बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 3:59 pm

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ३
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ४

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

भाग -५
जर्मनीच्या तिन्ही आर्मी ग्रुपना या मोहिमेत सामील होण्याचे आदेश मिळाले. क्लिस्टच्या पँझर तुकड्या सोडून सर्व पँझर ग्रुप टायफूनमधे सामील होणार होते कारण क्लिस्टच्या रणगाड्यांना युक्रेन ताब्यात घेण्याची कामगिरी पार पाडण्याचा आदेश होता. जनरल हॉपनरच्या सैन्याने उत्तरेकडून रशियन सैन्याच्या मध्यभागी हल्ला चढवायचा होता. त्याच्या एका बाजूस असणार नववी आणि चवथी आर्मी तर दुसऱ्या बाजूस दुसरी आर्मी. वेढा घालण्यात प्राविण्य मिळवलेल्या गुडेरियन आणि हॉथचे रणगाडे वरील हॉपनरच्या सैन्याच्या बाहेरच्या बाजूस असणार होते. जनरल हॉपनरच्या सैन्याने रशियाच्या सैन्याला खिंडार पाडले की हॉथचे रणगाडे व्याझमाला वळसा मारणार होते तर गुडेरियनचे रणगाडे ब्रायन्स्कला. हे झाल्यावर समोरचे सगळे रशियन सैन्य या वेढ्यात अडकणार होते. त्यानंतर थंडी मॉस्कोमधे व्यतीत करायची अशी सगळी योजना होती.

इकडे रशियन गोटात वातावरण काळजीचे, तंग पण जिद्दीचे होते. या पराभूत अवस्थेत हाताशी असणारे सैन्य योग्य रितीने तैनात करणे फार अवघड. सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते. मार्शल इव्हॅन कोकोनिएव्हची नुकतीच वेस्टर्न फ्रंटच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती व मार्शल येर्मेंको ब्रायन्स्क फ्रंटचे प्रमुखपद संभाळत होता. (रशियामधे त्या काळात डिव्हिजनला/आर्मीला फ्रंट असे म्हणत) या दोन्ही सैन्यामधे असलेल्या पोकळ जागा भरायचे अत्यंत महत्वाचे काम प्रथम उरकण्यासाठी उपलब्ध केलेले सैन्य राखीवदलातील होते. ते मॉस्कोवरुन येणार होते. शिवाय याचबरोबर येर्मेंकोने जर्मन फौजांवर ग्लुकॉव्ह येथे हल्ला करण्याचेही ठरविले.

रशियाकडे मॉस्कोच्या संरक्षणासाठी एकूण पंधरा आर्मी होत्या. दुसऱ्या महायुद्धात एका आर्मीमधे साधारणत: दोन किंवा त्याहून जास्त कोअर असायच्या म्हणजे अंदाजे एक लाख सैनिक. पण हे सैन्य राखीव असल्यामुळे यात अंदाजे ५०,००० सैनिक होते. या सैनिकांकडे छोटी हत्यारे होती पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे तोफा नव्हत्या. हे तसे दुय्यम प्रतीचे सैन्य होते आणि त्यांचे प्रशिक्षण ब्लिट्झक्रीगच्या अगोदर झालेले होते. त्यांना आधुनिक युद्धाच्या वेगाची कल्पनाच नव्हती. एवढेच नव्हे तर यातील बऱ्याच आधिकाऱ्यांना ब्लिट्झक्रीग म्हणजे काय याचीही कल्पना नव्हती.

पण स्टॅलिनकडे एक हुकमाचा एक्का होता आणि तो म्हणजे दूर सैबेरियामधे असणारे २५ डिव्हिजन पायदळ. हे सैन्य जपानच्या सैन्यासमोर खडे करण्यात आले होते. अत्यंत प्रतिकुल हवामानात तग धरुन लढणारे, खडतर प्रशिक्षण झालेले हे सैन्य जर जपानने आक्रमण केले नाही तर तो मॉस्कोच्या रक्षणासाठी वापरु शकणार होता. त्याच्या टोक्योमधील गुतहेरांनी जपान फक्त ब्रिटन व अमेरिकेच्या विरुद्ध लढण्याच्या मनस्थितीत आहे अशी खात्री दिल्यावर स्टॅलिनने सुटकेचा नि:श्वास टाकला.

मॉस्कोच्या नागरिकांची जर्मन सैन्याच्या आक्रमणास तोंड देण्याची तयारी झाली नव्हती. येल्नाच्या वळणावर जर्मन सैन्याला प्रखर प्रतिकारास तोंड द्यावे लागले याचे मुख्य कारण होते त्या सैनिकांना इतर रशियन आघाड्यांवर काय चालले आहे याची बिलकुल कल्पना नव्हती. किंबहुना असे म्हणता येईल की त्यांच्यापर्यंत त्या बातम्या न पोहोचण्याची खबरदारी घेतली गेली असणार. फिल्ड मार्शल बॉकच्या सैन्यात तीन पायदळाच्या आर्मी, दोन पँझर ग्रुप (हॉथ आणि गुडेरियनचे रणगाडे), हॉपनरचचा चवथा पँझर ग्रुप् जे लेनिनग्राडवरुन मॉस्कोवर चाल करुन आले होते, (सगळ्या मिळून १४ आर्मर्ड डिव्हिजन), ४६ पायदळाच्या डिव्हिजन, ७ मोटोराईझ्ड डिव्हिजन व या सर्वांना आकाशातून सहाय्य करण्यासाठी विमानांचे दोन फ्लिट व हजारो ८८ मि.मी च्या तोफा एवढे सैन्य होते. या कर्दनकाळासमान भासणाऱ्या सैन्यापुढे मॉस्को काय टिकाव धरणार असे सर्वांना वाटले. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी जगाने श्वास रोखला. या सैन्याच्या आक्रमणाने मॉस्कोची वाताहात झाली असती पण या सगळ्याला एक महिना उशीर झाला होता...

व्याझमा आणि ब्रायन्स्कच्या लढाईला एका ब्लिट्झक्रीगने सुरवात झाली. गुडेरियनच्या रणगाड्यांनी मोठ्या वेगाने ब्रायन्स्कवर मुसंडी मारली. ब्रायन्स्कमधे मार्शल येर्मेंन्कोचे मुख्यालय होते आणि मुख्य म्हणजे मॉस्कोच्या संरक्षणाची सर्व सुत्रे येथूनच हलत होती. सहजतेने गुडेरियनचे रणगाडे ब्रायन्स फ्रंटमागे १२५ मैलांवर असलेल्या ऑरेलला पोहोचले. हा सगळा प्रकार इतक्या वेगाने घडला की काही क्षण अनेक रशियन नागरिक रस्त्यावर जर्मन रणगाड्यांचे रशियन रणगाडे समजून स्वागत करीत होते.

पॅझर रणगाड्यांनी पटकन ब्रायन्स्क-ऑरेल रस्ता पार करुन कारचेव्हला धडक मारली. येर्मेंकोला तो वेढला जाण्याची रास्त भीती वाटत होती पण त्याला मरेतोपर्यंत लढण्याचा आदेश मिळाला होता त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. या वेढ्यात अखेरीस तीन रशियन आर्मी सापडल्या. त्याच दिवशी ऑपरेशन टायफूनचा पहिला भाग संपला असे म्हणायला हरकत नाही.
१३ ऑक्टोबरला मॉस्कोपासून फक्त १०० मैलावर जर्मन फौजा येऊन ठेपल्या. मग कॅलिलीन. शेवटी व्होल्गावरील पूल ताब्यात घेऊन जर्मन सैन्याने बोरोडिनोच्या जमिनीवर पाय रोवले.

