मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताल

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता. .. आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं. कसंबसं आवरुन विज्याला घेऊन मंडपासमोर आला. भीमश्याच्या डोळ्यासमोर लक्षीच दिसायली. लेकराला पदरात टाकून गेली बिचारी. शिकवू म्हणायची लेकराला. काय करावं आन काय न्हाय. दोन टायमाचं खाणं निघायचं. आता हे पोरगं आयटीआय करायचं म्हणतंय. कुणाला कौल लावावा काय कळेना. सवाशिण बायासमोर अन गावच्या एकमेव मारवाड्यासमोर आरती फिरवून हरीभटजी बाहेर आला. चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली. बापाचा हात धरुन विज्या कायबाय सांगत राह्यला. हरीभटजी लेकराला पाठीव म्हणला एवढं लै झालं पण चौघड्याचं कसं. हात तर आताच थरथरु लागलेलं. .. नेटानं भीमशानं अजून पाच धा वर्शं रेटली. कुकवानं माखलेली पडशी धरायला विज्या मातर नसायचा. तालुक्याला आयटीआय करुन कुटतर इंजिनेरच्या हाताखाली कामाला लागला. महिना पंधरा दिवसानी बापाला पैसे द्यायला तेवढं यायचा. आला की हरीभटजीकडची फेरी चुकायची नाही. भटजीला पण आता सेवा हुइना. त्येंचा धाकटा वृत्ती चालवू लागला. आयुष्याच्या संध्याकाळी दोन म्हातार्‍यांच्या गप्पा देवळाच्या पायरीवर रंगल्या. विज्याचा मोठेपणा आन त्याची कीर्ती भीमश्याला बाहेरुनच कळायची. हरीभटजी मात्र लै कौतुक करायचा विज्याचं. भीमश्याला वाटायचं लेकरु बोलीवतय शहरात. पण चौघडा कसा सोडावा. त्या तालावर तर लेकरु मोठं केलं. देवाची पडशी आयुष्यभर पुरलंच की. .. सकाळचा काकडा आटपला आन भीमश्या पायरीवरच कोसळला. तीन तासातच विज्यानं बापाला शहरात अ‍ॅडमीट केला. आठवडा दवाखान्यात काढून नीट घरी नेलं. पोराचा थाट पाहून बाप दिपला. घरचं नोकर चाकर बघून बुजला. जसं हातपाय व्येवस्थित हालायला लागले तसा भीमश्याचा गावी जायाचा घायटा वाढायला लागला. रात्र रात्र चौघड्याच्या आवाजानं म्हातार्‍याची झोप उडाली. अपरात्री हातानी कॉटवर वाजवायला लागला. सारखं सारखं हात जोडू लागला. शेवटी विज्यानं गाडी काढली. तासात बापाला देवळासमोरच आणलं. .. शेंदरी रंगानं मंदीर उजळायला लागलेलं आन तालात चौघडा वाजत होता. बापाला हाताला धरुन द्वाराखाली उभे केले. एका चौघड्यासमोर मशीन बसवलेलं. लाईटीच्या मोटारवर चाकं फिरत होतं. तालावर दांडकी आपटत होतं. शेजारी स्पीकरवर सुंद्री वाजत होती. काकड्याच ताट घेउन हरीभटजीचा भाऊ समोर आला. अरे विजयमालक नमस्कार वगैरे झालं. भीमश्याला म्हणाला मालकांनी मोठंच काम केलं की. मशीन बसवली चौघड्याची. देवळात ट्युब आन पंखे पण दिलेत. तुमचं तर्फे म्हणून नाव दिलय. लेकराचं कौतुक चौघड्याच्या आवाजात बापाला कळेना. कान लावून त्या मशीनीचा ताल मोजू लागलेला. . "चला बाबा, हरीकाकांना भेटून येऊ" "विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"

वाचन 14786 वाचनखूण प्रतिक्रिया 60

In reply to by संजय पाटिल

नाखु Mon, 04/04/2016 - 08:51
बुंगाट लिखाण... लेखन अर्धवट ठेऊन गुंगारा देणार्यांना भैरूबा माफ करीत नसतो. खंडोबाचा नावान चांगभलं

खेडूत Mon, 04/04/2016 - 08:09
कथा आवडली..! बदलत्या काळाची पावले ग्रामीण जीवनातही उलथापालथ करताना दिसू लागलीयत.

सुबोध खरे Mon, 04/04/2016 - 10:55
सुंदरच लिहिलंय. आमच्या गावची ( श्री क्षेत्र परशुराम) ची आठवण झाली. लहानपणी प्रचंड नगारा( देवाचा डंका म्हणत)दिवसातून तीन वेळेस सूर्योदय मध्यान वेळ आणि सूर्यास्ताला माणसं वाजवत असत. आता तोच मशीनवर वाजतो आणि त्याला बोंबल्यावरून( लाउड स्पीकर) प्रसारित करतात. मागच्या वर्षी मुददाम मशीन कसं वाजवतं ते मुलांना दाखवून आलो होतो. जुन्या पिढीतील माणसं देवळातील खटला कोर्टात चालू असेस्तोवर पगार मिळत नसतानाही देवावरील श्रद्धेमुळे विनावेतन वाजवत असत. ( एके दिवस त्यांची श्रद्धा पाहून त्यांना नमस्कार करावासा वाटला म्हणून नमस्कार केला त्यावर ती साधी माणसं फार ओशाळली होती). पुढे प्रकरण सुटले त्यांना त्यांचे पगार मिळाले. आणि नंतर बर्याच वर्षांनी गेलो तेंव्हा जुनी पिढी अस्तगत झाली होती आणि त्या ठिकाणी मशीनने डंका वाजतो. काय चांगलं आणि काय वाईट सांगता येत नाही. कालाय तस्मै नमः

