"ती" - १
"ती" - २
------------------------------------------------------------------------------
घाबरत घाबरत परत फोन केला, नेमका विजय ने उचलला.
"हेलो"
"हेलो, कोण हवय आपल्याला?"
"नेहा आहे का?"
"हो आहे आपण कोण?"
"मी संदीप, मालती आत्याचा मुलगा!"
"ओह, संदीप !! अरे किती दिवसांनी बोलतोय आपण? दिवसांनी कुठे वर्षांनी"
"हो बरोबर,"
"अरे भेट ना कधीतरी, मुंबईत असून भेटत नाही यार आपण!"
"हो, आता भेट होईलच, मी आणि आई येतोय ना गावी लग्नाला"
"अच्छा, नेहा तुला ओळखते?" (आला मुद्यावर)
"नाहीरे, त्यादिवशी आम्ही पण बरेच दिवसांनी फोन वर बोललो, बससाठी नावं द्यायची होती ना. तिनेच घरी फोन केला आणि विचारत होती कि संदीप आहे का. म्हणून म्हटलं फोन करून विचारावं, काय काम आहे."
"ओके, एक मिनिट तीला बोलावतो."
परत धडधड वाढली, आली फोनवर.
"हेलो"
"हा मी संदीप बोलतोय, आई म्हणाली तू फोन केला होतास"
"अरे हो, ते बस कुठे थांबणार आहे ते सांगायचे होते, आत्याला माहीत नाहीना दादरचे, म्हणून म्हटले तुला व्यवस्थित समजाउन सांगितले असते."
"अच्छा, कुठे थांबणार आहे गाडी?"
"तुला स्वामीनारायण मंदीर माहीत आहे का?
"हो"
"हो, बरोबर मंदिरासमोर उभी राहणार आहे गाडी, ७ ला निघेल गाडी."
"ठीक आहे"
"तुम्ही वेळेवर या"
"ओके"
"तू नक्की येतोयस ना"
"हो येतोय तर. का गं?"
"नाही सहजच विचारलं? लवकर या म्हणजे मनासारखी सीट मिळेल."
"ओके मग भेटूच"
"हो ठीकाय. ठेऊ?"
"हो"
तिने फोन ठेवला, नक्की येतोयस का असे का विचारले तिने. तिचे असे काय अडणार होते माझ्याविना. का तिलाही मला भेटण्याची ओढ लागली होती? एवढ्या सुंदर स्मार्ट मुलीला मला भेटण्याची ओढ का लागेल. तिच्यामागे तर बरेच असतील. कोणीतरी प्रपोजतर नक्कीच केले असणार. एवढ्या सुंदर मुलीला कोणीही प्रपोज करेल. जाउदेना आपण का एवढा विचार करतोय. कोणी तिला प्रपोज केल्यामुळे मला काय फरक पडणार होता? (खरंच मी इतका त्रयस्थपणे विचार करू शकतो तिच्याबद्दल?)
कधी एकदा प्रवासाचा दिवस येतोय असे झाले होते. गाडी ७ ला निघणार होती म्हणजे आम्हाला तिथे कमीतकमी साडे सहाला पोहचायला हवे होते पण माझी तयारी दुपारी ३ वाजल्यापासूनच सुरु झाली. सामान जास्तीत जास्त ओबडधोबड दिसणार नाही याची खबरदारी घेत होतो. मी तीनचार ड्रेस घालून परत काढून ठेवले. आरशात शंभरवेळा बघून झाले. नक्की कोणते कपडे घालावे ते कळत नव्हते. माझी धावपळ बघून आईने विचारलेच, "प्रवासात काय करायचेत रे एवढे चांगले कपडे?" आता हीला काय माहीत की मी कोणाला भेटायला जाणार आहे. फर्स्ट इम्प्रेशन इस लास्ट इम्प्रेशन. गेली नऊ वर्षे आम्ही एकमेकाना बघितले नसल्यामुळे समोर आलो तरी एकमेकाना ओळखण्याची सुतराम शक्यता नव्हती.
