सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल आणि गोंपा
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा
सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...
७ जून. चांगली झोप झाल्यानंतर ऊर्जा परत तर येत आहे; पण अजून थकवा आहे. शेजारचे लोक सांगत आहेत की, बरेचसे पर्यटक प्रतिकूल हवामानुळे लेह सोडून परत जात आहेत. पुढच्या प्रवासाविषयी अजून सगळे पर्याय खुले आहेत. नीरज जाट जी खूप प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी फोनवर सांगितलं, 'खुशखबर आहे! मनाली- लेह रोड जवळजवळ सुरू झाला आहे; फक्त बारालाच्छाला बंद आहे. तोसुद्धा दोन- तीन दिवसांमध्ये सुरू होईल. म्हणून मनाली रोडवर जा. पोहचेपर्यंत बारालाच्छालासुद्धा सुरू झालेला असेल.' ते मला प्रोत्साहन देण्याचा खूप प्रयत्न करत आहेत; पण कालच्या थकव्यानंतर मला ह्या बातमीनंतरही उत्साह वाटत नाहीय. कालचा प्रवास चांगला झाला; पण हेमिस गोंपाचा सात किलोमीटरमधला तीनशे मीटरचा चढही मी चढू शकलो नाही. खर्दुंगलामध्ये तर चाळीस किलोमीटरमध्ये एकवीसशे मीटर चढ आहे. मनाली रस्त्यावरही असे मोठे मोठे 'ला' आहेत आणि असाच चढ असेल. जर हेमिसचा छोटा तीनशे मीटरचा चढही चढता येत नसेल; तर पुढच्या चढावर काय अवस्था होईल?
अर्थात् काल पूर्ण दिवसभरामध्ये मिळून मी बहात्तर किलोमीटरमध्ये सुमारे अकराशे चढ (हाईट गेन) सुद्धा केला आहे. आणि खर्दुंगला त्याच्या तुलनेत दुप्पट मोठा आहे आणि बहुतांश अंतर पायी पायी जावं लागेल. त्यामुळे माझा कालचा प्रवास अगदीच वाईट नव्हता. पण ह्या गोष्टीची जाणीव मला नव्हती आणि थकलो असल्यामुळे त्याचा अर्थही तसा समजला नाही. झोप होऊनही असा थकवा वाटतो आहे की, बस लोळत राहावं. आपले काही शेतकरी मित्र कॅश क्रॉपच्या नादामध्ये आणि जास्त नफ्यासाठी एकाच वर्षी जमिनीतून तीन वर्षांचं उत्पन्न काढतात आणि नंतर दोन वर्षं रडतात. माझीही अवस्था काहीशी अशीच आहे. आणि बहुतेक डाएटच्या संदर्भातही मी बराच मागे आहे. काजू- बदाम- ग्लुकोज घेतोय. लदाख़मध्ये आल्यानंतर रोज कमीत कमी एक अंडं तर खातोय. पण तरीही शरीरात इतकी ऊर्जा जाणवत नाहीय.
काल येताना एक अडचण आली होती. सायकलीचा दुसरा गेअर पडतच नव्हता. तोपर्यंत मी फक्त पहिल्या गेअरच्या काँबीनेशन्सवरच सायकल चालवली आहे (सगळ्यात खालचा गेअर १-१; मग १-२; १-३; १-४ असे). काल पहिल्यांदाच दुस-या गेअरची गरज पडली. पण लेहमध्ये सेटिंग करताना काही गडबड झाल्यामुळे दुसरा गेअर पडतच नव्हता. त्यामुळे जेव्हा मला २-३ हे हायर काँबीनेशन चालवणं शक्य होतं; तेव्हासुद्धा मला १-५ वरच सायकल चालवावी लागली. त्यामुळे पोहचायला थोडा जास्त वेळ लागला. पण अर्थात् परत येताना जास्त उतारच होता. म्हणूनच त्या गेअरची गरज पडली. सायकलच्या सेटिंगमध्ये आणखी थोडे इश्युज आहेत. त्यांना ठीक करावं लागेल.
