|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jun 2015 - 2:54 pm

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

हंऽऽ कुठेपर्यंत बरे आलो होतो आपण ? श्री जोशी यांना एक हकिकत ऐकण्यास मिळाली.

‘‘सुमारे वीस वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे १९०० साली, काही मराठे उंट घेऊन या मैदानात उतरले. हे लोक दिवसा झोपा काढीत व रात्री तंबूत खणत असत. सात आठ दिवस ते खणत होते. एका दिवशी ते अचानक निघून गेले. सकाळी गुरे चारण्यासाठी जी गुराखी मुले त्या मैदानात गेली त्यांना तेथे अनेक खड्डे दिसले. मुख्य म्हणजे थोड्या बाजूला त्यांना काही चांदीची नाणी सापडली. हे पाहिल्यावर त्या गावकऱ्यांनीही तेथे बरेच खोदकाम केले पण दुर्दैवाने त्यांना काही सापडले नाही''

किंवा ते तरी तसे सांगतात.

श्री. जोशी त्या गावकऱ्यांना घेऊन संध्याकाळी त्या मैदानात गेले त्यावेळेस त्यांना ज्या काही हकिकती ऐकण्यास मिळाल्या त्या अशा :
"भाऊंच्या सैन्याचे सगळ्यात जास्त पिण्याचे पाणी संपल्यामुळे झाले. एका चांदीच्या शिक्क्याला एक पेला पाणी व एका सोन्याच्या नाण्याला एक रोटी असा भाव सुरु झाला.
भाऊने व त्याच्या सरदारांनी बरेच द्रव्य उत्तरेत आणले होते. माघार घेताता पुक्कळ लुटालुट झाली व स्थानिक लोकांपैकी काही अचानक श्रीमंत झाले. अचानक कोणी श्रीमंत झालेला दिसला की अजूनही लोक त्याला ‘‘भाउका बन्या‘‘ असे चेष्टेने हाका मारतात. जोशी म्हणतात, खुबडू व सफीदम या दोन गावातील जाट मंडळी ‘‘भाऊका बन्या’’ आहेत. आता हे तपासणे अवघड आहे कारण फाळणीनंतर जवळजवळ सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानात जावे लागले. ती संपत्तीही तिकडे गेली असणार.''

एक प्रवाद असाही आहे की भाऊ युद्धात मारला गेला नाही. तो महाराष्ट्रात परत जायचे नाही म्हणून हरियानातच ओसर नावाच्या गावात सन्यासी म्हणून राहिला. मी हिंडताना अशी एक दंतकथा ऐकली होती की रोहटक जिल्ह्यात सांघी येथे भाऊ सन्यासी हो़ऊन राहिला होता. त्या जागेला भाऊकी कुटी असे म्हणतात व ती जागा अजूनही त्याच नावाने ओळखली जाते. पानिपतच्या युद्धानंतर आपल्याला माहितच आहे की मराठ्यांनी नजिबखानाचा चांगलाच सूड घेतला. असे म्हणतात दिल्लीतील नजिबखानाची अवाढव्य हवेली शिंद्यांनी जाळली. काही भाग जळाला नाही म्हणून खणून काढला व शेवटी त्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. एवढेच नाही तर नजिबखानाच्या घराण्यातील लहान बालकापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ठार मारले. असे म्हणतात नजिबखानाचा एकही वंशज उरला नाही. त्याचा मराठ्यांनी निर्वंश केला. सांगायची गोष्ट म्हणजे यातील एक तुकडी सांघी लुटण्यासाठी गेली असता गावकरी त्या संन्याशाकडे विचार विनिमय करण्यासाठी गेले. त्या संन्याशाने जो कोणी मराठा सरदार प्रथम ये़ईल त्याला त्याच्याकडे घेऊन येण्यास सांगितले. असे म्हणतात की तो सरदार त्या संन्याशाला भेटला व ते मराठा सैन्य तेथून निघून गेले. त्यावरुन ही दंतकथा तयार झाली असावी. मला वाटते ते भाऊ नसावेत पण हकिकत खरी मानली तर एखादा तालेवार मराठा सरदार असावा.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाऊची पत्नी व त्याच्या पुतण्याने पानिपतवर चाळीस वर्षे राज्य केले हे त्या गावकऱ्यांना मान्य होते.