बोरोडिनोला एक ऐतिहासिक महत्व आहे. १८१२ साली नेपोलियनचा रशियाने याच युद्धभूमीवर पराभव केला होता. स्टॅलिनला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती यावेळीही होईल अशी आशा वाटत होती. ‘रशियामधे एक प्रसिद्ध वाक्य आहे ‘रशियाचा आपल्या दोन सेनानींवर अत्यंत विश्वास आहे. ते रशियाला कधीच खाली मान घालायला लावणार नाहीत. जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी.’’ स्टॅलिनची याच सेनांनीवर बहुदा मदार असावी.

स्टॅलिनने त्याच्या कडव्या रायफल डिव्हिजन व्लॅडिओस्टॉकवरुन या युद्धभूमिवर रवाना केल्या. यांच्या बरोबर दोन आर्मर्ड ब्रिगेड होत्या ज्यात केव्ही-२ व टे-३४ रणगाड्यांच्या तुकड्या होत्या. हे सैनिक वर म्हटल्याप्रमाणे प्रशिक्षित व अनुभवी होते. त्यांच्याकडे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फरचे लांब कोट व बूट होते. नाहीतरी रशियात दुसरी एक म्हण आहे ‘‘कडाक्याची थंडी वगैरे असे काही नसते. फक्त तुमच्याकडे योग्य कपडे नसतात.’ या सैन्याने बोरोडिनोच्या युद्धभूमिवर अत्यंत कडवा प्रतिकार केला. शिवाय प्रथमच त्यांचे रणगाडे व्यवस्थित ठरलेल्या डावपेचाप्रमाणे हालचाली करत होते. वरुन रशियन स्टॉर्मोव्हिक विमाने जर्मनीच्या स्टुकांशी सामना करत होती. रणगाड्यांच्या बरोबरीने रशियन तोफखाना अखंड आग ओकत होता. जर्मन सैन्याची एक आख्खी रेजिमेंट प्रथमच रशियाच्या आघाडीवर गारद झाली पण अखेरीस विजय जर्मन सेनेचाच झाला.

या लढाईनंतर मात्र मॉस्कोमधे खरी खळबळ माजली. राजधानीमधे कागदपत्रे जाळण्यास सुरुवात झाली. लाल चौकातील तारे व लेनीनेचे शव सुरक्षित ठिकाणी हलवले गेले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सरळ गोळ्या घालण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली. २ लाख नागरिकांना कष्ट घेऊन चार दिवसाचे प्रशिक्षण देऊन मॉस्कोच्या रक्षणासाठी उभे करण्यात आले. शहरातील प्रत्येक स्त्री पुरुष संरक्षणाच्या कुठल्या ना कुठल्यातरी कामात गुंतला गेला. स्त्रीया व मुले रात्रभर ऐन थंडीत खंदक खणत होते. या वेळी मात्र स्टॅलिनला दडपशाही करण्याची गरज भासली नाही. सर्व नागरिक आपल्या शहराच्या रक्षणासाठी झटू लागले.

आक्रमणाची व संरक्षणाची अशी धांदल उडाली असतानाच पाऊस सुरु झाला. दोन्ही बाजूंना याचा अर्थ चांगलाच माहीत होता. पावसानंतर बर्फ पडणार. त्याच रात्री जमीनीची दलदल झाली. आता रणगाडे फक्त मुख्य रस्त्याचा वापर करु शकत होते. (ते रस्तेही खराब झालेच होते) एखादा रणगाडा चुकून जरी बाजूला गेला की त्या चिखलात रुतत होता. ज्या वेगाने टायफूनचे आक्रमण सुरु झाले होते ते आता खुरडत चालू लागले. जर्मन पँझर चिखलात रुतत होते तर याच्या उलट रशियन रणगाड्यांचे पट्टे चांगले रुंद असल्यामुळे ते एवढे रुतत नव्हते. शिवाय त्यांना त्या भूभागाची चांगली माहिती होती. डोंगरातून खाली येऊन ते जर्मन रणगाड्यांची शिकार करु लागल्यावर जर्मन सैन्याचा आक्रमणाचा संवेग ओसरला. पण जर्मन पायदळ पुढे सरकत होते आणि जंगलात लपलेल्या सैबेरियन व मंगोलियन सैनिकांच्या गोळ्यांचे शिकार झाले. रशियन सैनिकांना युद्धकैदी न करण्याचे स्पष्ट आदेश होते. याचाच अर्थ त्यांची कत्तल होत होती.

वरुन बर्फाळ पाऊस जर्मन सैन्याला झोडत होता आणि खाली पिसवांनी त्यांचे रक्त काढले. मॉस्को आता दृष्टीक्षेपात होते आणि ते जिंकल्यावर हे युद्ध संपणार होते. थोडीशी जिद्द दाखविली तर हा विजय साध्य होणार होता पण सामान्य जर्मन सैनिकाची छाती रशियाचा अवाढव्य प्रदेश बघूनच दडपून गेली. त्या प्रदेशातील नद्यांचे पात्र एवढे रुंद होते की जर्मन तोफांचे गोळे समोरच्या किनार्यापर्यंत पोहोचत नसत. उन्हाचा चटका देणारे हवामान केव्हा बर्फाच्या वादळात बदलेल हे सांगणे मुष्कील होते. घरापासून ते इतके दूर आले होते की त्याची कल्पनाच त्यांना निराश करत असे. जर्मन एस् एस् बाबतीत तर हे जास्त खरे होते कारण त्यांना हजारो मैल जमीन तुडवत चालावे लागत होते. आत्तापर्यंत ते विजयी होत होते हे खरे असले तरी रशियाच्या भूमीचा विस्तार बघता जर्मन रणगाड्याचा एक अधिकारी म्हणाला, ‘आपण जर असेच पुढे जात राहिलो तर मला वाटते आपली गाठ मृत्युशीच पडेल.

मॉस्कोच्या रस्त्यावर अजून तीन अडथळे होते ते म्हणजे नॅरो-फॉमिन्स्क, इस्ट्रा व टुला. या तिन्ही ठिकाणी रशियन फौजांनी चांगले पिलबॉक्स उभे केले होते, शिवाय अगणित खंदक खणले होते. जर्मन सैनिकांना प्रत्येक फुट जमीन रक्ताची किंमत देऊन जिंकावी लागत होती. मॉस्कोला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोहोचेपर्यंत त्या रस्त्याची खड्ड्यांनी चाळण उडाली होती. पण दहाव्या पँझर डिबव्हिजनचे रणगाडी त्या रस्त्यावर प्रथम पोहोचले आणि थांबले. त्यांचे रणगाडे खड्ड्यातील चिखलात रुतत होते. इतर साहित्याचा व दारुगोळ्याचा पुरवठा होत नव्हता. ते थांबल्यावर रशियन रणगाड्यांनी त्यांची शिकार केली. हे रणगाडे हल्ला करुन पळून जात. दक्षिणेला तीस मैलांवर ७८वी इन्फंट्री डिव्हिजनही अशीच चिखलात फसली. मॉस्कोपासून तीस मैलावर असलेले फॉमिन्स्क जर्मन मोटोराईझ्ड रेजिमेंटस्ने घेतले मात्र त्यांनाही तेथेच थांबावे लागले. त्यांनी नारा येथील पूल काबीज केला पण त्यावरुन जाणारे रणगाडे मात्र अलिकडेच चिखलात रुतून बसले होते. जमीन गोठून परत कडक होईपर्यंत जनरल बॉकने आक्रमण थांबवायचा निर्णय घेतला, नव्हे त्याला त्याशिवाय तरणोपायच नव्हता.

दक्षिणेला ब्लिट्झक्रीगतज्ञ गुडेरियनचे रणगाडे टुला घेण्यासाठी झगडत होते. ऑरेलच्या विजयानंतर प्रथमच गुडेरियनच्या रणगाड्यांना थांबावे लागले. रशियन सैन्यामुळे नाही तर चिखलामुळे. टुला घेतल्यावर त्यांच्या आणि मॉस्कोच्या मधे कोणताही अडथळा नव्हता. आणि शिवाय वेढा पूर्ण होणार होता. टुलावर गुडेरियनने भीषण हल्ला चढवला मात्र त्याचे रणगाडे चिखलात फसू लागल्यावर त्याचाही वेग मंदावला. अन्न व दारुगोळा वेळेवर न पोहोचल्यामुळे सैनिकांना व तोफांना उपवास पडू लागले.