शेवटी केसावर शेवटचा हात फिरवला, खास आणलेला अत्तर मारला. होते नव्हते तेव्हढे बचत केलेले पैसे खिशात ठेवले आणि आईला घेऊन निघालो. ट्रेन चा प्रवासही फर्स्ट क्लास मधून केला. शक्य तेवढे ताजेतवाने रहावे हा उद्देश. दादर स्टेशन ला उतरल्यावर आईला मी एके ठिकाणी बसवून म्हणालो, "तू इथे बस, सामानावर लक्ष ठेव. मी येतो पाच मिनिटात." लगेच स्टेशनबाहेर येउन स्वामीनारायण मंदीर गाठले. लांबूनच परिस्थितीचा अंदाज घेतला. मंदिरा समोर दोन बस उभ्या होत्या. यातली नेमकी आमची कोणती कसे माहीत पडणार? काहीही करून नेहाने मला बघण्या अगोदर मला तिला पहायचे होते. ती या दोन बसपैकी एका बसच्या आतमध्ये किंवा बाहेर असणार होती. एका बसच्या आजूबाजूला मला माझ्या आजोळचे एक दोन नातेवाइक दिसले. पण नेहा कुठे दिसेना. जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. परत आईकडे जाउन, गाडी आलीय असे सांगून तिला गाडीकडे घेऊन आलो. एका बऱ्यापैकी चांगल्या ट्रॅव्हल कंपनीची बस बुक केली होती. बसच्या दाराजवळ दोन तीन एअरहोस्टेस शोभतील अश्या वेशातल्या सुंदर मुली तिथे उभ्या होत्या. त्या मुली येणाऱ्या प्रवाशांचे नाव त्यांच्याजवळ असलेल्या यादीत बघून त्यांना गाडीत बसण्यास सांगत होत्या. त्यांची मैनेजर शोभावी अशी एक मुलगी त्यांना सूचना करत होती. एकंदर जबरदस्त आयोजन केले गेले होते. माझ्या मनातील नेहा मला कुठेच दिसत नव्हती. मी आणि आई गाडीजवळ जाताच आमचे नाव यादीत आहे की नाही हे त्या मुली पाहू लागल्या. तेवढ्यात नीळा पंजाबी ड्रेस घातलेली ती मैनेजर मुलगी आमच्याजवळ येउन म्हणाली, "तुम्ही मालती आत्या आहात का?"
आई म्हणाली, "हो, तुम्ही कोण?"
"मालती आत्या मी नेहा"
"नेहा तू? किती मोठी झालीस? ओळखलेच नाही मी तुला!" (९/१० वर्षात मोठी होणारच ना!) आणि किती सुंदर दिसतेयस तू ! (हे बाकी खरे बोलली)
आई तर नेहाच्या सौंदर्याने मोहितच झाली. नेहाला बरेच लोक असे बोलत असणार. होतीच तशी ती. नितळ त्वचा. गोरा रंग. धारदार नाक. एखाद्या चित्रपटातील नटी वाटत होती. त्यामुळे आईच्या बोलण्याचे तिला काही वाटलेच नाही.
अशी
नेहा म्हणाली, "चल आत्या तुला मी तुझी सीट दाखवते." (अरे काय, बरोबरचा मुलगा कोण हे तरी विचार. किंवा संदीप येणार होता बरोबर, तो कुठे आहे, हे तरी विचार. आई पण ओळख करून देत नाहीये. ओळख करून देत नाहीये हे बरच आहे. नेहासारख्या सर्वगुण संपन्न मुलीशी मी काय बोलणार होतो)
"अगं, नेहा तुला सांगायचे राहून गेले, हा संदीप. तुम्ही फोनवर बोललायत ना?"
"ओह संदीप, अरे ओळखलेच नाही मी तुला." (कशी ओळखणार. तिच्या चेहऱ्यावर एखादी तरुण मुलगी तरुण मुलाला पाहून लाजते तशे हावभाव. एकदा नजरेला नजर मिळवल्यावर लाजून ती माझ्याशी नजर मिळवणे टाळू लागली. कदाचित लहानपणीच्या गोष्टी आठवल्या असतील)
"हाय"
"हाय, तुम्ही दोघे तुमच्या जागेवर बसून घेता का? म्हणजे सगळे एकदा बसले की माणसे मोजून आपल्याला निघायचंय. नंतर गाडीत बोलूच आपण"
आम्ही आमचे सामान घेऊन गाडीत चढलो. नेहा आमच्या गाडीतूनच येणार होती म्हणजे मला व्यवस्थित अॅन्गल लाऊन तिला डोळे भरून पाहता येणार होते. नेहा प्रत्येक येणार्या नातेवाईकाची व्यवस्थित विचारपूस करून त्याना गाडीत बसवत होती. एके काळी गावात राहिलेली नेहा हीच का असा प्रश्न मला पडला. कोण्या मोठ्या बिजनेस स्कूल मधून पास आउट होऊन बाहेर आलीय अशी दिसत होती. आम्ही आमच्या जागांवर स्थानापन्न होतोय तेवढ्यात माझा लांबचा मामेभाऊ अतुल येउन माझ्या बाजूला बसला. अतुल हा माझ्या जवळच रहायला असल्याकारणाने माझ्या चांगल्या परिचयाचा होता. तोही लहानपणी माझ्याबरोबर गावी येत असे. त्यामुळे लहानपणीची चिडवाचिडवी त्याला चांगली ठाऊक होती. कधीकाळी तोदेखील त्या चिडवाचिडवी मध्ये सामील झाला होता. बाजूला बसताच त्याची बडबड चालू झाली.