आज रविवार आहे आणि उद्याचा थकवा अद्याप गेला नाहीय. आज आरामच करतो. उद्या सायकलचं थोडं सर्विसिंअ करून मग परवा खर्दुंगलाला जाईन. कारण उद्या सर्विसिंग करण्यासाठी किमान सकाळचे दहा वाजतील आणि त्यानंतर खर्दुंगलाकडे जाणं शक्य होणार नाही. आज हवामान परत बदललं आहे. दिवसभर ढग आहेत. मध्ये मध्ये किंचित पाऊस आहे. माझ्या मित्रांसोबत बोलून मनाली रोडचे अपडेटस घेतोय. अपडेटस हेच आहेत की, अजूनही रस्ता सुरू व्हायला थोडा वेळ लागेल. बीआरओने अधिकृत रस्ता सुरू होण्याचा दिनांक १५ जून सांइतला आहे. नीरजजींच्या सांगण्याप्रमाणे बारालाच्छाला पर्यंत दोन्ही बाजूंनी रस्ता उघडला आहे. पण अर्थातच सामान्य वाहतुकीसाठी तो नंतरच सुरू होईल. बारालाच्छालामध्ये बीआरओ कित्येक फूटांची बर्फाची भिंत क्लीअर करत आहे. ..संध्याकाळी चोगलमसरमध्येच फिरलो. इथून दिसणा-या नजा-याचा आनंद घेतला.
आठ जून. लेहमध्ये जाऊन सायकलीचं सेटिंग ठीक करून घेतलं. खरं तर मलाही ते करता आलं असतं. पण मला अजून ते परफेक्ट जमत नाही; मी अजून शिकतोय. त्यामुळे जर इथे दुकान असेल तर मॅकेनिककडेच गेलेलं चांगलं. एकूणच ह्या प्रवासात सिद्ध होतं आहे की, मी जी काही तयारी केली होती, ती चांगली होती; पण पुरेशी नव्हती. खरं तर हा प्रवास यश किंवा अपयशाचा नाहीय. पण जर यश बघायचंच झालं, तर मला पन्नास गुण मिळतील. अशा कठिण प्रवासासाठी पन्नास टक्केसुद्धा खूप आहेत. आणि निघण्यापूर्वी जर मला कळालं असतं की, मी इतकं चालवू शकेन, तर मी एकदम खुश झालो असतो. अर्थात् हा अंदाज होताच की, जशी अपेक्षा होती, त्याप्रमाणे सायकलिंग होणार नाही. अडचणी नक्कीच येतील. असो.
पन्नास टक्के तयारी करणंही खूप शिकवून गेलं. दहा वर्षांच्या गॅपनंतर जुलै २०१३ मध्ये पहिल्यांदा सायकलिंग सुरू केलं. दहा किलोमीटरपासून सुरुवात करून हळु हळु पुढे गेलो. पंचवीस, चाळीस, साठ किलोमीटर चालवता आली. नंतर एका दिवसात शंभर किलोमीटरसुद्धा झाले. हे सर्व सपाट रस्त्यांवर असूनही त्या वेळच्या स्टॅमिनाच्या मानाने कठिण वाटलं. पण हळु हळु शरीराची तयारी झाली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी एक चूक ही करायचो की, मला मोठ्या राईडचं खूप आकर्षण होतं. छोट्या छोट्या राईडसमधली मजा मी घेत नव्हतो. मी दररोज थोडी थोडी सायकल चालवण्याऐवजी दहा दिवसांमध्ये एकच मोठी राईड करायचो. त्यामुळे नुकसानच व्हायचं. हळुहळु कळत गेलं की, मोठी राईड ठीक आहे; पण छोट्या राईडस करत राहणंही खूप आवश्यक आहे. दहा दिवसातून एकदा सायकल चालवून सत्तर ते ऐंशी किलोमीटर जाण्याऐवजी रोज किंवा आठवड्यातून पाच दिवस वीस किलोमीटर जात राहणं जास्त उपयोगी आहे. पण हे शिकण्यासाठी बराच वेळा लागला आणि किंमतही चुकवावी लागली.
