'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
12 Sep 2008 - 5:56 pm

मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला - 'डोंबिवली फास्ट'. चित्रपट फारच सुरेख जमलाय...मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही....फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.

सुचना/Disclaimer - Spoilers ahead! आणि हे वस्तुनिष्ठ, तटस्थ वगैरे परिक्षण नाही, सिनेमा खूप आवडला, म्हणून लिहिले! Nothing objective about it!

चित्रपट ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमधे झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात डोकावून बघतो. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा १००% तुमच्या-आमच्यासारखी माणसे वाटतात आणि तुमच्या-आमच्यासारखीच वागतात. सगळ्याच व्यक्तिरेखा फार सुरेख, तपशीलात लिहिल्यात आणि तितक्याच सशक्तपणे त्या पडद्यावर त्या-त्या कलाकारांनी निभावल्यात - चित्रपटाचे कास्टिंग हे चित्रपटाचे एक महत्वाचे बलस्थान - सगळेच कलाकार त्या-त्या व्यक्तिरेखाच वाटतात. अगदी माधवन पण फार हिरोगिरी न करता प्रामाणिकपणे भुमिकेत शिरतो आणि त्याहून महत्वाचे म्हणजे (नेहमीप्रमाणे चुकार मुलासारखा बाहेर न पडता) बहुतांश वेळ भुमिकेतच राहतो! ;)

ह्यातील पात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाला साजेशी वागत राहतात, आणि त्यातून निर्माण होते ते नाट्य, आणि या सगळ्याच्या पार्श्वभुमीला हादरवून सोडणार्‍या बॉम्बस्फोटांचा अनुभव! चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो, आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवतो! ह्यात वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आहे - -आणि मुंबई ह्या एका धाग्याने त्यांना सहजपणे बांधून ठेवले आहे. लोकलमधील बाँबस्फोट ह्या एकाच अनुभवाचे त्यांच्या भावविश्वात वेगवेगळे पडसाद उमटलेत.

माधवन हा एक उच्च-मध्यमवर्गीय, पर्यावरण, सार्वजनिक वाह्तूकीचे फायदे ह्यांची जाणीव असलेला, एक कॉर्पोरेट नोकरीपेशा माणूस. योगायोगाने त्या दिवशी सेकंड क्लास मधे बसतो आणि म्हणूनच वाचतो...पण ह्या अनुभवाने पुर्णपणे हादरून जातो...त्याची बायको प्रेग्नंट...तो ऑनसाईट बद्दल विचार करु लागतो...गाडीच्या शोरुम मधे जाऊन गाडी विकत घ्यायचा विचार करू लागतो...लोकलविषयी एक अनामिक भीती मनात बसते...

दुसरा असाच साधा, गरीब केरळी चहावाला - इरफान....त्याच्या जीवनात तसा फारसा फरक पडला नाही, पण पुर्वी एकदा मॉल मधे पत्नी व मुलीबरोबर झालेल्या अपमानाचा बदला घ्ययचा म्हणून फोनवरून मॉलमधे बाँब ठेवल्याच्या खोट्याच बातम्या देतो..आणि ते खाली होणारे मॉल, भयभीत उच्चवर्णीय लोग बघून आसूरी आनंद घेत असतो, आणि असाच एक दिवशी त्याला त्याच्या अफवांचे गांभीर्य कळते.... (नाही, नाही - त्याची मुलगी चिरडत वगैरे नाही....असेच बाळबोध cliché निशिकांतने टाळलेत!)...फारशे संवाद नसले तरी इरफानने ही भुमिका फारच छान केली आहे! केरळी टच ही त्याची आयडीआ होती म्हणे!

तिसरी सोहा-अली-खान, ही 'खोया खोया चांद' पासून अभिनेत्री म्हणून बरीच प्रगल्भ झाली आहे. तर ही (अशाच) एका न्यूज चॅनलची रिपोर्टर...तोच कुप्रसिद्ध प्रश्न 'आप को इस वक्त कैसा लग रहा है?' विचारणारी...तिचा भावी जोडीदार (समीर धर्माधिकारी) ह्या बाँबस्फोटात मरण पावतो आणि तिच्या न्यूज चॅनलवर तिलाच ह्या प्रश्नाला सामोरे जावे लागते...नंतर तिच्यावर 'रुपाली बनी रुदाली' अशी स्टोरी बनवली जाते...ही तिच्या आयुष्यातली उलथापालथ!

