गोष्ट तशी जुनी.... म्हणजे तितकीही जुनी नाही.... पण तरीही आजच्या मानाने जुनीच! पूर्वी - म्हणजे फेसबुक अस्तित्वातही नव्हतं तेव्हा.... आयफोन, आयपॅड सोडाच - आयपॉडही नव्हता. विकिपीडिया, यूट्यूब, ट्विटर... काही काही नव्हतं. माणसं चालताना समोर बघत चालायची. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नसायचा. २४ X ७ न्यूज चॅनल्सचं पेव नव्हतं फुटलेलं... सास बहू सीरियल्सना कोणी सीरियसली घ्यायचं नाही त्यामुळे टीव्ही पण कमीच पाहिला जायचा. इंटरनेटच धड नव्हतं तिथं कसलं ई-कॉमर्स अन कसलं क्लाउड कम्प्यूटिंग!
तर सांगायची गोष्ट. आजच्या पेक्षा फारच वेगळा काळ होता. तेव्हाचे फलंदाज सोट्यासारख्या बॅटस घेऊन बेमुर्वतखोरपणे मिडऑनकडे पट्टे फिरवून थर्डमॅनला षटकार मारायचे नाहीत. फास्ट बोलरला पुढे येऊन भिरकावणे ही एका हाताच्या बोटांवर मोजता येणार्या धुरंधरांच्याच कुवतीतली गोष्ट होती. तेव्हा आजच्यासारखा षटकार चौकारांचा पाऊस पडायचा नाही. चिअरगर्ल्स टिचभर कपडे घालून नाचायच्या नाहीत. पहिली बॅटिंग करताना २५०-२६० धावा काढल्या की सामना खिशात टाकल्यात जमा असे. "आस्किंग रेट" सहाच्या वर गेला की बघणार्यांचंही ब्लडप्रेशर वाढायचं. वनडेमध्ये १८ शतकं ठोकणार्या डेस्मण्ड हेन्सचं रेकॉर्ड कोणी इतक्यात मोडेल असं वाटायचं नाही. अश्या काळात अरबस्तानात घडलेली तिथल्याच अनेक "सुरस व चमत्कारिक" गोष्टींसारखीच ही एक गोष्ट.
आजचाच दिवस. दिनांक २२ एप्रिल १९९८. स्थळः शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा, संयुक्त अरब अमिराती. भारत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्यांच्यात कोकाकोला ट्रॉफीसाठी तिरंगी लढत चालू होती. क्रिकेटच्या प्राचीन परंपरेप्रमाणे ऑस्ट्रेलिया आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांवर एकेक विजय मिळवला होता आणि म्हणून भारत वि. ऑस्ट्रेलिया हा शेवटचा साखळी सामना एका प्रकारे उपांत्य सामना होता. अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला सामना जिंकणं अथवा किमान न्यूझीलंडच्या धावगतीपेक्षा सरस धावगती राखंणं क्रमप्राप्त होतं.
त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मार्क वॉच्या ८१ आणि मायकेल बेव्हनच्या १०१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८४ धावांचा तेव्हाच्या हिशेबात डोंगर उभा केला. इतर वेळी अश्या परिस्थितीत भारतीय क्रिकेटशौकिनांनी टीव्ही बंद करून आपापल्या कामांना लागावं अशी खरंतर रीत होती. पण आता मात्र गोष्ट वेगळी होती. १९९६ च्या विश्वचषकापासून सचिन तेंडुलकर नावाचं वाद़ळ क्रिकेटविश्वात थैमान घालत होतं. तसा हा इसम ९४ मध्ये ओपनिंगला यायला लागल्यापासूनच दंगा करायला लागला होता. पण ९६-२००० हा निर्विवादपणे त्याच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ होता. हा माणूस जगभरच्या गोलंदाजांना डोईजड होऊन बसला होता. नुकत्याच संपलेल्या एका कसोटी मालिकेत त्यानी कहर कहर मांडला होता. आणि म्हणूनच लोकं अजूनही टीव्हीसमोर बसली होती. बाकीच्या फलंदाजांबद्दल सांगायचं तर गांगुली लक्ष्मण तेव्हा नवीन होते. अझर, अजय जडेजा, नयन मोंगिया कधी कसे खेळतील ह्याचा फार थोड्या लोकांना अंदाज असायचा. थोडक्यात काय तर "जबतक तेरे पैर चलेंगे इसकी सांसें चलेगी" प्रमाणे "जबतक सचिन खेलेगा इंडियाकी उम्मीद चलेगी" म्हणण्याची स्थिती!
