कसंबसं आवरुन विज्याला घेऊन मंडपासमोर आला. भीमश्याच्या डोळ्यासमोर लक्षीच दिसायली. लेकराला पदरात टाकून गेली बिचारी. शिकवू म्हणायची लेकराला. काय करावं आन काय न्हाय. दोन टायमाचं खाणं निघायचं. आता हे पोरगं आयटीआय करायचं म्हणतंय. कुणाला कौल लावावा काय कळेना. सवाशिण बायासमोर अन गावच्या एकमेव मारवाड्यासमोर आरती फिरवून हरीभटजी बाहेर आला. चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली. बापाचा हात धरुन विज्या कायबाय सांगत राह्यला. हरीभटजी लेकराला पाठीव म्हणला एवढं लै झालं पण चौघड्याचं कसं. हात तर आताच थरथरु लागलेलं.
..
नेटानं भीमशानं अजून पाच धा वर्शं रेटली. कुकवानं माखलेली पडशी धरायला विज्या मातर नसायचा. तालुक्याला आयटीआय करुन कुटतर इंजिनेरच्या हाताखाली कामाला लागला. महिना पंधरा दिवसानी बापाला पैसे द्यायला तेवढं यायचा. आला की हरीभटजीकडची फेरी चुकायची नाही. भटजीला पण आता सेवा हुइना. त्येंचा धाकटा वृत्ती चालवू लागला. आयुष्याच्या संध्याकाळी दोन म्हातार्यांच्या गप्पा देवळाच्या पायरीवर रंगल्या. विज्याचा मोठेपणा आन त्याची कीर्ती भीमश्याला बाहेरुनच कळायची. हरीभटजी मात्र लै कौतुक करायचा विज्याचं. भीमश्याला वाटायचं लेकरु बोलीवतय शहरात. पण चौघडा कसा सोडावा. त्या तालावर तर लेकरु मोठं केलं. देवाची पडशी आयुष्यभर पुरलंच की.
..
सकाळचा काकडा आटपला आन भीमश्या पायरीवरच कोसळला. तीन तासातच विज्यानं बापाला शहरात अॅडमीट केला. आठवडा दवाखान्यात काढून नीट घरी नेलं. पोराचा थाट पाहून बाप दिपला. घरचं नोकर चाकर बघून बुजला. जसं हातपाय व्येवस्थित हालायला लागले तसा भीमश्याचा गावी जायाचा घायटा वाढायला लागला. रात्र रात्र चौघड्याच्या आवाजानं म्हातार्याची झोप उडाली. अपरात्री हातानी कॉटवर वाजवायला लागला. सारखं सारखं हात जोडू लागला. शेवटी विज्यानं गाडी काढली. तासात बापाला देवळासमोरच आणलं.
..
शेंदरी रंगानं मंदीर उजळायला लागलेलं आन तालात चौघडा वाजत होता. बापाला हाताला धरुन द्वाराखाली उभे केले. एका चौघड्यासमोर मशीन बसवलेलं. लाईटीच्या मोटारवर चाकं फिरत होतं. तालावर दांडकी आपटत होतं. शेजारी स्पीकरवर सुंद्री वाजत होती. काकड्याच ताट घेउन हरीभटजीचा भाऊ समोर आला. अरे विजयमालक नमस्कार वगैरे झालं. भीमश्याला म्हणाला मालकांनी मोठंच काम केलं की. मशीन बसवली चौघड्याची. देवळात ट्युब आन पंखे पण दिलेत. तुमचं तर्फे म्हणून नाव दिलय. लेकराचं कौतुक चौघड्याच्या आवाजात बापाला कळेना. कान लावून त्या मशीनीचा ताल मोजू लागलेला.
.
"चला बाबा, हरीकाकांना भेटून येऊ"
"विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"
प्रतिक्रिया
3 Apr 2016 - 9:42 pm | सतिश गावडे
छान लिहिलं आहे. आवडलं.
