कुवत - मिडिओक्रिसिटी
आपली कुवत मध्यम आहे ; हे पचवणं थोडं अवघडच आहे; विशेषतः प्रामाणिक असाल तर.
कुवत मध्यम असणं म्हणजे काय --
आपण बुद्धीनं फार काही माठ नसलो तरी फार थोरही नाही, अगदिच सर्वसाधारण आहोत;
प्रयत्न केल्यावरही एका मर्यादेपलिकडे काही आपली उडी पोचत नाही.
फार काही तार्किकक्षमता आपल्या विकसित नाहित; कुठलंही विशेष कौशल्य नाही; कारकुनी कामं करतो झालं.
कलाक्षेत्रातल्या जाणीवा विकसित झाल्या नाहित; उपजत नव्हत्याच. काहींच्या मुद्दाम नंतर प्रयत्न पूर्वक विकसित होतात;
आपल्या त्याही नाहित. शारिरिक बाबतीतही आपण दुर्बळ वगैरे अगदिच नसलो तरी अगदिच अॅथलीट वा पैलवानही नाही.
आतापर्यंत फार काही भव्य दिव्य करता आलेलं नाही करिअरमध्ये.
"आजवर काही बनलो नाही, पण इथून पुढे होउ शकतो की अजून " असं म्हणावंसं वाटत नाही.
इथून पुढे काही करता येण्यासाठी जो पाया लागतो; तोही अजून बनलेला आहे; असंही नाही.
त्यामुळे इथून पुढेही काही होण्याच्या आशा नाहित.
म्हणजे करिअर खड्ड्यात गेलं ; बर्बाद झालो; असंही नाही. अगदिच सरासरीवर सगळं सुरु आहे.
अगदि कर्ज न घेता एकदम रोख, एकरकमी घरं बाइक्स घेतल्या; असं नाही; किम्वा कर्जच फेडता येत नाहिये असंही नाही.
फेडतोय आपलं कसंबसं सगळ्यांसारखच.
एक वाईट गोष्ट म्हणजे "अमक्या गोष्टीमुळे वाईट झालं; नैतर कुठच्या कुठं पोचलो असतो" हा बहाणा मारायचाही स्कोप नाही. ;)
खरं काय ते स्वतःला ठाउक असतच साला. पळणार कुठे ?
.
.
मिडिओक्रिसिटी का काय ते ह्यालाच म्हणतात का ?
.
.
अवांतर --
"नाही रे तू तसा बरा आहेस" हे कुणाकडून तरी ऐकून घ्यावं; म्हणून मुद्दाम स्वतःहून डायलॉगबाजी करतोय असं समजू नका प्लीझ.
मला खरोखर असं वाटतं आहे. त्यावरुन पुन्हा टॉण्ट / टोमणे नकोत ; किंवा सद्भावनेने का असेना; केलेले चुकीचे कौतुक नको. मी बोलतो आहे ती वस्तुस्थिती आहे.
.
.
मिडिओक्रिसिटी मध्ये वाईट असं कुठे काय आहे ? फारसं नाहिच.
.
.
म्हंजे चांगलं - वाईट असं लेबल लावणं अवघड आहे.
मला आत्ता जे वाटतय ते पुन्हा सांगतो.
.
.
आपण फार काही कामगिरी केलेली नाही, फार काही कमावलंही नाही;
इथून पुढेही काही करण्याची शक्यता नाही; अशी जाणीव होते आहे.
.
.
अर्थात स्वतःत लै पोटेन्शियल होतं; आणि ते वाया घातलं; असं नाही.
.
.
हां पण गोष्ट वाटते. आपल्या पूर्वी खूप खूप पिढ्या होउन गेल्यात.
त्यांनी खूप खूप काही कमावलय, घोळ घातलेत; कष्ट केलेत; कित्येक बाबी अपघातानं शोधल्यात; कित्येकांनी उपजत गुण वापरुन खूप काही केलेलं आहे.
संघर्ष केलाय. हाणामार्या केल्यात. धीरानं वेळ सांभाळली आहे.
विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे. आपली जिंदगी म्हणजे ह्या सगळ्याचं तयार प्रॉडक्ट आपल्याला मिळालेलं.