सायकलिंगसोबत योगासन आणि प्राणायम करणंही आवश्यक आहे. पहिले वाटायचं, आज दोन तास सायकल चालवली आहे; आता अजून व्यायामाची काय गरज आहे? पण अनुभवामुळे लक्षात आलं की, सायकलिंग करताना पायांवर जो ताण पडतो; तो दूर करण्यासाठी पायांचे व्यायाम करायला हवेत. पोटाचीही आसनं करायला हवीत. आणि श्वास चांगला होण्यासाठी प्राणायाम. सायकलिंग असो किंवा कोणतंही शारीरिक काम; श्वास सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. जुलै २०१४ मध्ये टारगेट फायरफॉक्स सायकल थर्ड हँड घेतली. ही मध्यम श्रेणीची सायकल आहे. पहिली सायकल खूप प्राथमिक होती. गेअर असलेली सगळ्यांत स्वस्त सायकल होती. पण तीसुद्धा छान होती. जशी मोठा प्रवास करण्याची इच्छा होत गेली, तशी एडव्हान्स सायकलीची गरज वाटली. माझ्या गावातल्या- परभणीच्या सायकलिंग ग्रूपच्या एका सरांकडून ही सायकल घेतली. त्या सायकलीची सवय व्हायलाही एक महिना लागला. कारण तिचं वजन बरंच जास्त होतं. हळु हळु तिची सवय झाली. मग आणखी काही मोठे प्रवास केले. ऑगस्ट २०१४ मध्ये तोरणमाळला जाऊ शकलो. तिथे पन्नास किलोमीटरमध्ये सुमारे ११०० मीटर चढ होता. पाच तास सायकल चालवली आणि चौतीस किलोमीटर पार केले =. उरलेले सोळा किलोमीटर पायी पायी जावं लागलं. उतरताना पावसामध्ये तो घाट उतरलो. हा अनुभव खूप उत्साह देऊन गेला. पहिल्यांदा सायकल दूर नेऊन चालवली होती.
जेव्हा जेव्हा सायकलिंग सोडून द्यावी असा विचार यायचा- आणि असा विचार अनेकदा मनात आला आणि येतच राहिला- तेव्हा नीरजजींचे ब्लॉग खूप प्रेरणा द्यायचे. सायकलिंग सोडून देण्याची इच्छा टिकायची नाही. हळु हळु सायकल रिपेअरिंग शिकलो. पण त्यालाही फार वेळ लावला. पण लदाख़ला जायला निघण्याच्या अगदी आधी प्राथमिक दुरुस्ती आली. त्यासाठी परभणीच्या सायकलिस्ट मित्रांनी खूप मदत केली. नांदेडच्या एक सायकलिस्टनीही मोलाचं मार्गदर्शन केलं. सायकलिंगसाठी योग्य आहार काय असावा; शरीर कसं फिट ठेवावं; टूल्सचा प्रयोग कसा करावं अशा गोष्टी समजत गेल्या. नीरजजींचे ब्लॉग तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये बायबल होते.
ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१४ मध्ये इंज्युरीही येऊन गेली. कश्मीरमध्येच श्रीनगरजवळ असलेल्या शंकराचार्य हिलवर ट्रेकिंग करून उतरताना गुडघ्याजवळ लिगामेंट इंज्युरी झाली. त्यामुळे सायकलिंग थोडं थांबवावं लागलं. योगा किती आवश्यक आहे, हे परत कळालं.
