धुंदी कळ्यांना! भाग-१

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
27 Jun 2015 - 1:30 am

दिवसभराच्या धावपळीनंतर आता रात्री जरा कुठे अपर्णा विसावली होती. बाहेर अगदी धो धो नाही आणि अगदी मुळूमुळू नाही असा पाउस पडत होता. छान गारवा पसरला होता. आता पांघरून घेऊन गुडूप व्हायचं असा विचार करून अपर्णा बेडवर गेली खरी पण बेडरूमच्या उघड्या राहिलेल्या खिडकीतून गार वार्याचा झोत अंगावर आला आणि ती शहारली. खिडकी बंद करायला म्हणून खिडकीत गेली आणि तिथेच उभी राहिली. सगळा थकवा, झोप कुठल्या कुठे पळून गेली. किती आवडतो असा पाउस आपल्याला ती मनाशीच म्हणाली. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, अगदी एखाद दुसर वाहन जात होतं. अंगणातला प्राजक्त नखशिखांत ओलाचिंब झाला होता. किती तृप्त दिसतोय आज हा, असा खूप दिवसांनी दिसला नाही? आता कुठली आपल्याला झोप यायला, म्हणून टुणकन उडी मारून ती खिडकीतल्या कट्ट्यावर बसली. खिडकीच्या गजाला डोक टेकवून ती बाहेर पाहत राहिली. पाउस नक्की कुठे पडत होता? बाहेर म्हणावा तर मग आपल्याला आत बसून असं चिंब झाल्यासारखं का बर वाटतंय? जास्त विचार नको करायला असं स्वतःलाच म्हणून तिने हातातल्या फोनवर रेडियो सुरु केला. कुणीतरी आर जे वायफळ बडबड करत होता. छ्या, ह्या आर जे ना कधी बडबड करायची नाही ते पण कळत नाही अस म्हणून ती फोन बंदच करणार तेवढ्यात अगदी ओळखीचा आवाज आहे हा असं वाटून ती थांबली.

"तर आता ऐकूया मित्रांनो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची चिरतरुण रचना धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना"

पुढची चार एक मिनिट अपर्णा डोळे मिटून शांत बसून राहिली. आता पाउस बाहेर होता आणि आतही होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी अभिजीतनी आणि आपण किती प्रॅक्टीस करून म्हणल होत हे गाण! आधी अपर्णा तयारच होत नव्हती हे गाणं म्हणायला. त्यादिवशी प्रॅक्टिकल झाल्यावर सगळे कॅन्टीन मध्ये बसून यावर्षीच्या स्नेह संमेलनात काय करायचं याच प्लानिंग करत होते. अपर्णा आणि अभिजीतची जोडी दरवर्षी गायनात पुढे असायची. अभिजितने जवळ जवळ डीक्लेरच केलं,

"यावर्षी मी आणि अपर्णा धुंदी कळ्यांना म्हणणार आहे."

एक क्षण अपर्णा त्याच्याकडे पाहतच राहिली आणि मग म्हणाली, "ए वेडा झालाय का? किती अवघड गाण आहे ते. मला नाही जमणार!"

"ए अपुडे अग अजून किती वेळ आहे आपल्याकडे प्रॅक्टीसला. येईल ग. आणि तू असं म्हणलीस तर मी काय करायचं? तू तर शिकलीयेस गाण!"