२८५ धावांचा पाठलाग करताना सचिन - गांगुली जोडीने सावध सुरुवात केली. ३१ व्या षटकानंतर एक जोरदार वादळ आलं तेव्हा भारताचा स्कोर होता ४ बाद १४३. म्हणजे जिंकण्यासाठी १९ षटकांत १४२ आणि अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायला १११ धावा हव्या होत्या. ४५ मिनिटांनंतर खेळ पुन्हा चालू झाला आणि त्यावेळच्या नियमांप्रमाणे जिंकण्यासाठी ४६ षटकांत २७६ तर पात्रतेसाठी २३७ धावांचं लक्ष्य दिलं गेलं. म्हणजे पुढच्या १५ षटकांत जिंकायला १३३ तर पात्र ठरायला ९४ धावा हव्या होत्या.
......आणि खर्या अर्थानी सुरु झालं "ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म". ६४ धावांवर नाबाद असलेला सचिन आता खुलायला लागला. कास्प्रोविचच्या पहिल्याच षटकाचा शेवटचा चेंडू शिस्तीत साइटस्क्रीनवर पोचवण्यात आला. मग पाचवा गोलंदाज स्टीव्ह वॉला हेरून सचिनने त्याच्यावर नियंत्रित हल्ला केला. कधी पुढे सरसावत तर कधी क्रीजमध्ये खोल आत राहून त्यानी वॉला आपला टप्पा बदलायला भाग पाडलं आणि मोक्याच्या क्षणी धावा वसूल केल्या. समोर लक्ष्मण मोलाची साथ देत होता. पण ऑस्ट्रेलिया टिच्चून गोलंदाजी करत होते. मार्क वॉ, बेव्हन, पॉन्टिंग, मार्टिन जीव तोडून फील्डिंग करत होते. पण सचिनसुद्धा जिवाच्या आकांताने धावून १-२ धावा जोडत होता. फ्लेमिंग, कास्प्रोविच, वॉर्न... कोणीच काही करू शकलं नाही. कुठल्याही प्रकारचा घणाघाती हल्ला वगैरे न चढवता सचिननी लक्ष्मणच्या साथीत २० चेंडू बाकी असताना भारताला अंतिम फेरीत पोचवलं. And the rest, as they say, is history.
अशी काय खेळी होती ही डेझर्ट स्टॉर्म? काही धडकी भरवणारी फटकेबाजी वगैरे होती का? नाही. सचिननी ऑस्ट्रेलियन बोलिंगच्या चिंधड्या उडवल्या का? नाही. काही अचाट फटके मारले का? नाही. पण डेझर्ट स्टॉर्मनंतर एका भन्नाट फलंदाजाचा एक परिपूर्ण आणि खर्या अर्थानी चॅम्पियन खेळाडू झाला. A boy became a man. जणू एक आश्वासक फलंदाज म्हणून गांगुलीबरोबर ओपनिंगला गेलेला सचिन फ्लेमिंगकरवी बाद झाल्यावर परत आला त्तो एक प्रगल्भ आणि परिपूर्ण खेळाडू होऊन. चार दोन हिट सिनेमे देऊन हिरोगिरी करणं वेगळं आणि महानायक होणं वेगळं. सचिनच्या भारतीय क्रिकेटचा महानायक होण्याची ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म ही सुरुवात होती. २४ वर्षाच्या तरुण वयात सचिनने दाखवलेला संयम अचाट होता. नुसत्या फॉर्मच्या भरवश्यावर देमार हाणामारी न करता हा माणूस थंड डोक्याने आपलं काम करू शकतो हे ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मने दाखवलं. यशस्वी होण्यासाठी प्रसंगी आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालण्याचीही तयारी सचिनने दाखवली. ह्या खेळीत त्याने बोलरचा तेजोभंग करण्याचा माज नाही दाखवला (तो दाखवला फायनलमध्ये) तर अतिशय शिस्तबद्ध रितीने प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात करून, त्यांचा प्रत्येक डावपेच हाणून पाडून सचिनने केवळ एकहाती भारताला अंतिम फेरीत नेलं.
डेझर्ट स्टॉर्मनंतर क्रिकेटविश्वानी जोखलं की हा नुसता घणाघाती फलंदाज नाही. हे पाणी आधी वाटलं होतं त्याहीपेक्षा खूप गहिरं आहे. सचिनचा ग्रेट फलंदाज ते ऑल टाईम ग्रेट फलंदाज हा प्रवास सुरू झाला तो ह्या खेळी नंतर. ती खेळी बघताना सुरुवातीला आरडाओरडा करणारे आम्ही शेवटी शेवटी केवळ स्तिमित होऊन पाहात होतो. असाही कोणी फलंदाजी खेळू शकतो? फलंदाजी इतकी परिपक्व आणि परिपूर्ण असू शकते? डेझर्ट स्टॉर्मनंतर क्रिकेट अजून श्रीमंत झालं. ऑफस्टंपबाहेरचा चेंडू फाइनलेगला इतक्या तंत्रशुद्धपणे आणि प्रेक्षणीयरित्या मारता येतो हे क्रिकेटला तेव्हा उमगलं. फ्लॅट बॅट मारलेला कव्हर ड्राईव्ह इतका सुंदर दिसू शकतो हे तेव्हा कळालं. आणि असे फटके मारता येत असताना सुद्धा फलंदाज जीव तोडून धावतोय हे सुद्धा पहिल्यांदाच दिसलं. फलंदाजीच्या कलेला नवा आयाम मिळाला. आज १७ वर्षांनंतर सुद्धा ते खेळी डोळ्यांसमोरून हालत नाही ती यासाठी की त्यादिवशी आमच्या सच्यानी क्रिकेटचा नवा ब्रॅडमन होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं होतं.
सर्व छायाचित्र आणि व्हिडियो आंतरजालावरून साभार
संदर्भः https://www.youtube.com/watch?v=yGRrBXv6hnU
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65773.html
प्रतिक्रिया
23 Apr 2015 - 3:21 am | श्रीरंग_जोशी
एका अजरामर खेळीवर एक ताकदीचा लेख.
त्या काळात मी ११वीतून १२वीत गेलो होतो. या स्पर्धेपूर्वी ऐन एप्रिलच्या उन्हात भारतात भारत - ऑस्ट्रेलिया - झिम्बाब्वे अशी तिरंगी मालिका झाली होती (पांढर्या कपड्यांत खेळली गेलेली भारतातली कदाचित शेवटची एकदिवसिय मालिका असावी). १९९७ साल भारतीय संघाला (सचिनच्या नेतृत्वात) खूपच वाईट गेलं होतं. बहुधा कॅनडातली भारत पाकीस्तान मैत्री मालिका ४-१ ने जिंकणे वगळता भारताचा आलेख वाईटच होता.
जानेवारी ९८ पासून कर्णधारपद पुन्हा अझहरकडे गेलं अन संघाने कात टाकली. ढाक्यात पाकविरुद्धचा (३रा) अंतिम सामना) ऋषिकेश कानिटकरने सामन्याच्या शेवटून दुसर्या (तोही सकलेनच्या) चेंडूवर मारून जिंकवला होता.
नंतर ऑस्ट्रेलियाबरोबरची कसोटी मालिका झाल्यावर १ एप्रिलला (हनुमानजयंतीच्या दिवशी सामन्याच्या लंच ब्रेक दरम्यान मी घराजवळच्या मारुती मंदिरातून छान पत्रावळीवरचे जेवण जेवून आलो होतो.) अजित आगरकर नावाच्या नव्या गोलंदाजाला द्रुतगती (हो हो मध्यम-द्रुतगती ;-) गोलंदाजी करताना पाहून आश्चर्याचा धक्का बसला. मराठमोळं आडनाव असलेला खेळाडू (त्या काळात निलेश कुलकर्णी अन कानिटकर) टाकून टाकून फिरकी गोलंदाजी टाकणार असा तोवरचा समज.
