सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
20 Jun 2015 - 6:28 pm

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...

सिंधू नदीच्या निनादासह १ जूनची सकाळ झाली. लदाख़ी घर! एका थर्मासमध्ये भरपूर चहा मिळाला. सकाळी मस्त थंडी आहे. घराच्या प्रमुखांनी काही वेळाने निघायला सांगितलं. पण इथून लेह सुमारे ८४ किलोमीटर तरी आहे. त्यामुळे लवकर निघालो. सायकलीला एकदा धुतलं. सायकल मजेत आहे. सुमारे १४० किलोमीटर चालवूनही काहीही झालेलं नाही. बाहेरच्या हवेचा दाब कमी झाल्यामुळे टायर आतून टाईट वाटत आहेत. काल इथल्या छोट्या प-यांचे फोटो घ्यायचे राहिले. सकाळी त्या दिसल्या नाहीत. हरकत नाही; पुढेही अनेक छोट्या प-या आणि राजकुमार मिळतील!
नुरला गाव! सिंधू नदीची धीरगंभीर धारा! आज पहिला टप्पा ससपोल आहे जे चोवीस किलोमीटर दूर आहे. पण नाश्ता त्याआधीच मिळेल. निघताना बिस्किट आणि चिक्की खाल्ली. आज लेहपर्यंत मध्ये मोठा घाट किंवा 'ला' नाहीय. पण लहानमोठे चढ येतच राहतील.

तीन तास लागले पण आरामात ससपोलला पोहचलो. छोटं गाव असूनही भटक्यांसाठी चांगलं आहे. मुक्कामाची सोय आहेच आणि हॉटेलही आहेत. इथे चांगला नाश्ता केला- आमलेट- मॅगी आणि चहा- चिप्स. चॉकलेटसुद्धा घेतले. काल दुपारपासून खूप कमी खाल्लं होतं. साडेतीन हजार मीटरसारख्या उंचीवर भूकसुद्धा थोडी कमी लागते. पण भरपूर खाणं आवश्यक आहे. इथून पुढे आता एक चढ आहे. मग निम्मूच्या आधी उतार मिळेल. निम्मू सिंधू- जांस्कर नद्यांच्या संगमाजवळ आहे. ससपोलमध्ये पाऊस पडतोय! पाऊस थांबेपर्यंत थांबावं इथेच. लोकांना विचारलं तर म्हणाले की, अजून पाऊस येणार नाही. पुढे जाता येऊ शकेल. ससपोलमध्ये अनेक बाईकर्सनी बाजूच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यांच्या बाईक्सवर 'ॐ मणि पद्मे हुँ' मंत्राचे फ्लॅग्ज लावले आहेत.

ससपोलमधून बाहेर येता येताच चांगला चढ सुरू झाला. काही वेळ सायकल चालवता आली. पण आता पायी पायीच जावं लागणार. तितक्यात दोन विदेशी सायकलिस्ट क्रॉस झाले. पाच मिनिट हाय- हॅलो झालं. विचारपूस झाली. त्यांनी सांगितलं की, त्यांना लेहच्या थंडीचा व उंचीमुळे थोडा त्रास झाला; म्हणून ते परत जात आहेत. अनेक पॅनिअर्स; अनेक बॅग्ज अशी बरीच सामुग्री त्यांच्या सायकलवर ठेवलेली होती. त्यांनी माझी चौकशी केली आणि कौतुकही केलं. जेव्हा कळालं की ते जर्मन आहेत; तेव्हा दोन वाक्य जर्मनमध्ये बोललो. हसून एकमेकांचा निरोप घेतला.

इथून मोठा चढ सुरू झाला. वस्तुत: चढ आणि उतार ह्या दोन्ही‌ सापेक्ष बाबी आहेत. आपण कोणत्या स्थितीत आहोत- ताजेतवाने/ थकलेलो आहोत; हवा आपल्या बाजूला आहे का विरुद्ध बाजूला आहे; डाएट आणि ऊर्जा स्तर कसा आहे ह्या घटकांवर हे ब-याच प्रमाणात अवलंबून आहे. आज माझा तिसरा दिवस आहे. नक्कीच ऊर्जा स्तर कमी असणार. शिवाय आत्ताच नाश्ता केला आहे. तसं सायकलीवर बसून जाता येईल पुढे; पण चढावावर जास्त ऊर्जा खर्च करायला नको. इथे फार मोठा चढ तर असणार नाही. बावीस किलोमीटरवर निम्मू आहे जे दोन नद्यांच्या संगमाचं स्थान आहे. म्हणजेच त्याआधी उतार असणार. कारण पाणी खालच्या दिशेला वाहत असतं. आणि हा रस्ताही ब-याच प्रमाणात सिंधू नदीच्या जवळूनच जातो. त्यामुळे खूप मोठा चढ असणार नाही. ...पण हा एक भ्रम होता आणि हळु हळु त्याची जाणीव होत गेली.

