आज मित्राशी गप्पा सुरु होत्या.कुणीतरी वूडाहाउसचं नाव काढलय. वुडहाउस म्हणजे पी जी वुडहाउस. पुलंवर त्याचा प्रभाव होता म्हणे. पुलंचा फेव्हरिट लेखक होता म्हणे. तर त्या वुडहाउसवरुन आठवलं --
*********************पाच वर्षाचा असतानाचं आठवतय तसं*************
आमच्या एका दूरच्या काकांना पी जीवूडहाउस आवडत असे म्हणे. म्हणजे ते रहायला शेजारीच होते. पण नात्यात दूरचे होते. दूरचे लोक वरिष्ठ सरकारी अधिकारी असतील तर त्यांना जवळचे करायचा प्रयत्न होतो. म्हणून सगळेच नातेवाइक त्यांना जवळचे असल्यासारखे वागवत. माझ्या बाबांहूनही बरेच मोठे असावेत वयाने. ते बर्याच वरच्या पोस्टला असावेत कारण त्यांची इमेज स्वच्छ होती. तरीही घर सुखवस्तू म्हणावं इतपत होतं. उच्चमध्यमवर्गीय होतं. तेव्हा टीव्ही आख्ख्या गल्लीत एखाद दोघांकडेच असायचा. मात्र ह्यांच्याकडे टीव्हीच्या जोडीला व्हीसीआर होता घरी विडियो कॅसॅट पहायला. त्यात ते देशोदेशीचे पिक्चर पहायचे.त्यांना म्हणे पी जी वूडहाउस आवडे. म्हणूनच त्यांच्याघरी नेहमी मारी नावाची बिस्किटं असतं.पारदर्शक बरणीत असत. ते अर्थातच चहा - कॉफीत साखर फार फार कमी घालत. त्यांच्या घरात कुणालाही डायबेटिस वगैरे नव्हता, तरी हे असं होतं. ते मंद मंद हसत. कितीही मोठा जोक असू देत; त्यांच्याकडे कुणीच ठ्ठो करुन हसत नसे. मोठ्याने रडत आणि बोलतही नसे. त्यांच्याकडे नवं बाळ पण मॅच्युर्डच व्हायचं. तेही मंद हसे. मंद मंद रडे. म्हणजे हाताच्या मुठी आवळून फक्त तोंड वाकडं करे ते इलुसं बाळ. त्यातून ते रडायला आलय असं सम्जायचं. खुश झालं तर ते बाळही मोठ्यानं हसतं नसे. अनुवांशिक स्मित करायला त्याला पोटातूनच येत होतं. काकांना काही लोक शिष्ट म्हणत. काही लोक बेचव म्हणत. त्यांनी कधी नव्हे ते एकदा मिसळ केली आणि संध्याकाळी आलेल्या लोकांन दिली. मिसळ अगदि फुळ्ळ्क फचक् होती; असं लोक माघारी म्हणायला लागले. मला मात्र ती ही आवडली. लोकांना मिसळ आवडली नाही; तरी त्यांनी तोंडभर स्तुती केली. काकांनी त्यावरही मंदस्मित केलं. ते इंग्लिश पेपर वाचत. त्यातल्या कार्टून्सवर आरामखुर्चीत बसलेले असतना कॉफीचा लहानसा घुटका घेत एक स्माइल देत. जोक फार जास्त आवडला तर तोच पेपर किम्चित वळवून शेजारी बसलेल्या काकूंना आहे त्या जागेवरुनच खुणावत. काकूही चक्क इंग्लिश वाचत. आणि काकांना जोक आवडलाय आणि आता ते आपल्याकडे पाहून " हे वाच" अशा अर्थाची खूण करतील हे काकूंना कसे कळे कुणास ठाउक. कारण काका काकूंना मोठ्याने "अग ए" म्हणत हाक मारत नसत. मग?
.
.