लदाख़ प्रवासात शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमतेचीसुद्धा कसोटी झाली. त्याचीसुद्धा तयारी काही प्रमाणात झाली होती. हिमालयामध्ये पूर्वी जे थोडे ट्रेक केले होते; त्यांचा अनुभव कामी आला. उंच चढावावर आणि दुर्गम रस्त्यावर जाताना मानसिक दृष्टीने सुद्धा जुळवून घ्यावं लागतं. आधी केलेल्या ट्रेकमधून तो विश्वास मिळाला होता. जेव्हा पहिल्यांदा हिमालयातल्या पायवाटेने छोटा ट्रेक केला होता, तेव्हा खूप भिती वाटली होती. पण हळु हळु भितीदायक दरीची डोळ्यांना सवय झाली. अशा वाटांची भिती कमी झाली. त्यामुळे लदाख़च्या रस्त्यांवर तशी अडचण आली नाही. मानसिक दृष्टीने अशा स्थितीची तयारी झाली होती. अर्थात् ह्या तयारीच्या मर्यादाही उघड झाल्या होत्या. उदाहरणार्थ जोशीमठच्या जवळ ट्रेक करताना मला औलीपर्यंत जाता आलं नव्हतं. उत्तराखंडच्या काही अवघड पायवाटांवर मोठी अडचण आली होती. पण ह्या सगळ्यामुळे माझ्यासमोर एक मापदंड होता.
सायकलिंगसाठी शरीर चांगलं तयार होत गेलं. सुरुवातीला लहानसा डोंगरसुद्धा पायी जावा लागायचा. सवयीने तो पूर्ण सायकलीवर जाता येऊ लागला. नंतर तोच चढ न थांबता दोनदा- मग चारदा जाऊ शकलो. काही महिन्यांनंतर हाय गेअरमध्येही चढू शकलो. ही क्षमता निसर्गाने प्रत्येकालाच दिली आहे. गरज फक्त दिशा देण्याची असते.
जसं जसं लदाख प्रस्थान जवळ येत गेलं, एक गोष्ट महत्त्वाची समोर आली. ती म्हणजे श्वास घेण्याची क्षमता. सपाट प्रदेशात किंवा समुद्र सपाटीजवळ सायकलिंग इतकं अवघड नाही. १२०० मीटरसारख्या उंचीवर सायकलिंग करणं सोपंच आहे. पण लदाख़मध्ये सायकलिंग करायचं होतं ते ३५०० मीटरहून अधिक उंचीवर जिथे ऑक्सीजनचं प्रमाण दोन तृतीयांशपेक्षा कमी असतं. अशा उंचीवर सायकल चालवणं हेच सगळ्यांत मोठं आव्हान होतं. त्यासाठी श्वास घेण्याची क्षमता आणि प्राणायामावर विशेष ध्यान दिलं. आणि म्हणावं लागेल की, हीसुद्धा तयारी अर्धीच झाली. सायकल तर चालवू शकलो; श्वास घेतानाही विशेष अडचण आली नाही; पण नंतर पुढे जाताना अडचण आली. आपल्या फुप्फुसांमध्ये ४००० छिद्रं असतात. आपण सामान्य पद्धतीने जितका श्वास घेतो; त्याहून खूप मोठा आणि सखोल श्वास आपण घेऊ शकतो. त्यासाठी पोटामध्ये जागा हवी. सामान्यत: पोटाच्या वाढलेल्या आकारामुळे कमी जागा उपलब्ध असते! आणि सामान्यत: आपण लक्षपूर्वक श्वास घेत नाही. पूर्ण पोटभर; छाती आणि खांद्यापर्यंत व मानेपर्यंत श्वास भरून घेण्याची सवय आपल्याला नसते. त्यामुळे आपला श्वास उथळ असतो. पण जर आपण क्षमतेच्या पातळीवर श्वास घेतला; तर श्वासाची ऊर्जा वेगळी असते. दातांनी ट्रक ओढणारे किंवा केसांनी बैलगाडी ओढणारे लोक अशाच श्वासाचा प्रयोग करतात. खरं तर श्वास ऊर्जेचंएक रूप आहे जी जीवनभर आपल्याला चालतं ठेवते. ह्या प्रकारच्या ऊर्जेनेच टायर्स चालतात.