इथेही मिलिटरीच्या ट्रकांचा एक कॉन्वाय मिळाला. जवानांना सॅल्युट केलं; उत्तरादाखल अनेक सॅल्युट मिळाले. आता चढाची खरी मजा सुरू झाली. अगदी टेस्ट क्रिकेट. हवासुद्धा आत्ता माझ्या उलट बाजूला जाते आहे. काहीही असो; पण पायी जाताना इतकी अडचण येत नाही. हाँ वेग कमी असतो. अशा वेळी संगीत खूप सोबत करतं. मोबाईलमध्ये गाणे ऐकत पुढे गेलो. काही वेळाने मनातल्या मनात गाणे ऐकायला सुरुवात केली. जेव्हा पुढे जाताना काहीही घडत नसतं- प्रगती अगदी हळु होते- तेव्हा मनातल्या मनात गाणी ऐकूनही खूप ऊर्जा मिळते. मनाला चार्ज ठेवणं आवश्यक आहे. नाही तर मनामध्ये भिती घुसू शकते आणि असं वाटू शकतं की, लेह तर अजूनही ४५ किलोमीटर दूर आहे आणि आत्ताच चालणं कठिण झालं आहे. त्यामुळे होईल इतकंच की चालणं आणखी अवघड होईल. म्हणून मनात जर गाणे सुरू ठेवले तर त्यामुळे अनकॉन्शस माइंड बिझी राहील. गाण्यामुळे मनोरंजनाबरोबरच ऊर्जाही मिळेल. कितीही अवघड रस्ता असला तरी जर "थोड़ी सी धूल मेरी.. धरती की मेरी वतन की" जसं कोणतंही गाणं मनात प्ले केलं तर; आपोआप ऊर्जा येईलच शिवाय एक माहौल तयार होईल. “अकेले अकेले कहाँ जा रहे हो.. हमे साथ ले लो जहाँ जा रहे हो!” किंवा "अजीब दास्ताँ है ये.. कहाँ शुरू कहाँ खतम.. ये मंज़िलें है कौनसी.. ना वो समझ सके ना हम..” अशी गाणी मोबाईलमध्ये आणि मनात ऐकत रस्ता पार होत गेला.

रस्त्यावरून जाणारी काही वाहनं क्वचित थांबायची आणि चौकशी करायची. पाणी पुरेसं होतं. चॉकलेटसही होते. चढ अजूनही चालू आहे. मध्ये मध्ये थोडा रस्ता सपाट आहे; पण तिथेही सायकलीवर बसून जाता येत नाही आहे. एक मोबाईल टॉवर दिसल्यावर वाटलं की, चला ह्या चढाचा हा सर्वोच्च बिंदू असेल. पण नाही. रस्ता अजूनही चढावावरच पुढे जातोय. आता दुपार होत आहे. ससपोलपासून निघून तीन तास झाले आहेत आणि फक्त नऊ किलोमीटर पुढे आलो आहे. हवामान विपरित आहे. मध्ये मध्ये पाऊस पडतोय. एका पुलाजवळ थोडा वेळ बसून पाय वरती केले. स्ट्रेच केले.

एकदम मंद गतीने पुढे जात राहिलो. आत्ता कळत आहे की, अशा प्रवासामध्ये चांगलं खाणं किती महत्त्वाचं असतं! काल दुपारनंतर मी फारच थोडं खाल्लं होतं. कदाचित त्यामुळेच इतका थकवा आहे आणि पायी पायी जाण्याची गतीसुद्धा कमी झालेली आहे. नाही तर पायी चालणं इतकं सोपं असतं की, सपाट रस्त्यावर आपण जितक्या वेगाने चालतो; त्याच वेगाने पहाडी रस्त्यावरही जाऊ शकतो. हेच पायी चालण्याचं वैशिष्ट्य आहे. कमीत कमी ऊर्जा लागत असल्यामुळे चढाच्या रस्त्यांवरही चालणं कठिण जात नाही. किंबहुना पायी चालणं हा सायकलीचा 'पहिला' गेअर आहे. पण इथे पायी चालण्याचाही वेग कमी झाला आहे.

