पहिला भाग
कोकणात रबर लागवडीचा विचार आहे
----
पहिला भाग हा नोव्हेंबर २०१४ मध्ये, बहुधा काथ्याकूट सदरात टाकला होता.
दुसरा भाग टाकायला बराच विलंब होत आहे. कारण आमचा उपक्रमही वेळखाऊ आहे. योजलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काहीही होत नाहीये आणि खोडे घालणारे लोक/घटक विपुल आहेत. असो.
मागील भागात सांगितल्याप्रमाणे आमचा बेत, मार्च २०१५ मध्ये एकूण २० एकर जमीन खरेदी करायची, मे महिन्यापर्यंत जमिनीत माजलेल्या जंगलाची सफाई करून घ्यायची आणि जून २०१५ मधे पहिला पाऊस होताच रबर लागवड करून टाकायची असा होता. त्यानुसार आगाऊ विसारा आम्ही नोव्हेंबर महिन्यात मध्यस्थाला दिला, जेणेकरून पुढे पैसे देऊन मालकांची संमतीपत्रे मिळवता येतील.
हळूहळू जमीन खरेदी हे किती किचकट आणि दमवणारे काम आहे याची प्रचीती येण्यस सुरुवात झाली.
कोकणातील जमिनींची खरेदी ही एक सुरस चमत्कारिक कथा आहे. कोकणी लोकांचा कोर्टकचेरीवरचा अढळ विश्वास हा मिपाकरांना माहीत असेलच. एखादे माडाचे किंवा आंब्याचे झाड नावावर करून घेण्यासाठी वर्षानुवर्षे कज्जे लढवत राहणारे कोकणी भाऊबंद मराठी नाटके, चित्रपट, साहित्यातून अजरामर झालेले आहेत. या अढळ विश्वासाची दुसरी बाजू म्हणजे सरकारी कागदावर नाव टाकून घेण्याबद्दलची तत्परता. परिणामी, जमिनींवर पिढ्यानपिढ्या वारसांची नावे न चुकता जोडली जातात. एखाद्या एकरभराच्या तुकड्यावर वीस-पंचवीस भाऊ-बहिणी-नातू-पुतण्यांची नावे असणे हे कोकणात नित्याची आहे. त्यामुळे वारस तपास करून घेऊन जमीन खरेदी करणे हे अत्यंत डोकेदुखीचे काम होऊन बसते. एखादा वारस राहून गेला आणि नंतर त्याने इमानइतबारे दावा ठोकला तर काय, ही भीती पाठ सोडत नाहीच. या दिव्यातून पार पडायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण. त्यामुळे जमीन ठरल्यादिवशी ताब्यात येणे हे निव्वळ अशक्य असते.
पूर्वी जमिनी या भावांच्या नावावर जात. बहिणी लग्न झाल्यावर आपला हक्क लेखी सोडून देत. (आमच्या कुटुंबात असे मागच्या पिढीत राजीखुषीने झाले होते) पण बदलत्या काळानुसार हे होणे जवळजवळ थांबलेले आहे. बहिणी आपली नावे सातबारावर हक्काने नोंदवून घेतात आणि विक्रीला मान्यता देताना पूर्ण पैसे हातात रोख ठेवल्याशिवाय संमतीपत्र देत नाहीत. ग्रामीण भारतीय स्त्रीचे हे सशक्तीकरण पाहून मला व्यक्तिगत पातळीवर आनंदच होत असला, तरी एक खरेदीदार म्हणून आमच्या मार्गातील अडचणी शतपट वाढत होत्या.
बहुतेक बहिणी या लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या असतात. काही भाऊही मुंबई-पुण्यात स्थायिक असतात. गावात राहणारे मोजके. मुखत्यारपत्र देतानाही सगळी भावंडे एका भावाला देत नाहीत. कुणी मोठ्या भावाला, कुणी आईला, कुणी काका-आत्याला असे देतात जेणेकरून एका माणसाला फसवणूक करण्याची संधी मिळू नये. असे करत करत, पंचवीस माणसांच्या मालकीची जमीन विकायला सात-आठ माणसे भूलेख कार्यालयात ठरल्या दिवशी येतात.
जमीन विक्रीचे सरकारी नियमही आता आधीपेक्षा अत्यंत कडक झालेले आहेत. सर्व खरेदीदार आणि विक्रेते एकाच दिवशी, पूर्वनियोजित वेळेनुसार हजर राहतात. ओळखपत्रे तपासणी, अंगठ्याचे बायोमेट्रिक ठसे, वेबकॅमने घेतलेले फोटो, दस्तावेजावर सह्या असा साग्रसंगीत सोहळा एखाद्या लग्नाप्रमाणे प्रहरभर वेळ घेतो. चेकचे क्रमांक खरेदीखतात टाकावे लागतात.
नोव्हेंबरमध्ये विसारा दिलेला असल्यामुळे मार्चमध्ये ठरल्यादिवशी सगळे हजर राहतील आणि खरेदी होऊन जाईल अशा गोड गैरसमजात आम्ही होतो. पहिला धक्का तिथे बसला. आम्ही खरेदी करू घातलेली वीस एकर जमीन ही सलगच होती, पण भूलेख दप्तरानुसार सुमारे सात-आठ वेगवेगळ्या सातबारांमध्ये विभागली गेलेली होती. सुट्टी घेऊन घरी येतो, तो कळले, की फक्त सहा-सात एकर जमीन उपलब्ध झालेली आहे. बाकी जमिनीत कुठे एका मालकाचे (आड)नाव चुकीचे पडले आहे, कुठे एक बहीण बेपत्ता आहे (ती बिजवराला दिली होती. तो मेल्यावर सावत्र मुलांनी तिला घराबाहेर काढली. पुढे ती कुठे गेली हे भावांनाही माहीत नाही इ.), कुठे मुंबईवाल्या पुतण्याला यायला वेळ नाही अशा कारणांची मालिकाच उभी राहिलेली होती.