तयारी अशी ठीक झाली होती. पण उरलेल्या पन्नास टक्क्यांचं काय? इथे ब-याच कमतरता राहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे सातत्य. मी गेल्या दोन वर्षांमध्ये सहा हजार किलोमीटर सायकल चालवली. बघताना वाटेल की, ही खूप मोठी संख्या आहे. पण नीट बघितलं तर सरासरी रोज दहा किलोमीटरसुद्धा नाही. आणि संख्या मोठी आहे; कारण काही राईडस मोठे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे अडीच हजार किलोमीटर. तरीही दैनिक सरासरी पंधराहून जास्त नाही. जर आठवड्यात चार दिवस जरी दररोज चाळीस किलोमीटर सायकल चालवली असती, तरी चांगला स्टॅमिना वाढला असता. तसंच आठवड्यातून किमान एक दिवस पायी मोठं अंतर जायला हवं होतं. पोहणंही खूप उपयोगी पडलं असतं; पण ते केलं नाही. योग- प्राणायाममध्येही सातत्याचा अभाव राहिला. प्राणायाम निर्दोष पद्धतीने करत नव्हतो. अचुकता कमी होती. आहार- डाएटवरही पुरेसं लक्ष दिलं नाही. रोज पहाटे ४ वाजता उठायला हवं होतं. तेही झालं नाही. बारकाईने बघितलं तर हे पन्नास मार्क्ससुद्धा योग्यतेहून जास्तच आहेत! पण त्यातून खूप काही शिकायला मिळालं. अर्धा रस्ता तर पार झाला आहे.
...मनाली रस्त्याची शक्यता अजूनही आहे; पण खूप क्षीण आहे. त्यामुळे आता फक्त खर्दुंगलाला जाईन. तिथेही खरं तर आशा नाहीच आहे. कारण हेमिसचा छोटा चढच वाट लावत होता. खर्दुंगला तर त्याहून प्रचंड मोठा चढ आहे आणि तोही ५००० मीटर पेक्षा अधिक उंचीवर. मी फोतुलानंतर ४१०० मीटर उंचीवर गेलो नाहीय. लेहमध्ये काही जण म्हणत आहेत की, मला खर्दुंगलावरही श्वास घ्यायला अडचण येऊ नये. कारण श्वास घ्यायची अडचण किंवा एक्युट माउंटेन सिकनेस जर झाला तर तो सुरुवातीलाच होतो. आता तर मी ३५०० मीटरच्या उंचीवर रुळलो आहे. आता शक्यतो अडचण येऊ नये. पण चढाचं काय करू? पहिले एक विचार होता की, खर्दुंगलावर एकदम जाण्याऐवजी दोन टप्प्यांमध्ये जावं. खर्दुंगला रस्त्यावर लेहपासून पंचवीस किलोमीटर पुढे साउथ पुल्लू आहे आणि तिथून खर्दुंगला पंधरा किलोमीटर आहे. साउथ पुल्लूपर्यंत मी कसाही जाऊ शकेन. पहिल्या दिवशी साउथ पुल्लूला जाऊन दोन- तीन तास थांबावं असा विचार होता. साउथ पुल्लूची उंची सुमारे ४८०० मीटर असेल. तिथे काही वेळ थांबलो तर शरीराला त्या उंचीचा थोडा सराव होईल. मग दुस-या दिवशी खर्दुंगला. ह्यामुळे शरीराला अनुकूलन करण्यासाठी वेळ मिळाला असता. पण आता शक्यतो हवामान असंच राहील. त्यामुळे एकाच दिवसात खर्दुंगलाला जाण्याचा प्रयत्न करेन. खर्दुंगलाला पोहचण्याची शक्यता खूप थोडी आहे.