.
.
आणि त्या काळात ज्यांनी भरीव वगैरे कामगिरी केली; त्यांनी सगळं चुकत धडपडत केलेलं; फारसं ब्याकग्राउंड नसताना; परिस्थिती अधिक अवघड असताना.
संगीतापासून ते इतिहास संशोधन, सगळिच दृश्य माध्यमं (चित्रकला, चित्रपट, पडदे, रचनाशास्त्र, शिल्पकला, मूर्तीकाम) , विविध कारागिरी, ललित्,वैचारिक, लेखनकाम , अंक गणित ,बीज गणित, अमूर्त गणित, रसायन, भौतिकी..... अशी शेकडो हजारो शास्त्रं आहेत.
.
.
ह्या सगळ्यात अगदि पायोनियर म्हणवणार्यांना किंवा त्या पायोनियर्सच्या शिष्य म्हणवणार्यांना -- शास्त्र पुढे घेउन जायला जी माहिती उपलब्ध होती; ती फार फार थोडी होती. साधनं अति मर्यादित होती. आता औद्योगीकरण झालय; वस्तू उपलब्ध आहेत. चमत्कार वाटावा इतपत जग जोडलं गेलय. तुम्हाला कुतूहल असण्याचा अवकाश; पुढ्यात उत्तर हजर आहे. इंटरनेट आहे. तुमची पुरेशी पात्रता असेल; तर त्या त्या क्षेत्रातले जागतिक किर्तीचे नामवंत-- त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू शकताय. भिंती ऑल्मोस्ट संपल्यात. आता हवी आहे फक्त पुरेशी क्षमता, किम्वा कुतूहल, किंवा सरावाची तयारी; इतर अडथळे ऑल्मोस्ट संपलेत.
.
.
भातखंड्यांना संगीतासाठी जे उपलब्ध होतं; त्यातलं खूपसं आपल्याला आहेच ध्वनिचित्रफिती रुपात. शिवाय भातखंड्यांना जागतिक संगीतातलं मिळालं नसेल; तितकं एक्स्पोजर आपल्याला आहे. एका क्लिकवर आपण चायनिज, रशियन, अरबी, इराणी, कुठल्याशा भागातले आदिवासी..... अशा सगळ्यांचं संगीत ऐकू शकतो. ह्यांचे विविध क्षेत्रातले कलाविष्कार पाहू शकतो. ह्यांच्याकडे परंपरेतून आलेलं ज्ञान घेउ शकतो.
.
.
पूर्वी दोन-तीन भाषा शिकणंही अवघड असेल. आता हव्या तितक्या भाषा निदान प्राथमिक पातळीवर तरी तुम्ही काही महिन्यात शिकू शकता.
लिखित, वाचिक माध्यमं उपलब्ध आहेत; ऑडिओ विडियो आहेत.
तुम्हाला मदत करण्यास गुरु/शिक्षक/रिसोर्सेस उपलब्ध आहेत.
.
.
हे असं सगळं उपलब्ध आहे. आणि मी काय करतोय ?
तसं फारसं काहिच नाही. मी वाईट , दुरित म्हणावं असं काहिच करत नाहीये.
इतरांना त्रास नाही; पण स्वतःही काही नाही.
.
.
शिकणं वगैरे सोडून द्या. मग मी निव्वळ विशुद्ध टैम्पास तरी करतोय का ?
म्हणजे धम्माल मस्ती, दंगा, इकडं तिकडं भटक्णं, थकेस्तोवर पार्ट्या वगैरे....
नोप्स.
.
.
अगणित अशी अवांतर वाचनाला पुस्तकं उपलब्ध आहेत.
.
.
कारकुनी जिंदगी आहे. हापिसात जातो आणि घरी येतो. ह्याशिवाय तसं मी काहिच करत नाहिये.
आणि करीनसं वाटतही नाहिये.
.
.
मला एकच कुतूहल आहे. इथून पुढे दुनिया कशी असेल ? मागच्या शतकभरात आणि त्यातही मागच्या दोनेक दशकात तूफानी बदल झालेला आहे.