त्या सामन्यात सचिनने ऑसिजच्या ५ विकेट्स काढल्या. एखाद्या कसलेल्या फिरकी गोलंदाजाप्रमाणे उजवी व डावी फिरकी त्याने टाकली होती. त्या मालिकेत जाडेजाने सलग पाच सामन्यांमध्ये अर्धशतक केले होते. अझहरनेही एका सामन्यात शतक केले होते. कानपूरच्या सामन्यात सचिनने वेगवान १०० काढले होते.
एवढे करून आपण ऑसिजबरोबर अंतिम सामना हरलो. अन लगेच शारजातली तिरंगी मालिका सुरू झाली. त्या काळात घरी केबल नसल्याने जमेल तसे शेजार्यांकडे जाऊन ते सामने पाहिले. सचिनची ही खेळी पूर्ण पाहता आली नव्हती :-(. माझ्या एका वर्गमित्राने जे वर्णन दुसर्या दिवशी सांगितले होते की मैदानात वादळ सुरू असतानाही पॅव्हेलियनमध्ये सचिनने डोक्यावरचे हेल्मेटही काढले नव्हते अन त्याच्या बरोबरचा नाबाद असलेला फलंदाज हेल्मेट पॅड्स वगैरे काढून हाश हुश करत होता.
अंतिम सामन्यात सुरुवातीलाच एका षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सचिनने ३ धावा काढूनही स्कोअरर्सनी २च धावा मोजल्याचे माझे निरिक्षण होते. पुढचा षटकात स्ट्राइकवर पुन्हा सचिन आला होता. या धाग्याच्या निमित्ताने बघुया इतर कुणाचे तसेच निरिक्षण होते का?
दोन दिवसांनंतर अंतिम सामना जिंकल्यावर सचिनने शतक वाढदिवसाची भेट म्हणून बायकोला अर्पण केलं होतं. या मालिकेअगोदर आपण शारजात फारच कमी वेळा अंतिम सामना जिंकलो होतो. या दोन सामन्यांनी भारतीय संघाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.
23 Apr 2015 - 8:12 am | सौन्दर्य
लेखाचे नाव वाचल्या वाचल्या वाटले इराक युद्धाविषयी काहीतरी वाचायला मिळणार पण त्याहूनही चित्तथरारक वाचायला मिळाले. श्रीरंग जोशींनी देखील चांगला प्रतिसाद दिला. दोन्ही लेख वाचताना पुन्हा एकदा त्या काळातून फिरून आल्यासारखे वाटले. दोन्ही लेख सुंदर.
23 Apr 2015 - 9:00 am | चिनार
डेझर्ट स्टॉर्म! हे खरच एक युद्ध होते !
अप्रतिम वर्णन !
23 Apr 2015 - 9:16 am | बेकार तरुण
मस्त लेख, आवडला
23 Apr 2015 - 10:11 am | प्रचेतस
जबराट
23 Apr 2015 - 10:55 am | बाबा पाटील
_/\_
23 Apr 2015 - 11:05 am | क्लिंटन
लेख आवडला. त्याकाळी मी क्रिकेट अगदी भक्तीभावाने बघत असे आणि हा सामना मी बघितलेल्या आणि कायमच्या आठवणीत असलेल्या सामन्यांपैकी एक नक्कीच आहे.
मला वाटते की या खेळीसाठी (बहुदा) व्हिडिओकॉनने सचिनला २० हजार पौंडांचे विशेष बक्षिस जाहीर केले होते.
24 Apr 2015 - 9:31 am | तुषार काळभोर
पण मालिकावीर म्हणून त्याला कार मिळाली होती अन् त्यात आख्खी इंडियन टीम बसून मैदानात फेरी मारत होती.
24 Apr 2015 - 12:16 pm | जे.पी.मॉर्गन
ते बक्षीस त्याला कोकाकोला कंपनीने दिलं होतं. Playing it my way मध्ये तेंडुलकर लिहितो की ते बक्षीस त्याने प्रथेप्रमाणे सर्व सहकार्यांबरोबर शेअर केलं.