In reply to by सुबोध खरे

खेडूत Mon, 04/04/2016 - 10:59
:) ते कसं वाजतं बघायचं तर माहेश्वरी उद्यान ( गोल) चौकात पूर्वेला गल्लीत एक हनुमान मंदिर आहे, तिथे सकाळी सहाला भयाण मोट्ठ्या आवाजात ऐकायला मिळते..

चिगो Mon, 04/04/2016 - 16:57
अत्यंत भावपुर्ण कथा.. लैच जबरा लिव्हतो हा अभ्या..

मन१ Mon, 04/04/2016 - 18:03
भावुक करणारं लिखाण. सुंदर. फार फार मागे जी एं ची ' माघारा' वाचलेली. ती आठवली.

मी-सौरभ Mon, 04/04/2016 - 18:09
मुख्य म्हणजे शेवटी सगळि पात्रे जिवंत ठेवलीस, खुप छान केलस.

जव्हेरगंज Mon, 04/04/2016 - 18:40
"विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"
या वाक्यात आख्खा सारांश आहे तर ! म्हणजे कथा मशीन बसविण्याची नसून परंपरागत भाकरतुकड्याची आहे तर ! मस्तच !

In reply to by जव्हेरगंज

अभ्या.. गुरुवार, 04/07/2016 - 16:34
करेक्ट जव्हेरभाव. पोराने ताल बंद पडू दिला नाही पण पोराने ज्याच्या जीवावर हे केले ती पडशी आता घर झालेय शहरात.

सुरेख..... अतिशय सुरेख...... फारच आवडली गोष्ट. मनापासुन लिहिलेली. "विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी" या वाक्या साठी अभ्या शेठ काय मागाल ते देऊ तुम्हाला. पैजारबुवा,

नीलमोहर Tue, 04/05/2016 - 10:21
असे भावपूर्ण, संवेदनशील लेखन करणारा अभिजीत जास्त भावतो. लिहीत रहा..

चांदणे संदीप Tue, 04/05/2016 - 12:34
"विज्या पोरा ताल बरोबर जमलाय रं पण पडशी राह्यली लका तुझ्या घरी"
जुन्या नव्याचा मेळ घालताना काहीतरी तर काळाच्या प्रवाहात सोडून द्यावेच लागणार... ओन्ली थिंग कॉन्स्टण्ट इज चेंज! काल परवापर्यंत वाचू शकलो नव्हतो... आज हिंमत करून वाचली... असं काही संवेदनशील वाचताना मला खूप मनाची तयारी करावी लागते! :( तुमच्या लिखाणाची क्वालिटी अनम्याच्ड आहे हे परत एकदा प्रकर्षाने जाणवलं! दर्शन द्या येकदा गरीबाला... Sandy

भिकापाटील Wed, 04/06/2016 - 08:49
कुंचला व लेखनी दोन्ही बाबतीत समर्थ. अभ्या तुला एक अॅन्टीक्यूटी बक्षीस भिकापाटलाकडून.

अभ्या.. गुरुवार, 04/07/2016 - 16:36
धन्यवाद वाचकांनो, प्रतिसादकांनो. शतशः धन्यवाद. मिपावरील कथांना असेच प्रतिसाद मिळत राहोत. साहित्यविभाग बहरत राहो हिच प्रार्थना.

राही Sat, 04/09/2016 - 18:37
ही कथा वाचायची राहिली होती. आज वाचली. बदल खूप छान टिपला आहेच, पण बापाचं पडशीचं दु:ख अगदी आतपर्यंत पोचलं. बायको गेल्यानंतर जिने जिवाभावाची साथ दिली, पोटाची सोय केली, ती गमावल्याची पोकळी भयाणच वाटत असणार. आता सर्व काही आयते तयार. चौघड्याला आपली जरूर नाही, आणि पडशी नसली तरी चालतेय. आपली कुणाला जरूरच उरली नाहीय. अशी काहीशी विषण्ण भावना मला जाणवली.

फारएन्ड Tue, 04/12/2016 - 20:55
खूप सुंदर कथा! चार केळं आन धाची नोट भीमश्याच्या पडशीत वरनंच पडली >>> यासारख्या वाक्यांमुळे वेगळाच दर्जा जाणवतो लेखनाचा.

सुधांशुनूलकर Tue, 04/12/2016 - 21:43
भावा, छानच लिहितोस. ३ तारखेलाच वाचलं होतं, पण प्रतिसाद द्यायचं राहून गेलं होतं. सर्वांनी प्रतिसादही मनापासून दिलेले असल्यामुळे खूप भावले.