धुंदी कळ्यांना! भाग-२

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 4:42 am

भाग १

"सांग काय आहे तुझी अट?" अभि म्हणाला.

"अभि, मला माझ्यावर झालेल्या रेपची केस पुन्हा ओपन करायची आहे. तू म्हणशील मागच सगळं विसरून नवी सुरुवात करू ,पण अभि मी नाही करू शकत आता अशी सुरुवात. मला आता हेही माहित नाही की मला जे साध्य करायचं आहे ते मिळणार आहे की नाही, पण एवढं नक्की माहितीये की एकदा ही केस पुन्हा सुरु झाली की मला मागे वळून नाही पाहता येणार. माझ्याशी निगडीत किती तरी गोष्टी बाहेर सगळ्या जगाला माहित होतील, तुला मान्य असेल अशा मुलीसोबत पुन्हा संबंध ठेवणे? मला तुझ्याकडून होकाराची अपेक्षा नाहीये अभि. तू नाही म्हणालास तरी काही हरकत नाही. तू प्लीज विचार करून निर्णय घे."

"हं, तुझे आई बाबा काय म्हणत आहेत या बाबत? त्यांची तयारी आहे?"

"मी तयार केलय त्यांना अभि. काल मी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते पण खूप उडवा उडवीची उत्तर मिळाली. तुला तर माहितच आहे, त्याच स्टेटस. त्याच्याशी वाकड्यात शिरण तेव्हाही कठीण होतं आणि आता… आता तर ही केस उभी जरी राहिली तरी मी अर्धी लढाई जिंकली असच म्हणेन मी!"

"अपु मी विचार करतो आणि उद्या भेटूनच बोलू आपण."

ठीक आहे म्हणून अपर्णाने फोन ठेवला. काय करेल अभि? देईल आपली साथ? जरी नाही दिली तरी तो एकमेव साक्षीदार आहे सध्या या केसमध्ये. घटनास्थळी पोलिसांशिवाय त्यानेच पाहिलंय मला. किती नाही म्हणलं तरी या सगळ्याची झळ त्यालाही लागणारच आहे. बरोबर करतीये ना मी जे करतीये ते? कि मी स्वतः हुन ओढून घेतीये मानसिक त्रास, स्वतःवर, आई बाबांवर आणि अभिवर?

अभिच त्या रात्री प्रोग्राम मध्ये लक्ष नाही लागलं. कसातरी त्याने प्रोग्राम आटोपला आणि बाइक काढून घरी निघाला. डोक्यात फक्त अपुचाच विचार. ती अविचार तर नाही न करत? आता तिला ही केस कोर्टात गेल्यावर तिची किती बदनामी होणार याची जाणीव नसेल, पण अपु अपु तशी नाही. पुढचा मागचा सगळा विचार करूनच ती काहोतरी ठरवूनच परत आलीये. तिने मनात आणलं तर आपल्या मदतीशिवायही ती ही केस सुरु करेल, सगळ्या प्रसंगाना तोंड देईल. आताही देतेच आहे, कुणाच्याही मदतीशिवाय! पण मग आपण? आपण तिची आता साथ सोडली तर पुन्हा आरशात स्वतःला पाहू शकू? रोज माझी मैत्रीण परत येवू दे म्हणून छान छान गाणी लावायची एवढच का आपलं प्रेम? तिचीच वाट पहिली ना एवढे दिवस तर आता ती परत आल्यावर तिच्याकडे पाठ फिरवायची? विचारांच्या तंद्रीतच त्याने सिग्नल लाल झालेला पाहिला आणि करकचून ब्रेक दाबला. पावसाच्या गारव्यातही त्याला दरदरून घाम सुटला होता. हेल्मेट काढून त्यान घाम पुसला आणि त्याच लक्ष चौकात फ्लेक्स उभ्या करीत असलेल्या मुलांकडे गेलं. कुतुहलाने तो पाहू लागला. हळू हळू फ्लेक्स उभा राहिला आणि चेहऱ्यावर सोज्वळ हसू आणून हात जोडलेल्या त्याचा फ्लेक्सवरचा फोटो पाहून अभिच्या तोंडून सहज एक शिवी बाहेर पडली. "That bastard!" म्हणत त्याने गाडी चालू केली. अभि आणि अपर्णाच आयुष्य पत्त्याच्या डावाप्रमाणे उधळून लावणारा तोच होता तो नराधम!

"अखिल भारत तरुण संघटनेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक मा. श्री. प्रकाश भामरे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!"

खाली पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे मारून मुटकून बसवून काढल्यासारखे फोटो होते.