पावसामध्ये अनेकदा थांबत थांबत ससपोलपासून पुढचे दहा किलोमीटर पूर्ण झाले. समोर एक तिठा दिसतो आहे. इथून एक रस्ता लिकिर गोंपाकडे जातो. एक दुकानही आहे. हॉटेल मिळालं! चहा तर मिळेलच; मॅगी आणि चिप्ससुद्धा मिळेल. थंडीमध्ये हुडहुडी भरल्यानंतरचा चहा अवर्णनीय! हॉटेलच्या जवळ थांबल्यानंतर अधिकच थंडी वाजायला लागली. आत्तापर्यंत चालत असल्यामुळे थोडी ऊर्जाही मिळत होती. हॉटेल अगदी सुसज्ज आहे! आमलेटसुद्धा मिळेल. आतमध्ये काही सामानावर 'फक्त सेनेच्या वापरासाठी' असं लिहिलं आहे. पण इथल्या जनतेला मिलिटरीकडून खूप सुविधा मिळतात. त्यामुळेच लदाख़मध्ये मिलिटरीबद्दल लोकांच्या मनात आपुलकीची भावना दिसते.

अर्धा तास नाश्ता केला. स्वत:मध्ये इंधन भरलं. बाहेरून एक जण आले. त्यांनी सांगितलं की हवामान इतकं खराब आहे की, पाऊस तर आहेच पण बर्फही पडतोय! खरोखर! पावसामध्ये पुंजक्यासारखा बर्फ पडतोय! एकदा काळजी वाटली की मग पुढे कसं बरं जाता येईल? का अजून काही वेळ थांबून मग निघू? मग आज निम्मूलाच थांबू का? पण जसा नाश्ता झाला; ऊर्जा आली. बहुतेक शरीरात कमी झालेले सॉल्ट (क्षार) चिप्स खाल्ल्यामुळे मिळाले. खूप वेळाने सायकलवर बसून पेडल मारताना मस्त वाटलं. बर्फ पडणं जवळपास थांबलं आहे. पण माझ्या सॅकवर बर्फाचे काही कण पडलेले दिसले. पाऊसही थांबल्यासारखाच आहे. पुढे दोन किलोमीटर थोडा समतल आणि थोडा चढाचा रस्ता होता. थांबत थांबत पण सायकलीवरच तो पार केला. इथे एका ठिकाणी 'ला' प्रमाणे फ्लॅग्ज लावलेले आहेत; एक छोटा टिलासुद्धा आहे. नक्कीच पूर्वी इथेसुद्धा एखादा 'ला' असला पाहिजे. म्हणजेच हा ह्या टप्प्याचा सर्वोच्च बिंदू- घाटमाथा आहे! आता पुढे मोठा उतार मिळणार. इथून दिसणारा नजारा शब्दातीत आहे! चारही बाजूंना डोंगरावर शुभ्र बर्फ आहे! इथून बारा किलोमीटर निम्मूपर्यंत मस्त उतार! आणि रस्ता तर चकाचक आहे. खरोखर करगिलपासून इथपर्यंत सर्व रस्ता एकदमच जोरदार आहे. सॅल्युट, बीआरओ!
ओल्या रस्त्यावर जाताना काळजी घ्यावी लागेल. पण अशा उताराचीही वेगळी मजा आहे. फक्त वेग नियंत्रणात ठेवावा लागेल. थोडं पुढे गेल्यावर दूरवर निम्मूच्या आधीची झाडी दिसायला लागली. परत एकदा सिंधू मैयाचं दर्शन झालं. सिंधू नदी‌ ससपोलच्या नंतर दुस-या एका डोंगराजवळून पुढे गेली‌ होती‌ आणि रस्ता थोडा वळून पुढे आला. पण आता रस्ता परत सिंधूसोबत असेल. निम्मूच्या आधी अनेक माने आणि गोंपा वास्तु लागल्या. मिलिटरीचे खूप युनिटस इथे आहेत. निम्मूला पोहचताना दुपारचे साडेतीन झाले आहेत! अर्थात् ससपोलपासून निम्मू हे चोवीस किलोमीटरचं अंतर पार करायला साडेपाच तास लागले. आज लेहला खरोखर पोहचता येईल?

