किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी !
आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे ||
भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ?
धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि ||
जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे |
पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
मनात ढेकूण ठेवा लपवून घट्टच ढाकण दाबुनिया |
ऐकुया संगीत राहुया धुंदीत जीवन रंगीत पेल्यासम ||
फेका ती खड्ड्यात गंजली हत्यारं रंगवुनि मृत वाघनखं |
जळो इतिहास होऊदेत र्हास कुणास पत्रास समष्टीची ||
सुकून चालली झाडं, पानं, फूलं; खरडून शब्द काय मिळे ?
मनाशी वादळ, मनात कल्लोळ; सुचेना विचार काही केल्या ||
बळीयांचा जेठ येऊद्याहो थेट उराउरी भेट रासभाशी ||
|| जय गुरुदेव ||
प्रतिक्रिया
27 Jul 2015 - 10:53 pm | एस
हम्म्... या. एकटेच आलात?
27 Jul 2015 - 10:57 pm | जडभरत
कविता वाचली. कविचा परिचय वाचला. जुन्या साहित्यावरही नजर टाकली. काय म्हणू ही हाॅ ही हाॅ.
असो अशा मंडळिंमुळेच मिपावर धमाल आहे.
गमतीशीर.
27 Jul 2015 - 11:14 pm | जडभरत
आँ ते गाढवाचे चित्र कुठं गेलं या वेळी?
28 Jul 2015 - 2:01 pm | अजया
अरे!एका महिन्यात कसं आलं एवढं ज्ञान!!गाढव जुनं आहे!!
27 Jul 2015 - 11:09 pm | पैसा
हे गंभीर चिंतन म्हणावं का विनोदी? गुर्र्देव नसल्याने चुकल्यासारखं वाटत असेल नाही का?
28 Jul 2015 - 11:20 am | कवितानागेश
गंभीर दिसतय प्रकरण!
28 Jul 2015 - 5:34 am | स्पंदना
28 Jul 2015 - 7:02 am | बोका-ए-आझम
गुर्द्येव दत्त!
28 Jul 2015 - 7:21 am | अजया
किती दिवसांनी गाढव आलंय!वेलकम रे गाढवा वेलकम!!
गुर्रदेवांशिवाय गाढवाला करमत नसावं.म्हणून गंभीर कविता का रे गाढवा?
तू वरिजनल गाढव असशील तर तो तुझा फेमस फोटु टाक.
28 Jul 2015 - 12:11 pm | सनईचौघडा
मकरंद अनासपुरे मोड ऑन
ए शिपुरड्यांअनो काय गाढाव गाढाव करता रे ? सध्या माझं गाढाव आजारी हाये आनी मीच त्याची सेवा करतोय हे हे हे हे हॅ हॅ हॅ हॅ

मकरंद अनासपुरे मोड ऑफ.
28 Jul 2015 - 12:45 pm | प्यारे१
कवी आणि कवितेचं नाव सोडून वाचली....
अत्यंत दर्दभरी वाटली.
निराकारानं कसा घेतलासे आकार, रुते काय तुज सांग गाढवा
सुख असे भास् दू:ख तोही भास्, देतसे तुज आज्ञा गुरुदेव
28 Jul 2015 - 12:51 pm | बॅटमॅन
निराकार गाढवाने पुनरेकवार अवतार घेतल्याचे पाहून भडभडून आले. या कवितेबद्दल तुम्हांला शष्पश्री हा किताब द्यावा काय? ;) किंवा रादर कविताविषयाला ;)
28 Jul 2015 - 2:36 pm | टवाळ कार्टा
आणि टोपणनाव "शष्पू" =))
28 Jul 2015 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
वडक्कम गर्दभराज !
28 Jul 2015 - 2:29 pm | तुडतुडी
वा सुंदर . टचकन पाणी आलं डोळ्यात . हि हि हि
29 Jul 2015 - 9:37 pm | बोका-ए-आझम
जत्रा कधी आहे? यावेळी तुम्ही यजमान आहात म्हणे!
29 Jul 2015 - 10:34 pm | निराकार गाढव
कविता गंभीर विषयावरच आहे. निराकार गाढवचं व्यक्तित्व (बादवे, खरंच असं काही स्थिर व्यक्तित्व कुणाचंही असतं का...?) यात शोधण्याचा आटापिटा न केल्यास कदाचित समजू शकेल.
देशभक्ति, धर्मजांबद्दल, समाजाबद्दल, सृष्टीबद्दल, (ही यादी कितीही वाढवता येऊ शकते) प्रत्येकालाच जिव्हाळा असतो. त्या आपुलकीला, जिव्हाळ्ळयाला "मनातला ढेकूण" अशी उपमा दिली आहे. ही मनातली खरीखुरी आपुलकी—जी प्रत्यक्ष विठोबाचीच आपल्यामधली ओळख असते—ती व्यावहारिक जगात दाबून टाकण्याचे अनेक प्रसंग येतात, आणि वारंवार येतच राहतात. ते होत असताना होत असलेली मारामारी सुचली तशी लिहिली आहे. उंबराची उपमा तुकाराममहाराजांच्या एका अभंगावरून घेतली आहे (उंबरातील किटका...).
शतशब्दकथा स्पर्धेबद्द्ल वाचल्यावर वाटलं, शतशब्दकाव्य लिहावं. तसंही गद्यलेखन हे काव्यलेखनापेक्षा कितीतरी पटीने कठीणच काम आहे (हा माझा वैयक्तिक अनुभव आहे).