आजसुद्धा हवा खराब आहे. इथून शांती स्तुपाचा बिंदू दिसतो आणि त्याच्या बरोबर वर खर्दुंगलाचा बर्फाच्छादित पहाड. आज लेहमध्ये नेट कॅफेवर मनाली रस्त्याचे अपडेटस बघितले. काही वाहन मनालीवरून लेहसाठी निघत आहेत. पण तरीही दोन- तीन दिवस अजून लागतील. आणि रस्ता पूर्ण सुरू झाल्यानंतर एक- दोन दिवसांनी हॉटेल आणि तंबूवाले लोक येतील. किंवा कदाचित ते दोन्ही बाजूंनी बारालाच्छाला पर्यंत पोहचलेही असतील. आधी मिलिटरी रस्त्याची ट्रायल घेईल आणि त्यानंतर रस्ता सुरू होईल. सुरुवातीला लँड स्लाईड होऊ शकतात. म्हणून औपचारिक सुरूवात होण्याची वाट पाहायला हवी. अर्थात् आता मनालीला जाणं जमणार नाही. कारण माझं १९ जूनला अंबालावरून तिकिट आहे. दोन- तीन दिवसांमध्ये रस्ता सुरू झाला तर मला वेळेत पोहचता येणार नाही. तसं नीरजजी म्हणत आहेत की, तू जाऊ शकतोस; जा! पण हिंमत होत नाहीय. एका अर्थाने शारीरिक थकव्यासह मानसिक ऊर्जासुद्धा क्षीण झाली आहे. आतमधून जो आदेश यायला पाहिजे; तो येत नाहीय. खरं तर कितीही मोठा चढ असू दे; माझ्यात क्षमता आहे. सायकलवर नाही; पण पायी पायी तर जाऊच शकतो. ती गोष्ट आठवते आहे.
जुन्या काळी एकदा एक तरुण पर्वतावरचं मंदीर बघायला निघाला. त्याच्या गावापासून ते मंदीर खूप दूर होतं म्हणून तो पहाटे तीन वाजताच निघाला. त्याच्या हातात एक कंदील होता. जसा तो निघाला; त्याने बघितलं की, कंदिलाचा उजेड जेमतेम चार पावलांवर पोहचतोय. तो उदास होऊन बसला. काही वेळाने तिथून एक फकीर निघाला. फकीराच्या जवळ तर आणखीन लहान मेणबत्ती होती. ती घेऊन तो अंधारात जात होता. तरुणाने चकीत होऊन त्याला थांबवलं. फकिराने ऐकून घेतलं आणि म्हणाला, तुझ्याजवळ तर माझ्याहून जास्त प्रकाश आहे. तू का बसलास? चल, नीघ. तरुण म्हणाला, कसं जाऊ पुढे? मैलोन् मैल अंधार आहे. फकीर म्हणाल, तू जसा दोन पावलं पुढे जाशील; प्रकाशसुद्धा पुढे जाईल. तू फक्त चालत राहा; प्रकाश तुझ्याहून दोन पावलं पुढेच राहील. ही गोष्ट अगदी खरी आणि कडवी आहे. सगळ्यांच्या उद्दिष्टाची ही गोष्ट आहे. फक्त एक पाऊल उचलण्याची हिंमत हवी. बस्स. पण ही गोष्टही मला प्रेरणा देऊ शकली नाही.
..त्सोमोरिरी आणि पेंगाँग जीपद्वारे शेअरिंगमध्ये जाण्याविषयीसुद्धा लेहमध्ये विचारलं. जीप जात आहेत. पण एका माणसाला शेअरिंगमध्ये लगेचच जागा नाहीय, असं कळालं. त्यामुळे तोही पर्याय बाजूला राहिला. तसंही मला सायकल न घेता जीपने जाण्याची इच्छा होत नाहीय. आता फक्त खर्दुंगला करून परत जायला निघेन. खर्दुंगला... पण माझा जाण्याचा अट्टाहास नाहीय. आव्हान किंवा स्पर्धा मनात नाही. फिरता फिरता सहज जायचं आहे. जाता आलं तर ठीक. नाही जाता आलं तरी ठीक. जितकं लदाख़ बघायला मिळेल, ते प्रसाद समान आहे. जे बघायला मिळालं, ते किती अथाह आहे!