"काय रे संदीप तू येणार हे सांगितले नाहीस, फक्त मालती आत्या येणार हे माहित होते."
"तू येणार हे तरी मला कुठे माहित होतं" मी
"अरे मी येणारच होतो, पण तुझे अचानक ठरलंय. ठरलंय की ठरवलंय?"
"म्हणजे?"
"म्हणजे नेहा येणार म्हणून…"
"अरे गप रे" बाजूला आई होती तिच्या कानावर मला काही जाऊ द्यायचे नव्हते. म्हणून मी अतुलला कोपराने ढोसले. अतुलसुध्दा आई बाजूला आहे हे लक्षात येताच चपापला आणि जीभ चावत शांत झाला. आता हा अतुल अख्खा प्रवासभर असेच टोमणे मारणार याचा मला अंदाज आला. यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. आमची जागा बऱ्यापैकी मागे होती व खड्यामध्ये गाडी उडणार व त्रास होणार होता. आईला हा त्रास झेपणार नव्हता. म्हणून मी आणि अतुलने आईला पुढच्या जागांवर एका मावशीबरोबर बसवले. आता आमच्या बाजूला आमच्या जवळचे ओळखीचे कोणी नव्हते त्यामुळे आता रात्रभर अतुलच्या तोंडाचा पट्टा चालणार होता. नेहा कधी गाडीत येतेय आणि कुठे बसतेय याची उत्सुकता मला होती. गाडीचे इंजिन चालू झाले आणि नेहा येउन आमच्या पुढच्याच सीटवर येउन बसली. तिच्याबरोबर तिच्या दोन मैत्रिणीही होत्या. आल्याबरोबर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. बरोबर मैत्रिणी असल्यामुळे नेहा मोकळेपणाने अतुल आणि माझ्याबरोबर बोलू शकत नव्हती. डोळ्यांच्या कोपरातून ती माझ्याकडे बघतेय असा मला उगाच संशय आला. अतुल देखील आळीपाळीने माझ्याकडे आणि नेहाकडे पहात परिस्थितीचा अंदाज घेत होता. नेहाच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या गप्पा थोड्याफार आमच्या कानावर येत होत्या. एका मैत्रिणीने नेहाला, "नेहा, आता तुझा नंबर कधी?" असे विचारले. नेहा हे ऐकून एकदम कावरीबावरी झाली. तिला काय बोलावे कळेना. बाकीच्या मैत्रिणी हसू लागल्या. नेहाने मागे वळून माझ्याकडे पाहिले. मी काही ऐकलेच नाही असे दाखवून खिडकीबाहेर बघण्याचा अभिनय केला अतुल माझ्याकडे बघून हसला. त्यानंतर त्यांचा गप्पांचा विषय बदलला. गाडीने वेग पकडला आणि बरेच लोक पेंगायला लागले . नेहाही डुलक्या घ्यायला लागली.
------
(क्रमशः)
------
प्रतिक्रिया
23 Jul 2015 - 9:56 pm | पद्मावति
पहिल्या भागापासूनच या गोष्टीने अगदी छान पकड घेतली होतीच आता तर अजुनच रंगतेय.
23 Jul 2015 - 10:04 pm | टवाळ कार्टा
असे कधी अस्ते का...हा हिंदी पिच्चर झालाय :)
23 Jul 2015 - 10:19 pm | खटपट्या
ही कथा अती काल्पनीक आहे हे पहील्या भागात स्पष्ट केलेले हाये :)
24 Jul 2015 - 10:43 am | प्रमोद देर्देकर
जाऊ दे ना खटपट्या. तु कुणाला समजावतोयस तर ज्याने याच कथेला हा प्रतिसाद दिलाय त्याला. त्याच्या आयुष्यात असे प्रसंग घडले की मग बघ तो कसा विश्वास ठेवल ते.
दु दु टक्या.
बाकी तिनही भाग आजच एकदम वाचले खुप छान चालल्येय लेखमाला.