आर्मी ग्रुपच्या सेंट्रलच्या ६०० मैल रुंदीच्या आघाडीवर अशा प्रकारे नोव्हेंबरमधे आक्रमण जवळजवळ थांबले. याच काळात जर्मन सैन्याच्या दुर्दैवाने कसलेले, अनुभवी, कडवे सैबेरियन सैनिक प्रतिकारासाठी या युद्धभूमीवर अवतीर्ण झाले. चिखलाने व पावसाने अडकलेले जर्मन सैन्य हताशपणे हिमाची वाट पहात होते. समोर काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अखेरीस सहा नोव्हेंबरला हीम पडायला लागले. त्याने जमीन टणक झाली. रणगाड्यांची चिखलापासून सुटका झाली खरी पण माणसांच्या हालात भरच पडली. पण रणगाडे पळू लागल्यावर परत क्लिनवरचे आक्रमण हाती घेण्यात आले.
मॉस्कोवरचे आक्रमण व्यापक, भयानक, प्रचंड शक्तिशाली होते. दक्षिणेकडून ओरेल, ब्रायन्स्क व टुलामधून ‘पँझर ग्रुप गुडेरियन’ या रणगाडादलाने भीषण हल्ला चढवला. आर्मी ग्रुप सेंटर आणि दुसऱ्या आर्मीने कालूगा मधून जोरदार मुसंडी मारली तर हॉपनरच्या चौथ्या पँझर ग्रुपने रोस्लाव्हमधून युखनॉव्ह मार्गे आक्रमण केले. त्याचवेळी आर्मी ग्रुप नॉर्थमधील जनरल हॉथच्या तिसर्या पँझर ग्रुपने व्याझमा आणि बोरोडिनोमधून आक्रमण केले. या हालचालींबरोबर उत्तरेला नवव्या आर्मीने कालिनीनच्या दिशेने आगेकूच केली. सगळ्या मिळून वेअरमाख्टने एकूण ४४ पायदळाच्या डिव्हिजन या युद्धात उतरवल्या होत्या. सोबतीला ८ मोटरचलीत डिव्हिजन्स व १४ पँझर डिव्हिजन्स तैनात करण्यात आल्या. गुडेरियन ग्रुपने ३० सप्टेंबरला व इतर सैन्याने २ ऑक्टोबरला आक्रमणास सुरवात केली.

हिटलर म्हणाला, ‘आज या वर्षातील शेवटच्या पण सर्वात महत्वाच्या आक्रमणास सुरवात होत आहे’ मॉस्कोभोवती फास आवळत असतानाच वेअरमाख्टने रशियन फौजा नष्ट करण्याचे काम थांबवले नव्हते. जनरल हॉथ आणि जनरल हॉपनर यांच्या सैन्याने रशियाच्या बत्तीसाव्या आर्मीचा व्याझमा येथे १४ ऑक्टोबरला सर्वनाश केला तर गुडेरियन ग्रुपच्या दुसऱ्या आर्मी ग्रुपने रशियाच्या तिसऱ्या आर्मीचा ब्रायन्स्क येथे २० ऑक्टोबरला फडशा पाडला. इकडे उत्तरेला आर्मी ग्रुप नॉर्थची सेना नोव्हगोरोडला १६ ऑगस्टला पोहोचली आणि १ सप्टेंबरला त्यांनी जेथून लेनिनग्राडवर तोफा डागता येतील अशा ठिकाणी तळ ठोकला. झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या कल्पनेने प्रेरित होऊन फिनलँडच्या सैन्यानेही या आक्रमणात उत्साहाने भाग घेतला होता. त्यांनी व्हिपुरी काबीज करून मोठ्या धडाक्याने उरलेले कॅरेलिना इस्थमस काबीज करून लेनिनग्राडला वायव्य दिशेने वेढा घातला. १५ सप्टेंबरला रशियाचे सगळ्यात दुसरे मोठे शहर उर्वरित रशियापासून तोडण्यात आले व ते काबीज न करता ते उपासमारीने शरण येईल अशा अंदाजाने त्याला मजबूत वेढा घालण्यात आला. मागे वळून पाहताना हाही निर्णय महत्वाचा होता हे ध्यानात येते. जर्मनीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य होता कारण यामुळे एका महिन्यातच ११००० नागरीक उपासमारीने मृत्युमुखी पडले तर वेढ्याच्या पहिल्या तीन महिन्यात बाँबवर्षावात १२५०० नागरिक मृत्युमूखी पडले होते. या भयंकर वेढ्यात लेनिनग्राडने ९०० दिवस तग धरला. या तीन वर्षात तेथे १० लाख मृत्यु झाले म्हणजेजवळ जवळ रोज ११००. युद्धाच्या इतिहासातील या रक्तरंजित वेढ्यात जेवढी माणसे मारली गेली तेवढे ब्रिटन आणि अमेरिकेचे सैनिक या महायुद्धात मारले गेले नव्हते यावरून या वेढ्याची भीषणता लक्षात येऊ शकेल.

१२ सप्टेंबरला लेनिनग्राडच्या अन्नधान्य अधिकारी पाव्हलाव याने जे काम करत नाहीत अशा जनतेसाठी आणि मुलांसाठी दिवसाला पाच औंस पाव आणि महिन्याला एक पौंड मांस व बारा औंस सूर्यबियांचे तेल असे रेशनचे नवीन प्रमाण जाहीर केले. हे फारच कमी होते आणि पुढे पुढे तर यातही कपात करण्यात आली. २० नोव्हेंबरला आघाडीवर लढणाऱ्या सैनिकाला रोज ५०० ग्रॅम ब्रेड, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना रोज २५० ग्रॅम व उरलेल्यांना रोज १२५ ग्रॅम असे प्रमाण ठरविण्यात आले. १२५ ग्रॅम म्हणजे ब्रेडचे दोन काप होतात हे लक्षात घेतल्यावर अन्नाचे दुर्भिक्ष कसे होते हे कळते. एका इतिहासकाराने याचे वर्णन करताना लिहिले आहे, ‘जगण्यासाठी लोकांनी काय केले नाही? काटक्या गोळा करून त्या उकळून खाल्ल्या व उरलेले पाणी सूप म्हणून प्यायले. कुजलेला झाडपाला, हाडांचा भुगा करुन त्याचा अन्नात वापर करण्यात आला. ब्रेड तयार करताना पिठात लाकडाचा भुस्सा घालणे ही सर्वसामान्य बाब होती. अर्धवट बुडालेल्या जहाजातून बुरशी आलेले धान्य वापरण्यासाठी बाहेर काढण्यात आले. लेनिनग्राडच्या ब्रेडमधे त्यावेळी दहा टक्के सरकीची पेंड असणे ही काही आश्चर्याची बाब राहिली नव्हती. घरात पाळलेले प्राणी खाण्यात आले, वाळत टाकलेली कातडी चघळण्यात आली, किडे खाण्यात आले एवढेच काय भिंतीला कागद चिकटवण्यासाठी जी खळ वापरण्यात येई ती ही खाण्यात आली कारण ती बटाट्यापासून तयार केल्याची शक्यता होती. प्रयोगशाळेत व्यवच्छेदनासाठी जमा केलेले प्राणी खाण्यासाठी राखून ठेवण्यात आले. येलेना स्क्रायबिना नावाच्या एका स्त्रीने त्या मन:स्थितीबद्दल लिहिले ‘मरण किती सोपे आहे आज. फक्त मरायचे आहे हा विचार मनात आणून पलंगावर झोपले की परत उठायची शक्यताच नाही.’ पण माणसाची जगण्याची आस प्रचंड असते. काही माणसांची जिवंत राहण्यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची तयारी होती. २६६ नागरिकांना मानवी देह खाल्ल्याबद्दल अटक करण्यात आली. एनकेव्हिडीच्या एका अहवालात लिहिले आहे ‘बाजारात मानवाचे मांस विक्रीला आले आहे आणि स्मशानभूमीत माणसांच्या प्रेतांचे जितराबांसारखे ढीग लागले आहेत. कसल्या शवपेट्या अन कसले काय......