निम्मूमध्ये भूक नसूनही आलू पराठा खाल्ला. निम्मूजवळचा सिंधू- जांस्कर नद्यांचा संगम हेही लदाख़ला येण्याचं एक आकर्षण होतं. निम्मूमधून एक रस्ता सरळ संगमाजवळ जातो. पण आजच लेहला पोहचायचं आहे, त्यामुळे खाली संगमाकडे गेलो नाही. वरूनच संगम बघितला. खरोखर विश्वास बसत नाहीय, अजूनही! हे दोन नद्यांबरोबर दोन खो-यांचंही मीलन आहे. वरूनच फोटो घेतले. संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि इथून परत गुरुद्वारा पत्थर साहिब पर्यंत चढ आहे. जर तिथेच पोहचायला रात्र झाली, तर तिथेच थांबेन. ह्या चढावानेही वेळ लावला. पण नजारे अपूर्व!! सिंधू नदी दूर खाली पुढे जाते आहे. इथून रस्ता परत थोडा वेळ सिंधूपासून दूर जाईल. निम्मूनंतर हवामान एकदम चांगलं झालं. ऊन पडलं आहे. पुढचे सहा किलोमीटरसुद्धा पायी पायी जावे लागले.


सॅल्युट, बीआरओ!


सिन्धू- जांस्कर संगम!!!!!

गुरूद्वाराला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली. सात वाजले आहेत. आता इथेच मुक्काम करू की लेहला जाऊ? सायकलवर लदाख़ला जाण्याची प्रेरणा देणा-या नीरज जाटला फोनवर विचारलं. त्याने सांगितलं की, पत्थर साहिबपासून पुढे उतार तर आहे, पण लेहच्या पाच किलोमीटर आधी चढसुद्धा आहे. मी काय करू? लेहमध्ये ज्यांच्यासोबत राहायचं आहे; त्यांना आधी बोललो आहे की, शक्यतो आजच लेहला पोहचेन. अजून एक तास प्रकाश राहील. त्यानंतर अंधार होईल. पण उतार असल्यामुळे तोपर्यंत लेहच्या जवळसुद्धा पोहचेन. आणि मग उरलेलं अंतर अंधारातसुद्धा पार करता येईल.. तेव्हा बाकी २५ किलोमीटर आजच पूर्ण करतो. करगिल ते लेह तिस-या दिवशी पोहचेन! असा विचार करून मोठा निर्णय घेतला... नंतर त्याचा थोडा पश्चात्तापसुद्धा झाला; पण मजाही तितकीच आली!

पत्थर साहिबपासून एक किलोमीटर पुढेसुद्धा चढ होता. आता उतार सुरू होईल. सूर्य मावळेल लवकरच. पूर्णिमेच्या एक दिवस आधीचा चंद्र पूर्वेला उगवला आहे. मोठ्ठा उतार मिळाला. दूर लेह आणि आसपासची हिरवळसुद्धा दिसते आहे. हा उताराचा रस्ताही अगदी सरळ आहे. त्यामुळे पंचवीस- तीस किलोमीटर ताशी वेगाने सायकल पळवली. हळु हळु संधीप्रकाश कमी होत गेला. आणि त्याच प्रमाणात चंद्र प्रकाशमान झाला. थोड्याच वेळात पूर्ण अंधार झाला. आता फक्त चंद्रप्रकाश आहे आणि येणा-या जाणा-या वाहनांचा थोडा प्रकाश! अंधारी रात्र, सुनसान रस्ता आणि समोर पूर्वेला क्षितिजालगत उगवलेला जवळजवळ पूर्णिमेचा चंद्र! वेडं करण्यासाठी अजून काय हवं? इथे सायकल तुफान पळवली. नजारा वेडं करणारा आहे...
पण आता उतार संपला! लेह अजूनही किमान पंधरा किलोमीटर आहे! पुढे जाणं अत्यंत कठिण आहे. परत पाय ओढायला सुरुवात केली. आता अंधार पसरला आहे. पण थकवा इतका जास्त आहे की, दोन मिनिट थांबून सॅकमधून टॉर्च काढणंही अवघड वाटलं. मला वाटलं होतं की, लेहच्या दहा किलोमीटर आधी काही वस्ती मिळेल- हॉटेल मिळेल- काही खाऊन पुढे जाईन. पण इथे तर सन्नाटा आहे! जम्मू- कश्मीर विद्यापीठाचा एक कँपस लागला. काही ऑटोमोबाईल- गॅरेज अशी दुकानं लागली. पण हॉटेल किंवा वस्ती अजिबातही नाही! पण आता थांबणं शक्य नाही. साडे आठ वाजले. चंद्र ढगाआड आहे. येणा-या वाहनांच्या ड्रायव्हर्सना मी दिसल्यावर ते डिपर लाईट बदलायचे, म्हणून बरं! त्यामुळे मला रस्ता दिसत राहिला. अर्थात् चंद्रप्रकाशामुळे रस्त्याची रेषा सारखी स्पष्ट दिसत होतीच.