सुरुवातीला सुरजमलजाट भाऊंबरोबर दिल्लीच्या लढाईत होता. त्यावेळी भाऊंनी जुम्मा मशिद व लाल किल्ल्यावर तोफेचा भडिमार केला त्यावेळी सुरजमल जाटाने तसे करु नका असे भाऊंना विनविले त्याबाबत श्री. जोशींना खालील गाणे ऐकण्यास मिळाले.....
सुरजमल भाऊ रायासे फिर करे जबाब।।
औलिया-याकूब अलीक्खॉं दोनो सरदार ।।
गाजुद्दीनखान वजीरने हिकमत बतलायी ।।
जुम्मा मसजिद को लिया घेर धर तोफ चढाई ।।
गोळा माऱ्या किलेमे कचेरी ढाई।।
अवलिया याकूब अलीखान दिल दहशत खाई ।।
भरोसे बादशाके यह जान समाई ।।
महाराज तुम लालकिला अपना करो जान बचाई ।।
सर्त नमक करचुके हम बंदे बादशाही ।।

उग्राखेडीपासून कालाआंब अग्दी जवळ आहे. उग्राखेडे म्हणजे आपल्या येथील मिळिटरी अपशिंगे. घरटी एकदोन पुरुष सैन्यात असतातच. श्री. जोशींना येथे एक बराच मोठा खंदक दिसला. तोफेचे गोळे लागू नयेत म्हणून मराठ्यांचा बाजार या खंदकात भरत असे असे त्यांना सांगण्यात आले. शक्य आहे. पहिल्या महायुद्धात असे खंदक अस्तित्वात होते. उग्राखेडी गावात श्री. जोशींनी अजून एक गंमत पाहिली ती म्हणजे त्या भागात पुष्कळ विहीरी होत्या व प्रत्येक विहिरीजवळ एक दमदमा उभा केला होता. तोफेच्या भयंकर आवाजाने कान फुटू नये म्हणून तोफेला बत्ती दिल्यावर गोलंदाज या पाण्यात उडी मारत असे.

श्री. जोशी ज्या काळात तेथे गेले होते त्या काळात शेत नांगरताना अनेक गोष्टी सापडत. मी जेव्हा त्या भागात हिंडत होतो (याच ठिकाणी का दुसरीकडे ते आता नीट आठवत नाही) तेव्हाही शेतकऱ्यांना एक ढाल सापडली असे कळले होते.

श्री जोशींना तेथे अजून एक महत्वाची आसामी भेटली आणि ती म्हणजे तेजासिंग. त्यांचे १९३० साली वय ९२ वर्षाचे होते व त्यांनी १८५७ सालचे युद्ध स्वत: पाहिले होते. अर्थात तेव्हा ते लहान होते.या माणसाच्या मते भाऊंनी पुण्याहून निघताना बावीस कोट रुपयांचा खजिना आपल्या बरोबर घेतले होता व २००० घोड्याचा खरारा करणारे साईस. शिवाय त्यांच्या माहितीप्रमाणे भाऊंनी त्याच भागातील १००० स्त्रिया रोटी/चपात्या/भाकऱ्या करण्यासाठी भरती केल्या होत्या. याच ठिकाणी श्री जोशींना या लोकांच्या हव्यासाचा अनुभव आला.... तो त्यांच्याच शब्दात....