लाडात आला की मस्का मारायला अभिजित अपुडे म्हणायचा आपल्याला! आठवूनच खुदकन हसू आलं तिला. हो नाही करता करता अपर्णा शेवटी तयार झालीच. अशक्यच होत तिच्यासाठी अभिजीतच्या मखलाशीला बळी न पडणं! कधी कधी तिला वाटायचं, त्याच नावच उत्साह ठेवायला हवं होतं! त्यावर्षी दोघांच गाण संपल आणि काही क्षण निशब्द शांतता होती ऑडीटोरॆयम मध्ये. आणि सगळ्यानी एका सुरात वन्स मोर चा जल्लोष केला! दोघांनी पुन्हा एकदा गाण म्हणलं, गाण संपल्यावर पुन्हा एकदा तीच निशब्द शांतता होती आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला! त्या क्षणी अगदी नकळत अभिजितने अपर्णाचा हात हातात घेतला आणि दोघांनी वाकून त्या कौतुकाचा स्वीकार केला. हसत हसत दोघांनी एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही डोळ्यात आनंदमिश्रीत टपोरे पाण्याचे मोती जमले होते. काय नाही बोलले ते दोघं त्या क्षणा दोन क्षणांच्या मौनामध्ये. वेगळ्याच जगात वावरत होते दोघं! आता अजून थोडा वेळ हे इथे असेच हातातहात घालून थांबले तर काही खरं नाही असं वाटून
निवेदन करत असलेल्या रेवतीने पुढे जावून अपर्णाला कुणाला लक्षात येणार नाही असा चिमटा काढला. त्या चिमट्याच्या आठवणीने अपर्णाची आता सुद्धा तंद्री भंगली. आजही त्या आठवणींनी तिचे डोळे भरून आले. एव्हाना गाण संपल होतं आणि पुन्हा तोच ओळखीचा आवाज कानावर आला,

"आली ना मित्रांनो तिची आठवण? या गाण्याशी जोडलेल्या तुमच्या माझ्या सर्वांच्याच आठवणी आहेत, मनाच्या हळव्या कप्प्यात सारून ठेवलेल्या. कधी कुणाला दिसू नयेत, कधी कुणाला कळू नयेत म्हणून लपवलेल्या. पण स्वतःपासून वेगळ्या करता न आलेल्या. पाउस आला की तो कप्पा अलगद उघडतो. तुमची इच्छा असो वा नसो!"

अरे कोण बोलतोय हा? इतकं का आपल्या मनातल बोलतोय हा? एकतर खरोखर हा मनुष्य खूप रोमांटिक असला पाहिजे किंवा ज्याने कुणी त्याला हे सगळ लिहून दिलं तो!

"तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया, तिच्या किंवा त्याच्या आठवणीसोबत. मला विचाराल तर मला वाटतंय आता या क्षणी तिचा हात पुन्हा हातात घ्यावा. तिच्या टपोर्या डोळ्यात पुन्हा पाहावे आणि पुन्हा पुन्हा जगून घ्यावा तो एक क्षण. पुन्हा भेटूया उद्या रात्री, याच वेळी, याच ठिकाणी, पावसाच्या आणि तिच्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी! हा कार्यक्रम कसा वाटला जरूर कळवा. आमचा नंबर आहे ९८९८४५६७८९. शुभ रात्री! तुमचा आणि आजही फक्त तिचाच आर. जे. अभि!"

अभि! अभिच तो! कसं लक्षात नाही आलं आपल्या? इतका ओळखीचा आवाज आणि असं मधाळ बोलण! कुणाला जमणार आहे अभिशिवाय! हा रेडियोमध्ये काय करतोय पण? तसं आश्चर्य नाहीच त्या गोष्टीचं. कॉलेजमध्ये अभ्यास सोडून इतर गोष्टीमध्येच पुढे असायचा. त्याला विचारलं की म्हणायचा डिग्री फक्त नावाला. माझ प्रेम फक्त गाण! तिची वेगळीच अवस्था व्हायची त्याच्या सोबत असली की. किती मनस्वी किती स्वच्छंदी होता तो. आपल्याला जमेल का असं कधी त्याच्यासारखं जगायला? आपण किती सिरीयसली घेतो प्रत्येक गोष्ट. सगळ अगदी परफेक्ट व्हाव हा आपला ध्यास आणि तो छत्री असून भर पावसात ती न उघडणारा. मन मोकळा, अगदी निवांत. त्याच्या नुसत्या आठवणीनेच शांत पावसाची सर आल्यासारखं वाटल तिला. त्याला अजून आपण आठवतो, आपला स्पर्श तो एक क्षण त्याला पुन्हा हवा हवा वाटतोय, मनोमन सुखावली ती.