चालत असलो तरी टेंशन आलं होतं. जरा सपाट रस्ता दिसला की, सायकल चालवून बघायचो. परत पायी पायी. एक बोर्ड लागला 'वेलकम टू लेह'! चला, लेहला पोहचलो तर! पण पुढेच मैलाचा दगड आला ज्यावर लेह अजूनही दहा किलोमीटर दिलं होतं! लेहपर्यंत लिफ्ट घेण्याची इच्छा झाली. पण विचार केला, थोडा धीर धर. इतकं जवळ आल्यानंतर लिफ्ट... जिथे थोडे तरी लोक दिसतील असा एकही चौक/ जंक्शन पुढे लागलं नाही. तरीही चालत राहिलो. विचार केला, एक तासाऐवजी दोन तास अंधारात चालू. लेह कुठे जाईल? लेह जवळ आलं आणि मिलिटरीचे अनेक स्टेशन्स सुरू झाले. त्याचीही भितीच वाटली. रात्री इतक्या उशीरा त्यांच्या समोरून जाणं... अर्थात् प्रवासी वाहनं अजूनही चालूच आहेत. अंधारातच दिसलं की अरे! रस्ता परत नदीजवळा आला आहे. अगदी मंद गतीने लेहकडे सरकत गेलो. पण अजूनही एक अडचण आहे. मला लेहमध्ये चोगलमसरला जायचं आहे. तिथले एक जण ओळखीचे आहेत जिथे मी थांबेन. एका जागी काही जवान दिसले; त्यांना चोगलमसरचा रस्ता विचारला. ते म्हणाले, हाच रस्ता आहे; सरळ जा; मार्केटपासून राईट घे. पण चोगलमसर अजून किमान पंधरा किलोमीटर असेल! ते लेहचं उपनगर आहे किंवा जवळचं गाव आहे. थांबत चालत चालत थांबत पुढे जात राहिलो. साडेनऊ वाजता एअरपोर्टजवळ पोहचलो. इथून लेह शहर दोन किलोमीटर पुढे आहे आणि तिथून चोगलमसर! प्रचंड थकलो आहे. ज्यांच्याकडे जाईन त्या प्रोद्युतजींना फोन केला आणि कळवलं की मी एअरपोर्टपर्यंत आलो आहे. पण त्यांच्याकडे गाडी नाहीय. त्यामुळे मलाच पुढे जावं लागेल. एकदा वाटलं इथेच एखाद्या हॉटेलात थांबावं. लेहमधले एक हॉटेलवाले मित्र आहेत. पण त्यांचा नंबर लागला नाही. आता काहीच उपाय नाही. पाय ओढत ओढत जायचं पुढे.

एअरपोर्टनंतर जशी 'सिव्हिलियन' वस्तू सुरू झाली, एकदम बरं वाटलं. चला, आता कोणी मिलिटरीवाला किंवा दरोगा मला थांबवणार नाही; आता लेह सुरू झालं आहे. चक्क लेह!!! रात्री दहा वाजता एक हॉटेल सुरू मिळालं. पण तिथे फक्त नॉन व्हेज आहे. पुढे गेलो. प्रोद्युतजींनी एक गोष्ट चांगली कळवली होती की, लेह शहरातून चोगलमसर रोडवर उतार मिळेल. विचारत विचारत पुढे गेलो. पण त्यांचा पत्ता इथल्या लोकांना माहिती नाही. पुढे जाऊनच बघावं लागेल.