चौथा बेकार, मित्रांबरोबर टवाळक्या करणारा, मुस्लिमद्वेष्टा सुरेश; के के मेनन - त्याने ह्याही भुमिकेचे सोने केले आहे....त्याला कुठल्याही भुमिकेत टाकले तरी तो १००% निभावतो....तर हा असाच एक चहाच्या दुकानात टाइमपास करणारा मुलगा... बॉम्बस्फोटांनंतर तर अधिकच कट्टर होतो....शेजारच्या टेबलावर बसणारा युसुफ त्या दिवसानंतर दिसत नाही, तर ह्याचा संशय अजूनच बळावतो...तो मग त्याचा माग काढतो, घर शोधतो...तो सगळाच सिक्वेंस छान घेतलाय...त्याचे छोटे, छोटे संवाद 'ये लोग किशोरकुमार कभी नहीं सुनेंगे', किंवा पटकन ओंकार असलेले लॉकेट लपवणे, नजरेनेच 'बघ मी सांगत नव्हतो तुला?' असे मित्राकडे बघणे...सगळेच दाद देण्यासारखे. के के मेनन ग्रेटच आहे, आणि तितकीच दाद निशिकांत च्या टेकींगला!

आणि शेवटी पाचवा ह्या सगळ्यांना वरताण - हवालदार तुकाराम पाटील; परेश रावल! हा अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक (याचा अर्थ बाकीचे सूमार आहेत असा अजिबात नाही. खर तर के के मेनन आणि परेश रावल मधे डावे-उजवे करणे अवघड आहे!)...ह्या हवालदाराला रिटायरमेंटला काहिच दिवस राहिलेत...त्यातच ही घटना घडते...तिथे कदम नावचा एक नवीनच हवालदार भरती झाला आहे...ह्या पात्राचेही एक उप-कथानक आहे...त्याची हनीमूनची सुट्टी बॉम्बस्फोटांमुळे कँन्सल होते...त्यामुळे तो चिडलेला....मग त्या अनुषंगाने येणारे पोलिसांचे किस्से, त्यांचा तपास...नागरिकांशी संवाद...त्या हवालदार तुकाराम पाटीलला येणारी क्षुद्रतेची (insignificant असल्याची), वैफल्याची भावना त्यावर त्याचा विनोदाचा उतारा, आणि ह्या सगळ्या पलिकडे दिसणारा त्याचा कनवाळू समजूतदारपणा...ही भुमिका परेश रावलने अफलातून केली आहे. हा माणूस खरच अशक्य आहे....त्याचे पोलीस स्टेशनमधले शेवटचे भाषण, के के मेननला व्हॅन मधे बोलवतो तो प्रसंग...हे सगळेच अफाट....काहिही विशेष प्रयत्न न करता हा माणूस फक्त 'हवालदार तुकाराम पाटील' वाटतो! परेशला फक्त जागेवरूनच सलाम! बॉस, तुम सचमुच मे बहुत बडा आदमी है बे!

ह्या सगळ्यात जाणवणारी निशिकांतची दिग्दर्शक म्हणून प्रगल्भ समज आणि ह्या माध्यमाची अनन्यसाधारण जाण- ह्याचा हा फक्त दुसरा चित्रपट आहे हे सांगूनही खरे वाटत नाही! सगळ्यात महत्वाचे त्याने निवडलेली पटकथेची व्याप्ती आणि त्याची ट्रीटमेंट - फिल्मी होण्यासारखे खूप प्रसंग, उपकथानक असूनही त्याने तो मोह टाळला आहे. तसेच आपल्याला ह्या चित्रपटात अशा घटनांचा तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर होणारा परिणाम एवढेच (आणि फक्त तेवढेच) दाखवायचे आहे हे त्याने पक्के ठरवले आहे - आणि म्हणूनच ते तो तो खूप परिणामकाररित्या दाखवू शकला आहे - मला वाटते हे त्याचे यश खूप मोठे आहे. त्याची प्रतिके, त्याचे भाष्य हे खूप सहजपणे चित्रपटाचा भाग म्हणून येते - ते प्रसंग मुद्दाम घुसवल्यासारखे, किंवा बटबटीतपणे ठिगळासारखे येत नाहीत (बटवटीतपणाच्या बटबटीत उदाहरणासाठी आठवा इंद्रकुमार इराणी साहेबांचा 'बेटा', कुंभाराचे चाक, ओली माती...नुसता वैताग!!!!)...कित्येकवेळा तो हे खूप प्रभावीपणे संवादाशिवायही जाणवून देतो.

एक प्रसंग -- सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात...ते बोलत असतात...कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो....कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो...मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत...बॉसचे बोलणे संपते...तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात....

तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या जीवनात बॉम्बस्फोटांमुळे वेगवेगळ्या तर्‍हेने उलथापालथ होते...त्यांचे भावविश्व ढवळून निघते....यथावकाश, आपापल्या परीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी ती पात्रे सावरतात, भानावर येतात...तशीच महानगरी मुंबईही आपल्या रुळांवर चालू लागते....त्यांना आणि त्यांच्यावरोबरच ह्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार (खर तर भागीदार म्हणावे इतका चित्रपट सुरेख/वास्तवदर्शी झाला आहे) असलेल्या आपल्यालाही जाणवते....की जीवन अपरिहार्यपणे पुढे जातच राहते! आणि ही जाणीव एक बधीर, भावनाशून्य जाणीव नसते, तर ती असते एक सहृदय, समंजस, ओली जाणीव....

(मास्तरांच्या भाषेत सांगायचे तर) चित्रपटाचे प्रिमाईस एका ओळीचे - Life still goes on... आणि कुठेही शब्दबंबाळ, अतिरेक न करता 'मुंबई मेरी जान' हे सहजपणे आपल्याला जाणवून देतो. बॉम्बस्फोटांसारखा हादरवणारा विषय असूनही निघतांना आपण सहजपणे गुणगणतो, 'ऐ दिल, है मुश्किल जीना यहाँ...!'

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

12 Sep 2008 - 6:07 pm | मेघना भुस्कुटे

जबरदस्त बॉस. जबरदस्त.
जवळजवळ सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळाला.
आपल्याला काय दाखवायचे आहे, आणि ते कसे दाखवायचे आहे, याची क्लॅरिटी खरंच खूप महत्त्वाची असते. मी अजुनी पाहिला नाहीय 'मुंबई मेरी जान'. आता बघावा'च' लागणार. धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 3:34 pm | विसोबा खेचर

जबरदस्त बॉस. जबरदस्त.
जवळजवळ सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळाला.

हेच म्हणतो...!

मनिषराव, जियो...!

आपला,
(मुंबईकर) तात्या.

शितल's picture

12 Sep 2008 - 6:20 pm | शितल

परिक्षण छान केले आहे.
मुंबई मेरी जान पहायला पाहिजे.
:)

मनी's picture

12 Sep 2008 - 6:23 pm | मनी

मस्तः :) आता बघावा'च' लागणार

ऋचा's picture

12 Sep 2008 - 6:27 pm | ऋचा

मस्तच रे!
मलाही असच वाटलं की मी परत सिनेमा पाहातेय.
खरच खुप सुंदर चित्रपट!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मनस्वी's picture

12 Sep 2008 - 6:28 pm | मनस्वी

मस्त परिक्षण मनिष.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2008 - 6:35 pm | स्वाती दिनेश

परीक्षण वाचून सिनेमा पहायलाच हवा असे दिसते, आता डीव्हीडी मिळवण्याच्या मागे लागायला हवं..
स्वाती

मिसंदीप's picture

12 Sep 2008 - 6:40 pm | मिसंदीप

अतिशय सुंदर परिक्षण.
वर लिहिल्याप्रमाणे, खरंच पुर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.
या चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा या आपल्यातील एक आहेत असे आपल्या परिक्षणावरुन कळते.हा चित्रपट बघायलाच हवा!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Sep 2008 - 6:46 pm | ब्रिटिश टिंग्या

बघायला हवा 'मुंबई मेरी जान'!

अवांतर - कालच अनुपम खेर अन् नसरुद्दीन शहा यांचा "वेनस्डे" बघितला.....याच पठडीतला अतिशय वेगळा अन् सुंदर चित्रपट! बर्‍याच वर्षानंतर अनुपम खेरने चांगला अभिनय केला आहे!

मनिष's picture

12 Sep 2008 - 6:52 pm | मनिष

वेनस्डे मलाही बघायचा आहे...छे, फारच बॅकलॉग राहिलाय सिनेमांचा, भरून काढला पाहिजे! :)

रामदास's picture

12 Sep 2008 - 7:07 pm | रामदास

रॉकऑन वेद्न्सडे
आणि आता मुंबई मेरी जान .
बघून नक्की कळेल काय ते.
आपण केलेल्या लिखाणातून तसा सिनेमा बघितल्याचा अनुभव आला आहेच.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

निशिकांत कामत चा उत्तम चित्रपट. बघाच ..... फक्त मुम्बईकरच नाहि पण सगळयाच्या मनाला भिडेल असा चित्रपट...
मनिष, जबरदस्त परीक्षण ....!
रॉकऑन हि चान्गला आहे...