‘‘तेजासिंग व इतरांनी मला अजून दोनचार दिवस राहण्याचा आग्रह केला. माझ्याजवळ नकाशे, चोपड्या, कागद, पुस्तके इत्यादि सामान असलेले गावकऱ्यांनी पाहिलेले होते. शिवाय बोलण्यातून मी पुण्याचा आहे हेही त्यांना कळले होते. तेव्हा मी काही कागदपत्रे घेऊन भाऊंचा खजिना शोधत हिंडतोय अशी त्यांनी स्वत:ची कल्पना करुन घेतली होती. ते ऐकून गावकऱ्याच्या तोंडाल पाणी सुटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी तुम्ही आम्हाला जागा सांगा आम्ही खणू. मिळालेला खजिना अर्धा अर्धा वाटून घेऊ असा प्रस्ताव मांडला. असेल आपल्या नशिबात तर मिळेल काहीतरी. फक्त सरकारची या भागावर नजर असल्यामुळे हा उद्योग रात्री करावा लागेल. हिंडण्याचा माझा उद्देश सांगितल्यावर त्यांनी अत्यंत उदास होत माझा निरोप घेतला व मी कालाआंबला रवाना झालो.’’

श्री जोशींनी कालाआंबची खालील माहिती गोळा केली....
हे झाड काळसर हिरव्ख़ रंगाच्या पानाचे होते. याचा विस्तार इतका मोठा होता की त्याखाली सहाशे ते सातशे गुरे आरामात दुपारी सावलीत विश्रांतीसाठी बसत. या झाडाभोवती इतरही अनेक झाडे होती त्यामुळी ही जागा एखाद्या बागेप्रमाणे भासत असे. असे म्हणतात हे झाड लोकांनी मोहरांच्या लोभाने जाळले. त्याचे जे लाकूड उरले त्याची किंमत त्याकाळी पासष्ट रुपये आली असे म्हणतात.

कालाआंबला भाऊसाहेबाची मुख्य कचेरी होती. असाही एक प्रवाद आहे तो म्हणजे येथे इतका रक्तपात झाला की रक्ताने ते झाड माखले व रक्त वाळल्यावर ते काळे पडले. खरे खोटे देव जाणे. अर्थात झाडाच्या खालच्या फांद्यांबाबत हे शक्य आहे व त्यावरुन हा प्रवाद तयार झाला असावा. याच ठिकाणी १९०८ साली पंजाब सरकारने एक स्मारक उभे केले. त्याच्या आत्ताचे स्वरुप आपण तेथे जाऊन बघू शकता. चांगले ठेवले आहे. मी गेलो होतो तेव्हा मी त्यांना पानिपत संदर्भात काही चित्रे भेट देउ का असे विचारल्यावर तेथे असणाऱ्या माणसाने मला पुण्यातून काही मंडळींनी ते काम शिरावर घेतले आहे असे सांगितले. ते पूर्ण झाले आहे की नाही याची कल्पना नाही.

काळाआंबच्या अवती भोवती असणाऱ्या गावातून बऱ्याच भुताखेताच्या गोष्टी प्रचलित आहेत. बऱ्याच गोष्टींमधे घोडेस्वार, मराठा स्वार या आकृत्या असतात. साहजिकच आहे.

श्री जोशींनी अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे ते गेले होते त्याच्या वीस वर्षापूर्वी धनसोली येथे एक ढाल जमीन खणताना सापडली. ढालीच्या आत एका कप्प्यात एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी त्या जाटाने पानिपतच्या तहशील कचेरीत नेऊन दिली. ती त्याने कर्नाल व तेथून ती लाहोरला पाठविण्यात आली. ती मराठीत असल्यामुळे ती परत मुंबईस पाठविण्यात आली. त्यातील मराठी (मोडी) मजकूर होता ‘‘मोहरांनी भरलेल्या काही थैल्या एका विहिरीत टाकून आम्ही दक्षिणेस जात आहोत’’ त्या नंतर धनसोलीच्या आसपास असलेल्या सर्व विहीरी उपसण्यात आल्या पण काही सापडले नाही.