पुन्हा एकदा अपर्णा कॉलेजच्या आठवणींमध्ये रमून गेली. स्नेहसंमेलन संपले तरी दोघ त्याच धुंदीत होते. शब्दाविना प्रेम व्यक्त झाले होते. दोघांनाही आता एकमेकांच्या मनातले कळले होते. मित्र मैत्रिणींमध्ये भरपूर चिडवण होत असे दोघांना. पुन्हा पुन्हा ग्रुप मध्ये त्यांना धुंदी कळ्यांना म्हणायची फर्माईश होत असे. आणि अपर्णा इतकी गोड लाजायची की अभि तिला पाहतच राहायचा. सावळा रंग, बोलके डोळे, गालांना खळ्या आणि लांबसडक कुरळे केस! त्यावर आणि लाजण म्हणजे अभि म्हणायचा अगदी मारवा संपता संपता जोगची झालेली सुरवात!* तो असं काही बोलायला लागला की अपर्णाला वाटायचं त्यानं थांबूच नये. म्हणजे त्याच्या दृष्टीने योग्य त्याच करीयरमध्ये आहे तो, अपर्णा वर्तमानात आली. नंबर लिहून नाही घेतला आपण, बोलायलाच हव त्याच्याबरोबर! सापडेल नेटवर, नाहीच सापडला तर पुन्हा ऐकू उद्या त्याचा प्रोग्राम असं स्वतःशीच ठरवत तिने आता खिडकी लावून घेतली आणि दुसर्या दिवसाच्या कामांची उजळणी करत झोपून गेली.

कॉलेज संपल आणि सर्वांचे काही ना काही उद्योग सुरु झाले. अपर्णा, रेवती आणि ग्रुप मधले जवळपास सगळेच ट्रेनिंगसाठी वेगळ्या शहरांमध्ये गेले. अपर्णा मैसूर मध्ये होती. अभि पुण्यातच होता. त्याच अजूनही तळ्यात मळ्यात चालू होत. त्याला वाटायचं एकदा सुरुवात झाली नोकरीला कि मग बाहेर नाही पडता येणार. म्हणून तो अजूनही वेगळी वाट सापडते का ते चाचपडत होता. त्याच्याच भाषेत सांगायचं तर तो अजून थोडा वेळ घेत होता, त्याच्या आवडीला अनुरूप कुठली संधी सापडते का ते पाहायला. दोघेही अजूनही तेवढेच प्रेमात होते. आता तर सक्तीच्या दुराव्याने ते वाढत चाललय असच वाटायचं अपर्णाला. तिचं ट्रेनिंग झालं की दोघं फोनवर तास तास बोलत बसायचे. यथावकाश अपर्णाच ट्रेनिंग संपल आणि तीच पोस्टिंग पुण्याला झालं. चार महिने कसे काढले होते दोघांनी, त्यांनाच माहिती. ट्रेन ने अपर्णा पुण्याला परत आली तेव्हा अभि प्लाटफॉर्मवर तिच्या आवडत्या लिलीच्या फुलांसोबत वाट बघत होता.