सोव्हिएत रशियाच्या फौजांनी हा वेढा फोडून शहरात अन्नधान्य पोहोचवायचे काही यशस्वी यत्न केले पण त्याची संख्या गरजेपेक्षा इतकी कमी होती की त्याने काही विशेष फायदा झाला नाही. ऑक्टोबरमधे लेनिनग्राडवर ७५०० बाँब, ९९११ शक्तिशाली स्फोटक बाँब टाकण्यात आले; नोव्हेंबरमधे ११२३० व ७५०० तर डिसेंबरमधे ६००० व २००० बाँब टाकण्यात आले. १९४१च्या डिसेंबरमधे ख्रिसमसला गोठलेल्या लाडोगा तलावावरून रसद आणली गेली तरीसुद्धा ३७०० नागरीक उपासमारीने मेलेच. या गोठलेल्या तलावावरून येताना वाहनचालकांनी पटकन उडी मारता यावी म्हणून या गोठवणाऱ्या थंडीतही गाड्यांचे दरवाजे उघडे ठेवले होते. रशियाच्या युद्धनौका बंदरात बर्फामुळे अडकून पडल्या होत्या आणि विमानविरोधी तोफांचे काम करत होत्या अर्थात बर्फ नसता तरीही त्यांना बंदर सोडता आलेच नसते कारण बाल्टिक समुद्रात जर्मन नौकांचा सुळसुळाट होता. वसंत ऋतूत जेव्हा बर्फ वितळायला लागला तेव्हा बर्फाखालून गोठलेली अगणित प्रेते कुजायच्या आत बाहेर काढण्यात आली नाही तर रोगराई पसरण्याची भीती होती.

वर म्हटलेला जो धुवांधार पाऊस झाला त्याने हिटलरच्या रशिया जिंकण्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी फिरवले असे म्हणण्यास हरकत नाही. त्या पावसाला रशियात ‘रासपूट्टिसा’- रस्ते विरघळवणारा पाऊस असे म्हणतात. पावसामुळे झालेल्या चिखलामुळे जर्मन सैन्याच्या कालिनिन, कालूगा व टुलाच्या दिशेने होणाऱ्या आक्रमणाला खीळ पडली. रशियाची व्याझमा बचाव फळी कोलमडली पण नशिबाने मोझायिस्कने बरीच तग धरली. त्यामुळे जर्मन सैन्य मॉस्कोपासून ४५-७५ मैल अंतरावर अडकून पडले. बऱ्याच वर्षानंतर जनरल रूनस्टेडने बार्बारोसामधे जिंकण्याची आशा होती का ? या विषयावर विचार मांडताना लिहिले , ‘हिवाळा यायच्या कितीतरी आधीच खराब रस्त्यांमुळे आणि चिखलामुळे होणाऱ्या खोळंब्यामुळे बार्बारोसा विजयी होण्याची शक्यता दुरावत चालली होती. युक्रेनमधील काळ्या चिकणमातीचा दहा मिनिटाच्या पावसानेही भयंकर चिखल होतो ज्याने वाहनांची सर्व हालचाल बंद होते. वेळेच्या शर्यतीत हा मोठाच अडथळा होता. हे कमी की काय म्हणून रशियामधे रेल्वे नसल्यामुळे रसदीचा पुरवठा मर्यादित होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कितीही डिव्हिजन नष्ट करा, त्यांची जागा घेण्यासाठी नेहमीच दुसऱ्या डिव्हिजन तयार असायच्या व आमचा रस्ता रोखायच्या.’

जसजशी हवा बदलत गेली तसे तापमान खाली जाऊ लागले पण त्याने जमीन घट्ट झाली. त्यामुळे जर्मन सैन्याला मॉस्कोला वेढा घालण्याची अजून एक संधी मिळाली खरी पण त्यांचे दोनास एक या प्रमाणात असलेले प्राबल्य झपाट्याने कमी होत गेले कारण स्टॅलिनने त्याच्याकडे होते नव्हते तेवढे सैन्य आता या लढाईत ओतले. ७ नोव्हेंबरला लालक्रांतीच्या वाढदिवसानिमित्त, क्रेमलीनमधून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्याने लेनिन, नेव्हस्की, मायकेल कुटझॉव्ह यांच्याबरोबर ब्रिटन आणि अमेरिका यांच्याकडून मिळणार असलेल्या मदतीचा उल्लेख केला. यातील विरोधाभास असा की स्टॅलिनच्या नास्तिक राजवटीने या संत राजाचे-नेव्हस्की व ज्याच्या विरूद्ध क्रांती झाली त्या राजाचा सेनापती-कुटझॉव्ह यांचे नाव या भाषणात आदराने घेतले होते.

जर्मन सैन्याने तुलनेने मॉस्कोमधील फारच कमी (फक्त तीन टक्के) इमारती नष्ट केल्या. याला कारणीभूत होत्या रशियाच्या अचूक व शक्तिशाली विमानविरोधी तोफा व बाँबरविरोधी इल्युशीन आणि एअरकोब्रा जातीची फायटर विमाने. यांनी मॉस्कोला चांगलेच संरक्षणकवच पुरवले. या खेरीज मॉस्कोवर मोठमोठे बराज बलून्स तरंगत असत त्यांनीही बरीच मदत केली.
हा एक मोठ्या आकाराचा फुगा असायचा आणि याला दोरखंडाने किंवा लोखंडी साखळ्यांनी बांधलेले असायचे. जमिनीलगत उडणाऱ्या विमानांपासून हे संरक्षण करायचे. काही वेळा त्यात स्फोटकेही भरलेली असायची. उंचावरुन उडणाऱ्या विमानांसाठी याचा फारसा उपयोग व्हायचा नाही कारण जास्त वर सोडल्यास त्या साखळ्यांचे वजन वाढून ते खाली यायचे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मॉस्कोच्या परिघावर रशियाच्या ३७ कॅलिबरच्या दोन टनी वजनाच्या विमानभेदी तोफांची ठाणी उभी केली होती. या तोफा ७३० ग्रॅम वजनाचे गोळे डागायच्या. त्याचा वेग सेकंदाला ९०८ यार्ड असायचा. मिनिटाला १८० फैरी झाडणाऱ्या या तोफांचे गोळे १९५०० फूट उंची गाठू शकत होते आणि त्यांची अचूकता ९००० फूटापर्यंतत कौतुकास्पद होती. याच युद्धात फिरत्या वाहनातून डागता येणाऱ्या छोट्या क्षेपणास्त्रांचा पहिला वापर करण्यात आला त्याचे नाव होते काट्युशा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे रॉकेट लाँचर अमेरिकेकडून भेट मिळालेल्या स्टुडबेकर ट्रकमधे बसविलेल्या होत्या. याच अस्त्राला लिटल केट (छोटी केट) असे गमतीने म्हणण्यात येई. पण त्याच्या या नावावर जाऊ नका. ही एक १३२ कॅलिबरची, १.४१ मिटर लांबीची, ४२.५ किलो वजनाची व ५ किलो वजनाची रॉकेट डागणारी शक्तिशाली तोफ होती. याचा पल्ला होता ८.५ कि.मि आणि त्याची संहारक शक्ती कल्पनेपेक्षा जास्त होती कारण ती एकाच वेळेच १६ रॉकेट्स सोडायची. जर्मन सैनिकांनी मोठ्या कष्टाने रशियाची ही तोफ त्याच्यावर संशोधन करण्यासाठी काबीज केली. ही हातात पडणे तसे मुष्किल होते कारण ज्यांनी ही तयार केली त्यांनी ती सहजपणे नष्ट करता येईल अशीही त्यात सोय ठेवली होती. सोव्हिएट सेनेने जर मॉस्को जर्मन सैन्याच्या हातात पडले तर ते शहर नष्ट करण्याच्या सर्व प्रकारच्या योजना आखल्या होत्या.