९ जूनला पहाटे उठलो. पाच वाजता बाहेर येऊन आकाश बघितलं. आकाश स्वच्छ असावं अशी अपेक्षा होती. पण हे काय? पूर्ण आकाशात काळे ढग आहेत! काही वेळ थांबलो. सर्व आकाश ढगांनी व्यापलेलं आहे. पर्वतांवर पाऊस आणि बर्फवृष्टी होते आहे. थोडा वेळ वाट पाहिली. पण लवकरच पाऊसच सुरू झाला. खर्दुंगला जाणं अशा हवामानात शक्यच नाही. जर निघालो असतो तर उंच वाटेत भिजावं लागलं असतं आणि बर्फवृष्टीमध्ये जावं लागलं असतं. इतकी हिंमत झाली नाही. तसंही अशा हवामानात वर रस्त्याची स्थिती कधीही बदलू शकते. ५००० मीटर उंचीवर हवामान कधीही बदलू शकतं. जातात; काही डेअरडेव्हिल नक्की जातात. नीरज जाट नक्की जातात. पण मी? ना बाबा. हिंमत झाली नाही. आता वाटत आहे की, चला, खूप झालं. आता कुठे जावसं वाटत नाहीय. मग लेहमध्ये थांबून तरी काय करू? पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान असंच राहील असा अंदाज आहे. त्यामध्ये लगेच बदल होण्याची शक्यता कमीच आहे. अजून तसे बरेच दिवस हातात आहेत; पण आता थांबावसं वाटत नाहीय. त्यामुळे उद्याच जम्मूच्या दिशेने निघावं म्हणतो. परत जाताना तिकिट काढेन कसं तरी. मागच्या वेळेस लदाख़मधून असंच परत जावं लागलं होतं. त्यावेळी सियाचेन बेस कँपवर जाण्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती. परतीच्या वेळेस मनाली रस्त्याने यायचं होतं; तोही मोठ्या पावसामुळे बंद झाला होता. ह्या वेळीही काहीसं असंच होतं आहे. पण ह्या वेळी अपूर्व दृश्ये जास्त जवळून बघता आली.
जुले लदाख़! लदाख़मधून निघण्याचा क्षण जवळ येताना खरोखर दु:ख होतंय. हवामान आणि माझ्या अर्धवट तयारीमुळे अजून पुढे जाता आलं नाही. त्याचा खेद आहे. पण इतकाही नाही. माझा सायकल प्रवास फक्त माझा नव्हता. किंबहुना खरं तर तो माझा नव्हताच. अनेक लोकांच्या मदतीने; अनेक जणांनी माझ्यासाठी जे काही केलं; त्यामुळेच हे सगळं होऊ शकलं. त्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. माझ्या दृष्टीने त्यात 'माझं' काहीच नव्हतं. एक तर नशीब असावं लागतं. घटना घडत असतात. मी तर त्याला एक योगायोगाने प्रत्यक्षात आलेलं स्वप्नच म्हणेन. मला नशीबाने सर्व इनपुटस मिळत गेले; सर्व गोष्टी होत गेल्या. माझा प्रवास हा फक्त एक एकत्र आलेला धागा आहे. सगळ्या गोष्टी इकडून- तिकडून एकत्र आल्या. पर्वतही मातीने बनलेला असतो आणि माणूसही मातीनेच बनलेला असतो. त्यामुळे जर माणूस पर्वताजवळ जाऊ शकला तर त्यात आश्चर्य काय? जो निसर्ग बाहेर आहे; तोच आतमध्ये आहे. त्यामुळे मेळ तर होणारच. युरोपियन साधू जॉर्ज गुरजीएफने म्हंटलं आहे, आपण ज्याला 'वास्तव जीवन' म्हणतो; तेसुद्धा वस्तुत: एक स्वप्न (माया) असतं. इथे जे अपूर्व नजारे बघता आले; त्यांना आठवताना तर वाटतं की खरंच हे एक स्वप्न तर आहे!