प्रकाश भामरे, पूर्वाश्रमीचा पक्या. गावगुंड होता तो तिथला. तोच नाही त्याचं अख्ख घरच आपण इथले राजेच असल्यासारखं वागत असे. ऐन शहरात भरपूर जमिनीची मालकी, त्यामुळे स्वभावात एक प्रकारचा मुजोरपणा ठासून भरला होता. जरा काही झालं की माणसं घेऊन धमक्या द्यायच्या, मारामारी करायची हा त्याचा आवडता उद्योग. त्यात आणि सरकार दरबारी चांगलीच पोच, त्यामुळे राग येत असूनही कुणी काही करू शकत नव्हतं. नवीन आलेल्या कुणी तक्रार केली जरी, तरी साक्ष द्यायलाही कुणी पुढे येत नसे, त्यामुळे पोलिसांनीदेखील हात वर केलेले. नुसता गावगुंड म्हणून फिरणाऱ्या पक्याने आता अखिल भारत तरुण पक्षाशी संधान साधून राजकारणात प्रवेश केला होता आणि बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आला. विरोध करणार कोण? कुणाला पैसे देवून तर कुणाला धमकावून मत विकत घेतलेली, त्यातही ज्या सुजाण लोकांनी त्याला मत दिलं नाही, त्यांची मतच बदलली गेली. अन्यायाचं हे साम्राज्य उभ राहत असतानाच पक्याने स्वनाताही विचार केला नसेल अशी एक व्यक्ती आता त्याला सुरुंग लावणार होती आणि केवळ तेच उद्दिष्ट समोर ठेवून आता ती परत आली होती!

अपर्णा! पक्या आता तिला विसरलाही असेल, पण ती त्याला विसरली नव्हती. त्या दिवसानंतर एक एक क्षण जो तिने रडत जगला होता त्या सर्वांचा हिशोब ती आता करणार होती. सोपं असणार नाहीये हे याची जाणीव तिला तेव्हाही होती आणि आताही आहेच, पण एक अनामिक निर्धार, एक बळ आता तिच्यात आल होतं. आपल्याला नाही मिळाला न्याय तरी तिला एक ठिणगी टाकायची होती. समाजाने डोळे झाकले असले तरी तो झोपलेला नाहीये. इथल्या प्रत्येकाच्या बहिणी, मुली, प्रेयसी सुरक्षित नाहीत ही जाणीव हाच त्या ठिणगीला भडकवणारा वारा होता. त्या ठिणगीने लागलेल्या आगीत ती स्वतःसुद्धा जळणार होती, पण आता तिला त्याची पर्वा नव्हती.

दुसर्या दिवशी अभिने अपर्णाला फोन करून भेटायला बोलावलं. आज तब्बल दीड वर्षाने ते भेटत होते. ठरलेल्या कॉफी शॉप जवळ येवून अभि तिची वाट पाहत होता. अजून तशीच असेल न अपु की आता परिस्थितीच्या चटक्यांनी अकाली पोक्तपणा आला असेल तिच्या निरागस चेहऱ्यावर? बोलताना तर आवाज खूप खोल, गूढ वाटत होता तिचा. एकप्रकारचा अलिप्तपणा असल्यासारखा. आपण दीड वर्षात कधीच पुन्हा तिला संपर्क करायचा प्रयत्न केला नाही म्हणून रागावली असेल का? पण तीच मला सोडून गेली, मी तर तेव्हाही तिच्या पाठीशी ठाम उभा होतो. अभि विचारात गुंग झाला होता, तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. मागं वळून पाहिलं तर अपर्णा!

"अपु!" तिचे दोन्ही हात हातात घेऊन तो जवळ जवळ ओरडलाच," अपु! आय मिस्ड यू! का गेलीस तू?"

"अरे हो हो. चल आत जाउन बोलूयात का."

"हो. चल" अपुला इतक्या दिवसांनी पाहिल्यावर अभिच्या आवाजात, देहबोलीत पुन्हा उत्साह संचारला.

दोघेजण आत जाउन बसले. वेटर ओर्डर घेऊन गेला. अभिने अजूनही अपुच्या चेहऱ्यावरून नजर बाजूला केली नव्हती.

"आय'म सॉरी. मला माहितीये जे मी केलं त्याला आता ह्या सॉरीने सावरता येण शक्य नाहीच. पण एवढ मोठ ओझ खांद्यावर घेऊन मी नाही जगू शकत. आज भले तू मला मी आता तुझ्यात इन्टरेस्टेड नाही असं सांगितलं तरी मी मनाची तयारी करून आलीये. अभि ज्या परिस्थितीत मी तो निर्णय घेतला तेव्हा मला स्वतःलाच माहित नव्हत की मी आता कुठल्या वाटेवर जाणार आहे. तुझ्या समोर तुझं सगळं आयुष्य होतं. मला माहितीये आता ह्या कुठल्याच स्पष्टीकरणाला काहीही अर्थ नाहीये आणि तू ते समजून घ्यावस असही मी म्हणत नाही रे.." बोलता बोलता अपर्णाचे डोळे भरून आले, आवाज कातर झाला. तसा अभिने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "तुला मला स्पष्टीकरण द्यायची गरजही नाहीये अपु. अगं पहिल्यांदा खूप राग आला पण नंतर का काय माहिती सतत असच वाटत राहिलं की तू परत येणार आहेस. माझी म्हणून."