शेवटी तो उतार मिळाला आणि चोगलमसरकडे निघालो. पण मोबाईलची बॅटरी आचके देते आहे. प्रोद्युतजी माझ्यासाठी रस्त्यावर येऊन थांबतो म्हणाले आहेत; पण अजून किती पुढे जायचं‌ हेच कळत नाहीय. रात्री पावणेअकरा वाजता रस्त्यावर वाहतुक मंदावली आहे. हळु हळु पुढे गेलो. आयटीबीपी स्टेशनवरही पत्ता विचारला; पण त्यांनाही माहिती नाही. प्रोद्युतजी रस्त्यावर आले असतील. पण अजून किती दूर? इतका थकलोय की, काहीही कळत नाहीय. असं तर नाही की, मी रस्त्यावर पुढे आलोय? अंधारात कदाचित दिसलं नसेल. त्याच वेळी मोबाईल बंद झाला. आता काय करू? हायवेवर वाहनं तर जात- येत आहेत; पण पत्ता सांगणारं कोणी नाही.

शेवटी एका जागी बसलो. विचार केला की, स्लीपिंग बॅग आहेच सोबत. चला, आता इथेच एखाद्या दुकानाजवळ थांबतो. रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत. अगदी एलेवन्थ अवर! चार वाजता पहाट होईल. सकाळी पुढे जाईन. चार- पाच तासांचाच तर प्रश्न आहे. हायवेला लागून असलेल्या एका रिकाम्या जागी जाऊन सामान उघडलं. स्लीपिंग बॅग उघडून तिच्यात शिरलो. सोबत दुसराही एक हँडसेट आहे; त्यामध्ये सिम टाकलं. शेवटी लेहला पोहचलो! पण इतक्या उशीरा पोहचल्यामुळे ह्या मोठ्या आनंदावर विरजण पडलं. घरी सकाळीच कळवेन. आत्ता कळवण्यासारखी स्थितीही नाहीय! तितक्यात प्रोद्युतजींचा फोन आला. त्यांना सांगितलं की, मी रस्त्यावरच थांबतोय. सकाळी येईन. ते चकित झाले. पण अजून उपाय सुचला नाही. मी कमालीचा थकलो आहे. आता फक्त झोपेन. काही तासांचाच तर प्रश्न आहे...

तिस-या दिवशी जरी मी लेहमध्ये पोहचलो असलो तरी मी अनेक चुका केल्या. पहली चूक ही की, मला प्रोद्युतजींचा पूर्ण पत्ता आधीच घेऊन ठेवायला हवा होता. त्याचा फटका बसला. रस्त्यात मी पुरेसं खाल्लंही नाही. तसंच चॉकलेट बार/ ओआरएससुद्धा घेतलं नाही. त्यामुळे वेग कमी पडला. तिसरी गोष्ट- मी मनाली- लेहच्या तुलनेत करगिल- लेह रस्त्याचा अभ्यास कमीच केला. त्यामुळे ससपोलनंतरच्या घाटाबद्दल मी अंधारात होतो. लेह शहराजवळच्या रस्त्यांचीही पुरेशी माहिती घेतली नाही. असो. जे झालं ते झालं. जवळजवळ पूर्णिमेचीच रात्र आहे. चोही बाजूंना पर्वतावर बर्फ चकाकतो आहे. व्वा! हीही दुर्मिळतम मजा! जर कुठे रात्री थांबलो असतो तर ही बर्फाची चमकी थोडीच बघायला मिळाली असती? थंडी तर तुफान आहे. थंडीने थरथर कापतोय. पण त्याचाही हवामानासोबत अक्लमटाईझ व्हायला फायदाच होईल. बघूया.

...पण आजच्या रात्री माझ्या नशीबात बहुतेक विश्रांती नाहीय. मला असं आलेलं बघून आणि सायकल- सामानाजवळ झोपताना बघून कुत्रे चेकाळले. हळु हळु त्यांचं भुंकणं वाढत चाललं. तसे कुत्रे माझे मित्र आहेत; मी नेहमी त्यांच्याशी खेळतो; त्यांना थोपटतो. आणि कुत्रेही अशा माणसाला बरोबर ओळखतात. पण तरीही ते माझ्याजवळ येऊन भूंकत आहेत. बहुतेक म्हणत आहेत, 'असशील तू मित्रच असशील; पण आत्ता इथे नको थांबूस!' दिवसभर मी मनात अनेक गाणी ऐकली. चला अजून एक ऐकू- 'दोस्त दोस्त ना रहा!' थोडा वेळ तसाच पडून राहिलो. पण कुत्र्यांचा आवाज वाढत जातोय. अचानक ज्युरासिक पार्कमधला एक सीन आठवला ज्यामध्ये डायनोसॉरसची अनेक पिल्लं एका माणसाला पकडतात... मग विचार केला की, चल निघ आता. कसंबसं सामान परत सायकलवर ठेवलं. पुढे निघालो. पण कुत्र्यांचं भुंकणंही माझ्यासोबत पुढे सुरू राहिलं. पायी जाऊन चालणार नाही. शिल्लक असलेली नसलेली ऊर्जा एकत्र करून सायकलवर बसलो आणि निघालो. कुत्र्यांच्या भुंकण्याने माझा पाठलाग केला. काही क्षणांसाठी वाटलं की, चला सुटलो त्यांच्या भुंकण्यातून! एक किलोमीटर पुढे गेलो. पण अरे! मागून भुंकण्याचा आवाज फॉरवर्ड होऊन पुढे येतोय! लवकरच जवळचेही कुत्रे भुंकायला लागले! ***** आता काय करू?

