सध्या विरोधी बाकांवरची हवा खात असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुका एकत्र लढववाव्यात असा निर्णय तातडीने घेऊन टाकला. नुकतीच विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखेंच्या शासकीय निवासस्थानी अशोक चव्हाण विखे, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजितदादा पवार व जयंत पाटील असे एकत्र बसले व त्यांनी आघाडीची घोषणा करून टाकली.
मुंबई मनपामध्ये मागच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष निरनिराळे लढले होते आणि शिवसेनेची सत्ता तिथे आली होती. दीडच वर्षात पुन्हा मुंबई मनपाच्या निवडणुका येत आहेत. शिवसेना व भाजपा तिथे एकत्र लढवणार की नाही असे प्रश्नचिन्ह सध्या मोठे होताना दिसत आहे.
दोन्ही पक्षांची पावले विरुद्ध दिशांनाच पडत आहेत. मुंबईत भाजपाने आशिष शेलार यांच्याकडे अध्यक्षपद दिल्यापासून ते जोरदार टोमणे मारत शिवसेनेला डिवचण्याचेचे काम करत आहेत. वर्षभरापूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांतही दोन्ही पक्ष आमने सामने लढले व दोन्ही काँग्रेसचीही आघाडी झालेली नव्हती. तरीही भाजपाने मुंबईत कधी नव्हे इतकी चांगली कामगिरी केली आणि शिवसेनेपेक्षा त्यांचा एक जादा जागा निवडून आली आहे. सेनेचे चौदा तर भाजपाचे पंधरा आमदार आले आहेत.
सेना, काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे मोठे मोहरेही आपटलेले आहेत.
नसीम खान, वर्षा गायकवाड , कालिदास कोळंबकर, अमीन पटेल आणि अस्लम शेख असे मोजके पाचच आमदार काँग्रेसचे आले आहेत. तर राष्ट्रवादीचा एकही आमदार मुंबई व उपनगरांत विजयी होऊ शकलेला नाही.
तीच स्थिती राज ठाकरेंच्या मनसेची झालेली आहे. मनसेचाही भोपळा अबाधित राहिला.
या उलट समाजवादी पार्टी आणि एमआयएम या दोन मुस्लीम मतांचे राजकारण कऱणाऱ्या पक्षाचे दोन नेते मुंबईचे आमदार बनलेले आहेत. अशा स्थितीत मुंबई मनपाच्या पुढच्या दीड वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत काय करायचे याची जी गणिते भाजपा व शिवसेना आखत आहेत त्यांचे पहिले प्रत्यंतर आपल्याला या विधान परिषदेच्या निवडणूकतच मिळणार आहे.
शिवसेना दोन्ही जागांवर जर दावा सांगणार असेल तर भाजपाही आपला उमेदवार उतरवू शकेल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून दोन पैकी एक परिषदेची जागा जिंकता येऊ शकेल इतके नगरसेवक त्यांचे आहेत. या जागेवर अर्थातच काँग्रेसचा पहिला दावा असणार आहे. कारण त्यांचे भाई जगताप हे इथले विद्यमान आमदार आहेत.
मुंबई बाहेरच्या परिषदेच्या जागांपैकी कोल्हापुरात सध्या निवडणुका सुरु आहेत तिथे महाडिक गटाने काँग्रेस राष्ट्रावादीची साथ सोडून भाजपा सोबत समझोता केलेला आहे. तिथल्या मनपामध्ये नेहमीच महाडिकांचे वर्चस्व राहिलेले आहे.
अर्थात तिथेले निकाल आल्यावरच त्यावर बोलता येईल.
धुळे नंदुरबार मधीलही चित्र काँग्रेस राष्ट्रवादीला अनुकूल आहे. तिथे अमरीश पटेल यांना काँग्रेस पुन्हा उमेदवारी देणार की तिथे राष्ट्रवादीचा दावा मान्य करणार असा एक प्रश्न आहे. कोणता पक्ष परिषदेची कोणती जागा लढवणार यावर सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मौन आहेत आम्ही एकत्र लढवणार असे त्यांनी ठरवलेले आहे.
या आठ जागां पाठोपाठ ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून परिषदेवर पाठवण्याच्या एका जागेची ची निवडणूक जून 2016 मध्ये लागणार आहे. तिथे राष्ट्रावादीचे वसंत डावखरे हे सध्या आमदार आहेत. त्या मतदारसंघावर विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. आताही विरार महानगर पालिकेत त्यांची एकहाती सत्ता आहे. कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणुका सध्या सुरु आहेत. तिथे भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची आशा वाटते आहे.
तिथे जर जादा नगरसेवक भाजपाचे आले तर या परिषद मतदारसंघातील चित्र थोडे बदलेले. पण शिवसेना भाजपाने एकत्र जायचे ठरवले आणि राष्ट्रवादीकडून डावखरे उमेदवार नसतील तर तिथे भाजपाचा नंबर लागू शकतो. अर्थात हुकुमाचे पत्ते ठाकुरांच्याच हाती राहणार आहेत.
डावखरेंच्या त्या एका जागेच्या पाठोपाठ आणखी सात विधान परिषद जागांच्या निवडणुका जुलै 2016 मध्ये लागणार आहेत. विधानसभेमधून हे सारे निवडून गेलेले आहेत. त्या वेळी रिक्त होणाऱ्या जागांमध्ये विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचीही जागा आहे. म्हणजेच पुढच्या सहा महिन्यात विधान परिषेदच्या उपसभापती व सभापतींच्या जागा रिक्त होणार आहेत. एकूणच सभागृहाचा चेहरा मोहराच त्यामुळे बदलणार आहे. सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. व पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अधिक संख्येने आहेत. राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या बारा जागा 2014 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने घाऊकपणाने आपसात वाटून घेतल्या. परिणामी 2020 पर्यंत ते सारे सदस्य राहणार आहेत. या दोन्ही पक्षांपाठोपाठ शिवसेनेचे सदस्य जादा आहेत आणि भाजपाचा क्रमांक यात सर्वात शेवटचा लागतो आहे. पण आता विधानसभेत भाजपाचे सब्बल 123 आमदार आहेत शिवाय सात अपक्ष, लहान पक्षांच्या आमदारांनी सरकारला पर्यायाने भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. त्या 130 सदस्यांच्या जोरावर भाजपा विधान परिषदेचे संख्येच गणित पालटणार आहे. प्रत्येक वेळी सभेतून परिषदेवर जायच्या जागांपैकी दोन तृतियांश जागा भाजपा ताब्यात घेईल असे गणित त्या पक्षाने मांडलेले आहे....
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 10:08 pm | एस
उत्तम ऊहापोह आहे. दोन्ही लेख एकत्रितच असते तरी चालले असते असे वाटले.
16 Oct 2015 - 10:18 pm | दा विन्ची
उत्तम लेख आहे.
28 Oct 2015 - 5:35 pm | भुमन्यु
उत्तम संकलन आणि चर्चा