१५ नोव्हेंबरला मॉस्कोवर प्रत्यक्ष हल्ले चालू झाले व मॉस्कोच्या वेशीवर तिसऱ्या पँझर ग्रुपच्या तुकड्या धडका मारू लागल्या. २७ तारखेला त्यांचे रणगाडे व्होल्गा कालव्यापाशी पोहोचले. इकडे गुडेरियन पँझर ग्रुपच्या सेना काशीराला २५ तारखेला पोहोचल्या पण त्या अजून पुढे जाऊ शकल्या नाहीत. हवामानाने जर्मन फौजांना साथ दिली नाही हेच खरे आहे. पण हिटलरने मॉस्कोसाठी पुरेसे सैन्य उपलब्ध करून दिले नाही ही वस्तुस्थिति आहे. बार्बारोसा सुरू झाल्यापासून त्यांचे ७५०,००० सैनिक युद्धाबाहेर फेकले गेले होते त्यात २००,००० सैनिक व ८००० अधिकारी ठार झाले होते. दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे पारडे बार्बारोसाच्या वेळी कुठेही झुकू शकले असते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही पण याच वेळी तिसऱ्या आणि दुसऱ्या पँझर ग्रुपच्या सैन्याला इस्ट्रिया-क्लिन व डॉन-उला येथे माघार घेऊन तेथे मोर्चेबांधणी करावी लागली. जर हिटलरने २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात गुडेरियनच्या सैन्याला मूळ मोहिमेतून काढून दक्षिणेकडे २५० मैल दूर पाठवले नसते तर जर्मनीने मॉस्को जिंकले असते का ? निश्चित सांगता येत नाही पण तसे झाले असते असे मानण्यास जागा आहे !

अखेरीस ३० सप्टेंबरला गुडेरियन ग्रुपने उत्तरेकडे मॉस्कोच्या दिशेने आगेकूच केली आणि त्याच दिवशी जनरल क्लिस्टच्या १-पँझर ग्रुपने दक्षिणेत नायपर व सामारा या नद्या पार करून रॉस्टॉव्ह-ऑन-डॉनच्या दिशेने कूच केले. याच सेनेच्या काही डिव्हिजन्सने दक्षिणेत एझॉव्हच्या समुद्रावरील बर्डियान्स्क काबीज करून तेथे असलेल्या रशियाच्या आठव्या आर्मीच्या १००,००० रशियन सैनिकांना युद्धबंदी केले. या सेनेलाही उत्तरेकडे बर्फाच्या आणि चिखलामुळे अडचणी सोसाव्या लागल्याच पण त्यांनी आपली आगेकूच तशीच चालू ठेवून २४ ऑक्टोबरला खार्कॉव्ह व २० नोव्हेंबरला रॉस्टॉव्ह काबीज केले. घाईघाईने उभ्या केलेल्या रशियाच्या ३७व्या आर्मीने रॉस्टॉव्हच्या येथे जर्मन सेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता लक्षात घेऊन जनरल रूनस्टेडने आर्मी ग्रुप साऊथला मियुस व डॉनेट नद्यांच्या काठावर माघार घ्यायची आज्ञा दिली. हिटलरला अर्थात हे मान्य नसल्यामुळे त्याने ही आज्ञा रद्द करण्याचा आदेश सोडला परंतु त्याला उशीर झाल्यामुळे रुनस्टेडने ३० नोव्हेंबरला एक तार हिटलरला पाठवली त्यात त्याने म्हटले होते ‘माघार न घेणे हा शुद्ध वेडेपणा होईल. पहिली गोष्ट म्हणजे सैन्याला त्याशिवाय गत्यंतर नाही. जर माघार घेतली नाही तर या सेनेचा सर्वनाश होईल. आपला हा आदेश ताबडतोब रद्द करावा किंवा मला या जबाबदारीतून मोकळे करावे.’ दुसऱ्याच दिवशी हिटलरने जनरल रुनस्टेडला बडतर्फ केले. जनरल रुनस्टेडला याच वेळी एक छोटा ह्रदयविकाराचा एक झटकाही आला होता तेच कारण पुढे करून त्याला क्षमा करून परत बोलाविण्यात आले आणि एक भली मोठी रक्कम त्याला आत्तापर्यंतच्या कामगिरीदाखल बक्षीस देण्यात आली. अपमान आणि बक्षिस याने शरमिंदा झालेल्या रुनस्टेडने त्याच्या आयुष्यात त्या रकमेला कधीही हात लावला नाही.

आत्तापर्यंत आक्रमक असलेल्या जर्मन सैन्याला ६ डिसेंबरपासून एका अत्यंत विस्तृत आघाडीवर बचावात्मक धोरण स्वीकारणे भाग पडले. एझॉव्ह समुद्रावरील रॉस्टॉव्ह पासून सुरु होऊन ही युद्धरेषा जर्मनसेनेच्या ताब्यातील इझियम व येलेट्सला स्पर्श करून रशियन सेनेच्या ताब्यातील टुला व मॉस्कोतून जाऊन लेनिनग्राडपर्यंत पोहोचली होती. ६ डिसेंबरला रशियाच्या जनरल झुकॉव्हने आपल्या ४० सैबेरीयन डिव्हिजन्सला हिवाळ्यातील अत्यंत महत्वाच्या आक्रमणाचा आदेश दिला. हे असले प्रतिआक्रमण या युद्धात आत्तापर्यंत जगाने पाहिले नव्हते. आक्रमक असलेले जर्मन सैन्य मोठ्या प्रमाणावर धडाधड शरणागती पत्करत होते. दोन वर्षात हे पहिल्यांदाच होत होते.

जनरल कायटेलने जर्मनीची अधोगती निश्चित केव्हा चालू झाली यावर भाष़्य करताना म्हटले, ‘११ डिसेंबर १९४१! हवामान बदलले. त्याचे चिखल आणि गाळ यातून मरणीय थंडीत रुपांतर झाले. आमच्या फौजांचे या हवामानात अतोनात हाल झाले कारण त्यांचे कपडे हे फक्त साध्या थंडीसाठी योग्य होते.’ पुरवठा करणारी रेल्वे व्यवस्था पूर्ण कोलमडली कारण वाफ होण्यासाठी लागणारे पाणी गोठून त्याचा बर्फ झाला होता. कायटेलच्या मते हिटलरचा माघार घेण्यास ठाम नकार हा समजण्यासारखा होता ‘कारण त्याला माहीत होते की काही मैल माघार घेणे म्हणजे रणगाडे, तोफा यासारख्या अवजड युद्धसाहित्यावर पाणी सोडणे. हे युद्धसाहित्य आता अत्यंत महत्वाचे होते आणि त्याच्या जागी दुसरे पाठवणे हे अशक्यच होते. वस्तुस्थिति ही होती की लढण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.’ याच काळात एका जनरलने हिटलरकडे ३० मैल माघारीची परवानगी मागितल्यावर हिटलरने त्याला उपहासाने विचारले ‘३० मैल अलिकडे थंडी कमी आहे का ? आणि आत्ता माघार घेतली तर रशियन सैन्य राईशच्या सीमेवर थांबणार आहे का ? जेणे करून तुम्हाला त्यांच्याशी युद्ध करायला लागणार नाही?’ यातील उपहास जरी सोडला तरी या प्रश्नात तथ्य होते हे नाकारता येणार नाही. कायटेलने पुढे लिहिले ‘वर्षाच्या अखेरीस फ्यूररच्या मुख्यालयात आम्ही ख्रिसमस अत्यंत तणावात साजरा केला.’