शिक्षण व्यवस्थित पूर्ण झाल आणि नोकरी लागली की सगळ्या मुलींसोबत जे होत ते आता अपर्णाबरोबर होणार होतं, लग्न! घरून तसा काही विरोध व्हायची शक्यता नव्हती.अभिच्या घरी देखील तो अरेंज मेरेजच्या फंदात पडणार नाही हे ओळखून त्याच्या आई वडीलांनी आधीच त्याला सांगितलं होतं, बाबा रे लग्न ठरलं की सांग, आम्ही पण येवू अक्षता टाकायला. अपर्णाच्या घरी हालचाली सुरु झाल्या तसं तिने अभिला सांगून आई वडिलांशी बोलायला सांगितलं. अभिनेही आता वेळ घालवून उपयोग नाही हे लक्षात घेऊन एक दिवस त्याच्या आईला अपर्णाबद्दल सांगितलं आणि रीतसर तिला मागणी घालायला तिच्या घरी गेला.
अभिला अजून नोकरी नाही, पुढे काय करायचं हेही ठरलेलं नाही म्हणून अपर्णाचे बाबा थोडे नाराज वाटले पण आताच्या मुलांना काही सांगायला गेलं की भलतेच सेन्सिटॆव होतात म्हणून ते शांत बसले. तसाही अपर्णावर विश्वास होताच त्यांचा. सगळं व्यवस्थित पार पडलं आणि अपर्णाच्या घरून लग्नाला संमती मिळाली. मग काय, स्वर्ग दोन बोटे उरला दोघांना. अभिला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळाली की बार उडवून द्यायचा ठरलं आणि दोघांच्या घरचे निश्चिंत झाले.

आजही अपर्णाला कुणी विचारलं की तुझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण कोणते तर तिने हेच सांगितलं असतं, "When i was engaged to Abhi!"

Was? हो was च! लग्न ठरून बघता बघता वर्ष निघून गेलं. अपर्णाच्या घरी आता थोडी कुरबुर सुरु झाली होती, पण ती समजूत काढत होती घरच्यांची. अभिला आणि घरच्यांना दोघांची समजूत काढताना तिची बरीच कसरत होत होती. ती अभिला सांगत होती आता काहीतरी कर, असं किती दिवस हे नको ते नको करत बसणार?

अशात एक दिवस जे होऊ नये ते घडलं. ऑफिसमधल काम संपवून अपर्णा घरी जात होती. फार वेळ नव्हता झाला पण ऑफिस शहराच्या बाहेर असल्याने जरा निर्जन, निर्मनुष्य असा भाग होता. एरवी ती अभिला बोलवून घेई आणि मग तो तिला घरी सोडत असे पण आज का कुणास ठाऊक तिला वाटलं आज अभिला भेटलो तर भांडण होईल म्हणून ती एकटीच चालली होती. ऑफिसची बस चुकली होती म्हणून ती जवळच्या बस स्टोपवार चालली होती.

आपसूकच तिची पावलं झपझप पडत होती. मागे कुणीतरी आहे हे जाणवत होत तिला पण वळून बघायचा धीर होत नव्हता. हृदयाची धडधड वाढली होती. हातापायांना घाम सुटत होता. नेहमी येताजाता इतका जवळ दिसणारा बस स्टोप आज इतका लांब का वाटतोय असा विचार करत मनातल्या मनात करत ती आता जवळ जवळ धावतच होती. एखादवेळेस नजर रस्त्यावर टाकत होती, न जाणो अभि सवयीने आला असला तर, कुणी ओळखीच भेटलं तर, पण आज सगळे फासे उलटे पडत होते. मागून येणारा तो आता तिच्या अगदी जवळ आला होता. अपर्णाच्या लक्षात आलं ते आणि प्रतिकार करायला ती ओरडणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि जवळ जवळ फरफटतच तिला मागच्या झाडीमध्ये घेऊन गेला. अपर्णाने प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण वासनेनी आंधळ्या झालेल्या त्या पुरुषाचा सामना करायला अपुरी पडली तिची शक्ती. पुढचा एक अर्धा तास प्रत्येक क्षण तिला हेच वाटलं की आपण आता मेलो तर खूप बरं होईल. शेवटी ग्लानी येवून तिची शुद्ध हरपली तेव्हा तो नराधम तिथून निघून गेला.

