पूर्वेच्या समुद्रात -- १५
पूर्वेच्या समुद्रात -१४
दुसर्या दिवशी आम्ही विशाखापटणमसाठी कूच केले. विशाखापटणमला पोहोचल्यावर मी ताबडतोब एक हाताने अर्ज खरडला कि माझे पोस्टिंग तटरक्षक दलासाठी झाले असले तरीही मला कल्याणी या रुग्णालयात विशेषज्ञ म्हणून सेवा देण्यासाठी( SPECIALIST COVER) सांगितलेले आहे आणी तेथील तज्ञ सुटीवर गेल्यावर मी पूर्ण वेळ तेथे हजर असतो त्यामुळे मला नौदलाच्या गृह वसाहतीत घर मिळावे. या अर्जावर कमांडिंग अधिकार्याने सही केली आणी तो स्थानिक तटरक्षक दलाच्या आणी नौदलाच्या मुख्यालयाकडे रवाना केला.
नौदलाच्या मुख्यालयातून कमांडिंग अधिकार्याकडे चौकशी करण्यात आली कि असे करण्यासाठी अगोदर असा अर्ज कधी आलेला नाही( PRECEDENCE) किंवा सध्या प्रचलित असलेल्या कायद्यात असे कोणतेही प्रावधान नाही. कोणत्या कायद्याच्या आधारे या अधिकार्याला घर द्यायचे?
कमांडिंग अधिकार्याने मला विचारले डॉक्टर आता काय करायचे? मी त्यांना स्पष्टपणे सांगितले कि आजता गायत कोणत्याही वैद्यकीय तज्ञ अधिकार्याला तटरक्षक दलात पाठविलेले नव्हते. जेथे एम बी बी एस झालेला लग्न न झालेला तरूण अधिकारी पाठवायचा असतो तेथे लग्न होऊन दोन मुले असलेल्या वरिष्ठ स्पेशालीस्ट अधिकार्याला एम डी झाल्यावर पाच वर्षांनी तुम्ही मला अशा जहाजात पाठविले. येथे काहीही काम नाही आणी शिवाय तुम्ही आता आपला पदर झाडता आहात. माझी एकच भूमिका स्पष्ट आहे -- मला घर मिळाले नाही तर मी जहाजावर चढणार नाही. मग भले माझे कोर्ट मार्शल झाले तरीही चालेल.
कमांडिंग अधिकार्याने मग मला त्याच्या बरोबर नौदलाच्या मुख्यालयात यायला सांगितले. तेथे मला CAPO(COMMAND ADMINISTRATIVE AND PERSONNEL OFFICER) कमोडोर भोला राव यांच्या पुढे उभे करण्यात आले. त्यांना मी हीच गोष्ट स्पष्टपणे सांगितली कि मला तटरक्षक दलात काम करण्यात कोणतेही स्वारस्य नाही कि मी तेथे माझे पोस्टिंग करा हा अर्जहि केला नव्हता. मला घर देणार नसाल तर मी काही जहाजावर चढणार नाही. हे बोलून मी बाहेर आलो.
यानंतर त्यांनी माझे पत्र तेथील वैद्यकीय मुख्यालयात पाठवले. तिथल्या मुख्य वैद्यकीय अधिकार्याशी त्यांनी चर्चा केली. दुसर्या दिवशी मी जेंव्हा कल्याणी रुग्णालयात गेलो तेंव्हा तेथील सर्जनने मला विचारले कि तुला कुठले वैद्यकीय प्रमाणपत्र हवे आहे? मी त्यांना म्हणालो मला कोणतेही असे प्रमाणपत्र नको आहे. त्यावर ते म्हणाले कि मला मुख्य वैद्यकीय अधिकार्याचा फोन आला होता आणी घरासाठी तुला वैद्यकीय प्रमाणपत्र हवे आहे. मी त्यांना म्हणालो मला पाठदुखीचा त्रास होता त्या साठी मी तुमच्या कडे आलो होतो हि जुनी गोष्ट आहे पण मला त्याचे कोणतेही प्रमाणपत्र नको आहे. तेथेच उभे असलेले स्त्रीरोग तज्ञ मला म्हणाले कि पाहिजे तर मी तुझ्या बायकोसाठी तसे प्रमाणपत्र देतो म्हणजे उद्या तुला काही कटकट नको असेल तर. मी त्यांना स्पष्ट पणे सांगितले कि मला घर माझा अधिकार म्हणून हवे आहे. कुणाचा उपकार म्हणून नको. मी असे कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही.