ज्या दिवशी युद्धाला कलाटणी मिळाली, म्हणजे कायटेलच्या मते ११ डिसेंबर १९४१ रोजी हिटलरने अजून एक आत्मघातकी निर्णय जाहीर केला तो म्हणजे त्याने अमेरिकेबरोबर युद्ध घोषित केले. हे युद्ध घोषित झाल्यावर पहिल्यांदा काय झाले असेल तर अमेरिकेचा रशियाला होणारा शस्त्रपुरवठा कितीतरी पटीने वाढला. यात रणगाडे, विमाने, ट्रक, दारूगोळा आणि इतर अनेक युद्धोपयोगी वस्तू होत्या. उदा. यात शस्त्रक्रियांना लागणारऱ्या १५००० करवती आणि सुऱ्यांचाही समावेश होता.
लुफ्तवाफ व वाफनच्या सैनिकांना थंडीचे पायघोळ जाड कोट पुरवण्यात आले होते तरी वेअरमाख्टच्या बहुसंख्य सैनिकांच्या नशिबी हे कोट नव्हते. जर्मनीच्या कार्यक्षम आणि दूरदृष्टि असणाऱ्या जनरल स्टाफकडून हे अपेक्षित नव्हते. रशियाच्या सैन्याच्या मोसीन बनावटीच्या रायफल्स व मशीनगन गोठून अडकत नसत याउलट श्माईसर बनावटीच्या जर्मन मशीनगनमधील वंगण गोठायचे. इतिहास प्रसिद्ध युद्धनीतितज्ञ हेलमुथ फॉन मॉल्टके म्हणतो ‘एखाद्या युद्ध मोहिमेची आखणी खूप अगोदर करून त्याबरहुकूम ती मोहीम अचूकपणे पार पाडता येते, हा एक भ्रम आहे. जेव्हा दोन सैन्यांची टक्कर होते त्या क्षणापासून होणाऱ्या प्रत्येक चकमकींच्या निकालांमुळे दररोज नवीन परिस्थिती उद्भवत असते.’ हे त्याचे वाक्य सर्वसाधारणपणे बऱ्याच मोहिमांना लागू पडते, बार्बारोसाला तर निश्चितच. पण रशियामधील कडाक्याच्या थंडीचा व त्याच्यावर मात करण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांचा तरी त्यांना अचूक अंदाज यायला हवा होता आणि म्हणे अशी अचूक आखणी करण्यासाठी जर्मन मुख्यालयाची प्रसिद्धी होती. फाजील आत्मविश्वासाने जर्मन लष्कराच्या पुरवठा विभागाने कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लोकरीचे कपडे, कोट, मोजे इत्यादि..सामान पाठवलेच नव्हते आणि आता असे लाखो कपडे पाठाविण्याची वेळ आल्यावर त्यांची भंबेरी उडाली. आघाडीवर काही प्रमाणात जर्मन सैन्याने शत्रूचे कपडे वापरून आपली गरज भागवली खरी पण त्याचे प्रमाण फारच फुटकळ होते. २० डिसेंबर १९४१ रोजी गोबेल्सने नागरिकांच्या भावनांना हात घालून गरम कपडे देण्याविषयी आवाहन केले ‘आपल्या एकाही सैनिकाला जर त्या कडाक्याच्या थंडीचा त्रास झाला तर जे घरच्या उबेत बसले आहेत त्यांचा एकही क्षण सुखात जाणार नाही’ पण जर्मनीमधे अगोदरच दोन वर्षे कपड्यांवर नियंत्रण असताना असे कपडे मिळवणे अवघडच होते.

बाश्टेसगाडन येथे सहज बोलताना हिटलरने वेळोवेळी जे काही उद्गानर काढले त्यावरून हिटलर स्वत:च्या सैनिकांबद्दल एवढा बेफिकीर का होता यावर थोडाफार प्रकाश पडतो. हिटलरचे आधुनिक युद्धातील हवामानाविभागाबद्दल विचार किती बुरसटलेले होते हे त्याच्या खालील उद्गारावरुन समजून येते. जर जर्मन लष्कराने हवामान विभाग आधुनिक केले असते तर कदाचित ...
बोरमनशी बोलताना तो म्हणाला ‘या हवामानखात्याच्या अंदाजांवर विसंबून राहता येत नाही. यांना पायदाळातून तोडले पाहिजे.’ त्याला लुफ्तवाफच्या आधुनिक हवामान विभागाबद्दल माहिती होती व ते खाते उत्कृष्ट काम करते याबद्दलही माहिती होती पण जेव्हा पायदळाचा प्रश्न येई तेव्हा ते शास्त्र कुचकामी आहे असे त्याचे ठाम मत होते. तो स्वत:ला हवामानशास्त्राचा तज्ञ समजत असे (तसे तो स्वत:ला सगळ्याच विषयातील जागतिक दर्जाचा तज्ञच समजत असे). तर हा जागतिक दर्जाचा तज्ञ म्हणाला, ‘हवामानशास्त्र हे काही खरे शास्त्र नाही. यासाठी आपल्याला अतींद्रिय शक्ती असलेली माणसे, जी निसर्गात राहतात त्यांची आवश्यकता लागेल. या माणसाला आयसोबार आणि आयसोथर्म म्हणजे काय हे कळले नाही तरी चालेल. ही माणसे लष्करी गणवेष परिधान करण्यास कदाचित योग्य नसतील कारण काहींना कुबड असेल, तर काही फेंगड्या पायाचे असतील तर काहींना अर्धांगवायू झालेला असेल. तसेच ते नोकरशाहीतही सामावून घेतले जाऊ शकणार नाहीत.’
‘या मानवी वायूदाबमापकांना (हिटलर अशा माणसांचा याचप्रकारे उल्लेख करत असे व ही माणसे खरे म्हटले तर आर्य वंशाच्या व्याख्येत बसत नाहीत असेही त्याचे मत होते) घरात बसवून त्यांना फुकट दूरध्वनी देण्यात येईल व ते राईशसाठी हवामानाचा अंदाज देतील. या माणसांना पक्षांची चांगली जाण असेल, ढगांच्या हालचालीतून ते हवामान वर्तवू शकतील, त्यांना हवेची जाण असेल, थोडक्यात हे काम गणिती नाही त्याच्याही पलिकडचे आहे ते हीच माणसे करू जाणे.’

हे वाचल्यावर हसावे का रडावे हे समजणे अवघड आहे...

हिटलरला जर असे वाटत असेल की वेअरमाख्टचे सैनिक रशियात शून्याच्या खाली, थंडीत सहज तग धरू शकतील तर त्याची ती मोठीच चूक होती. बार्बारोसात रशियावरच्या आक्रमणाचा खोलवर विचार केला गेला होता असे म्हणतात. खरे खोटे तेच जाणोत. रशियात पोहोचल्यावर उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केला गेला होता. उदाहरणार्थ रशियन भाषेत प्रश्न कसे विचारायचे यावर एक पुस्तिकाच तयार केली गेली होती. ‘सामुहिक शेती संस्थेचा अध्यक्ष कुठे आहे ?’ ‘तुम्ही कम्युनिस्ट आहात का?’ ( याचे उत्तर नकारार्थी देणे फायद्याचे असे) असे अनेक प्रश्न व त्यांच्या उत्तरांबद्दल त्यात ऊहापोह केला गेला होता पण आश्चर्याची बाब म्हणजे थंडीत वापरायच्या कपड्याबद्दल फारच थोडा विचार केला गेला होता आणि त्या थंडीत संरक्षण होईल असे कपडेही सैनिकांना पुरवले गेले नव्हते. रशिया तीन महिन्यात, वसंत ऋतूच्या आत म्हणजे सप्टेंबरच्या अखेरीस काबीज होईल या हिटलरच्या गैरसमजुतीवर आधारित मतामुळे हे सर्व घडत होते.