मागाहून जाणवले. पेपर दुमडल्याचा , पेपर काकूंकडे वळवल्याचा एक आवाज होइ पेपराचा. घरात इतकी शांतता असे की तो आवाजही शेजारच्या माणसाला जाणवे. त्यांची वेव्हलेंथ इतकी जुळली होती की दुम्डण्याचा आवाज, आणी साधं पान उलटायचा आवाज ह्यातला फरक त्यांना सरावाचा झाला असावा. त्यांच्या संसारिक आणि वैवाहिक सुखाचा इतर निम्न मध्यमवर्गीयांना हेवा वाटत असावा. श्रीमंतीचे रोग म्हणतात ते उलट ह्या श्रीमंतांना कधीच झाले नाहित. अॅसिडिटी, अल्सर, बी पी , डायबेटिस असे उलट इतर सर्वांना झाले. मग ह्यांना श्रीमंतीचे रोग का म्हणाय्चं ते मला समजत नसे. त्यांना कधीच कुणी सिगारेट बिडी पिताना पाहिलं नव्हतं. पण एक नक्षीदार सुरेख सागवानी अॅश ट्रे त्यांच्या घरात होता. हॉलमधल्या भिंतीवर गूढ अमूर्त पेंटिंग असे. त्याखालच्या काचेच्या पॉश टी पॉयवर अॅश ट्रे असे. त्या चित्रातून मला मला नागड्या बाईचा भास होइ. पण ते अस्पष्ट होतं. तो अॅश ट्रे सिगार का पाइप साठी असल्याची वदंता होती. सिगार अन् पाइप कधी पाहिला नाही. सिगार म्हणजे पैशेवाल्यांची बिडी असावी. ह्यांना गोल्फ आवडे. त्यांच्या मुली नव्यानेच मार्केट मध्ये फॅशन आलेल्या जीन्स घालत. स्लीव्हलेसही घालत. तशाच स्लीव्ह लेस घालून रामायण महाभारतही बघत.मुलींचे मित्र घरी येत. आणि ही त्यांच्यासाठी सहज बाब होती. मुलीचे केस नेहमीच तजेलदार कसे असत ते समजत नसे. तिचा आख्खा हात जबरदस्त गोरा होता. माहितीतल्या इतर गोर्या मुलींचा फक्त दंड गोरा असे. त्यानंतर सगळा हात ...विशेषतः कोपरापासून पुढे काळा. चेहराही उन्हानं काळवंडलेला असे. ह्या मुलींचा आख्खा हात गोरा. शिवाय काखेत केस नसत. शिवाय त्या मुली असूनही स्वयंपाक वगैरे येत नसे. चेहरा नितळ होता. त्वचा तजेलदार होती.
.
.
त्यांचं आणि आमचं नातेवाइक आणि परिचित सर्कल खूपसं कॉमन होतं. त्यातल्या बहुतांश श्रमिक लोकांचं फारसं वाचन नव्हतं. बहुतांश लोक कामगार होते. त्यांचं खाणं खणखणीत होतं, बोलणं मोठ्यानं होतं. एकमेकांशी शेयरिंग होइ. कधी काही केलं तर श्रमिक लोक एकमेकांना आणून देत. फक्त काहींचं वाचन होतं. त्या वाचन असणार्यांना इतरांत मान होता. वाचन म्हणजे पु ल , व पु आणि वसंत कानेटकर. सगळ्यांचं वाचन मराठी होतं. ह्या मराठी वाचन असणार्यांना इतर श्रमिक मान देत. आणि हे वाचन असणारे त्या वूडहाउस आवडणार्या काकांना मान देत म्हणून इतरही त्यांना मान देत. एक हायरार्की /उतरंड होती. कधीतरी बोलत असताना त्यांच्या घरात "वूडहाउस की जॉर्ज बर्नार्ड शॉ " असं त्यांच्याच घरातले सदस्य आपसात बोलू लागले. लगेच जमलेल्या इतरांना आपापली कामं आठवली आणि ते बकाबका खाउन झटपट घराबाहेर पडले. वूडहाउस आवडणार्या काकांना सगळे शिष्ट म्हणत. का म्हणत मला कधीच समजलं नाही. ते स्वतःहून ज्याच्याशी बोलत, बोलावून घेत; त्यापैकी मी एक होतो. अभ्यासक्रम वगैरेमध्ये किम्वा खेळातही कधीच विशेष प्रावीण्य नव्हतं. ना मी स्टार होतो. तरी ते मला भाव का देत हे मलाही सम्जलं नाही. आजही देतात; आजही समजलं नाही.