अपर्णाच नशीब चांगल म्हणा की दुर्देव म्हणा, काही वेळाने एक रिक्षावाला मोकळा होण्यासाठी म्हणून त्या झाडीच्या बाजूला गेला आणि समोरच दृश्य बघून परत मागे धावत रिक्षात येवून बसला. पोलिसांचे झेंगट मागे नको म्हणून त्याने तिथून निघून एका STD बूथवरून पोलिसांना फोन करून पाहिलेल्या दृश्याची कल्पना दिली. पोलिसांनी तिथे पोचल्यावर अस्ताव्यस्त पडलेली तिची bag उचकटून फोन बाहेर काढला आणि सर्वात जास्त वेळा जो फोन नंबर डायल केला होता त्याला कॉल केला. फोन अर्थातच अभिनेच उचलला. पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यावर तो पोचला आणि अपर्णाची अवस्था बघून कोसळलाच. भानावर आल्यावर त्याने तिची फाटलेली ओढणी तिच्याभोवती लपेटली आणि पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर सगळे सोपस्कार पूर्ण करून एकदाचे अपर्णावर उपचार सुरु झाले. आतापर्यंत अभिने दोघांच्याही घरी कळवले होते आणि सगळे तिथे पोचले होते. सुन्न होऊन अभि बाहेर बसला होता. काय स्वप्न पहिली होती आणि हे काय झाल होतं त्याच्या अपुडीसोबत. अभिच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा इतका वेळ धरून ठेवलेला त्याचा उरलासुरला धीरही संपला आणि डोक हातात धरून तो लहान मुलासारखा रडू लागला. अपर्णाची आई आणि बाबा दोघेही आता त्याला धीर देण्याच्या स्थितीत नव्हतेच. त्यांनाच आता आधाराची गरज होती. डॉक्टरांच्या बाहेर येण्याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. शेवटी एकदाचे ते बाहेर आले आणि अपर्णा उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.

हळू हळू अपर्णाची प्रकृती स्थिर झाली. तिला जास्त कुणाला भेटून देत नव्हते. आई, बाबा किंवा अभि कुणीही भेटलं तरी ती गप्प गप्पच असायची. तिचं मन रमावं म्हणून अभि काय काय करत बसायचा हॉस्पिटलमध्ये येवून. पण अपर्णा अगदी अनोळखी असल्यासारखी पहायची त्याच्याकडे. तिने त्याला तसं पाहिलं की अभि बाहेर येवून हमसाहमशी रडायचा. बघवतच नव्हती त्याला तिची ही अवस्था. याआधी कधीही त्याला कुणी इतका अस्वस्थ, इतकं सैरभैर झालेला पहिला नव्हता. अपर्णाला हॉस्पिटलमधून घरी नेलं. तिच्या घरच्यांना आणि अभिच्या घरीही बाहेर ही गोष्ट जास्त पसरू द्यायची नव्हती, त्यामुळे पोलिसांना भरपुर पैसे चारून केस बंद करण्यात आली. अर्थात अपर्णाच मत कुणी विचारात घेतलच नाही, आणि तीसुद्धा काहीही निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हती. अभिनेही हार मानली होती, त्याला फक्त त्याची अपु परत हवी होती. पूर्वीसारखी हसरी, लाजरी! त्यामुळे त्यालाही त्या वेळी तपास बंद करणंच योग्य वाटलं.