थंडीपासून रक्षण करणारे कपडे नसल्याचे परिणाम भयंकर होते. कर्झिओ मालापार्टे नावाच्या इटालियन युद्धवार्ताहराने त्याच्या कापूट्ट नावाच्या कादंबरीत तो वॉर्सामधे एका रस्त्याच्या कडेला कॉफीच्या दुकानात कॉफी पीत असताना पूर्व आघाडीवरून माघारी येत असलेल्या जर्मन सैनिकांचे वर्णन केले आहे: ‘माझ्या लक्षात एकदम एक भयंकर गोष्ट आली. या परतणाऱ्या सैनिकांना पापण्याच नव्हत्या. मी भूवया नसलेले सैनिक मिन्स्कच्या रेल्वेस्टेशनवर बघितले होतेच पण हे दृष्य अतीभयंकर होते. हजारो नाही लाखो सैनिकांना या थंडीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. कित्येकांचे कान, गाल, बोटे व इतर अवयव हिमदंशांनी कुरतडले होते. कित्येकांचे केस गळून गेले होते....थंडीने होरपळून पापण्या एखाद्या खपलीप्रमाणे गळून पडत असत.... त्यांना फक्त वेड लागायचे बाकी होते.’

युद्धाच्या तयारीबाबत दाखवलेल्या अनास्थेने वेअरमाख्टच्या सैनिकाला या अवस्थेपर्यंत आणून सोडले होते. रिबेन्ट्रॉपचा एक राईनहार्ड स्पिट्झी नावाचा खाजगी सचिव होता त्याने त्याच्या आत्मचरित्राचे नाव - (आम्ही राईशची कशी वाट लावली‘ असा त्याचा मराठीत स्वैर अनुवाद होऊ शकतो). जर्मनसेनेला युद्धभूमीवर पराभूत करणे ही एक वेगळी बाब होती आणि त्याला अजून एक वर्ष लागले पण त्यांच्या पुढाऱ्यांनी त्यांच्याच सेनेची जी हेळसांड चालवली होती हे समजण्याच्या पलिकडले होते.
रशियाला अजून एका गोष्टीचा फायदा झाला आणि तो म्हणजे स्टॅलिनच्या अमानुष निर्दयपणाचा. याचे उदाहरण आपण वर पाहिलेच आहे. या वाक्यात विरोधाभासाचा भास झाला तरी ते नाकारण्यात अर्थ नाही. बार्बारोसाच्या पहिल्या सहा महिन्यात सोव्हिएत सरकारने त्यांचे कारखाने आणखी पूर्वेला हलविले. त्याचा आवाका पाहिलात तर डोळे फिरतात. २५९३ उद्योग १५ लाख रेल्वेच्या वाघिणी आणि ट्रक वापरून हलविण्यात आले आणि त्याच वेळी २५ लाख सैन्य उलट दिशेने हलविण्याचे काम चालू होते. हे अवाढव्य ऑपरेशन ज्या चिकाटीने व निर्दयपणे पुढे रेटण्यात आले त्यावरून त्याला अर्थशास्त्रीय स्टॅलिनग्राड असे संबोधले जात असे. औद्योगिक वसाहती इतक्या झपाट्याने स्थापन करण्यात येत होत्या की लवकरच त्यांना काय नावे द्यावीत हे अधिकाऱ्यांना सुचेनासे झाले आणि कुबायशेव्ह नावाच्या गावाबाहेर जे एक औद्योगिक शहर वसविण्यात आले त्याचे नाव बेझिमायनी असे ठेवण्यात आले. या रशियन शब्दाचा अर्थ होतो निनावी. रशियाचा हा सगळा उद्योग, त्यांची यंत्रे, त्यांचे २५० लाख कामगार, त्यांना लागणारे अन्न, त्यांची वापरण्याची हत्यारे, आणि त्या कामगारांना दिवसाला १८ तास काम करायला लावणे या सगळ्यासाठी एकहाती सत्ता असणे आवश्यक होती आणि ती स्टॅलिनकडे होती. असे काही कारखाने उरलच्या पलिकडेही उभे करण्यात येत होते व या उत्पादनाची एवढी निकड होती की कारखान्यांवर छपरे चढण्याआधीच त्यात उत्पादन सुरू झाले होते. या कारखान्यांच्या व्यवस्थापकांना या उत्पादनावर त्यांचा जीव आणि देशाचे भवितव्य अवलंबून आहे हे पटवून देण्यात स्टॅलिनला चांगलेच यश आले होते. या सर्व कारखान्यांमधे कामगारांचे तसे हालच होत होते. उदाहरण द्यायचेच झाले तर एका कारखान्यात ८००० स्त्री कर्मचारी हे जमिनीत खणलेल्या खंदकात राहात होते. जेवढे म्हणून शक्य आहेत तेवढे सगळे उद्योग युद्धसामग्रीच्या उत्पादनाला जुंपले होते. दारू तयार करणाऱ्या कारखान्यांमधे बाटल्या असल्यामुळे त्यांना मोलोटोव्ह कॉकटेल बाँब तयार करण्यास सांगण्यात आले. या मोलोटोव्हमधे दोन प्रकार होते. एकात फ्यूज होता तर एकात आपटल्यावर रसायने एकामेकात मिसळल्यावर आग उसळायची. दोन्हीमधे १५०० सेल्सियस तापमानाच्या ज्वाळा तयार करण्याचे सामर्थ्य होते व रणगाडे नष्ट करण्यात यांनी चांगली कामगिरी बजावली असे म्हणतात.

जर्मन सैनिकांची सहनशक्ती आता संपुष्टात आली होती. शेवटी पाच डिसेंबरला जर्मन सेनाधिकाऱ्यांना मॉस्कोवरील त्यांचे आक्रमण फसले आहे याची जाणीव झाली असे म्हणायला हरकत नाही. त्या वेळी तापमान उणे ५२ सेल्शियसपर्यंत खाली उतरले होते.....

चर्चिलने हिटलरने केलेल्या पहिल्या घोडचुकीवर (रशियावरचे आक्रमण) उपहासाने कडवट टीका केली ज्यात त्याच्या शिक्षणाचा उद्धार केला. ‘‘तेथे थंडी नावाची एक गोष्ट असते. तापमान शून्याच्या खाली असते व तेथे बर्फ वगैरे असतो हे तुम्हाला माहीतच असेल. हिटलर हे विसरला. त्याचे शिक्षण कमी पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपण हे सर्व आपल्या शाळेतच शिकलेले असतो. माझ्या आयुष्यात अशी घोडचूक मी केलेली नाही आणि करेन असे वाटत नाही.’’.....

गोठलेला जर्मन सैनिक्...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टॅलिनग्राड व रशियाने नंतर जे आक्रमण केले त्यावर परत कधीतरी.....

समाप्त
जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

12 Mar 2016 - 5:00 pm | बोका-ए-आझम

थरारक! पुभाप्र!

मार्गी's picture

12 Mar 2016 - 5:07 pm | मार्गी

खूप खूप मस्त! विशेषत: काही प्रसंग सहसा वाचायला न मिळणारे सांगितलेत. . . पण समाप्त झाल्याचं दु:ख झालं! दुर, सरं महायुद्ध हा विराट रंगमंच आणखी खुलून सांगावा ही नम्र विनंती. धन्यवाद.

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Mar 2016 - 12:50 am | लॉरी टांगटूंगकर

तुफान!!!
स्टॅलिनग्राड व रशियाने नंतर जे आक्रमण केले त्यावर परत कधितरी.....
परत कधीतरीची प्रतिक्षा राहील.

अभ्या..'s picture

14 Mar 2016 - 1:15 am | अभ्या..

जबरदस्त लेखमाला जयंतराव.
पुढील लेखनाची प्रतिक्षा राहील.