थोडं पुढे गेलो आणि विचार करणं थांबवून सरळ एका दुकानाच्या शटरजवळ जाऊन उभा राहिलो. सायकल उभी केली. सॅक खाली ठेवली. तेव्हा बघितलं की, बाजूलाच दोन कुत्रे बसलेले आहेत! पण ते शांत आहेत. बाकी आसपासचे कुत्रे भुंकत आहेत! मी एक केलं की, तिथेच स्थिर उभा राहिलो. कुत्र्यांच्या समोर उभा राहिलो. हळु हळु कुत्रे शांत झाले. भुंकत राहिले; पण माझ्या आणखी जवळ आले नाहीत. आणि त्या कुत्र्यांना कसं धन्यवाद देऊ जे माझ्या अगदी बाजूला होते पण चुपचाप झोपले होते! जर तेसुद्धा भुंकले असते तर अवघड झालं असतं. पण त्यांनी मला सोबत दिली.

अजूनही पहाट व्हायला किमान चार तास आहेत. तिथेच बसून राहिलो. मधून मधून रस्त्यांवर वाहनं जात आहेत. कुत्र्यांनी मला सोडून दिलं! बसल्या बसल्या एक डुलकी घेतली. थंडी प्रचंड आहे. शरीराखाली हात ठेवून बसल्यावर किंचित बरं वाटलं. मध्ये मध्ये कुत्र्यांचं भुंकणं वाढल्यावर उठावं लागत आहे. रात्री उशीरा एक टेंपो येऊन थांबला. त्यात काही जण होते. ते टेंपोतच बसून राहिले. मग निघून गेले. हळु हळु एक एक मिनिट गेलं. चंद्र पुढे सरकला. पण रात्रभर बर्फाचा नजारा अभूतपूर्वच राहिला. चंद्रप्रकाशात बर्फ कसला चकाकतोय! पावसानेही कृपा केली. रात्र उलटत गेली. हुडहुडी वाढत गेली.

पहाटे चार वाजता एक जण प्रकट झाला! त्या दुकानाचा मालक! त्याला थोडक्यात माझी कहाणी सांगितली. त्याला आश्चर्य वाटलं. मग त्याने दुकानात आग पेटवली. हे त्याचं चपाती विकण्याचं दुकान आहे. आगीची ऊब घेताना बरं वाटलं. ऊब घेताना उभ्या उभ्या डुलकी लागत आहे! ह्या दुकानदाराला प्रोद्युतजींचा पत्ता माहिती आहे. पहाटे पाचला निघालो. इथून ती रूम जवळच आहे. पण पुढे अजून विचारावं लागलं. पुढेही रस्त्यावर सलग चढ आला! शेवटी सकाळी साडेसहाला त्यांच्या रूमवर पोहचलो एकदाचा! काल नव्वद किलोमीटर सायकल चालवली आणि रात्र तर अविस्मरणीय ठरली! मिसमॅनेजमेंटही जोरदार झालं. पण एकून त्यातही प्रचंड मजा आहे. आजवर आयुष्यात कधीच इतका थकलो नव्हतो की, उभ्या उभ्या डुलकी लागावी. एकंदरित सायकलिंग जोरदार झाली. करगिलपासून तिस-या दिवशी लेह! आणि "सफर" करताना इंग्रजी "सफर" सुद्धा झालं! अजून काय पाहिजे!?