.
.
वूडहाउस आवडणारे लोक मारी बिस्किट खातात. मंद हसतात. स्माइल देतात. चांगलेपण असतात.
--मनोबा
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 4:03 pm | टवाळ कार्टा
ख्याक
लेख "अगदि फुळ्ळ्क फचक्" वाटला पण वरच्या एका वाक्यासाठी :) <- स्मितहास्य आहे हे ;)
31 Mar 2016 - 4:17 pm | मीता
मनस्वी लेख
31 Mar 2016 - 4:22 pm | अमृता_जोशी
वाचनीय !
31 Mar 2016 - 4:30 pm | एस
त्या वयातल्या मनोभूमिकेत शिरून केलेले लेखन आवडले.
31 Mar 2016 - 5:22 pm | अस्वस्थामा
छान हो मनोबा..!!
31 Mar 2016 - 6:33 pm | कंजूस
पिजि "नर्म विनोदा"साठी प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्यावरचा लेख"अगदि फुळ्ळ्क फचक् वाटला म्हणजे पोहोचला की रे.
31 Mar 2016 - 7:01 pm | आदूबाळ
मला प्रचंड आवडतो वुडहाऊस. अतिशय उच्च आणि कोणाला न दुखवणारा विनोद. ग्राऊचोसारखा वुडहाऊस चमकदार वाक्यांसाठी प्रसिद्ध नाही. एखाद्या कथेचं प्लॉटिंग कसं करावं याचा तर वुडहाऊस वस्तुपाठ आहे.
पुलंचं प्रसिद्ध वाक्य आहे - "विनोदाच्या वस्तर्याने गुळगुळीत दाढी करावी, पण रक्त काढू नये" - यात अनेक प्रकारे वुडहाऊस डोकावतो. हे तत्त्व वुडहाऊसने स्वतःच्या लेखनात पाळलं. या प्रकारचा तुलनात्मक शाब्दिक खेळ वुडहाऊसच्या लेखनात जागोजागी सापडतो.
एखादं पुस्तक वाचतावाचता स्वतःशीच खुदुखुदु हसणारा माणूस दिसला की समजावं साहेब वुडहाउस घेऊन बसले आहेत.
1 Apr 2016 - 10:25 am | पिशी अबोली
+1
वुडहाऊस म्हणजे वुडहाऊसच फक्त..
1 Apr 2016 - 11:00 am | रातराणी
तंतोतंत सहमत!
31 Mar 2016 - 8:19 pm | आनंदयात्री
भारी रे मना.
>>बहुतांश लोक कामगार होते. त्यांचं खाणं खणखणीत होतं, बोलणं मोठ्यानं होतं.
'नाणं खणखणीत' वाचून मनातल्या मनात तोंड मुरडणार तोच 'खाणं खणखणीत' हा बोध होऊन हसू फुटले.
असे अजून काका काकू येऊ देत. उदाहरणार्थ अगाथा क्रिस्ती आवडणार्या काकू :-)
1 Apr 2016 - 9:28 am | सिरुसेरि
ग्राज्वेट गंगाबाईं आठवल्या
1 Apr 2016 - 9:45 am | असंका
पाच वर्ष वयाच्या आठवणी....वाटत नाहीत!
लिहिलंय एकदम ओघवतं. सुंदर!
1 Apr 2016 - 11:00 am | रातराणी
छान लिहिलंय!
2 Apr 2016 - 11:09 am | भाऊंचे भाऊ
एक एक वाक्याचा एक एक प्याराग्राफ करने वुडहाउसच जाणो. बर्टी वुस्टर क्लासच.
2 Apr 2016 - 11:17 am | नीलमोहर
'वूडहाउस आवडणारे लोक मारी बिस्किट खातात. मंद हसतात. स्माइल देतात. चांगलेपण असतात.'
:)
2 Apr 2016 - 12:34 pm | Anand More
बारीक निरीक्षण
26 Apr 2016 - 8:58 am | शित्रेउमेश
'वूडहाउस आवडणारे लोक मारी बिस्किट खातात. मंद हसतात. स्माइल देतात. चांगलेपण असतात.'
हे अगदी खासच... ;)
3 May 2016 - 12:25 pm | मन१
सर्व वाचक , प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.