प्रचेतस's picture

14 Mar 2016 - 9:44 am | प्रचेतस

खूपच जबराट लेखमाला. प्रचंड आवडली.

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 11:44 am | भाऊंचे भाऊ

एकदम कॉल ऑफ ड्यूटी वर्ल्ड एट वॉर खेळत असल्या सारखे वाटत आहे पण लेखमाला जबर्दस्त परिणामकारक़

सतीश कुडतरकर's picture

14 Mar 2016 - 12:49 pm | सतीश कुडतरकर

प्रचंड आवडली.

जव्हेरगंज's picture

14 Mar 2016 - 8:11 pm | जव्हेरगंज

फारच जबरदस्त!!

पण समाप्त वाचून निराश झालो!

येऊ द्या अजून !!

आणि अतिशय वेल डॉक्युमेन्टेड असल्याने त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. अन्यथा सर्व आकडेवारी महाभारताप्रमाणे अतीरंजित वाटणारी आहे.
रशियाचे सैन्य व नागरिक मिळून अडीच कोटी लोक मारले गेले!!!!!
२,५०,००,०००!!!!!
लाखाहून अधिक विमाने नष्ट झाली!!!
१,०६,४००!!!
त्र्याऐंशी हजार रणगाडे!!
८३,५४०!!!!

जर्मनीच्या बाबतीत हे आकडे:
७० लाख मृत्यू! (५०,००,००० सैन्य + २०,००,००० नागरिक)
७०,००,०००!!!!
पाऊण लाख विमाने!
७६,८७५!!!
पन्नास हजार रणगाडे!!

(आपण किती शांत कालखंडात जगतो आहोत, या तुलनेसाठी: भारताचे सैन्यः- १३,००,००० सक्रीय व ११,००,००० राखीव = एकूण २४ लाख ; अर्धसैनिकी दले: १३,००,००० सक्रीय व १०,००,००० राखीव = एकूण २३,००,०००
५०० लढाऊ विमाने + ४००-५०० जुनी विमाने त्यांची जागा तेजस घेईल.
४००० रणगाडे)

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 11:25 am | भाऊंचे भाऊ

आत्ता संख्या नक्कीच कमी आहे पण संहार क्षमता जास्त असावी तसाही भारताला आपापसातच लढाया लढायची सवय अन अनुभव आहे चीनचे आक्रमण सोडले तर .

आपण किती शांत कालखंडात जगतो आहोत

+१..

अशा भयंकर क्रौर्याची आत्ता कल्पना करणे सुध्दा अवघड आहे. म्हणूनच आपण एकंदरच वाईट अवस्थेतुन चांगल्या अवस्थेकडे चाललो आहोत हे घासकडवीजींचे मत पटते. असो.

जयंतजी, आणखी एका नितांतसुंदर लेखमालेसाठी आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Mar 2016 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमालिका ! प्रत्येक भागाने तो वाचायला सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत खिळवून ठेवले होते.

रशियाच्या बर्लिनपर्यंतच्या धडकेचाही वृत्तांतही येऊद्या नवीन लेखमालेच्या रुपाने.

स्वराजित's picture

15 Mar 2016 - 3:13 pm | स्वराजित

जबरदस्त

आदिजोशी's picture

15 Mar 2016 - 7:49 pm | आदिजोशी

भन्नाट मालिका. मिपावरच्या उत्तम मालिकांपैकी एक नक्कीच. अत्यंत आभारी आहोत.

पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

काय हे भयानक क्रौर्य! मानवी मांस खाण्याची वेळ यावी.. :(

जयंत कुलकर्णी's picture

16 Mar 2016 - 8:17 am | जयंत कुलकर्णी

ही पाच भागांची मालिका ज्यांनी वाचली त्यांना धन्यवाद ! ज्यांनी वाचून प्रतिक्रिया लिहिली त्यांचे विशेष आभार !

अत्रन्गि पाउस's picture

16 Mar 2016 - 4:39 pm | अत्रन्गि पाउस

दाद देणा भूल जाये इससे बडी दाद क्या हो सक्ती है

नाखु's picture

16 Mar 2016 - 8:35 am | नाखु

अतिशय उत्तम संकलन आणि विश्वासार्ह माहीती असूनही ललीत धाटणीने वाचकाम्ना विषयाशी बांधून ठेवते हे लेखमालेचे सर्वात मोठे बलस्थान आहे.

थेट शेवटच्या भागातच प्रतिक्रिया द्यायचे ठरवले होते.
जयंतकाका तुमच्या अनुवादीत्/आधारीत कथाही फार चांगल्या असतात त्याचीही एखादी कथा माला येऊद्या..

नित वाचक नाखु

आदूबाळ's picture

17 Mar 2016 - 11:08 pm | आदूबाळ

नाही. त्यांनी रिसर्च करून स्वतंत्रपणे लिहिलेल्या कथा जास्त भारी असतात. उदा० "नथ".

सर्वा प्रतिसादांना +१११११

गॅरी ट्रुमन's picture

16 Mar 2016 - 4:57 pm | गॅरी ट्रुमन

जबराट लेखमाला.

लेनिनग्राडचा वेढा हे दुसर्‍या महायुध्दाच्या इतिहासातील एक अत्यंत थरारक पान आहे.परिस्थिती किती गंभीर होती याची कल्पना वाचून येईल त्यापेक्षा अनेक पटींनी एखादा माहितीपट बघून येईल.म्हणून इथे एक युट्यूबवरील माहितीपट डकवत आहे.हा माहितीपट चित्रपट दिग्दर्शक फ्रॅन्क कॅप्रा यांनी १९४३ मध्ये बनविला आहे. हा प्रपोगांडा माहितीपट असला तरी लेनिनग्राडमध्ये परिस्थिती किती भयानक होती याची कल्पना त्यातून नक्कीच येईल. स्टालीनग्राडच्या लढाईविषयीही असे म्हटले जाते की ही लढाई शहरातील एकेक रस्ता,रस्त्यावरील एकेक घर आणि घरातील एकेक खोली घेण्यासाठी लढली गेली. ते नक्की काय होते याचीही कल्पना या माहितीपटातून येईल.

आतापर्यंत मी हा माहितीपट ७०-८० वेळा तरी बघितला आहे.या लेखात लेनिनग्राडमधील परिस्थितीचा उल्लेख आला म्हणून हा माहितीपट याच लेखात देत आहे. स्पॉईलर अलर्ट वगैरे काही व्हावा अशी इच्छा/अपेक्षा नाही.

अर्धवटराव's picture

17 Mar 2016 - 2:12 am | अर्धवटराव

हा इतीहास खरच पुनरागमनायच करणार काय?
भारतात तर भूकमरी अजुनही आहे. पण अशी युद्धोत्पन्न्/शत्रुने कोंडी केल्यामुळे येणारी भुकमरी आपल्या वाटेला येण्याचे चान्सेस आहेत का ??

urenamashi's picture

17 Mar 2016 - 11:01 pm | urenamashi

Aprtim lihita tumhi..... Kharach tumchya mule etihas aawdayla lagla. Hats off to u sir.....

पैसा's picture

18 Mar 2016 - 1:46 pm | पैसा

सर्वसंहार!

सोनल परब's picture

30 Mar 2016 - 4:18 pm | सोनल परब

सुदर लेखमाला. स्टॅलिनग्राड व रशियाने नंतर जे आक्रमण केले त्यावर परत कधितरी.....
परत कधीतरीची प्रतिक्षा राहील.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2016 - 5:50 pm | सुधीर कांदळकर

ब्लीट्झक्रीगच्या वेगाने चाललेल्या या मालिकेत सोल्जर्स ब्लू काय आहे आणि युद्ध किती बीभत्स आणि भयानक असू शकते याचे या भागात तपशीलवार आणि प्रत्ययकारी दर्शन घडले आहे. धन्यवाद.