काल एकूण ९० किमी चालवली. १७४५ मी. चढ आणि १५३७ मी. उतार

पुढचा भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला


साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

प्रतिक्रिया

बहारिन् चा खलिफा's picture

20 Jun 2015 - 7:01 pm | बहारिन् चा खलिफा

फार छान प्रवास वर्णन

अजया's picture

20 Jun 2015 - 7:06 pm | अजया

दं ड व त!पुभाप्र.

यशोधरा's picture

20 Jun 2015 - 7:16 pm | यशोधरा

बापरे! वाचूनच हुडहुडी भरली!
मस्त लिहिलंय आणि दाद आहे तुमच्या जिद्दीला.

सुबोध खरे's picture

20 Jun 2015 - 7:32 pm | सुबोध खरे

आपल्या साहसाला आणि उत्साहाला सलाम.
परंतु एवढ्या कष्टप्रद प्रवासासाठी आपली प्रेरणा(MOTIVATION) कोणती आहे?

सुबोध खरे's picture

20 Jun 2015 - 7:33 pm | सुबोध खरे

आपल्या साहसाला आणि उत्साहाला सलाम.
परंतु एवढ्या कष्टप्रद प्रवासासाठी आपली प्रेरणा(MOTIVATION) कोणती आहे?

चैदजा's picture

20 Jun 2015 - 7:38 pm | चैदजा

शब्दातीत !!!!!!!!!!

एस's picture

20 Jun 2015 - 8:35 pm | एस

एकदा सायकलवरून कात्रजच्या घाटापर्यंत जाऊन येणार... बस्स ठरलं. :-)

प्रीत-मोहर's picture

20 Jun 2015 - 8:48 pm | प्रीत-मोहर

__/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2015 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय उत्साह आणि काय साहस ! __/\__

स्वगतात लिहिण्याची शैली भयंकर आवडली !!!

अरे काय! असं काहीतरी जबरदस्त वाचायला मिळालं की भारी वाटतं...

मित्रहो's picture

20 Jun 2015 - 11:16 pm | मित्रहो

तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे.
इतके थकल्रायावरही रात्री लेहला न थांबता तुम्ही पुढे गेलात याचे आश्चर्य वाटते.

पैसा's picture

20 Jun 2015 - 11:29 pm | पैसा

डायरी लिहिल्यासारखां लिहिलंय! मस्तच!

बोका-ए-आझम's picture

21 Jun 2015 - 12:41 am | बोका-ए-आझम

मार्गीजी, तुसी ग्रेट हो! नमस्कार कुबूल करो!

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2015 - 10:24 am | श्रीरंग_जोशी

इतकी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही तुम्ही न डगमगता मार्गक्रमण करत राहिलात... फारच जोरदार. या धैर्याचे कौतुक करायला शब्द नाहीत.

सोबत काडेपेटी / लायटर वगैरे असायचे का? थंडीपासून रक्षणासाठी काय काय सोबत ठेवायचा?

बिआरओ ची विनोदी पाटी आवडली. फोटोजला व्हिडिओची जोड छानच.

मार्गी's picture

23 Jun 2015 - 10:53 am | मार्गी

आव्हानात्मक स्थिती इतकी नव्हती. उलट करगिल- लेह रस्ता तसा सोपा आहे. काडेपेटी- लायटर नव्हतं. थंडीसाठी इनर आणि जर्किन होतं. आणि डबल- टिबल कपडे. :)

उगा काहितरीच's picture

21 Jun 2015 - 10:34 am | उगा काहितरीच

सलुत!

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2015 - 4:09 pm | स्वाती दिनेश

तुमच्या प्रवासातला थरार शब्दाशब्दातून आमच्यापर्यंत पोहोचतो आहे.
स्वाती

नाखु's picture

24 Jun 2015 - 4:00 pm | नाखु

सलाम जिद्दीला.

कहर आहे हे सारं

अचंबीत नाखु

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 4:26 pm | मोहनराव

_/\_

शंतनु _०३१'s picture

24 Jun 2015 - 4:52 pm | शंतनु _०३१

जे वाचलंय ते निव्वळ अविश्वसनीय आहे hats off to you

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2015 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

मोदक's picture

25 Jun 2015 - 2:23 pm | मोदक

वाचतोय.!! __/\__

पिलीयन रायडर's picture

6 Jul 2015 - 11:33 am | पिलीयन रायडर

सलग वाचायला घेतलेत भाग..
हा तर निव्वळ कहर आहे!!!!
महान आहात...

sagarpdy's picture

30 Mar 2016 - 2:23 pm | sagarpdy

__/\__