पुढे नेमकं कय होणारेय ; ह्याबद्दल फारच कुतूहल आहे. त्या पुढच्या शतकभरातल्या घडामोडी पहायला तरी इथून पुढे शंभर वर्षांची जिंदगी हवी आहे.
मानवी संस्कृती सभ्यतेनं एकदम टॉप गिअर टाकलाय, पुढे ताटात अजून काय काय वाढून ठेवलं असेल ? क्लायमॅक्स अजून बाकी आहे.
सीट बेल्ट मी आवळून ठेवतोय.
.
.
एकूणात सध्याच्या परिस्थितीवरुन अंदाज बांधायचा ; ह्याच प्याटर्नमध्ये गोष्टी सुरु राहतील असं मानलं तर सरासरी भारतीय आयुष्यापेक्षा मला पंधरावीस वर्ष
जास्तच मिळणारेत. मी एकदम हेल्थ फ्रीक वगैरे झालो आतापासूनच तर शंभरेखून अधिक वगैरे वर्षेही जगेन बहुतेक. पण शेवटची वर्षं अंगदुखी, सांधेदुखीनं खराब होतील; कदाचित आर्थिक चिंता सतावतील ; पण मी जास्त जगायचीच शक्यता अधिक .
.
.
प्रतिक्रिया
28 Jan 2016 - 10:21 am | प्रचेतस
काय बे मनोबा..आँ.......
28 Jan 2016 - 10:37 am | बिपिन कार्यकर्ते
मनोबा इज ब्याक .... अँड इन हिज एलिमेंट्स! मस्त रे भाऊ!
28 Jan 2016 - 11:01 am | उगा काहितरीच
आपल्याकडे ना "मध्यमवर्गीयाची" फार कुचंबना होते. ज्याला ९५% मिळतात ते करतात उत्तम करीयर . जे नापास होतात ते टाकतात मस्त वडापावची गाडी अन् कमावतात २-५ हजाराचा गल्ला रोज . अन् जे ६०% वाले असतात त्यांना तेपण जमत नाही अन् हेही करावेसे वाटत नाही. आणी त्यांना "समजून" घेणारे कुणी उपलब्धच नसतात. कारण त्यांच्या समस्यांची तिव्रता बाकीच्यांना कळतच नाही.
28 Jan 2016 - 11:11 am | नीलमोहर
मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही
नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही !
मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
(सौजन्यः - संदीप खरे, आयुष्यावर बोलू काही)
28 Jan 2016 - 11:14 am | स्पा
वा मणोबा
28 Jan 2016 - 11:16 am | नीलमोहर
फक्त तुम्हाला म्हणायचंय तो शब्द मिडीओक्रिटी, mediocrity आहे बहुधा :)
28 Jan 2016 - 11:18 am | खेडूत
अगदी मनातलं उतरवलंय! मस्त!
(आम्ही तुमचे पूर्वीपासून फ्यान आहोत. पण आपण मधेच गायबता ब्वॉ.)
28 Jan 2016 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट लिहिलेय !
* तो शब्द मेडिओक्रिटी (mediocrity) असा आहे.
28 Jan 2016 - 12:38 pm | सुबोध खरे
चांद मिलता नही सबको संसारमे
है दियाही बहोत रोशनी के लिये.
28 Jan 2016 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
क्या बोल्या ! :)
30 Jan 2016 - 3:39 pm | संदीप डांगे
हॅट्स ऑफ!!!
सोबतच -
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नहीं मिलता
जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नहीं मिलता
बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नहीं मिलता
तेरे जहाँ में ऐसा नहीं के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहा नहीं मिलता
28 Jan 2016 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
जीवनातले सुख, हवेहवेसे वाटणारे मिळण्यावर नाही तर मिळाले आहे ते हवेहवेसे वाटण्यावर अवलंबून आहे.
28 Jan 2016 - 1:00 pm | सुबोध खरे
+ १००
28 Jan 2016 - 1:12 pm | मितान
ह्मम्म !
28 Jan 2016 - 1:36 pm | मोहनराव
वा. छान लेख.