आणि एक दिवस अभिला काही न सांगता अपर्णा बेंगलोरला निघून गेली. तिच्यासोबत आई गेली होती. बाबा पुण्यातच होते. अभिने विचार केला होता आज अपर्णाला थोड बाहेर नेवू फिरायला, मोकळ्या वातावरणात गेल की बरं वाटेल. खूप वेळा फोन करूनही अपर्णाने फोन उचलला नाही तेव्हा त्याने तिच्या बाबांना फोन केला. आणि त्यांनतर त्याने जे ऐकल ते ऐकून तो हादरला. अपर्णाचे बाबा सांगत होते, "अभि बेटा, अपर्णाने सांगितलय आता तू तिला पुन्हा भेटू नकोस. तिला वाटतंय आता ती तुझ्यासाठी परफेक्ट नाही. मी समजावलं तिला असं एकदम तोडून जाऊ नकोस त्याला पण ती म्हणाली तुला भेटून तिला जाताच येणार नाही. तिने सांगितलय अभिला म्हणाव move on, माझी वाट पाहू नकोस आता. अभि पण एका बापाची एवढी विनंती ऐकशील का रे, थांबशील का रे आपल्या अपुसाठी. निदान अजून एखाद वर्ष तरी. मला वाटतंय तिला आपण थोडा वेळ दिला सावरायला तर अजूनही ती सावरेल. करशील का रे माझ्यासाठी एवढं?" काही न बोलता अभिने फोन ठेवला. त्या दिवसापासून अभिने एका पाठोपाठ एक आघात सहन केले होते. पण हा सर्वात मोठा होता. त्याला राग येत होता त्याच्या अपुचा. वेळच हवा होता तर सांगून जायचं. भेटून बोलून गेली असतीस तर वर्ष काय अख्खं आयुष्य थांबलो असतो. हीच किंमत केली माझ्या प्रेमाची शेवटी? त्यानंतर त्याने पुन्हा अपर्णाच्या घरी फोन केला नाही.

हे सर्व झाल्यावर आज जवळ जवळ वर्ष दीड वर्षाने ती अभिचा आवाज पुन्हा ऐकत होती. आयुष्याने दिलेल्या या खडतर प्रवासात तिला आशेचा अंधुक किरण दिसत होता. इतक सगळ होऊनही अभि अजूनही तिचाच होता. ती परत आलीये हे तिने अजून अभिला सांगितले नव्हते, तिला वाटलेलं तो खरोखर move on झाला असेल. लग्न करून छान सुखी संसारात रमला असेल. पण त्याचा प्रोग्राम रेडीयोवर ऐकल्यावर तिला वाटलं, आपल्यासाठीच थांबला आहे का तो? एकदा बोलून बघायला काय हरकत आहे.

दुसर्या दिवशी तिची सर्व कामं आटोपून अपर्णान अभिच्या प्रोग्रामचा नंबर शोधला. फोन करायच्या आधी तिने स्वतःलाच बजावलं, आता जर तो move on झालाच असेल तर त्याच्याशी फक्त मित्र म्हणूनच बोलायचं. फोन केला तर तो तिथल्या संयोजकाने उचलला. त्याने सांगितलं तिला अभि बरोबर बोलायचं आहे तर तो म्हणाला अभि रात्रीच येणार आहे studio मध्ये. तुम्हाला त्याला निरोप ठेवायचा असेल तर ठेवू शकता. अपर्णाने तिला अभिचा कार्यक्रम आवडल्याच आणि शक्य असेल तर त्याला फोन करायला सांगा असं म्हणून तिचा नंबर दिला आणि फोन ठेवला. आता ती वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हती. घरी येवून आता कधी रात्र होते आणि आपल्याला पुन्हा अभिचा आवाज ऐकायला मिळतो याची वाट पाहत बसली. तो तिला फोन करेल असं वाटत होत तिला पण मुद्दामच जास्त अपेक्षा नको करायला म्हणून ती शांत होती. जेवण वगैरे आवरून ती तिच्या बेडरूममध्ये जावून ९ वाजण्याची वाट पाहत होती आणि तिचा फोन वाजला. अभिचाच असेल का असा विचार करत तिने फोन घेतला. त्याच ओळखीच हेलो कानावर आलं आणि इतका वेळ अभिचा फोन आला तर काय काय बोलायचं हे ठरवत असलेल्या अपर्णाला आता काहीच बोलायचं सुचेना. शेवटी अभिनेच सुरुवात केली,

"कधी आलीस परत?"

"एक आठवडा झाला"

"कशी आहेस?"