श्री जोशींनी पानिपत व मराठ्यांमुळे तयार झालेल्या त्या प्रांतातील काही म्हणीही लिहिल्या आहेत..
भाऊका बन्या....... आपण पाहिलीच.
क्या भाऊकी लुट है क्या...... म्हणजे आयती झालेली लुट जशी माघार घेताना झालेली मराठ्यांची लुटमार...
क्या भाऊका घोडा लगा है क्या?............. भाऊंजवळ एक फार उत्तम जातिवंत घोडा होता. या घोड्याचे वैषिष्ट्य होते त्याची झेप.... त्यामुळे कोणत्याही जनावराचे किंमत करताना जर जास्त किंमत वाटली तर ही म्हण वापरत असावेत.
भाऊका प्रताप......... सुवाखेडी भागात कोणी बाहेरचा पेहेलवान कुस्ती करण्यास आला तर तो कधीही विजयी होत नाही..... कारण त्याला भाऊंचा आशिर्वाद असतो म्हणतात...

जोगींनी भाऊच्या पराक्रमाचे पोवाडे गाईले. ते आता मला नाही वाटत परत ऐकण्यास मिळतील. पण त्यातील काही दोहे श्री जोशींमुळे आपणास वाचण्यास मिळतात हे आपले भाग्य्.....
भाऊ ऊठदरबारसे माताके पास आया ।।
माता बोली प्यारसे भाऊ पास बिठाया ।।
तेंकरी तयारी हिंदकी क्या भूल्या तहकाया ।।
तूं क्या शासे लढेगा मनमे गर्वाया ।।
बडे राव पटेल का शिर तोड भगाया ।।
शुक्रताल पे भुरटिया ढुंढा न पाया ।।
बेटा दखिन बैठ करो राज मेरी बहुतही माया ।।

अर्थ : श्री जोशींनी दिलेला.
भाऊ दरबारातोन मातेच्या जवळ आला. मातेने त्यास मोठ्या प्रेमाने जवळ बसविले व म्हणाली, ‘‘ तू हिंदुस्थानात जाण्याची तयारी चालविली आहेस. अहमदशाहचा पराभव करेन असा गर्व तुला चढला आहे. तो सोडून दे ! अहमदशहा पराक्रमी आहे बघ. त्याने शुक्रताल यथे दत्ताजिचा पराभव करुन त्याचे शीर धडावेगळे केले.’’
यात बरीच गडबड आहे पण आपण ते सोडून देऊ....शेवटी जाटांनी केलेले काव्य आहे ते....

भाऊ उत्तर देतो....
भाऊ मातासे कहे एक अर्ज सुनावे ।।
कहे कहाणी बावरी क्यो हमे डरावे ।।
मेरा नवलख नेज्या दखनी कोण सामने आवे ।।
सुयेंके सुनके मसकले जस सावर गावे ।।
अटक नदी मेरी पाएगा घोडोंको जलप्यावे ।।
तोफ कडकडे खुणे देश गणियर जर्जावे।।
दखन तो सोई आवेंगे जिन्होने हरलावे।।

अर्थ : हे माते माझी एक विनंती ऐक्. का मला घाबरवतेस ? माझा नवलाखा हार कोण हिसकावून घेऊ शकतो ?-हे बरोबर असेल असा दावा नाही (पुढच्या ओळीचा अर्थ कळत नाही.) मी माझ्या घोड्यांना अटकेचे पाणी पाजीन. माझ्या तोफांच्या गडगडाटाने सर्व राजे शरण येतील. आम्ही परत तर येऊच पण शत्रूला हरवूनच येऊ.......