3 Apr 2016 - 9:49 pm | विजय पुरोहित
मस्तच अभ्या...
जगदंबेच्या राऊळात संगीतसेवा सादर करणार्याची कथा काळजाला भिडली...
उधे गं अंबे उधे...
3 Apr 2016 - 9:53 pm | विजय पुरोहित
श्री तुळजाभवानी देवस्थानातील सनईचौघडा कानांत गुंजारव करु लागला...
उधे गं अंबे उधे...
3 Apr 2016 - 9:59 pm | टवाळ कार्टा
मस्त
3 Apr 2016 - 10:57 pm | नाव आडनाव
भारी.
3 Apr 2016 - 11:02 pm | lgodbole
छान
3 Apr 2016 - 11:40 pm | उगा काहितरीच
मस्त! आवडली कथा... साधी सरळ सोपी कथा.
3 Apr 2016 - 11:48 pm | तर्राट जोकर
अभ्या भौ, बात है यार कुछ आपमें. और लिखा करो. खुप सुंदर लिहलंय राव. आवडलं. इवेंटम्यानेजमेंटचा पुढचा भागाच्या परचंड प्रतिक्षेत.
4 Apr 2016 - 6:44 am | संजय पाटिल
इवेंटम्यानेजमेंटचा पुढचा भाग येवुद्या लवकार
4 Apr 2016 - 8:51 am | नाखु
बुंगाट लिखाण...
लेखन अर्धवट ठेऊन गुंगारा देणार्यांना भैरूबा माफ करीत नसतो.
खंडोबाचा नावान चांगभलं
4 Apr 2016 - 7:28 am | प्रचेतस
खूपच छान.
लेखनशैली सुरेख.
4 Apr 2016 - 8:09 am | खेडूत
कथा आवडली..!
बदलत्या काळाची पावले ग्रामीण जीवनातही उलथापालथ करताना दिसू लागलीयत.
4 Apr 2016 - 8:27 am | मितान
छान.
4 Apr 2016 - 8:42 am | स्पा
क्या बात अभ्या लेका एकदम खास
असाच लिहित रहा बावा
4 Apr 2016 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा
मण:पूर्वक प्लस वण टू पांडू!
4 Apr 2016 - 9:58 am | रातराणी
क्लास!
4 Apr 2016 - 10:50 am | सस्नेह
सुंदर कथा ! एकदम भिडली.
4 Apr 2016 - 10:55 am | सुबोध खरे
सुंदरच लिहिलंय.
आमच्या गावची ( श्री क्षेत्र परशुराम) ची आठवण झाली. लहानपणी प्रचंड नगारा( देवाचा डंका म्हणत)दिवसातून तीन वेळेस सूर्योदय मध्यान वेळ आणि सूर्यास्ताला माणसं वाजवत असत. आता तोच मशीनवर वाजतो आणि त्याला बोंबल्यावरून( लाउड स्पीकर) प्रसारित करतात. मागच्या वर्षी मुददाम मशीन कसं वाजवतं ते मुलांना दाखवून आलो होतो.
जुन्या पिढीतील माणसं देवळातील खटला कोर्टात चालू असेस्तोवर पगार मिळत नसतानाही देवावरील श्रद्धेमुळे विनावेतन वाजवत असत. ( एके दिवस त्यांची श्रद्धा पाहून त्यांना नमस्कार करावासा वाटला म्हणून नमस्कार केला त्यावर ती साधी माणसं फार ओशाळली होती).
पुढे प्रकरण सुटले त्यांना त्यांचे पगार मिळाले. आणि नंतर बर्याच वर्षांनी गेलो तेंव्हा जुनी पिढी अस्तगत झाली होती आणि त्या ठिकाणी मशीनने डंका वाजतो.
काय चांगलं आणि काय वाईट सांगता येत नाही.