एक मुम्बईकर :)
बाबा

प्रभाकर पेठकर's picture

12 Sep 2008 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर

'वेनस्डे' आणि 'मुंबई मेरी जान' दोन्ही चित्रपट पाहिले पाहिजेत.
उत्तम लेख. अभिनंदन.

लिखाळ's picture

12 Sep 2008 - 8:45 pm | लिखाळ

हा चित्रपट परवाच पाहिला.. चांगला आहे.. परेश रावलचे काम चांगले आहे.
आपले परिक्षण चांगलेच आहे. त्यात कॉफिवाल्याचे भावविश्व फार चांगले वाटले. तो वेगळ्या कथानकाचा विषय वाटतो. तसेच वार्ताहर बाईना झालेले साक्षात्कार पण चांगले आहेत. हे लोक इतरांच्या भावनांचा कसा खेळ करतात ते चांगले दाखवले आहे. चित्रपट एकसंध आणि चांगला वाटतो.
पण...
देवासमोर उभे राहून शांत चित्ताने प्रार्थना केल्यावर समाधान मिळते.. हे समजले. त्यानंतर मी ते करु लागलो. पण कुणी वेगळ्या काही कारणासाठी देवासमोर डोळे मिटले नाहित तर मी त्याला रागावलो. असेच होत असते. डोळे मिटावे..समाधानासाठी पण तसे नकरणार्‍याला माझ्या नकळत मी दोषी ठरवतो. समाजाने सहिष्णू असण्याचे फायदे जाणले आहेत. जो सहिष्णू नाही तो समाजात थोडा खालच्या प्रतिचा समजला जाउ लागतो. हे स्वाभाविक. पण वेगळ्या व्यक्तीने आपली शांतता भंग केली आहे आणि मी ते डोळे उघडून पाह्यला लागल्यावर मलाच शिक्षा, माझीच निर्भत्सना ! ज्याने शांतता भंग केली त्याच्या बद्दल पुढे बोलू..पण मी आत्ताच्या आता गप्प बसायचे ! आणि त्याच्याबद्दल पुढे बोलु..कधितरी पुढे... (अगदी वास्तवदर्शी चित्रपट.)
सहिष्णूतेचे तेच तत्वज्ञान नव्या वेष्टणात.. ज्याला खप आहे तेच तयार केले जाते !

--लिखाळ.

घाटावरचे भट's picture

12 Sep 2008 - 9:48 pm | घाटावरचे भट

मी हा चित्रपट ८-१० दिवसांपूर्वी पाहिला. विस्कळीत पटकथा असलेला चित्रपट असं मी याचं वर्णन करीन. कामतसाहेबांना शेवटपर्यंत काय म्हणायचं आहे ते कळत नाही. त्यांना जर 'लाईफ गोज ऑन' आणि त्या अनुषंगानं दिसणारं मुंबईचं स्पिरिट दाखवायचं असेल (असं मी गृहित धरून चाललो होतो) तर त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरलाय असं म्हणावं लागेल. पण दिग्दर्शक त्यातल्या पात्रांच्या वैयक्तिक सुखदु:खातून बाहेरच पडू शकत नाही. त्यामुळे एकूणच मुंबईकरांची एक समाज म्हणून झालेली हानी आणि त्यातून त्यांचं जिद्दीनं उभं राहाणं हे न दिसता चित्रपट २-३ पात्रांच्या भोवतीच फिरत राहतो, विशेषतः सोहा अली खानची कथा. माधवनच्या कथेबद्दलही असंच म्हणता येईल. देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे. यातून कामतसाहेबांना नक्की काय सुचवायचं आहे? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रथम पाहता खटकतात (आणि जरा खोलात विचार केल्यावर अजूनच जास्त खटकतात).

सर्व कलाकारांचा अभिनय दमदार आहेच. त्याबद्दल वादच नाही. विशेषतः परेश रावल आणि केके यांचा अभिनय उत्तम, किंबहुना पटकथेतच त्यांची पात्रं एकूण इतरांपेक्षा जास्त सशक्तपणे उभी राहिली आहेत असं म्हणायला हरकत नाही. असो, मी काही फार मोठा जाणकार नाही, पण 'डोंबिवली फास्ट' नंतरची गाडी एकदम 'स्लो' सोडून कामतसाहेबांनी थोडा अपेक्षाभंग केला असंच मी म्हणीन.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

लिखाळ's picture

12 Sep 2008 - 10:04 pm | लिखाळ

>>देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे. <<
ह्म्म हा मुद्दा मी विसरलोच होतो.. बरोबर आहे आपण म्हणता ते.