सदाशीवराव भाऊ आपल्या पत्नीस भेटण्यासाठी जेव्हा तिच्या महालात गेले तेव्हाचे वर्णन एका गीतात केलेले श्री जोशींना आढळते....
महेलोंके अंदर बोलती भाऊकी रानी।।
ऋतुवंती जोबन भरी ना समा पछाणी ।।
जैसा स्वप्न रण का ऐसिही जिनगानी ।।
बुरके पैरों लढे नार मै सुन्या पठाणी ।।
हुकूम हो तो चलूंसाथ सुखसे रहेंगे प्राणी ।।
अहमदशाके दलोमें चल घेरलू घाणी ।।
होनहार सो होंगी जो करेंगे कृष्ण मुरारी ।।

अर्थ : श्री जोशींनी लावलेला....
तारुण्याच्या भरात असलेली भाऊची राणी महालातून म्हणते, ‘रणाचे स्वप्न आणि आयुष्यात काय फरक आहे ? मी ऐकले आहे की पठाणांच्या स्त्रिया पायात काहीही न घालता युद्ध करतात. हे खरे असेल तर मला हुकूम द्यावा मी अहमदशाह्च्या गोटात घुसून त्याचे शक्य तितके नुकसान करेन. या उपर कृष्णाची इच्छा !

चंबळ नदी पार केल्यावर जनकोजी शिंदे सदाशिवराव भाऊंना मथुरेजवळ भेटले. त्यावेळेस दोघांमधे जे संभाषण झाले ते खालील दोह्यात दिले आहे....
फौजा चंबळ उतरके आयी पार दिलसेन ।।
भाऊसे जनका मिल्या ब्रिज के हेर।।
जनका रोया हायजार कैसे निसगूं गेर।।
कहता भाऊ पेशवा दिल रखो समशेर।।
मारुं खान नजीबने दिल्लीने घेर ।।

अर्थ : चंबळ नदी पार केल्यावर मथुरेस फौजा आल्या. त्यावेळी जनकोजी भाऊंना भेटण्यासा आला. त्यावेळी त्याचे वय फार नसावे. त्यावेळी जनकोजीच्या डोळ्यातून पाणी आले तेव्हा भाऊ म्हणाले, ‘घाबरु नकोस, तुझ्यासाठीच ही तलवार मी हाती धरली आहे दिल्लीजवळ नजिबला गाठून ठार करु. भिऊ नको धीर धर.
या काव्याला काय अर्थ आहे कोणास ठाऊक कारण जनकोजी स्वत: फार शूर होता पण भाऊ अनुभवाने व वयाने मोठे होते म्हणून हा दोहा रचला गेला असावा.

हरियाना व त्याजवळील प्रांतात सध्या जी घोड्याची अवलाद आहे ती सर्व दख्खनच्या घोड्यांची आहे असे त्या प्रांतात समजले जाते. हे मात्र शक्य आहे कारण मराठ्यांचे बरेच घोडे शेवटी तेथे बेवारस झाले.

आता जोशी साहेब कुंजपुऱ्याला जाणार आहेत. तेथे त्यांनी काय पाहिले ते पुढच्या भागात......
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
ता. क. सहा तारखेला कृष्णधवल छायाचित्रांच्या स्पर्धेचा निकाल लावायचा असल्यामुळे आता त्यानंतर लिहेन.....

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - ३

इतिहासलेख

प्रतिक्रिया

जबरदस्त रोचक ईतीहास समजतोय. त्यावेळची परीस्थीती नजरेसमोर येतेय.
खूप छान चालू आहे मालीका...

काय सुंदर लिहिलेले आहे... ज्याने हे पुस्तक तुम्हाला दिले त्याला सलाम.. ज्याने हे लिहिले त्यांना ही सलाम...

अवांतर :

कृष्णधवल छायाचित्रे.. ओह निकाल पण आला काय.. मला तेथे चित्र द्यायचे होते.. पण नेट वर न टाकल्याने राहिले.. अरे रे ...

बबन ताम्बे's picture

5 Jun 2015 - 3:31 pm | बबन ताम्बे

विश्वासराव पाटलांनी पण "पानीपत" मधे प्रस्तावनेत लिहीलेय की भाऊसाहेब पेशव्यांना महाराष्ट्राने वेडा, खलनायक ठरविले, पण पानीपत आणि आसपासच्या गावांमधे त्यांचे पोवाडे गायीले जातात.
खूप सुंदर मालिका. पुढील भाग लवकर येऊ द्या.