कालाय तस्मै नमः
4 Apr 2016 - 10:59 am | खेडूत
:)
ते कसं वाजतं बघायचं तर माहेश्वरी उद्यान ( गोल) चौकात पूर्वेला गल्लीत एक हनुमान मंदिर आहे, तिथे सकाळी सहाला भयाण मोट्ठ्या आवाजात ऐकायला मिळते..
4 Apr 2016 - 1:31 pm | विवेक ठाकूर
आणि छान लेखन .
4 Apr 2016 - 1:40 pm | राजाभाउ
मस्त.
4 Apr 2016 - 3:09 pm | वेल्लाभट
जबर!
4 Apr 2016 - 4:01 pm | शैलेन्द्र
सुन्दर कथा , आवड्ल।
4 Apr 2016 - 4:19 pm | ब़जरबट्टू
सुंदर कथा ! एकदम भिडली.
4 Apr 2016 - 4:43 pm | जगप्रवासी
एक नंबर, आवडली कथा
4 Apr 2016 - 4:57 pm | चिगो
अत्यंत भावपुर्ण कथा.. लैच जबरा लिव्हतो हा अभ्या..
4 Apr 2016 - 4:58 pm | उगा काहितरीच
चंद्रपुर येथील देवीच्या मंदिरात पण अशीच मशीन आहे. औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगालापण अशीच मशीन बसवलेली आहे.
4 Apr 2016 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा रे अभ्या. लेखन आवडलं. लिहिण्याची शैली चांगली आहे.
-दिलीप बिरुटे
4 Apr 2016 - 6:03 pm | मन१
भावुक करणारं लिखाण. सुंदर.
फार फार मागे जी एं ची ' माघारा' वाचलेली.
ती आठवली.
4 Apr 2016 - 6:09 pm | मी-सौरभ
मुख्य म्हणजे शेवटी सगळि पात्रे जिवंत ठेवलीस, खुप छान केलस.
4 Apr 2016 - 6:40 pm | जव्हेरगंज
या वाक्यात आख्खा सारांश आहे तर !
म्हणजे कथा मशीन बसविण्याची नसून परंपरागत भाकरतुकड्याची आहे तर !
मस्तच !
7 Apr 2016 - 4:34 pm | अभ्या..
करेक्ट जव्हेरभाव.
पोराने ताल बंद पडू दिला नाही पण पोराने ज्याच्या जीवावर हे केले ती पडशी आता घर झालेय शहरात.
4 Apr 2016 - 9:06 pm | बोका-ए-आझम
_/\_ अभ्याभौ!
4 Apr 2016 - 9:09 pm | बोका-ए-आझम
पण गारंबीचा बापू मधले विठोबा आणि बापू आठवले.
4 Apr 2016 - 9:34 pm | अनुप ढेरे
मस्तं!
4 Apr 2016 - 9:38 pm | पैसा
कथा आवडली.
5 Apr 2016 - 1:23 am | कपिलमुनी
कालाय तस्मै नम: !
5 Apr 2016 - 6:41 am | यशोधरा
कथा अतिशय आवडली.
5 Apr 2016 - 9:04 am | एक एकटा एकटाच
मस्तच लिहिलीय
अत्यंत सुरेख
पुढिल लिखाणास मनपुर्वक शुभेच्छा
5 Apr 2016 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख..... अतिशय सुरेख...... फारच आवडली गोष्ट.
मनापासुन लिहिलेली.
"विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"
या वाक्या साठी अभ्या शेठ काय मागाल ते देऊ तुम्हाला.
पैजारबुवा,
5 Apr 2016 - 9:44 am | श्रीरंग_जोशी
भावपूर्ण कथा. खूप आवडली.
5 Apr 2016 - 9:46 am | प्राची अश्विनी
अप्रतिम!!!
5 Apr 2016 - 10:21 am | नीलमोहर
असे भावपूर्ण, संवेदनशील लेखन करणारा अभिजीत जास्त भावतो.
लिहीत रहा..