"मी ठीक आणि तू?"

"सोडून गेलीस तेव्हा होतो तसाच आहे. भेटूया आपण?"

"हो. पण एका अटीवर, आणि ती मान्य असेल तरच. नाहीतर आपण जिथे आहोत तिथेच ठीक आहोत. मला माझा निर्णय लादायचा नाहीये, त्यामुळे तू स्वतंत्र आहेस तुला योग्य वाटेल ते करायला. मला अजिबात वाईट नाही वाटणार. "

"तशीच आहेस अजून. सगळं तुला हवं तसं परफेक्ट झाल्याशिवाय स्वस्थ न बसणारी. काय आहे तुझी अट?"

कानात प्राण आणून अभि आता अपर्णा पुढे काय बोलते ते ऐकत होता.

क्रमश:

* मला इथे संगीत माहीत असणाऱ्या कुणाची मदत मिळेल का? मारवा आणि जोग राग योग्य आहेत का? योग्य तो बदल सुचवण्यास मदत करेल का कुणी?

धुंदी कळ्यांना! भाग-२

कथा

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

27 Jun 2015 - 1:55 am | राघवेंद्र

पु. भा. प्र.

रातराणी's picture

27 Jun 2015 - 2:24 am | रातराणी

धन्यवाद! लवकरच टाकते पुढचा भाग :)

बहुगुणी's picture

27 Jun 2015 - 8:23 am | बहुगुणी

सुरेख सुरूवात!

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 9:46 am | नूतन सावंत

छान झालीये सुरुवात.पुढे वाचायला आवडेल.लवकर लिही.

बोका-ए-आझम's picture

27 Jun 2015 - 9:49 am | बोका-ए-आझम

छान सुरुवात. पुभाप्र.

चुकलामाकला's picture

27 Jun 2015 - 10:01 am | चुकलामाकला

आवडली . पु. भा. प्र.

उगा काहितरीच's picture

27 Jun 2015 - 3:20 pm | उगा काहितरीच

पुभाप्र...

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 6:42 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

उमा @ मिपा's picture

27 Jun 2015 - 8:06 pm | उमा @ मिपा

पहिल्याच भागात छान पकड घेतलीये कथेने, वेगही. पुभाप्र.

इशा१२३'s picture

27 Jun 2015 - 10:34 pm | इशा१२३

छान सुरवात.पु.भा.प्र.

शशिकांत ओक's picture

28 Jun 2015 - 3:45 pm | शशिकांत ओक

वाचून वाचायला प्रारंभ केला. अन् वाचतच राहिलो! ही लघुकथा कि दीर्घ की कादंबरी? रेडीओ वरील गीतातून आठवणींची गुंफण आणि पुढे सरकत जाता जाता नायिकेच्या जीवनाचा पट उलगडून फुलवलेले कथानक भावले.

शशिकांत ओक's picture

28 Jun 2015 - 3:45 pm | शशिकांत ओक

वाचून वाचायला प्रारंभ केला. अन् वाचतच राहिलो! ही लघुकथा कि दीर्घ की कादंबरी? रेडीओ वरील गीतातून आठवणींची गुंफण आणि पुढे सरकत जाता जाता नायिकेच्या जीवनाचा पट उलगडून फुलवलेले कथानक भावले.

धन्यवाद काका.दीर्घ आहे पण अती दीर्घ नाही. 3 भागात संपेल.:

रातराणी's picture

28 Jun 2015 - 6:47 pm | रातराणी

धन्यवाद! पुढच्या आठवड्यात टाकते दुसरा भाग.

छानच लिहिलय. पुढील विस्तार अपेक्षित आहे.

पैसा's picture

29 Jun 2015 - 6:20 pm | पैसा

छान सुरुवात!

दुसऱ्या भागाची लिंक कथेच्या शेवटी अपडेट केल्याबद्दल श्रीरंग जोशी यांचे विशेष आभार. : )