28 Jan 2016 - 1:46 pm | जयन्त बा शिम्पि
जीवनाकडे पहाण्याचा चष्मा प्रत्येकाचा वेगवेगळा असु शकतो. सर्वानीच सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली , तर कसे व्हायचे ? प्रत्येकाचा स्वभाव, छंद, आवडी- निवडी, वातावरण, आर्थिक स्थिती, संस्कार , ह्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यातल्या त्यात जमेल तेव्हढे करण्यापेक्षा, झेपेल तेव्हढेच करावे , हा मध्यम मार्ग अतिशय सोयिस्कर असा आहे.
28 Jan 2016 - 1:49 pm | गामा पैलवान
मन,
एक सांगू? प्रत्येक माणूस आयुष्यात आहार, निद्रा, भय, मैथुन या प्राणीजन्य गोष्टी सोडून इतर फारसं काही करत नाही. जे थोडंसं जास्त केलेलं आहे, ते करणारी माणसं अत्यल्पसंख्य आहेत. त्यामुळे स्वत:च्या दुय्यमत्वाची अजिबात खंत बाळगू नका.
तुम्ही जी स्थिती वर्णन केली आहे, ती योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिला समतोल भोवताल म्हणतात. तो योगसाधनेसाठी जबर अनुकूल आहे !
आ.न.,
-गा.पै.
28 Jan 2016 - 1:54 pm | अभ्या..
.किती इचार, किती इचार करतोय (अन करायला लावतोय) हा प्राणी. रॅम उडल लेका.
.
जाउदे म्हणा, मनोबाने तरी कुठे लै तीर मारलेत म्हणायचे अन सोडून द्यायचा लेख. ;)
28 Jan 2016 - 2:03 pm | नाखु
टाळ्या वाजवायला कुणी नसेल तर नाटकही व्यर्थ आहे.
बाघायलाच कुणीही नसेल तर "नटसम्राट"लाही काय अर्थ आहे.
तीर का नजर अंदाज नाखु
28 Jan 2016 - 3:03 pm | लालगरूड
दंडवत
28 Jan 2016 - 2:05 pm | विजुभाऊ
मन भौ तुझे बरोबर आहे.
पण आपण एका ठिकाणी चुकतो.
एखादी गोष्ट उदा: नवी भाषा शिकणे , संगीत शिकणे या गोष्टीना सुरुवात करणे हे आपल्या हातातच असते की
आपणच आपले आयुष्य भाकड करून घेत असतो.
व.पुंच्या भाषेत बोलायचे तर " लोक काय म्हणतील" या अष्टाक्षरी बीज मंत्रामुळे आपण गारठलेले असतो.
कोणी काही म्हणत नाही. तुमच्या शहरातदेखील तुम्हाला ओळखणारांपेक्षा तुम्हाला न ओळखणारांची संख्या हजारो पटीने जास्त आहे.
28 Jan 2016 - 2:21 pm | पैसा
पण तू फारच जास्त विचार करतोस रे! त्यापेक्षा जे जसं आपल्या वाट्याला आलंय ते मजेत जगायचा प्रयत्न कर! बरं असतं ९९९९ पैकी एक राहिलेलं. तो उरलेला एक व्हायला लैच त्रास बाबा!
28 Jan 2016 - 2:58 pm | नाव आडनाव
आयला! मला इतकं लिहिता येत नाही. पण आलं असतं तर थोड्याफार फरकाने असंच लिहिलं असतं मी पण :) एकदम असंच.
मी पण मला एकदम बेसिक माणूस वाटतो - म्हणजे देव बनवू शकत होता असा एकदम बेसिक फंक्शनॅलिटीवाला माणूस. ना मला एखादी कला येत, ना मी रोज हापिसात करतो त्या कामात लई भारी. इन जनरलंच "मी नसल्याने अडणारं असं कोणतं काम आहे" असा विचार बर्याचदा आणि असलेली बुद्धी लई ताणून केला तरी पण "काहीच नाही" असंच उत्तर मिळतं. मीच ठरवतो - चांगलंच आहे हे. कशाला अडायला पाहिजे कोणाचं काही :)
मला आधी वाटायचं आजूबाजूच्या सगळ्या / बर्याच लोकांसारखा मी वागण्या-बोलण्यात, माणसं ओळखण्यात हुशार का नाही. देवाने का बरं असं केलं असेल. आता मीच मला सांगतो - जर सगळेच असे हुशार असते तर त्याची काय किंमत राहिली असती. बॅलंस करण्यासाठी काही लोक (एकदमंच कमी असतील) देवाने माझ्यासारखे पाठवले असतील :)
चांगलं लिहिणारे बरेच आहेत पण रिलेट करू शकलो तर एकदम आवडतं, तसं तुम्ही लिहिलेलं एकदम आवडलं बघा :)
28 Jan 2016 - 4:23 pm | मित्रहो
हेच विचार.
मला वाटते बहुतेकांना असेच वाटत असावे म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगला असेलच. तेंन्हा त्याच्या दृष्टीकोणातून तो अॅव्हरेजच. कदाचित असेही काही असतील ज्यांना वाटत असेल की आपण काहीतरी मिळवलय पण तो मिळवू शकला नाही.
29 Jan 2016 - 2:26 pm | मोदक
कशाला इतका विचार करतोस?
आपल्या जगात आपण राजे. मग मिडीऑकर वगैरे तू म्ह्णतो आहेस ते विचार मनात आले म्हणजे कुठेतरी दुसर्याशी तुलना झाल्यामुळे येतात.
जगाला फाट्यावर मार आणि आत्ता तुला जे करायचे आहे ते कर. लोळत पडायचे आहे? झकास मिसळ खायची आहे किंवा पावसात भिजत भिजत आईसक्रीम खायचे आहे तर तसे कर. मनात विचार आला की लगेच प्रत्यक्षात आणायचा.
आपण ताजमहाल बांधू शकत नाही. निढळ्या घामाच्या पैशाने घेतलेले घर ताज इतके सुंदर नसेलही पण मालकीहक्क आपलाच आहे ना? मग ताज को मारो गोली. आपले घर ताजपेक्षा भारी आहे. बस्स..!!!
29 Jan 2016 - 3:21 pm | बोका-ए-आझम
तुमचाच खाण्यावरचा लेख पुन्हा वाचा बघू.
29 Jan 2016 - 6:11 pm | बॅटमॅन
सारखी तुलना करत बसलं की असं होतं.
राजहंसाचे चालणे, जाहले जगी शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये?
समोरच्याचे धवळार पाहोन आपल्या तृणारास आग लावायची नसते.
29 Jan 2016 - 7:15 pm | चांदणे संदीप
वेल्कम ब्याक! :)
29 Jan 2016 - 8:53 pm | अस्वस्थामा
सहमत.. नै तर अंबानीपण बिल गेट्सच्या संपत्तीकडे पाहून आपण कसे मिडियोक्र म्हणून उसासे सोडत बसून शकतोच की.
;)
बादवे, मनोबांच्या लेखातल्या भावार्थाशी मात्र (नेहमीपमाणेच) "बाडिस"..!
30 Jan 2016 - 2:59 pm | चैतन्य ईन्या
अम्बानि आणी बिल गेट्स ह्यानि अपल्या कम्पन्या केल्या आहेत.
आपन कार्कुन आहोत हा फरक आहे.
3 Feb 2016 - 8:30 pm | अस्वस्थामा
कंपनी असली की तुलना येत नाही असे कसे वाटले ? आणि त्याबरोबर येणारी मेडिओक्रिटीची भावनाही येणे शक्य आहेच.
तसाही भावार्थ पहावा.
आपण स्वतःबद्दल बोलत असाल तर माहीत नै पण आम्ही नाही कारकून.. ;)
(आणि असतो तरी अशी मेडिओक्रिटी वगैरे नसती वाटली.. तरी असो).
30 Jan 2016 - 12:40 pm | मन१
आबहर.
खूप जणांनीक्खूप काही सुचवलय. सगळ्याबद्दल लगेच इथे उपप्रतिसाद, प्रश्न वगैरे जमत नाहियेत. नंतर सवडिनं येउन उत्तरं देतो. तोवर सर्व वाचक आणि प्रतिसादकांना थ्यांक्स म्हणून रजा घेतो.
टैम्प्लीज.
