संवाद साधन

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 9:32 am

मी बोरीवलीत राहातो. आमच्या भागात एक मराठी माणसाचे बियर शॉप आहे. काल रात्री त्याच्याकडे एकजण आला. 'केम छो काका' अशी आस्थेने मालकाची विचारपूस केली.
मालकाने दोन्ही तळवे उंचावून, पांडुरंग, पांडुरंग म्हटले.
मी मराठी असल्याने, त्याच्या प्रतिसादाचा अर्थ मला समजला.
'चित्ती असो द्यावे समाधान' असे त्याला म्हणायचे असावे...
त्या ग्राहकाला ते काही समजले नसावे!
'त्रण स्ट्रोंग आपो'... तो गोधळल्या आवाजात म्हणाला, आणि काऊंटरवरचा पोरगा गोंधळला.
'गुजराती समझती नही क्या?... सीख लो यार, गुजराती एरियामे रहते हो ना?'... त्या ग्राहकानं चढ्या आवाजात मुलाला सल्ला दिला आणि काळी पिशवी घेऊन पैसे देऊन तो निघून गेला.
मी बाजूलाच उभा होतो.
मालकाने निराश नजरेनं माझ्याकडे बघितलं. पुन्हा एकदा हात उंचावले आणि पुन्हा पांडुरंगनामाचा जप केला.
या वेळीही, त्याला काय म्हणायचंय ते मला समजलं!!
*** ***
पण एवढं विचित्र वगैरे वाटून घ्यायचं किंवा कसं होणार मराठीचं वगैरे चिंता करायचं कारण नाही.
दोन महिन्यांपूर्वी मी बडोद्याला गेलो होतो. एका दुकानात बायको आणि मी एकमेकांशी काहीतरी बोलत होतो. ते ऐकल्यावर दुुकानदारही आमच्याशी मराठीत बोलू लागला.
माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले असावे. कारण, काही न विचारताही दुकानदारच म्हणाला, 'साहेब, आमच्या गावात मराठी माणूस भरपूर आहे. त्यांच्याशी बोलायचं तर त्यांची भाषा यायला नको का?'
आश्चर्य चेहऱ्यावर ठळक करून मी त्याला विचारलं, 'का? त्यांना गुजराती येत नाही? '
'येतं ना! इथल्या मराठी माणसाला चांगलं गुजराती येतं. पण काय आहे, माणसाशी त्याच्या भाषेत संवाद साधला की जवळीक वाढते!'
... मग मी काहीच बोललो नाही!

समाजप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

6 Jan 2016 - 10:49 am | सर्वसाक्षी

समोरच्याने आपली भाषा बोलावी असे मराठी माणसानाच वाटत नाही, उलट त्यांना ते संकुचित मनोवृत्तीचे लक्षण वाटते. त्यांना आपणच समोरच्याची भाषा शिकावी असा न्यूनगंड आहे. आपल्या परिचयातील अमराठी व्यक्तिला त्याच्या भाषेत अभिवादन केले तर बरे वाटते, पण म्हणुन त्याच्या भाषेत बोलायची गरज नाही. जर त्याचा प्रतिसाद सकारात्मक नसेल तर पडते घेउ नये. मराठीचा आग्रह धरणार्‍याची बर्‍यापैकी उपेक्षा व उपहास मराठी संकेतस्थळांवर होताना दिसतो. मराठी माणसाच्या हिंदीची टिंगल उडवणारे फक्त मराठीच, अन्य कोणतेही भाषिक त्यांच्या भाषा बांधवांची इतर भाषा येत नसल्याबद्दल खिल्ली उडवत नाहीत.

व्यवसाय करणार्‍याला ग्राह्कांना खुष करण्यासाठी त्यांची भाषा बोलणे फायद्याचे असते. आंध्र प्रदेशातले असंख्य भाविक शिर्डीला येत असल्याने तिथल्या दुकानदारांना तेलगु समजते/ बोलता येते. महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या स्थायिक झालेली अनेक मारवाडी कुटुंबे व्यवस्थित मराठी बोलतात, किंबहुना ते ज्या प्रांतात जातात तिथली भाषा शिकुन घेतात. पण आपसात वा आपले भाषिक भेटल्यावर आवर्जुन व न लाजता आपल्या भाषेतच बोलतात, त्यांना ते कमीपणाचे वा अशिष्ट वर्तन वाटत नाही.

पैसा's picture

6 Jan 2016 - 11:22 am | पैसा

पांडुरंग! पांडुरंग!!