http://www.daijiworld.com/images1/glad_082508_phoonk2.jpg
चि त्रपटगृहात जाऊन "फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. "फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली.
रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः "रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी! ), त्यावरून तो रामूच्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असावा की काय, असं वाटतं. लेखक नाही का, स्वतःच्याच कुटुंबात, आसपास पाहिलेली पात्रं आपल्या कलाकृतीत साकारतात. तसंच दिग्दर्शकांनाही आपल्या स्वभावावर, आयुष्यावर चित्रपट काढण्याची खुमखुमी असते. त्यातून रामू तर जीवनातल्या अनुभवांवर आधारितच चित्रपट बनवतो. त्यामुळं तर त्याच्याविषयीची शंका आणखी बळावते. त्यातून "रात', "भूत', "वास्तुशास्त्र', "डरना मना है', "डरना जरूरी है' आणि आता "फूंक' असे चित्रपट काढून आणि त्यातले काही दिग्दर्शित करून त्यानं आपला विक्षिप्तपणा सिद्धही केला आहे.
"फूंक' एकट्याने पाहा आणि पाच लाख रुपये मिळवा, हा जाहिरातीसाठीचा स्टंट होता, की आणखी काही, हे रामूच जाणे. आमच्या निरागस मनातला प्रश्न एवढाच आहे, की ही स्पर्धा "फूंक'बाबतच का? आधीच्या भयपटांबाबत ती का नाही घेतली? खरं तर "कौन' रहस्यपट असला, तरी रामूचा सर्वोत्तम भयपटच होता. आणि त्याहूनही मोठा आक्षेपाचा मुद्दा असा, की रामूनं आधीच्या "दौड', "गो', "रोड', "मिस्टर या मिस', "नाच' या चित्रपटांबाबत ही स्पर्धा का नाही ठेवली? कारण हे चित्रपटदेखील आम्ही चित्रपटगृहात सलग पाहू शकलो नव्हतोच! एरवी, वीस-पंचवीस प्रेक्षकांसोबत ते पाहणं हा भयावह अनुभव होता. तर एकटे कसे काय पाहणार?
"रामगोपाल वर्मा की आग' म्हणून रामूनं "शोले'ची जी काही अब्रू काढली होती, ती आम्हाला विव्हळत, घायाळ होत, धापा टाकत पाहावी लागली. "आग' बघून केस उपटून न घेतलेला, कपडे-बिपडे टरकावून रस्त्यावरून पिसाटासारखा पळत न गेलेला प्रेक्षक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्पर्धाही घेता आली असती. "फूंक' वगैरे चित्रपट जसे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी त्यानं काढले, तसेच हे काही चित्रपट त्यांचा सूड घेण्यासाठी काढले, असं आमचं स्पष्ट मत आहे. असो. रामूनं सत्याला सामोरं जावं, एवढंच आमचं मागणं आहे. "सत्याला' म्हणजे सत्य परिस्थितीला. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या "सत्या'ला नाही!
---------
प्रतिक्रिया
29 Aug 2008 - 10:20 pm | डॉ.प्रसाद दाढे
सत्या मला खूप आवडला, अजुनही पाहात असतो.
र॑गीलातल्या काही गोष्टी मात्र अनाकलनीय आहेत. मिलीच्या धाकट्या भावाचे नाव 'मोतीलाल'? आणि तोही एव्हढा काळा? आणि वयातही डिफरन्स जरा जास्तच वाटतो.
30 Aug 2008 - 10:38 am | मृगनयनी
अभिजीत जी....... रामूचा "फुंक" बघायला मी आणि काही मिपा सदस्या जायचा विचार करत होतो, परंतु संभ्रमात आहोत , अजुनही .......
पण आता तो विचारच रहित करावा.. अशी अंतर्मनाची साद येऊ लागलीये....
कारण आमच्या सदसद्विवेकबुद्धीचे मोल ५ लाखापेक्षा नक्क्कीच जास्त आहे.... :)
संकटाची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे................ :)
(केदार शिंदे चा " गलगले निघाले" कसाये हो? :-? )
:) :) :)
हॅपी विकांत!
30 Aug 2008 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आठवाः "रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी!)
त्यातून "रात', "भूत', "वास्तुशास्त्र', "डरना मना है', "डरना जरूरी है' आणि आता "फूंक' असे चित्रपट काढून ...
राव, तुम्ही "मस्त" विसरलात का? तो पण तेवढाच टुकार होता/आहे. पण त्यात उर्मिला आणि अंतराच्या ऐवजी आफताब विचित्र आहे.
बाकी रामूचं काहीही असो एक गोष्ट मान्य करायलाच लागेल, रामूनेच उर्मिला, संदीप चौटा, सुनिधी चौहान असे भारी भारी लोक किती गुणी आहेत ते दाखवलं.
(मस्त बघून आफताबची एकेकाळी दीवानी झालेली) अदिती
30 Aug 2008 - 3:53 pm | सुचेल तसं
बरोबर आणि अजुन एक: नुकताच येऊन (लगेच गेलेला) कॉंट्रॅक्ट
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
30 Aug 2008 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर, आणि त्यात रामूने दगडाकडून काम करवून घेतलंय!
31 Aug 2008 - 12:29 pm | भडकमकर मास्तर
मी आग नावाचा सिनेमा पाहिला... रिलीज झाला त्या पहिल्या दिवशी... गेला ऑगस्ट किंवा सप्टेंबर असेल...
पहिला भाग मी कसाबसा सहन केला.... पुढे काहीतरी भारी असेल , वगैरे आशा होत्या मला....
मी इतकी आशा कशी केली म्हणून मला बरोबर आलेले मित्र खूप हसले.......ते तर सुरुवातीपासूनच जाम हसत होते ,
दुसर्या भागात महान विनोदी प्रकार सुरू झाले....
मग धमाल एंजॉय केला सिनेमा....
अमिताभ नावाच्या माणसाने इतका किळसवाणा रोल का केला असे काही क्षुल्लक प्रश्न अधून मधून पडले...
त्यानंतर रामगोपाल वर्माचा कोणताही सिनेमा थिएटरला पाहणार नाही असा पण केला...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/