थंड डोक्याने... २

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
27 Jan 2016 - 10:53 pm

पहिला भाग
फ्लॉइड वेल्स हा क्लटरच्या शेतात काम करायचा. निदान वर्षे दोन वर्षे तो तिथे कामाला होता. त्याची क्लटरबद्दल काही तक्रार नव्हती. उलट तो नोकरांना चांगले वागवतो. गरज असली तर पगार व्हायच्या आधी तो पैसे उसनेही देतो. ख्रिसमसला भरपूर बोनस देतो अशा चांगल्या गोष्टीच त्याला आठवत होत्या. पण यथावकाश त्याने ती नोकरी सोडली. नंतर तो कुठल्याशा चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला. लान्सिंग नावाच्या गावात तो तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला रिचर्ड (डिक) हिकॉक नावाचा जोडीदार त्याच्या कोठडीत भेटला. तुरुंगात गप्पा मारणे हा एक मोठा उद्योग असतो. वेळ भरपूर असल्यामुळे कैदी लोक भरपूर गप्पा मारतात. त्यात फुशारक्या, अतिरंजित वर्णने हेही असते. बोलता बोलता वेल्स क्लटर बद्दल बोलू लागला. क्लटरच्या श्रीमंतीबद्दल तर त्याला प्रत्यक्ष अनुभवच होता. आपण कसे तिथे काम करत होतो, पगार भरपूर होता. क्लटरचे शेत इतके मोठे होते की त्याचा खर्चच आठवड्याला १०००० डॉलर्स इतका अफाट होता. त्यात वेल्सने अशीही बढाई मारली की क्लटरच्य घरात एक ऑफिस होते जिथे भिंतीत एक मोठी तिजोरी होती. त्यात तो भरपूर पैसे राखून होता. ह्या गोष्टी ऐकून डिकला फारच उत्सुकता वाटू लागली. त्याने खोदून खोदून वेल्सला विचारले आणि आणखी माहिती काढून घेतली. कुठले गाव, गावात त्यांचे घर कसे शोधायचे, घरात किती लोक आहेत, काय वयाचे लोक आहेत वगैरे वगैरे वगैरे. इतकी भक्कम असामी क्यांसासमध्ये आहे तर आपण हात मारूनच घ्यावा असा त्याने पक्का निश्चय केला. नंतर काही काळाने डिकला पेरी स्मिथ नावाचा जोडीदार भेटला. त्यांचे चांगले सूत जमले. नंतर यथावकाश दोघांना पेरोल मिळाला. डिक मुळचा क्यांससचाच. त्याने त्याच्या गावात पेरीला बोलावले. डिकच्या कारने दोघे होल्कमला गेले. ४०० मैलाचा हा दीर्घ प्रवास करून ते मध्यरात्री हर्ब क्लटरच्या घरात घुसले. वाटेत हातमोजे, टेप, दोरी वगैरे सामग्री विकत घेतली. बाजूचे दार उघडेच होते त्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही. डिकने आपल्या घराची बंदूक आणली होती. तिचा धाक दाखवून त्याने प्रथम हर्बला बान्धले. नंतर बाकी तिघांनाही बांधले. पेरी स्मिथ हा बोटीवर काम केलेला खलाशी त्यामुळे तो दोरी बांधण्यात प्रवीण होता. तिजोरी कुठे आहे असा प्रश्न विचारातच हर्ब चक्रावला. माझ्याकडे तिजोरी नाही. मी रोख पैसे जवळ ठेवत नाही असे सांगायचा प्रयत्न केला. पण ह्या दोघांनी विश्वास ठेवला नाही. सगळे घर धुंडाळले पण तिजोरीचा पत्ता नाही. आता काय करायचे? दोघे हे ठरवून आले होते की आपण जे काही करू त्याचे साक्षीदार जिवंत ठेवायचे नाहीत. त्या दृष्टीने विचार सुरु झाला.

पेरी हा एक संवेदनाक्षम माणूस. उत्तम चित्रकार, गिटार वादक. बुद्धिमान. पण लहानपणी त्याचे आई वडिल विभक्त झाले. दारुच्या आहारी गेली. मग पेरी अनाथाश्रमात तर कधी कुण्या दत्तक पालकाच्या घरी असा राहू लागला. त्याची अगदी परवड झाली. एका अनाथाश्रमात त्याच्यावर अत्याचार झाले. त्याला किडनीचा विकार होता त्यामुळे बिछान्यात लघवी होत असे. त्यामुळे अनाथाश्रमाची मुख्य असणारी नन त्याच्यावर खवळून होती. त्याला ती पट्ट्याने झोडपायची. भर थंडीचे त्याला बिछान्यातुन उचलून थंड पाण्याने भरलेल्या बाथ टब मध्ये उतरवून कपडे धुवायला लावायची. त्याला रात्र म्हणजे प्रचंड संकट वाटायचे. ह्या दीर्घकालीन अत्याचारामुळे ह्या माणसांत एक सैतान निर्माण झाला. तसा तो बोलाचालायला सभ्य. पण अचानक काही प्रसंगी त्याची संवेदना नष्ट होऊन तो हिंसक बनू शकायचा. इथेही तसेच झाले असावे. त्याने हर्ब क्लटरचा शिरच्छेद करायचा प्रयत्न केला. पण जीवावरचे संकट पाहून हर्बने सर्वशक्तीने प्रतिकार केला. कसाबसा त्याने एक हात दोरातून मोकळाही केला. हे पाहून स्मिथने त्याच्यावर गोळी झाडून त्याला ठार केले. नंतर एकामागून एक सर्व सदस्यांना डोक्यात गोळ्या घालून ठार केले गेले. हा एक प्रकारचा मनोविकाराचा झटका असावा. तो असताना सद्सद्विवेक सोडून जातो पण नंतर शुद्धीवर आल्यावर वाईट वाटते.

हे भयंकर कृत्य केल्यावर दोघांनी बंदुकीच्या गोळ्यांची टरफले (शेल्स) काळजीपूर्वक गोळा केली. तिजोरी नव्हतीच, पण जे काही मिळाले ते पैसे घेतले (४६ डोलर मात्र!). हर्बच्या मुलाचा ट्रान्सिस्टर रेडियो होता तो उचलला. हर्बची एक दुर्बीण होती तीही लंपास केली आणि आपल्या कारने दोघे निघाले. वाटेत पश्चात्ताप हळहळ वाटण्याऐवजी ते खदाखदा हसत होते!

त्यांचा मूळ बेत असा होता की ही शिकार करून झाली की जे भक्कम पैसे मिळतील ते घेऊन मेक्सिकोला जायचे. तिथे समुद्रात बुडी मारून पूर्वी बुडालेल्या जहाजांचा खजिना शोधण्याचे काम करायचे. पेरीला ते एक वेड होते. विविध मासिके, पुस्तके जमवून ह्या विषयावर माहिती जमवायचा त्याला नाद होता. पण आता पैसे नव्हते. मग डिकने खोटे चेक लिहून महागड्या गोष्टी विकत घेतल्या. त्या गहाण ठेवून थोडे पैसे जमवले. असे करत ही दुक्कल मेक्सिकोला निघाली. यथावकाश तिथे पोचली आणि पुढच्या योजना ठरवू लागली.

समाजसमीक्षा

प्रतिक्रिया

एस's picture

27 Jan 2016 - 11:04 pm | एस

थरारक.

पुभाप्र.

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 11:23 pm | यशोधरा

गुडनेस!!

पैसा's picture

28 Jan 2016 - 6:04 pm | पैसा

बापरे!