30 Jan 2016 - 3:44 pm | एस
आयुष्यभर जे 'ट्याम्प्लिस' असंच म्हणत आलो होतो तो लहानपणीचा खेळशब्द 'टाईम प्लीज' असा असतो हे मला त्या नावाचा चित्रपट पाहिल्यावर समजलं होतं. ;-)
(जस्ट वॉण्टिड टू कन्फेस.) =))
30 Jan 2016 - 3:47 pm | संदीप डांगे
नाही? खरंच...? खाहीहां एस... ;-)
30 Jan 2016 - 6:08 pm | एस
नाही, खरेच! मी लोकांना अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्रजीतले फरकाचे बारकावेदेखील शिकवलेत पण कसा कोण जाणे हा शब्द मला ह्या अर्थाने माहीत नव्हता. म्हणजे 'टाईम प्लीज' म्हणजेच आमचं 'ट्याम्प्लीस' हा अनोन्यसंबंध माझ्या जेव्हा लक्षात आला तेव्हा आपण असे कसे बुद्धू असे म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायला लागला होता! ;-) खो: खो: हसत सुटलो होतो हेवेसांनल.!!
30 Jan 2016 - 6:15 pm | संदीप डांगे
होतं असं कधी कधी. =))
असे बरेच शब्द आहेत इंग्रजीचे जे अगदी गावठाणापर्यंत गेलेत पण लोकांना पत्त्याच नाय का ते विंग्रजी हेत म्हणून. पिव्वर हा असाच एक शब्द. त्याचा मूळ अर्थ 'शुद्ध' पण लोक 'उच्च दर्जा' म्हणून वापरतात. अजून आठवायला लागतील.
3 Feb 2016 - 9:40 pm | होबासराव
Hide and Seek (लपंडाव) ले काय म्हनत आठवा त जरा अकोल्यात ? रेस्टिप ना ? अॅक्चुअलि असा कुठला शब्द्च नाहि मला वाटते.
30 Jan 2016 - 7:01 pm | फारएन्ड
आवडले एकदम.
पण मी करीयर च्या मध्यापर्यंत 'कोस्टिंग' करत करत एकदम काहीतरी डोक्यात चमकल्यासारखी त्यापुढे एकदम काहीतरी जबरी केलेल्या लोकांची काही उदाहरणे बघितली आहेत. कमी आहेत, पण आहेत. लोक हे नक्की कसे करतात मलाही समजलेले नाही.
एक पॉप्युलर उदाहरण म्हणजे स्टीव वॉ चे. आपल्याला त्याची ओळख एक खडूस, जिगरबाज खेळाडू म्हणून आहे. पण हे त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातले. तो पहिल्या दर्जाचे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला तेव्हापासून सुमारे १९९४ पर्यंत इतर अनेक सेकण्ड स्ट्रिंग ऑसीज सारखा कधी संघात असे, कधी नसे. वयाच्या साधारण तिशीपर्यंत तो इतका भारी समजला जात नसे. मग एकदा संघातून बाहेर गेल्यावर डोक्यात इतकी वर्षे बंद असलेला एखादा स्विच ऑन व्हावा तसे काहीतरी झाले. त्याने प्रचंड मेहनत घेउन पुन्हा स्वतःला प्रस्थापित केले व १९९५ च्या विंडीज टूर मधे त्या मॅचविनिंग डावानंतर तो तोपर्यंतच्या लेव्हलच्या एकदम वर गेला. त्याचे 'आउट ऑफ माय कम्फर्ट झोन' हे आत्मचरित्र क्रिकेट इतकेच या भागाकरताही वाचनीय आहे.
त्याची ओळख मी पूर्वी लिहीली होती.
कदाचित असे इतरही असतील. तसे म्हंटले तर अमिताभही वयाच्या २८-३० पर्यंत किंवा कलकत्त्यात असेपर्यंत असाच चांगली नोकरी, थोडेफार नाटकांत काम वगैरे लेव्हललाच होता.
मला अशा लेट ब्लूमर्स बद्दल कायम कुतूहल वाटते. कारण तोपर्यंत आधीच्या सवयी इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या बदलणे फार अवघड असते.
30 Jan 2016 - 7:21 pm | संदीप डांगे
आवडला प्रतिसाद!