संद्याकाळी मला मुख्य वैद्यकीय अधिकार्याचा फोन आला. अरे आम्ही तुला मदत करायचा प्रयत्न करतो आहोत तर तू इतका आखडू पणा का करतो आहे. मी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले कि मी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार नाही. नौदलाकडून घर मिळणे हा माझा मुलभूत हक्क आहे आणी त्यासाठी मला कुणाचेही उपकार नको आहेत. त्यावर त्यांनी आम्ही इतकी मदत करायला तयार आहोत तर याचे नखरेच जास्त म्हणून फोन ठेवून दिला.
दुसर्या दिवशी संध्याकाळी कमांडिंग अधिकार्याने मला बोलावले आणी म्हणाला कि तुमच्या वैद्यकीय मुख्यालयाने त्यात काडी घातली आहे. त्यांनी असे घर देण्याचा कोणताही PRECEDENCE नाही म्हणून शेरा मारला आहे. मी शांतपणे म्हणालो मला कोणी काय शेरा मारला आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. मला घर मिळाले नाही तर मी जहाजावर चढणार नाही या भूमिकेवर मी ठाम आहे आणी या साठी मी कोणतेही खरे किंवा खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देणार नाही.
कमांडिंग अधिकारी किंकर्तव्य विमूढ झाले. दुसर्या दवशी परत ते नौसेना मुख्यालयात गेले आणी तेथे हा प्रश्न परत कमोडोर भोला राव यांच्यापुढे मांडला. ते दोघे उठून CSO (CHIEF STAFF OFFICER) यांच्या केबिन मध्ये गेले.त्यांच्याशी या सगळ्य़ा प्रकारावर चर्चा केली. यावर CSO नि माझ्या पत्रावर एक शेरा मारला--NOT WITHSTANDING ALL THE OBJECTIONS ABOVE, THE OFFICER SHOULD BE GIVEN ACCOMODATION IN NAVAL BASE IN HIS OWN TURN.
झाले. लेखणीच्या एका फटक्यासरशी माझे नाव घराच्या यादीत दाखल झाले आणी एका आठवड्याच्या आत मला तेथे एक छोटे हंगामी घर मला नेमून दिले गेले. हे घर म्हणजे जुन्या बराकीचे हंगामी घरांत रुपांतर केलेले होते. दोन १५ X १० च्या खोल्या. एक ८ X ६ चे स्वयंपाक घर आणी एक ६ X ५ चे न्हाणीघर.
परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे घर नौदलाच्या मुख्यालयाच्या हद्दीत होते. सर्ब बाजूनी खडा पहारा होता. कोणतीही रहदारी नव्हती. एका फूटबॉल कोर्टाच्या चारी बाजूनी बैठ्या चाळीसारखी हि घरं होती. आजूबाजूला सारे नौदल अधिकारी आणी त्यांची कुटुंबे होती.बाजार आणी मुलांची शाळा चालत जाण्याच्या अंतरात होती. नौदलाची अधिकाऱ्यांची वसाहत रस्ता ओलांडल्यावर पलीकडेच होती. क्लब आणी कॅन्टीन त्याच आवारात होते. तेथे येणाऱ्या कामाच्या बायकांना हिंदी येत असे. अतिशय कामसू आणी स्वच्छ् अशा त्या बायका होत्या. फटाफट दोन तासात सर्व काम उरकून जात असत. घर घेतले आणी ज्या दिवशी आम्ही तेथे सामान हलवले त्याच दिवशी बाजूच्या अधिकार्याच्या पत्नीने दुपारचे जेवण त्यांच्या ताट वाट्या भांड्यांसकट पाठवले. संध्याकाळी दुसर्या अधिकार्याकडून असेच सर्व जेवण आले. पहिले दोन दिवस घर लावेपर्यंत तुम्हाला स्वयंपाकघरात जायचीच गरज पडली नाही कि भांडी घासणे साफ करणे याचे कष्ट पडले. यामुळे एक दोन दिवसात तुम्ही सर्व घर लावून मोकळे होता.अशी सर्व तर्हेची मदत आजूबाजूच्या नौदल अधिकार्यांच्या कुटुंबाकडून झाली. दोन अधिकाऱ्यांच्या कडे फोन होते त्यांनी लगेच आपले फोन नंबर दिले आणी केंव्हाही कुठूनही निस्संकोचपणे फोन करा असे सांगितले. शेवटी ते सर्वहि अशाच परिस्थितीतून केंव्हा तरी गेलेले होते/ जात होते. म्हणतात ना समानशीले व्यसनेषु सख्यं.
