दुपारची वेळ. मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो. बाजूने वाहनांची भरधाव वर्दळ सुरु होती.
एक आलीशान गाडी उजवीकडून भर वेगात आली. समोरून तितक्याच वेगात पुढे गेली.
पाचपन्नास फूट गेल्यावर करकचून ब्रेक लागला. गाडी हळुहळू पुढे गेली आणि जागा मिळताच यू टर्न मारून वळली.
पुन्हा काही फूटावर वेगात गेली आणि तिथेही गाडीने यू टर्न घेतला.
मी काहीशा रागाने, काहीशा उत्सुकतेनं त्या महागड्या गाडीच्या कसरती पाहात होतो. सत्तरएक लाखाची असावी!
आता ती गाडी संथ गतीने माझ्या दिशेने येत होती.
अगदी माझ्यासमोर येताच थांबली.
डावीकडची काच खाली लयदारपणे खाली गेली...
'नमस्ते साब'... ड्रायवरच्या सीटवरून नम्र आवाज आला आणि मी गाडीच्या जवळ गेलो.
सोन्याने जवळजवळ मढलेला एक हसतमुख मध्यवयीन माणूस आदराने माझ्याकडे पाहात होता.
म्हणजे, फूटपाथवर बससाठी थांबलेल्या मला भेटण्यासाठीच त्याने अगोदरच्या कसरती केल्या होत्या.
मी हलकसं हसून त्याला प्रतिसाद दिला. पण ओळख पटत नव्हती.
'पहचाना क्या साब?' त्यानं बसल्या जागेवरूनच उजवा हात शेकहँडसाठी पुढे करत त्यानं विचारलं.
मी काहीच बोललो नाही. पण माझ्या नजरेतून त्याला उत्तर मिळालं असावं.
मग त्यानं संदर्भ सांगायला सुरुवात केली. काही कॉमन मित्र, अगोदर झालेली भेट आणि तेव्हाच्या गप्पांचे विषय...
मग मला ओळख पटली.
खळखळून हसत त्यानं पुढे केलेला हात मी हातात घेतला.
त्याला खूप बरं वाटलं होतं.
हलकेच बाजूचं दार उघडून त्यानं मला आत यायची खूण केली आणि कुठे, काय, कशाला... काहीच न विचारता मी बाजूच्या सीटवर बसलोही!
मग पुढे जाऊन त्याने पुन्हा यू टर्न घेतला.
तोवर मला त्याच्याविषयी असलेली माहिती मनात ताजी झाली होती.
तो बोलतच होता. थोडं पुढं गेल्यावर त्यानं खिडकीबाहेर रस्त्यापलीकडे ऐसपैस पसरलेली एक शेड दाखवली. चारपाच हजार स्क्वेअर फुटात पसरलेली.
ये अपना वर्कशॉप.... मी मान डोलावली.
दोनचार सिग्नलनंतर गाडी रस्ता सोडून वळली, आणि एका आलिशान, ऐश्वर्यसंपन्न काम्पलेक्स मध्ये जाऊन थांबली.
उतरून आम्ही लिफ्टमध्ये शिरलो.
वेस्टर्न म्युझिकची संपूर्ण धून संपेपर्यंत लिफ्ट सुरू होती.
एकोणीसाव्या मजल्यावर बाहेर आलो.
समोरचा फ्लॆट दरवाजा उघडाच होता.
डोळे विस्फारत मी त्याच्या मागोमाग आत शिरलो.
त्याने नम्रपणे बसायची खूण केली. मी घर न्याहाळतच सोफ्यात बसलो.
तोवर त्याची बायको, मुलगी, मुलगा... सारे हसतमुखाने समोर येऊन नमस्कार करून गेले.
मग त्यानं पाचदहा मिनिटांत घर दाखवलं.
पुन्हा सोफ्यात आलो, तोवर चहा आला होता.
एवढ्याशा वयात त्यानं व्यवसायात मिळवलेल्या प्रचंड यशाच्या साऱ्या खाणाखुणा सभोवती नम्रपणे वावरत होत्या.
चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो.
पुन्हा त्यानं आदरानं दरवाजा उघडून मला गाडीत बसायची खूण केली. मी बसल्यावर तो ड्रायव्हिंग सीटवर बसला, आणि झोकदार वळण घेऊन गाडी बाहेर आली.
'ड्रायवर नही रखते हो?'... मी सहज विचारून गेलो.
नही साब... अपनेको शौक है गाडी चलानेका. वैसे हमारे घरमें किसी भी काम के लिये कोई नौकर नही. सुबहसे राततक सारा घर का काम हम ही करते है... झाडूपोछा, बरतन, सफाई, सबकुछ... भगवानने अच्छे दिन आज दिखाये फिरभी पुराने दिनो को भूलना नही चाहता हूं...
तो समोर पाहात बोलत होता.
साब मेरे लायक कुछ भी हो तो बता देना... आपलं बिझिनेस कार्ड माझ्या हातात देत तो नम्रपणानं बोलला.
मी नुसतंच हसून त्याला प्रतिसाद दिला.
मेरा नंबर है आपके पास?'... गाडीतून उतरताना मी विचारलं.
'नही साब, लेकिन आप मेरे नंबरपर व्हॉटसप पर 'ही' करके भेजो. नंबर आ जायेगा' त्यानं सहज सुचवलं, पण, 'ही करके' हा प्रकार काही कळला नाही.
पुन्हा तो म्हणाला, 'साब, सिर्फ ही भेजो '....
मी विचारच करत होतो.
तोवर मी त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह केला होता.
व्हॉटसपचं हिरवं बटन दिसताच मी मेसेज बॉक्स उघडला आणि सवयीनं टाईप केलं... Hi...
दिला पाठवून.
त्याला मेसेज मिळाला.
साब, आया ही... तो हसून म्हणाला.
त्याच्या ही चा अर्थ मला तेव्हा कळला होता.
'साब मै पूरा अनपढ हूं... साईन करना आता है सिरफ. नही तो आप व्हॉटसप पर बहुत कुछ भेजते रहोगे और मै समझ नही पाऊंगा.... रातको लडके को सामने बिठाके उससे सारे मेसेज पढ लेता हूं.... अभी अगली साल वो लंदन जायेगा उसकी कंपुटरकी अगली पढाई के लिये... तबतक मै कुछ पढना सीख लूंगा'... तो सहज बोलत होता.
मी हसत त्याचा हात हातात घेऊन थोपटला आणि त्याला निरोप दिला.
गाडी सुरू झाली.
पुढे जाऊन एक झोकदार वळण घेत त्यानं यू टर्न मारला आणि हात बाहेर काढून हलवत निरोप घेत तो वेगानं माझ्या समोरून पुढे गेला.
त्याची पाठमोरी गाडी क्षणभरच दिसू शकली.
तोवर किती सहज वळणं घेतली होती त्यानं...
प्रतिक्रिया
4 Jan 2016 - 9:02 pm | जेपी
चांगलय
तीन स्टार
4 Jan 2016 - 9:14 pm | यशोधरा
तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीची उन्नती झाली ही उत्तम गोष्ट आहे, पण इतक्या लवकर जर सगळी वळणं घेतली तर सगळी वळणं प्रामाणिक मार्गावरचीच होती का, असा एक प्रश्न मनामध्ये आला खरा.
4 Jan 2016 - 11:30 pm | आनंद कांबीकर
.