3 Feb 2016 - 7:21 pm | अभिजीत अवलिया
जबरी लिहिलेय ...
3 Feb 2016 - 7:57 pm | मम्बाजी सर्वज्ञ
असे डीप्रेसीव विचार माझ्याही मनात येतात कधी कधी. पण तेवा मी दोन आदर्श डोळ्यांसमोर ठेवतो - पहिले म्हणजे आपले सध्याचे पंतप्रधान. दंगलीनंतर एवढ्या केसेस झाल्या, विझा देऊ नका म्हणून पत्रे लिहिली, तुरुंगात टाकले, ९ तास अखंड चौकशी केली टग्या पोलिसांच्या हातात देऊन (हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही) तरी पण ३०-४० वर्षे देशाच्या मानगुटीवर भूतासारख्या बसलेल्या कोन्ग्रेस च्या छातीवर पाय देऊन उभा राहिला आहे हा माणूस या वयात. हे बघितल्यावर वाटते अजून माझी वेळ नक्कीच गेली नाही.
दुसरे उदाहरण अजूनच सकारात्मक आहे - आपले सगळ्यांचे आवडते राहुल गांधी : आत्ता पर्यंतच्या आयुष्यात फार काही विशेष जमलेले नाही (अगदी लग्न सुद्धा), लोक तोंडावर बोलतायत बाळ पार्टीची नैय्या बुडव्ल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून, पवार, केसरी, लालू, मुलायम, अजून कोण कोण रथी महारथी आले आणि गेले पण राहुलबाबा शांत चित्ताने मार्गक्रम करत आहेत. शोकसंदेश कॉपी करणारे लोक जर पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करू शक्ताय्त तर मी काय वाईट आहे? जर 'मोदी' नाही बनता आले तर कमीत कमी 'राहुल' तर नक्की बनू शकेन - लोक काय म्हणतायत त्याकडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून............
3 Feb 2016 - 8:35 pm | मन१
=))
3 Feb 2016 - 10:37 pm | राघव
लेख वाचला आणि वरचे प्रतिसादही वाचलेत. सगळं चांगलंच आहे, मग माझी अजून एक भर कशाला असा विचार करून मी गप्प बसू शकतो खरं तर, पण स्वतःला पुन्हा बोच लागेल की.. काय एक प्रतिसादही नाही देऊ शकत आपण?? म्हणून हा प्रपंच!! :-) :-)
एनीवे, जोक्स अपार्ट. खूप मनापासून अन् छान लिहिलंय मनोबा! सगळ्यांना लेखाशी निगडित होता येतंय हेच त्याचं यश आहे.
तुलना इतरांशी करावी का करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न. काही बाबतीत तुलना गरजेचीच असते. पण तिचा हेतू स्वतःच्या व्यक्तित्व [व्यक्तिमत्त्व नव्हे] विकासाचा असावा.
वर जी काही उदाहरणं आलेली आहेत लेखात.. त्या व्यक्तींनी स्वतः एखादं मोठं कार्य करायच्या अगोदर काय विचार केला असेल? मी खूप मोठे कार्य करेन, असं करेन, तसं करेन.. असं काही?? मला नाही वाटत तसं. त्यांनी काही मोठं कार्य करायचं असं ठरवून न करता, आवड म्हणून, उत्सुकता म्हणून ते हाती घेतलं असावं. त्यातून त्यांच्या हातून मोठं कार्य झालं हा केवळ साईड इफेक्ट. तो विचार आपण करतोय आत्ता. आपण त्यातून फक्त एवढीच प्रेरणा घेऊ शकतो की प्रामाणिक प्रयत्न, आवड आणि विशुद्ध हेतू धरून आपल्या क्षेत्रात काम करत रहावं.
जे आवडतं ते जीवितध्येय झालं तर विशिष्ट चौकट राहतेच कुठे? फार मजा आहे.. चौकटीचा विचार केला तर चौकट उभी राहते... नाही तर नाही!! मग एक तर सतत चौकट विस्तारत जायची किंवा वादळासारखं अनिर्बंध चौखूर उधळायचं.. जे आपल्याला श्रेयस्कर ते आपल्यासाठी योग्य. कसंं?
राघव