एवढ्या मोठ्या तीन बेडरूम च्या ग्रानाईटची फरशी असलेल्या पाचव्या मजल्यावरील लक्झरी घरापेक्षा हे साधे मोझाईक टाईल्स असलेलं बैठं चाळीतील घर कितीतरी सुखदायी होतं.
शेवटी घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत. शेजारी आणी आजूबाजूचे वातावरण हे जास्त महत्त्वाचे असते. येथे आल्या बरोबर माझी पत्नी आणी मुलं अतिशय शांत आणी समाधानी झाली. केलेल्या भांडणाचे चीज झाल्यासारखे वाटले.
म्हणतात ना -
याचसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा.
क्रमशः
प्रतिक्रिया
15 Jan 2016 - 1:18 pm | एस
वा! तुमचा तत्त्वनिष्ठपणा नेहमीच अनुकरणीय वाटत आला आहे.
15 Jan 2016 - 1:36 pm | नरेश माने
छान! तुमच्या लढ्याला यश मिळाले हे खुप चांगले झाले.
15 Jan 2016 - 1:52 pm | पिलीयन रायडर
Great Doctor!! Really appreciate the way you denied giving any medical certificate for getting a home which was your right!!
15 Jan 2016 - 2:00 pm | नाखु
आणि कौतुकास्पद!
आज्काल खोटी कारणे देऊन प्रमाणपत्रे मिळवून लाभ लाटण्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकला हे फार महत्वाचे !!
15 Jan 2016 - 2:04 pm | अजया
Kudos to you Dr Khare.तुम्ही अगदी खरेपणाने वागलात!
15 Jan 2016 - 2:10 pm | होबासराव
अहो मग खरे च आहेत ना ते :))
माझ नाव खरे सुबोध खरे :)) (ह.घ्या. ;))
15 Jan 2016 - 2:06 pm | सनईचौघडा
वाचतोय. पुभाप्र.
डॉ.च्या लेखणीचा पंखा
(पम्या)
15 Jan 2016 - 2:08 pm | होबासराव
लेख नेहमि प्रमाणे मस्तच :))
15 Jan 2016 - 2:35 pm | मन१
वाचत आहे.
15 Jan 2016 - 3:39 pm | सुधांशुनूलकर
घर मिळाल्याचं वाचून खूप छान वाटलं..
आपली तत्त्वनिष्ठ भूमिका न सोडल्याबद्दल तुमचं कौतुक. (म्हणूनच आपलं खूप जमतं बहुतेक!)
लेखमालिका खूप छान चालली आहे.
15 Jan 2016 - 5:19 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. शिकता येण्या सारख आहे.
15 Jan 2016 - 5:27 pm | तुषार काळभोर
द नेम इज खरे, सुबोध खरे!
डॅशिंग डॉक!
नडला की तोडला!!
15 Jan 2016 - 5:30 pm | पैसा
ग्रेट! खरे बोलून बरीच कामे व्यवस्थित होतात!
15 Jan 2016 - 6:04 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
17 Jan 2016 - 7:52 am | रेवती
छान काम झालं.
18 Jan 2016 - 7:06 pm | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- Refugee