जमीन घेण्याअगोदर मोजणी करून घ्या, असा स्पष्ट सल्ला वकिळांनी दिलेला होता. कारण जमीन डोंगर उताराची व दाट झाडीने व्यापलेली अशी होती. कागदावरील आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळ यात फरक असण्याची शक्यता होती. दुसरे म्हणजे ही जमीन वर्षानुवर्षे पडीक राहिलेली असल्यामुळे एखादी विशिष्ट हद्द कुठे पडते हे कुणालाच नक्की माहीत नव्हते. व्यवस्थित मोजणी करायची, तर आधी जमिनीतले जंगल साफ करावे लागते. (सदर जमिनीत झाडी इतकी दाट होती की चालत जाणेही अशक्य. खालील छायाचित्रे पाहिल्यास कल्पना येईल). हे काम मध्यस्थ करणार होता पण खरेदीखत होईपर्यंत कोणी सफाई करू देणार नाही असे त्याने सांगितले (त्यात तथ्य नव्हते हे आम्हाला नंतर कळले). त्यामुळे बाहेरून फक्त सीमारेषांची मोजणी करावी असा मध्यममार्ग निश्चित केला.
ही मोजणी अधिकॄत सरकारी खात्यातर्फे झाल्यास योग्य असते. पण भू-अभिलेख खाते हे मोजणीची तारीख द्यायला किमान दोन ते तीन महिने लावते. शिवाय जमीनही अद्याप आमच्या नावावर नव्हती. त्यामुळे खाजगी मापक बोलावून मोजणी केली. (हा गॄहस्थही त्याच खात्यातून निवॄत्त झालेला होता). त्यातही खिशाला बरीच चाट बसली. मोजणीमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर आहे असे दिसले.
जमीन साफ करवायची होती आणि मला ते काम नजरेसमोर करवून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे खरेदीखते लवकरात लवकर व्हावीत अशा प्रयत्नात मी होतो. पण विक्रेते उपलब्ध नसल्यामुळे सुट्टीचे सुमारे दहाएक दिवस मी निव्वळ माशा मारत काढले. शेवटी सुटी संपतासंपता तीन वेगवेगळ्या दिवशी एकूण दहा ते अकरा एकरांची खरेदी झाली. सफाईचे काम लवकरच सुरू करतो आणि मे महिन्यापर्यंत संपवतो, असे मध्यस्थाचे आश्वासन ऐकून घेत मी काहीशा निराश मनाने परतलो.
(अपूर्ण)
काही छायाचित्रे:
(पिकासा अल्बममधील फोटो आहेत. अल्बम सेटिंग "सर्वांना खुले" अशी ठेवली आहे. फोटो दिसतील अशी अपेक्षा)
.
.
.
प्रतिक्रिया
24 Jul 2015 - 5:41 pm | चलत मुसाफिर
फोटो दिसत नाहीत. वाचकांनी उपाय सुचवावा
24 Jul 2015 - 5:43 pm | खटपट्या
छान लेख. चित्रे दीसत नाहीत.
24 Jul 2015 - 6:07 pm | रेवती
वाचतिये. अवघड आहे खरच!
24 Jul 2015 - 6:53 pm | पैसा
अवघड आहे खरे. लिहिताय छान. पण या सगळ्यातून बाहेर पडलात का?
24 Jul 2015 - 6:57 pm | टवाळ कार्टा
वाचतोय
24 Jul 2015 - 8:32 pm | कंजूस
बराच खटाटोप आहे.
फोटो इल्ले.
फोटो इथे टाकून त्यातली दुसरी direct link वापरा.do not resize my image पर्याय तसाच राहू दे.अकाउंट बनवले की अॅल्बमही करता येतात.
24 Jul 2015 - 11:41 pm | एस
वाचतोय. यात शेवटी तुम्हांला यश लाभो ही सदीच्छा!
25 Jul 2015 - 3:40 am | सटक
छान उपक्रम आहे. ह्या निमित्ताने आधीचा धागाही वाचला. फार पूर्वी खोपोली-पाली रस्त्यावर जांभूळ्पाड्याच्या आसपास एक रबर प्लँटेशन पाहिले होते. त्याचे वय २५ वर्षे होते, आणि त्यांची अशी तक्रार होती की उत्पन्न घटले आहे. त्यांना अख्खी जमीन overhaul करून घेण्यास सांगितले होते. रबर जमिनीला खूप ताण देते असे ऐकून आहे. त्यातील पोषणमूल्ये फार झपाट्याने संपवते. त्यांना बरीच मेहनत करावी लागणार होती जमिनीचा पोत सुधरवायला!
त्यांच्या अनुभवानुसार ७-८ वर्षांनंतर त्यांना आंतरपिकेही घेता आली नाहीत.
एकसलग लावलेली, ढलप्या काढून त्यांना करवंट्या लावलेली झाडे दिसतात मात्र सुंदर!