अपर्णाने तिचा हात अभिच्या हातातून सोडवून घेतला.

"अभि तुला माहितीये न मी केस परत ओपन करायचे प्रयत्न करतीये. गेल्या दीड वर्षात पुलाखालून बरच पाणी गेलय. आता तो नगर सेवक आहे इथला. तेव्हाच आपल्याला कुणी दाद देत नव्हते आता तर सगळ अशक्यप्रायच आहे त्याला शिक्षा होण. but you know what i am going to give it a shot. ह्या सगळ्या प्रकरणात जर माझ, तुझ, आपल्या घरच्याचं आयुष्य बरबाद होऊ शकत तर त्याचही झालंच पाहिजे! He has no right to live in this society!"

"अपु, सगळ कळतंय ग मला. मी आहे तुझ्या सोबत. तुला मी आधीही म्हणायचो तू म्हणालीस तर आगीतही उडी मारायला तयार आहे मी. आता ही उडी मी तुला एकटीला नाही मारू देणार. तुला माहितीये तू इथे नव्हती तेव्हा मी तुझाच विचार करायचो अगदी रात्रंदिवस, नशिबाने तू परत आलीयेस. आता काहीही झालं तरी इथून पुढे दोघांनी लढायचं, एकत्र!"

अपर्णाचे डोळे भरून आले. "मी काहीतरी खूप पुण्य केलं असणार रे मागच्या जन्मी. म्हणून तू मला भेटलास."

"आता नाही न सोडून जाणार?"

अभिच्या हातावर हात ठेवून अपर्णा डोळ्यानीच नाही म्हणाली.

"आता पुढे काय करायचं? पोलिस काय म्हणतात?"

"ते काय अरे, ते म्हणतात तुम्हीच पैसे देवून मिटवली ना केस? आता नाही ओपन करता येत. आमच्याकडे फिर्याद सुद्धा नाही म्हणतात. "

"अपु, मला वाटत इतक्या सहज केस पुन्हा उभी राहणार नाही. आपल्याला वेगळी चाल खेळायला लागणार आहे. आता आपल्याला जनतेची मदत घ्यायला लागणार! तसेही त्याचे कारनामे इतके पोचलेले आहेत ,आपल्याला आता लोकांनीच काही मदत केली तर चान्स आहे. "

"तू काय म्हणतोयस? जनतेची मदत कशी घ्यायची? कोण ऐकून घेणार आहे आपली गोष्ट?"

"ऐकतील अपु ऐकतील, अगं तू एकटी नाहीयेस. मी सांगेन तुझी गोष्ट इथून पुढे प्रत्येक शो मध्ये. एकदा लोकांचा दबाव पडला की पोलिसांना ही केस ओपन करायलाच लागणार!"

"अभि कल्पना चांगली आहे पण अरे तुझा जॉब? असं काही करता येईल तुला?"

"हे तर काहीच नाही. अजूनही खूप काही करू शकतो मी!" उगीच शर्टाची कॉलर ताठ करत अभि म्हणाला, "बोल तू तयार आहेस?"

त्याचीच नक्कल करीत अपर्णा म्हणाली, "येस बॉस!"

त्या दिवशी रात्री अभिचा प्रोग्राम चालू असताना, एक मिनिटासाठीही कुणी रेडियोसमोरून हलल नाही.

क्रमश:

धुंदी कळ्यांना! भाग-३

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Jun 2015 - 9:51 am | पैसा

गोष्टीत तरी असं होताना वाचून छान वाटलं!

रातराणी's picture

30 Jun 2015 - 10:38 am | रातराणी

खरंच ग! असं कधी खरं घडेल तो सुदीन!

यशोधरा's picture

30 Jun 2015 - 10:50 am | यशोधरा

हेच म्हणते.

उमा @ मिपा's picture

30 Jun 2015 - 11:50 am | उमा @ मिपा

हा भाग पहिल्या भागापेक्षाही सरस! अगदी योग्य वळण घेतलंय कथेने, पुढचा भाग वाचण्यासाठी उत्सुक.

छान वाटलं वाचायला..मस्त सुरू आहे कथा.
दोन्ही भाग आवडले.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 1:07 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

पद्मावति's picture

30 Jun 2015 - 1:33 pm | पद्मावति

मस्तं जमलाय हा भाग पण. पु.भा.प्र.

स्नेहानिकेत's picture

4 Jul 2015 - 11:25 am | स्नेहानिकेत

हा पण भाग छान.पु.भा.प्र.

स्पंदना's picture

4 Jul 2015 - 2:18 pm | स्पंदना

पहल्या प्रतिसादा सारखच म्हणेन्

गोष्टीत तरी अस घडतय याच बर वाटल. नाहीतर पुरावे देऊन सुद्धा पुरावा देणारा नकोसा होतो अन अपराध करणारे जवळचे होतात.