नजरों में हो.. गुजरता हुआ.. ख़्वाबों का कोई काफ़ि-"ला".. हे सर्व स्वप्नच तर आहे!
ह्या प्रवासाचे फोटोज- पार्ट १ आणि पार्ट २
व्हिडिओज
पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ८- हाँ यही रस्ता है तेरा.. तुने अब जाना है.. (अंतिम)
मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...
साईकिल पर जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन
साईकिल पर जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल और गोंपा
साईकिल पर जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा
साईकिल पर जुले लदाख़ भाग ७- जुले लदाख़!!
प्रतिक्रिया
28 Jun 2015 - 3:24 am | बोका-ए-आझम
क्या बात है मार्गीजी! तुसी तो छा गये! पण साहस, प्रवासवर्णन, आत्मकथन आणि तत्वज्ञान यांचं हे एकत्र रसायन फारच सुंदर झालेलं आहे. पुढचा भाग अंतिम आहे हे वाचून जरा चुटपुट लागली पण तुम्ही गप्प न बसता पुढे असे अनेक फासले तय कराल याचा विश्वास तुमच्या सगळ्याच वाचकांना वाटून राहिलेला आहे!
28 Jun 2015 - 8:41 am | अजया
असंच म्हणते.
28 Jun 2015 - 9:20 am | एस
हेच म्हणतो!
28 Jun 2015 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
+++१००
लिखाणाची प्रवाही शैली वाचकाला एकदम तुमच्या मनातल्या विचारांच्या भोवर्यांत ओढून नेते आणि चक्रावत ठेवते.
फिरत रहा आणि लिहीत रहा !
28 Jun 2015 - 5:39 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते.
28 Jun 2015 - 6:57 am | यशोधरा
क्या बात हैं!!
28 Jun 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा
नमोस्तु अनंताय __/\__
28 Jun 2015 - 4:47 pm | अप्पा जोगळेकर
अप्रतिम. मोदक रावांचे धागे वाचून सायकलिंगला सुरुवात केली. ही लेखमालिका वाचून अशीच प्रेरणा मिळाली आहे. हे असलं काही वाचलं की स्वतः बद्दलचे गैरसमज गळून पडतात. मन म्हणत की 'अजून तर आपण बच्चू आहोत.' तुमची जिद्द प्रेरणा देऊन गेली._/\_.
28 Jun 2015 - 8:00 pm | मित्रहो
तुम्ही काय टक्के घेउन बसलात. प्रवास करण्याचा विचार केला आणि प्रवासाला सुरवात केली तेथेच तुम्ही जिंकलात.
वरील प्रतिसादांशी सहमत प्रवास, साहस आणि तत्वज्ञान याचा सुरेख मेळ घातला.
29 Jun 2015 - 8:05 am | उगा काहितरीच
कुठलीही अचाट गोष्ट केली कि तत्त्वज्ञान सुचत जाते बहुतेक. सुंदर !
2 Jul 2017 - 9:34 pm | भुजंगराव
सर
खरच वाचताना अंगावर शहारे उठले , काही दिवसापूर्वीच नीरज जाट चा बBLOG वाचला होता , म्हणून लगेच क्लीक झाले , HATTS OFF जगात जर्मनी न भारतात आपली परभणी
2 Jul 2017 - 9:35 pm | भुजंगराव
सर
खरच वाचताना अंगावर शहारे उठले , काही दिवसापूर्वीच नीरज जाट चा बBLOG वाचला होता , म्हणून लगेच क्लीक झाले , HATTS OFF जगात जर्मनी न भारतात आपली परभणी