पण या प्रसंगी केलेला गुगल अर्थचा वापर फार मस्त आहे ! मला एकदम कल्पक वाटला !
--लिखाळ.

मनिष's picture

12 Sep 2008 - 10:55 pm | मनिष

देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे.

स्वप्न रंगवतांना???
मला नाही वाटत तस अभिप्रेत आहे दिग्दर्शकाला -- माधवन घाबरला आहे, ही सततची असुरक्षितता, वारंवार होणारे घातपात हे बघून तो देशांतराचा विचार करतो, पण मित्राच्या सांगण्यवरून ९/११ नंतर अमेरिकेतही पसरलेला दहशतवाद, ती असुरक्षितता आहेच हे त्याला जाणवते! ती त्याची प्रक्रिया अतिशय नैसर्गिक वाटते...

प्राजु's picture

12 Sep 2008 - 11:32 pm | प्राजु

सर्वप्रथ तुझं अभिनंदन! इतकं सुंदर तू परिक्षण लिहिलं आहेस ना या चित्रपटाचं की, आता हा चित्रपट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही असच वाटतं आहे. तू तर प्रत्येक पात्र आणि प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला आहेस. जबरदस्त लेखन.
धन्यवाद, एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनिष's picture

14 Sep 2008 - 11:51 am | मनिष

प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सगळ्यांनाच धन्यवाद!

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 12:14 pm | भडकमकर मास्तर

हा चित्रपट पहायचा राहिलाय ...स्पॉइलर्स डिस्क्लेमर सुद्धा वाचला... त्यामुळे डीटेल्स वाचले नाहीत.... पाहिल्यावर लिहिणार...

अरे आठवडाभर घरचे नेट बंद आहे त्यामुळे सगळे प्रतिसाद उशीरा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मनिष,

मस्त परीक्षण. आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.

भडकमकर मास्तर's picture

27 Sep 2008 - 12:34 am | भडकमकर मास्तर

परीक्षण पूर्ण वाचले... एकदम छान झालंय...

आज दुपारी पाहिला सिनेमा...
फार आवडला...

एक गोष्ट पाहिली का?
या सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेयनामावलीत पहिलंच नाव परेश रावळचं आहे.... बहुतेक प्रथमच असं घडत असेल...

( चांगल्या अर्थाने म्हणतोय, ) क्रॅशची आठवण झाली...
त्यात शेवटी सार्‍यांचे गंड ( कॉम्प्लेक्सेस) , गिल्ट आणि द्वेषाची भावना या सार्‍याचे शांतपणे निराकरण होताना पाहणे आवडले....
विशेषतः के के ( सुरेश) शेवटी चहाच्या टपरीत त्या पोराशी गप्पा मारतो आणि नंतर कार्ड फाडून टाकलेल्या कंपनीत कम्प्यूटर बसवायला सुद्धा जातो, तो साराच प्रसंग अप्रतिम...
मुंबई हे एक मोठं मेल्टिंग पॉट आहे ....

( सारा सिनेमा झाल्यानंतर सगळ्या व्यक्तिरेखा काय शिकल्या?.... ).. हा अभ्यासही छान आहे करायला...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री's picture

27 Sep 2008 - 12:50 am | भाग्यश्री

एक प्रसंग -- सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात...ते बोलत असतात...कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो....कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो...मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत...बॉसचे बोलणे संपते...तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात....

संवादाशिवायचा हा प्रसंग खूप आवडला.. १० वाक्यांचं काम केला या सीनने..!
खूप आवडला मुव्ही.. बॉम्ब फुटला तेव्हा मी लिटरली हादरले.. पॉझ करून दोन मिनीटं बसून राहीले होते.. ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला त्यांची काय हालत होत असेल! :(
परेश रावल्,केके मेनन्,सोहा सगळे सगळेच आवडले!! खूप आवडला मुव्ही!

मानस's picture

27 Sep 2008 - 1:02 am | मानस

ह्या अनुषंगाने बर्‍याच, म्हणजे सुमारे २० वर्षांपुर्वी "सवाई एकांकीका" स्पर्धेत झालेल्या "बाँब ए मेरी जान" ह्या केदार शिंदेच्या एकांकीकेची खुप आठवण झाली.

निव्वळ ४५ मिनिटात, बॉंब-स्फोटाच्या पार्श्वभुमीवर अतिशय सुरेख चित्रण केदार शिंदे याने ह्या एकांकीकेत मांडले होते, आता आठवत नाही पण बहुतेक पहिलं बक्षिस मिळालं होतं.

असो, हा चित्रपट नक्कीच बघणार ..... इथे थिएटर मधे लागण्याची वाट पहात आहे.