"राधा"
घननीळा, का अवेळीच तू
या राधेला परत भेटला?
विराण आता झाले गोकुळ
जुना पुराणा कदंब वठला
अता न उरली स्वप्नामधली
तरल अनामिक धूसर नाती
कुठे पाहसी कृष्णा मधुबन
भयाण या अवसेच्या राती
कालिंदीचे उदासले जळ
अता लोपली त्याची खळखळ
नि:शब्दाचे पिसाट वारे
ठेवून फिरते उरात खळबळ
अता न उरल्या काठावरच्या
कुरणातिल चरणाऱ्या गायी
टपोर त्यांच्या डोळ्या मधली
दूर हरवली वत्सल आई
तुझ्या करातील सुस्वर मुरली
आठवते केवळ प्राचीनता
चैतन्याचा सूर हरवूनी
फक्त विराणी गाते आता
सांग, कशी मग मी तरी येऊ
आठवुनी मागिल संमोहन
अता कुठे उरला राधेचा
तो पूर्वीचा घननिळ मोहन?
आणि इकडे कृष्ण ........
मी शोधतोच आहे माझ्या मनात राधा
युग संपले तशी का गेली लयास बाधा?
सर्वस्व सोडले मी, हा धर्म रक्षिण्याला
कल्पांत भोगताना पण राहिलो अकेला
मी वेड लाविले का केले मलाच वेडे?
जन्माहुनी निराळे पडले अगम्य वेढे
हे कोणते किनारे? येथे विराट लाटा
अभिशापिता परी या उध्वस्त सर्व वाटा
मी गुंतलो कसा, या गुंत्यास थांग नाही
एकांत भोगणाऱ्या जन्मास अंत नाही
भोवंडुनी दिशा या गाती मला विराणी
स्वप्नात काळनिद्रा स्मरते जुनी कहाणी.....!
प्रतिक्रिया
23 Sep 2015 - 9:17 pm | मांत्रिक
याऐवजी सांग कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागील ते संमोहन असे पाहिजे. बाकी कविता क्लासच! विस्ताराने लिहिन यावर!!!
23 Sep 2015 - 9:19 pm | मांत्रिक
जगाच्या कल्याणासाठी झटणार्या विभूतींचे वैयक्तीक आयुष्य कसे विराण होते त्याचे वर्णन आहे. त्या दृष्टिकोणातून वाचा कविता. समजेल!!!
23 Sep 2015 - 9:49 pm | मांत्रिक
राजे!!! मिपावर वाचक आणि प्रतिसादक म्हणून देखील रहा! अन्य लेखकांना त्याचीही अपेक्षा असते. केवळ लेखनमात्र रहाल तर ईतर लोक दुर्लक्ष करतील!!! पूर्ण डुबकी मारा मिपामध्ये!!! मगच गंमत कळेल!!!
23 Sep 2015 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
ककविताअप्रतीम!
बाकी मांत्रिक, एकाच वेळी तीन मूडमधून मंत्र का हो मारलात? ;)
23 Sep 2015 - 11:22 pm | मांत्रिक
३ मूड कुठल्ले हो गुर्जी!!!
23 Sep 2015 - 9:57 pm | प्राची अश्विनी
अप्रतिम!!
23 Sep 2015 - 10:37 pm | रातराणी
सुरेख !
23 Sep 2015 - 11:27 pm | प्यारे१
अता?????
देशपाण्डे आपणच का?
कविता आवडली हो!
24 Sep 2015 - 10:32 am | शशीभूषण_देशपाण्डे
धन्यवाद हो सर्वाना. सूचना नक्की लक्षात ठेवीन. घ्या सांभाळून!!!
24 Sep 2015 - 3:55 pm | विशाल कुलकर्णी
वाह... सुंदर !
24 Sep 2015 - 9:03 pm | विवेकपटाईत
सुंदर कविता. या वरून आठवले एकदा वृंदावनात यमुना घाटावर एका बकरीला एका वाळलेल्या झाडाच्या बुंध्याला बांधलेले होते, ती मे मे करत होती, ते दृश्य पाहून मला हसूच आले,
था जहां कभी कदम्ब का पेड़
बजती थी मुरलिया मोहन की.
आज वहां है ठूँठ भर
करती है बकरी मे में भर.
शेवटी काले तस्मे नम: