सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
19 Jun 2015 - 2:06 am

सायकलसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...

३१ मे, रविवारची सकाळ! सेनेच्या जवानांसोबत चांगला आराम झाला. कालच्या दिवसावर अजूनही विश्वास बसत नाहीय. काल रात्री जवानांसोबत मस्त गप्पा झाल्या. पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहात असल्याची थोडी भिती वाटली. पण वातावरण अगदी अनौपचारिक होतं. अर्थात् सुरक्षेच्या नियमांप्रमाणे सामानाची तपासणी केली. माझ्याकडे ओळख दर्शवणारे कागदपत्र होते; पण त्यांना ते बघण्याची गरज वाटली नाही. रात्री बराकीमध्ये थांबणं अपूर्व होतं. ही जागा ३४०० मीटर पेक्षा जास्त उंच आहे. २७०० मीटरपासून त्या उंचीवर एकाच दिवसात आल्यामुळे थंडी खूप जाणवली. पण श्वास घेण्यामध्ये काहीच अडचण आली नाही. शरीराने आता खूप जास्त प्रमाणात उंचीशी जुळवून घेतलं आहे. रात्री बराकीमध्येच जवानांनी जेवण बनवलं होतं. रात्री आतमध्ये शेकोटीही पेटवली होती. एकूण कालची‌ संध्याकाळ चिरस्मरणीय होती. सर्वांनी खूप कौतुक करून प्रोत्साहन दिलं आणि आपुलकीने लक्ष दिलं. त्यांचे अनुभवसुद्धा सांगितले. हिवाळ्यात इथे खूप बर्फ पडतो. तरीसुद्धा हा कँप इथेच सुरू राहतो. हिवाळ्यात इतका बर्फ असतो की, उच्छ्वासाचाही लगेच बर्फ होतो. इथे मिलिटरीने चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी वेगळं रेशन, इंधन, उष्णतेसाठीची साधनं हे साळं येतं. परंतु तरीही मेजर- लेफ्टनंटसारख्या अधिका-यांच्या मानाने व्यवस्था साधीच वाटली. अर्थात् हे विसरून चालणार नाही की, हे एक दुर्गम क्षेत्र आहे आणि झोजिला नुकताच म्हणजे वीस दिवसांपूर्वी १० मे ला सुरू झाला आहे. मनाली रोड सुरू होण्याची तर अजून चिन्हंही नाहीत. म्हणून इथे साधनांची थोडी कमतरता असणं स्वाभाविक आहे. मिलिटरीचं 'वेट कँटीन' सुद्धा दिसलं. मिलिटरीचं‌ जग आतून बघता आल्यामुळे धन्य धन्य वाटत आहे.

जास्त उंचीचं ठिकाण असूनही झोप ठीक लागली. पण पहाटे तीन वाजता जाग आली. उजेड व्हायला अजून एक तास आहे. हळु हळु जवान उठले. त्यांच्यासोबत मीही तयार झालो. कँपमध्ये एका ठिकाणी 'कन्धों से मिलते हैं कन्धे कदमों से कदम मिलते हैं' सुद्धा ऐकू आलं. चारही बाजूंना बर्फाच्छादित पर्वत आहेत! खरोखर किती विलक्षण जागा आहे ही...

काल सत्तर किलोमीटर चालवल्यामुळे आज विश्वास वाटतो आहे की, मी आजसुद्धा जवळ जवळ तितकंच चालवू शकेन. आज सगळ्यात आधी फोतुला पार करायचा आहे. फोतुला श्रीनगर- लेह रस्त्यावरचं सर्वोच्च स्थान आहे. उंची सुमारे ४१०० मीटर आहे. आज जर सत्तर किलोमीटर झाले तर उद्या लेहला पोहचता येईल. त्यामुळे चांगलाच उत्साह वाटत आहे. कालचा थकवा अजिबात जाणवत नाही आहे. अशा वातावरणामध्ये थकवा जाणवेल तरी कसा! सकाळी जवानांनी खास आर्मीची रोटी खाऊ घातली. नंतर कॅफेटेरियामध्ये मॅगीसुद्धा खाऊ घातली. इथे अजून मॅगीवर बॅन आला नाही आहे. किंबहुना मॅगी माझ्या बरीच उपयोगी आहे! जवानांनी माझं भरपूर आतिथ्य करून मला बाहेर सोडलं. माझ्याजवळ त्यांना देण्यासाठी काही नाही आहे. काही चॉकलेट आणि सुकामेवा आहे; तेच दिलं. त्यापैकी काही जण आता कॉन्वायमधून निघत आहेत...

आता पहिलं उद्दिष्ट फोतुला ओलांडणे आहे. इथून फोतुला पंधरा किलोमीटर असावा. पण फोतुला ओलांडायला बराच वेळ लागेल. त्याआधी येणा-या एखाद्या गावात परत नाश्ता करावा लागेल. सायकलिंग अनेक अर्थांनी कसोटी क्रिकेट सारखं आहे. कसोटीत बॅटिंग करताना पहिल्या तासामध्ये बॉलर्सचा आदर करावा लागतो; नवा चेंडू स्विंग होतो; फिरतो; त्याच प्रमाणे पहिल्या तासामध्ये सायकलिंग थोडं संथ असतं. रात्रभर झोपलेलं शरीर थोडं कडक असतं. हळु हळु पुढे जाण्याच्या प्रवाहामध्ये ते लवचिक होत जातं. मग पाय सहजपणे चालू लागतात. हळु हळु सायकलिंग किंचित सोपं होतं. बुधखारबूच्या पुढे पहिलं गाव हंसकोट आहे पण तिथे हॉटेल मिळालं नाही. पुढे गेलो. रस्त्यात मिलिटरीचा खूप मोठा कॉन्वाय लागला. अनेक जवानांना मान झुकवून आणि सॅल्युट करून अभिवादन केलं. तेसुद्धा उत्तरादाखल सॅल्युट करत आहेत. खरोखर असा अनुभव शब्दात कसा सांगणार..

फोतुला किती दूर आहे हे कळत नाहीय. पण काय नजारा आहे! पर्वतात दूरवर कुठे कुठे वस्ती दिसते आहे. तिथे मेंढ्या चरत आहेत. दोन डोंगरांच्या मधून वाहणारं पाणी! नशीब!!! सुमारे दिड तास पुढे गेल्यानंतर एक लहान गाव आलं. इथे एक हॉटेल आहे. कमीत कमी चहा तर मिळेलच. बघितलं तर चहा तर आहेच; पण आमलेटसुद्धा आहे. एक आमलेट खाल्लं आणि एक पार्सल घेतलं. हे लदाख़चं वैशिष्ट्य आहे. कितीही छोटं दुकान असलं तरी त्यातही पुष्कळ गोष्टी मिळतात. अंडे असतील तर आमलेट मिळेलच. मॅगी, चिप्स आणि चिक्कीसुद्धा आहे! झोजिला थोड्याच दिवसांपूर्वी उघडल्यामुळे नवीन स्टॉक आलेला दिसतोय.

चांगला नाश्ता करून पुढे निघालो. आता फोतुला पार करून लामायुरूपर्यंत जेवण मिळणार नाही. पुढे लगेच फोतुलाचं अंतर दिसलं. फक्त अकरा किलोमीटर. पुढे तीन किलोमीटर सायकल चालवता आली. आता उरलेले आठ किलोमीटर पायी पायी जावं लागेल. ते गाणं लगेच आठवलं- वहाँ हाथी ना घोड़ा है बस पैदल ही जाना है! पायी पायी जाताना मोबाईलमध्ये गाणी‌ सुरू केली. “जहाँ दूर नजर दौडाए आज़ाद गगन लहराए...”

पुढे जाण्याची अजिबात घाई नाही. त्याउलट हळु हळु आणि निवांतच जातोय. कारण आत्ता मी जवळपास ३८०० मीटर उंचीवर आहे. जर मी इथे जास्त वेळ थांबलो तर पुढे लदाखमध्ये लागणा-या अधिक उंच "लां"साठी मला मदत होईल. त्यामुळे अगदी पायांच्या नैसर्गिक चालीने पुढे जात राहिलो. फोटो घेण्याच्या निमित्ताने थांबत राहिलो. श्वास सामान्यच आहे. पण नजारे काय वर्णावेत! गाडीने जाणं एक गोष्ट आहे आणि सायकलवरून जाणं अगदी वेगळी गोष्ट आहे. आता मला हा राष्ट्रीय महामार्ग एक वाटतच नाहीय. मी तर त्याला वेगवेगळ्या गावांना जोडणारा रस्ता म्हणूनच बघतोय. आणि जसा आपण वेग कमी करतो; तशी आपली बघण्याची गहराई वाढते. गाडीतून दिसल्या नसत्या अशा अनेक गोष्टी. मेंढपाळ दूर डोंगरात आत जात आहेत. डोंगरातून पाण्याच्या धारा नाचत खाली येत आहेत. दूरवर बर्फ तर आहेच...

आठ किलोमीटर पायी जायला दोन तास लागले. मंद गतीने पुढे जाताना अगदी छोटी छोटी उद्दिष्टं ठेवत गेलो. एकदा व्ही व्ही एस लक्ष्मणनी एका मुलाखतीत सांगितलं होतं ना की, टेलएंडर्ससोबत भागीदारी करताना त्याचा एक फॉर्म्युला असायचा. ते खूप छोटी छोटी उद्दिष्टं समोर ठेवायचे. जसं पुढच्या दोन ओव्हर्स खेळून काढू. किंवा पुढच्या अर्ध्या तासात पाच रन बनवायचे. त्याप्रमाणे मनासमोर छोटं टारगेट ठेवून पुढे जात राहिलो. फोतुलाच्या पाच किलोमीटर आधी चहा मिळाला. बिस्किटसुद्धा खाल्लं. पुढे थंडी वाढली. जीवनात पहिल्यांदाच चालत चालत चार हजार मीटर उंचीवर जातो आहे. फोतुला! इथे थांबून पार्सल आणलेलं आमलेट खाल्लं. आता मोठा उतार मिळेल. इथून लामायुरूपर्यंत मोठा उतार आहे.

लामायुरूमध्ये अनेक पर्यटकांनी थांबवलं. एक दक्षिण भारतीय काका खूप खुश झाले. तेसुद्धा सायकल चालवतात. मला सायकलवरून येताना बघून त्यांना एकदम आनंद झाला. तुम्हीसुद्धा इतकं सायकलिंग करू शकता, असं त्यांना सांगून पुढे निघालो. काही पर्यटकांनी माझ्यासोबत सेल्फी घेतली! लामायुरू गोंपा बघण्याचं लक्ष्य नसल्यामुळे चहा घेऊन पुढे निघालो. इथली पर्यटकांची गर्दी बघून लेहला पोहचल्यासारखंच वाटलं. इतक्या वेळच्या निर्जन परिसराचं रुपांतर शहरामध्ये झालं. पुढे बरंच पुढे आल्यावर परत शांतता झाली. उतार सुरूच राहिला. मूनलँड जवळून बघता आला. खरोखर निसर्गाची जादू विलक्षण आहे! पण ह्या मूनलँडलाही शहरीकरणाचा फटका बसतोय!

आता सिंधू नदीची वाट बघतोय. खालसीपासून सिंधू नदीसुद्धा ह्या रस्त्याला येऊन मिळेल. पुढे क्वचित चढ येत आहेत. पण उतार सुरूच आहे. इथे रस्ता अगदी अरुंद दरीतून जातोय. खालसी नदीच्या किनारी असल्यामुळे त्याची उंची अजून कमी असणार आणि तोपर्यंत उतार सुरूच राहणार असं दिसतंय. पण काय रौद्र भाग आहे हा! आता तर सतत खाली उतरण्याचीच भिती वाटते आहे. एकदा तर वाटतंय की, रस्ता बरोबर आहे ना. मी रस्ता चुकलो तर नाही? पण रस्त्यात कोणताही फलक आला नाहीय. मध्ये वाहतुकसुद्धा लागत नाहीय. एक पहाडी नदी येऊन रस्त्याला मिळाली. नक्कीच हीसुद्धा सिंधूला भेटायला जाते आहे.. पुढे एक फलक मिळाला. हाच रस्ता बरोबर आहे. आता लवकरच खालसी आणि सिंधूचं दर्शन होईल... इथेच बटालिकवरून येणारा रस्ताही मुख्य महामार्गाला मिळेल.

सिंधू नदीचं पहिलं दर्शन!! अहा हा! तिबेटमधून येणारी रमणीय धारा! आता लेहपर्यंतचा बराचसा प्रवास सिंधूच्या सान्निध्यातच होईल. खालसीच्या थोडं पुढे खालत्सी गाव लागतं. इथेसुद्धा पर्यटकांची गर्दी आहे. चहा पिऊन पुढे निघालो. जर उद्या लेहला पोहचायचं असेल तर मला आज खालत्सीच्या अजून पुढे जावं लागेल. खालत्सीपासून लेह ९७ किलोमीटर आहे. आज नुरला इथे थांबेन. तिथे गेस्ट हाउस मिळेल अशी माहिती मिळाली. नुरला अजून बारा किलोमीटर पुढे आहे. आत्ता संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत. अंधार पडण्याची भिती नाही. इथून पुढे तीव्र चढसुद्धा नाही आहे.

सिंधू नदीच्या निनादासह पुढचाही टप्पा लवकरच पूर्ण झाला. नुरलापासून पुढचं गाव ससपोल चोवीस किलोमीटर दूर आहे. आज तिथे पोहचू शकणार नाही. त्यामुळे नुरलाच ठीक आहे. नुरलामध्ये हॉटेल महाग आहेत; पण होम स्टे मिळू शकेल. आणि मिळालासुद्धा. एका माणसाकडे थोडी विचारपूस केली. लवकरच त्यांच्याकडेच होम स्टे मिळाला. लदाख़मध्ये कित्येक गावांमध्ये अशा प्रकारे पैसे देऊन घरी राहता येतं. आज पहिल्यांदा एखाद्या लदाख़ी घरामध्ये राहणार आहे. लदाख़ी‌ गावं छोटी असली तरी समृद्ध आहेत. माने, प्रेअर व्हील आणि प्रेअर फ्लॅग लागलेले आहेत. घरामध्ये दोन लहानशा निरागस प-यासुद्धा भेटल्या. गच्चीतल्या खोलीत राहण्याची व्यवस्था झाली. अखंड गरजणारा सिंधू नदीचा रौरव स्पष्ट ऐकू येतो आहे.
आजसुद्धा चांगली सायकल चालवली. बुधखारबूपासून सुमारे ६५ किलोमीटर आलो आहे. पण एक गोष्ट खरी की, फोतुलानंतर सुमारे पंचवीस किलोमीटर उतार असूनही फार पुढे जाता आलं नाही. कदाचित दुपारी फोतुलावर आमलेट खाल्ल्यानंतर काहीच खाल्लं नसल्यामुळे असेल. त्यामुळे ऊर्जा किंचित कमी वाटते आहे. संध्याकाळीही काहीच खायची इच्छा झाली नाही. सोबत बिस्किट होते; पण भूकच नाहीय. आजची रात्र सिंधूच्या गर्जनेच्या सोबतीने..


जहाँ दूर नजर दौडाए.. आज़ाद गगन लहराए लहराए लहराए..


वक़्त झरना सा बहता हुआ गा रहा है यह कहता हुआ...


लामाजी


फोतुलाजवळ


लामायुरू


मूनलँड


आजच्या सायकलिंगचा लेखाजोखा- अंतर ६५ किमी; चढ सुमारे १७०० मी आणि उतार २१७० मी


सिंधू!!!!!!!


"तू मेरे साथ साथ आसमाँ‌ से आगे चल.. तुझे पुकारता है तेरा आनेवाला कल.. नई हैं मन्जिलें..
नए हैं रास्ते.. नया नया सफ़र है तेरे वास्ते.. नई नई है ज़िन्दगी.."- सिन्धू

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

19 Jun 2015 - 2:36 am | मधुरा देशपांडे

अफाट...निव्वळ अफाट. सुंदर अनुभव आणि तेवढ्याच छान शैलीत मांडलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2015 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ __/\__ अक्षरशः तिथे आहोत आपण,असं वाटतय वाचताना.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 5:35 am | श्रीरंग_जोशी

हा भाग वाचून खूप अद्भुत वाटतंय. परिसर तर स्वर्गीय आहेच पण तुमची विचार करण्याची पद्धत जे लेखनात अगदी सहजपणे उतरली आहे ती खूपच आवडली.

९० अन २०००च्या दशकांतल्या हिंदी चित्रपटगीतांच्या ओळींमुळे तर तुम्ही एकदम जवळचे मित्र वाटत आहात :-) .

कंजूस's picture

19 Jun 2015 - 6:19 am | कंजूस

वाचतोय.

यशोधरा's picture

19 Jun 2015 - 8:03 am | यशोधरा

सुरेख! सिंधू!!

उगा काहितरीच's picture

19 Jun 2015 - 9:38 am | उगा काहितरीच

केवळ अप्रतिम !

यसवायजी's picture

19 Jun 2015 - 9:45 am | यसवायजी

मानलं राव

क्रेझी's picture

19 Jun 2015 - 10:00 am | क्रेझी

एकदम लाईव्ह कव्हरेज वाचून तुमच्यासोबत प्रवास चालू आहे असंच वाटत आहे :) मस्त एकदम :)

मूनलँड भाग म्हणजे नेमकं काय आहे? फोटोमधून काही कळत नाहीये.

माझीच मी's picture

19 Jun 2015 - 10:01 am | माझीच मी

भारीच एकदम ! ह्याट्स ऑफ टु यु !

मित्रहो's picture

19 Jun 2015 - 10:09 am | मित्रहो

परत एकदा प्रणाम
लिहाण्याची पद्धत आवडली. दहा मिनिटा्या वाचनात संपूर्ण दिवसाचा प्रवास आपल्या सोबतच केल्यासारखा वाटला.

खटपट्या's picture

19 Jun 2015 - 10:44 am | खटपट्या

फोटो छान, आता वाचतोय

नाखु's picture

19 Jun 2015 - 11:01 am | नाखु

अद्भुत आणि विलक्षण आहे सारं आणी आम्च्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेकानेक धन्य्वाद.

सायकल पेक्षा सोयकलीत आडकलेला नाखु

तरल आणि जिवंत अनुभववर्णन. जणूकाही वाचकही तुमच्याबरोबर ही भटकंती करतोय.

आणि जसा आपण वेग कमी करतो; तशी आपली बघण्याची गहराई वाढते.

अगदी नेमके. घाईघाईत आपण अगदी आजूबाजूच्या छोट्या छोट्या आनंदांसही मुकत असतो याची जाणीव झाली.

जिन्गल बेल's picture

19 Jun 2015 - 11:57 am | जिन्गल बेल

निव्वळ अप्रतीम.......
तुमचे लेखन...वर्णन...आणि फोटो...सगळेच खूप सुन्दर आहे...
वाचते आहे....पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अचाट सफर, अफाट निसर्गाची प्रकाशचित्रे आणि सिंधूच्या प्रवाहासारखेच प्रवाही प्रवासवर्णन !!

हा प्रवास सायकल घेऊन एकट्याने करायला काळजात बळ आणि डोक्यात वेड असायला लागतं... ते तुमच्या पुरेपूर दिसत आहे ! हा तुमचा अनुभव आमच्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद !!

मोहनराव's picture

19 Jun 2015 - 1:01 pm | मोहनराव

वाचतोय. छान चालु आहे प्रवास!

झकासराव's picture

19 Jun 2015 - 1:37 pm | झकासराव

अफाट, आणि भन्नाट :)

मोनू's picture

19 Jun 2015 - 1:38 pm | मोनू

तुमच्या साहसाचे कौतूक करावे तेव्हढे थोडेच...अत्यंत सुरेख वर्णन केलेय...आपणही त्या भागात प्रवास करतोय असे वाटतेय वाचताना..कॅप्टन म्हणाले त्याप्रमाणे पुढील कट्ट्याला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. तुमच्या पुढील प्रत्येक प्रवासाला अनेक अनेक शुभेच्छा ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

मोनू's picture

19 Jun 2015 - 1:40 pm | मोनू

फोटो पण खूपच सुंदर.

कपिलमुनी's picture

19 Jun 2015 - 3:14 pm | कपिलमुनी

सायकलिंग अनेक अर्थांनी कसोटी क्रिकेट सारखं आहे

एकदम परफेक्ट !

अशा भागात सोलो सायकलींग करायचा धाडसच आहे. कारण मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचा घोळ झाला तर फार अवघड ! रात्री सयकलीग सुद्धा अवघड आणि पंक्चर ई झाला तर पंचाइत !
पण रिस्क आहे तर थ्रिल आहे.

सानिकास्वप्निल's picture

19 Jun 2015 - 4:09 pm | सानिकास्वप्निल

आज दोन्ही भाग वाचुन काढले.
अद्भुत!! भन्नाट !!
लेखनशैली आवडली, पुभाप्र.

नया है वह's picture

19 Jun 2015 - 6:33 pm | नया है वह

__/\__

बोका-ए-आझम's picture

19 Jun 2015 - 7:48 pm | बोका-ए-आझम

अशा अनुभवांपुढे शब्द तोकडे पडतात. अप्रतिम!

चैत्रबन's picture

19 Jun 2015 - 9:22 pm | चैत्रबन

शब्द सुचत नाहीत.. तुम्हाला सलाम..

जगप्रवासी's picture

20 Jun 2015 - 2:31 pm | जगप्रवासी

अप्रतिम लेख

जुइ's picture

21 Jun 2015 - 5:44 am | जुइ

सिंधू नदीचे दर्शन अदभुत!

अद्भुत आणि प्रेरणादायक …. __/\__

खूप धाडसी आणि भाग्यवानही आहात.
शतशः प्रणाम!

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2015 - 4:01 pm | स्वाती दिनेश

हा भागही फार आवडला, फोटोही छानच!
सिंधू नदीचे दर्शन आवडले.
स्वाती

बदामची राणी's picture

23 Jun 2015 - 2:01 pm | बदामची राणी

निव्वळ अप्रतिम! ओघवती लेखन शैली आणि जोडीला सुरेख फोटो. स्वत: तिथे असल्याचा अनुभव देताय वाचकाला.

बदामची राणी's picture

23 Jun 2015 - 2:01 pm | बदामची राणी

निव्वळ अप्रतिम! ओघवती लेखन शैली आणि जोडीला सुरेख फोटो. स्वत: तिथे असल्याचा अनुभव देताय वाचकाला.