24 Jul 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा
खिक्क...त्या भागापर्यंत जे झालेले तसे प्रत्यक्षात बर्याचदा घडू शकते...हा भाग मात्र टिपिकल कादंबरीटैप फिक्शन झालाय :)
23 Jul 2015 - 10:07 pm | स्रुजा
छान चालु आहे. खर्या प्रेम कथेत घडतील असे प्रसंग ..साधे, सरळ. उगाच सिनेमा चालुये असा फील आला नाही त्यामुळे खुप आवडली.
23 Jul 2015 - 10:18 pm | एस
क्रमशः दिसत नसले तरी पुढचा भाग येणार आहे हे गृहित धरतो.
छान!
23 Jul 2015 - 10:20 pm | खटपट्या
अरे हो ते राहीलेच, सा. स. नी क्रमश: टाकावे अशी विनंती करतो,,
23 Jul 2015 - 10:34 pm | पैसा
मस्त चालू आहे कथा!
23 Jul 2015 - 10:43 pm | श्रीरंग_जोशी
वाह उस्ताद.
लेखनसौंदर्य भावले.
23 Jul 2015 - 10:48 pm | भिंगरी
मस्त!!!!!
वाचनेबल आणि उत्कंठा वाढवनेबल कथा.
23 Jul 2015 - 11:47 pm | प्यारे१
बस निघाली तर...
माई मोड़- तो फोटो नको. प्रत्येक नानाची माई वेगळी असणार, तिला चौकटीत नका बसवू असं यांचं मत ;)
24 Jul 2015 - 6:53 am | बोका-ए-आझम
मेरा मन मेरे बस मे नही असं का म्हणतात, ते समजलं. आणि सागरिका घाटगेचा फोटो टाकल्यामुळे जरा visualize करता आलं. पुभाप्र.
24 Jul 2015 - 10:45 am | क्रेझी
भारी चालू आहे प्रवास लेखमालेचा :) पुढचा भाग लवकर येऊ देत :)
24 Jul 2015 - 12:25 pm | तुडतुडी
छान . हि सत्यकथा आहे का ?
24 Jul 2015 - 1:11 pm | खटपट्या
नाही, ही कथा अती काल्पनीक आहे. तुम्हाला ती सत्यकथा वाटली म्हणजे मला थोडंतरी जमतंय असं म्हणू शकतो.
टकाचे म्हणणे आहे आहे की चित्रपटाकडे झूकतेय...
असो, वेगवेगळे प्रतिसाद वाचून मजा येतेय.
24 Jul 2015 - 1:33 pm | रातराणी
बघा तुमचा पत्ता कट नाही ना करणार अतुल? : ) छान लिहिताय.
24 Jul 2015 - 1:44 pm | खटपट्या
अतुल हा नायकाचा मामेभाउ आहे, म्हणजे तो नेहाचा चुलतभाउ लागतो. त्यामुळे नायकाला धोका नाही.
(ही कथा माझ्या अनुभवावर आधारलेली नाही, सम्पुर्ण काल्पनिक आहे.) :)
24 Jul 2015 - 2:00 pm | स्पंदना
;)
गोड हूरहूर
मनात काहूर
मस्त!
27 Jul 2015 - 11:51 am | रातराणी
अर्र्र बेसिक मधेच लोचा झाला. आलं लक्षात आता. स्वारी बरं का.
27 Jul 2015 - 2:26 pm | खटपट्या
चालतंय !!
24 Jul 2015 - 3:33 pm | एक एकटा एकटाच
मस्त
और आन दे........
24 Jul 2015 - 5:18 pm | पाटील हो
भारी आहे येवुदे लवकर पुढचा भाग ..
24 Jul 2015 - 11:08 pm | माम्लेदारचा पन्खा
आवडता शर्ट धुण्यात पडलेला.....
दादरला उतरेपर्यंत दोघा तिघांशी शाब्दिक हाणामारी....
उतरताना समोरून दिसेल असा ग्रीसचा काळा डाग...
बसमध्ये सगळ्यात शेवटची सीट...
आजूबाजूला प्रचंड चावणारे वर्हाडी लोक....
नकोसा वाटणारा प्रवास.....
हे स्वप्नरंजन छान आहे....... चालू द्या !!!
24 Jul 2015 - 11:40 pm | जुइ
चांगली चालु आहे कथा.
25 Jul 2015 - 9:41 am | प्रदीप@१२३
मस्तच कथा.
26 Jul 2015 - 7:15 pm | बाबा योगिराज
परन्तु पुढचे भाग जरा लवकर येउ द्या...
और दिखओ, और दिखाओ