5 Apr 2016 - 12:34 pm | चांदणे संदीप
जुन्या नव्याचा मेळ घालताना काहीतरी तर काळाच्या प्रवाहात सोडून द्यावेच लागणार... ओन्ली थिंग कॉन्स्टण्ट इज चेंज!
काल परवापर्यंत वाचू शकलो नव्हतो... आज हिंमत करून वाचली... असं काही संवेदनशील वाचताना मला खूप मनाची तयारी करावी लागते! :(
तुमच्या लिखाणाची क्वालिटी अनम्याच्ड आहे हे परत एकदा प्रकर्षाने जाणवलं! दर्शन द्या येकदा गरीबाला...
Sandy
5 Apr 2016 - 9:49 pm | आदूबाळ
जबरदस्त लिहिलंय अभ्या. एकच नंबर.
5 Apr 2016 - 10:01 pm | वैभव जाधव
ह्या अभ्या कडूमुळं यावं लागलं 'आत'...
भारी लिहितोयस अभ्या..
'आलेलं' लिखाण मस्त असतंच. बेश्ट हाय
6 Apr 2016 - 8:49 am | भिकापाटील
कुंचला व लेखनी दोन्ही बाबतीत समर्थ.
अभ्या तुला एक अॅन्टीक्यूटी बक्षीस भिकापाटलाकडून.
6 Apr 2016 - 10:08 am | साहेब..
मस्त _/\_
6 Apr 2016 - 11:03 am | शित्रेउमेश
कथा आवडली..! मस्त...!!!
6 Apr 2016 - 2:27 pm | स्वामिनी
अप्रतिम !!!!!
6 Apr 2016 - 6:27 pm | भरत्_पलुसकर
जबरदस्त!
7 Apr 2016 - 4:36 pm | अभ्या..
धन्यवाद वाचकांनो, प्रतिसादकांनो.
शतशः धन्यवाद.
मिपावरील कथांना असेच प्रतिसाद मिळत राहोत. साहित्यविभाग बहरत राहो हिच प्रार्थना.
7 Apr 2016 - 4:43 pm | चाणक्य
ही वाचायची राहिली होती.
7 Apr 2016 - 5:48 pm | एस
पुनःपुन्हा वाचली. अतिशय जिवंत रेखाटन केलेय.
7 Apr 2016 - 6:11 pm | सूड
निवांत वाचायची म्हणून अजून उघडून पाह्यली नव्हती.
सुंदर!!
9 Apr 2016 - 5:57 pm | शिव कन्या
सुरेख कथन!
आवडले!
9 Apr 2016 - 6:37 pm | राही
ही कथा वाचायची राहिली होती. आज वाचली.
बदल खूप छान टिपला आहेच, पण बापाचं पडशीचं दु:ख अगदी आतपर्यंत पोचलं. बायको गेल्यानंतर जिने जिवाभावाची साथ दिली, पोटाची सोय केली, ती गमावल्याची पोकळी भयाणच वाटत असणार. आता सर्व काही आयते तयार. चौघड्याला आपली जरूर नाही, आणि पडशी नसली तरी चालतेय. आपली कुणाला जरूरच उरली नाहीय. अशी काहीशी विषण्ण भावना मला जाणवली.
12 Apr 2016 - 7:55 pm | चौथा कोनाडा
सुंदर हृदयस्पर्शी कथा !!
सुरेख लेखन !
हॅटस ऑफ अभ्यादादा !
12 Apr 2016 - 8:55 pm | फारएन्ड
खूप सुंदर कथा!
चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली >>> यासारख्या वाक्यांमुळे वेगळाच दर्जा जाणवतो लेखनाचा.
12 Apr 2016 - 9:43 pm | सुधांशुनूलकर
भावा, छानच लिहितोस.
३ तारखेलाच वाचलं होतं, पण प्रतिसाद द्यायचं राहून गेलं होतं.
सर्वांनी प्रतिसादही मनापासून दिलेले असल्यामुळे खूप भावले.