मित्रहो's picture

5 Jun 2015 - 4:19 pm | मित्रहो

रोचक इतिहास वाचायला मिळतोय.

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 4:49 pm | मुक्त विहारि

अतिशय रोचक लेखमाला.

पुभाप्र

मूकवाचक's picture

11 Jun 2015 - 6:04 pm | मूकवाचक

+१

झकासराव's picture

5 Jun 2015 - 5:00 pm | झकासराव

सुरेख लेखमाला.
:)

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 8:13 pm | श्रीरंग_जोशी

ही लेखमालिका म्हणजे इतिहासाची आवड असणार्‍यांसाठी पर्वणी आहे.

एक एकटा एकटाच's picture

5 Jun 2015 - 9:16 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहे.

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

जयंतराव आपले लिखाण खरच वाचनिय आणि माहितीत भर टाकणारे असते. खुपच छान, आभार...

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jun 2015 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2015 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

फार दुर्लक्षित असलेला भारतिय इतिहासाचा कालखंड या लेखमालेतून उलगडला जातोय. त्यातच तुमचे लेख नेहमीसारखेच प्रावाही आणि रोचक आहे !

पुभाप्र.

पैसा's picture

6 Jun 2015 - 7:48 am | पैसा

काळोखात गेलेला इतिहास छान उलगडून सांगताय! मस्त!

प्रचेतस's picture

6 Jun 2015 - 10:08 am | प्रचेतस

दोन्ही भाग एकदमच वाचले. ओघवती लेखनशैली आणि नेहमीच्या माहितीव्यतिरिक्त अगदी वेगळी माहिती.

एस's picture

6 Jun 2015 - 12:53 pm | एस

रोचक.

सिध्दार्थ's picture

6 Jun 2015 - 3:45 pm | सिध्दार्थ

लेख माले मुळे इतिहास नव्याने उलगडला गेला. ह्या अमुल्य माहिती साठी धन्यवाद. पुढील भागाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2015 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर. वाचतोय. इतिहासातील नवीन माहिती मिळतेय.
पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

6 Jun 2015 - 7:26 pm | तिमा

दुसरा भाग आधी उघडला कारण पहिल्या भागाची लिंक मिळेल म्हणून! पण लेखन इतके आकर्षक आहे की दुसराच भाग आधी वाचून काढला. मग पहिला वाचला. बिकांच्या स्टार्टर नंतर तुमच्या लेखमालेची मेजवानी.

अन्या दातार's picture

8 Jun 2015 - 11:51 am | अन्या दातार

बिकांच्या पानिपतस्वारीचा असाही फायदा. वाचकांना भारीच मेजवानी मिळतेय. धन्स बिका अँड जयंत सर :)

मालोजीराव's picture

10 Jun 2015 - 7:03 pm | मालोजीराव

जबरीच आणि नवीन माहिती … बुराडी घाट च्या लढाईत आमचे दोन पूर्वज सरदार यशवंतराव आणि पिराजीराव जगदाळे हि पडले होते.

अदि's picture

10 Jun 2015 - 8:50 pm | अदि

मालिका!!!!

वॉल्टर व्हाईट's picture

11 Jun 2015 - 1:01 am | वॉल्टर व्हाईट

पुढिल भागाची वाट बघतोय.

प्रीत-मोहर's picture

11 Jun 2015 - 8:48 am | प्रीत-मोहर

सह्ही

किसन शिंदे's picture

11 Jun 2015 - 9:44 am | किसन शिंदे

मस्त मालिका!

दोन्ही भाग एकदमच वाचले. पानिपताबद्दल नवीन माहीती वाचायला मिळतेय. ओघवत्या शैलीमुळे वाचायला मजा येतेय.

मोहनराव's picture

11 Jun 2015 - 4:47 pm | मोहनराव

वाचतोय! तुमची लेखमालीका म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच!

अतिशय सुरेख लेखमाला.इतिहास आवडतोच.छान उलगडु न लिहिताय.