जे.पी.
23 Apr 2015 - 11:13 am | मृत्युन्जय
अतिशय सुंदर लेख. अप्रतिम.
मी देखील हा सामना बघितलेला आहे. अंतिम सामन्यात तर सचिनने कचरा केला होता ऑस्ट्रेलियाचा. माझ्या मते तरी वरील (उपांत्या सामन्यातली) खेळी सचिनची सर्वोत्तम खेळी होती. त्या खालोखाल विश्वचषकातली पाकिस्तानविरुद्धची ९८ धावांची खेळी.
मला जे आठवते त्यानुसार उपांत्य सामना सचिनने जिथवर आणला होता तिथपासुन इतर फलंदाजांनी तो सामना जिंकवुन देणे सहज शक्य होते. पण नेहमीप्रमाणे इतरांनी नांग्या टाकल्या आणि आपण तो सामना हरलो. सचिनचे श्रेष्ठत्व तिथेच सिद्ध होते.
23 Apr 2015 - 11:23 am | क्लिंटन
+१००
23 Apr 2015 - 11:45 am | चिनार
सामना हरलो हे खरे असले तरी हे फार कमी लोकांना आठवते. कांगारुंनी सुद्धा विजय साजरा केला नसेल त्यादिवशी. कोण "जिंकलंय" हे त्यांना माहिती होतं !
24 Apr 2015 - 9:40 am | तुषार काळभोर
हा हा हा!!!
हे तर इतक्यावेळा झालंय..
१९९९ पाकिस्तान बरोबरची चेन्नई कसोटी- सचिन १३६ (पाठदुखी असूनही त्याने जवळ नेऊन पोचवलं होतं) भारत फक्त १२ धावंनी हरला होता.
२००९ ऑस्ट्रेलिया बरोबरचा एकदिवशीय सामना (हैदराबाद): सचिन १७५, भारत ३ धावांनी हरला.
इत्यादी.
इत्यादी..
इत्यादी...
.
.
.
.
24 Apr 2015 - 11:38 am | नाखु
पैलवान दादा..
त्याच्या ऐन भराच्या काळात त्यानेच सगळ्या धावा कराव्यात अश्या उदात्त हेतूने अगदी २००९ पर्यंत १५-२० धावा सुद्धा करण्याचे "महापाप" केले नाही आणि त्याच्यावरील तथाकथीत सभीक्षकांना एक नवा वाकप्रचार मिळाला.
"सच्या खेळला किंवा शतक केले की भारत हरतो+सच्या फक्त शतकासाठी खेळेतो सामना जिंकून देत नाही"
मूळ अवांतरः
लेख फक्कड मलाही शोएब फेम ९८ वाली खेळी कोण दर्जा आहे आणि कोण गमजा यासाठी जास्त आवडते.
निष्कलंक व्यक्ती म्हणूनही सच्याबद्दल आदर अस्लेला
पांढरपेशा नाखु
24 Apr 2015 - 1:49 pm | तुषार काळभोर
+१...
सचिन-राहुल-लक्ष्मण-कुंबळे
१००% निष्कलंक 'माणसं'!
23 Apr 2015 - 11:18 am | प्रभो
मस्त रे!!!
23 Apr 2015 - 8:57 pm | किसन शिंदे
अप्रतिम म्हणजे अप्रतिम वर्णन केलेय 'वादळ' आलेल्या त्या वादळी सामन्याचे! उपांत्य फेरीचा तो सामना आणि अंतिम फेरीचा सामना माझ्या स्मरणातून तरी कधीच जाणार नाही.
23 Apr 2015 - 10:09 pm | सुहास झेले
बाब्बो... अजूनही आठवतो तो सामना... लगेहाथ क्रीडायुद्धस्य मालिका होऊन जाऊ देत...धम्माल येईल :) :)
23 Apr 2015 - 11:54 pm | यशोधरा
जबराट.
24 Apr 2015 - 8:24 am | मुक्त विहारि
माझी नेमकी सेकंड शिफ्ट असल्याने , हे दोन्ही सामने मिस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स झाले.
लेख उत्तम.
24 Apr 2015 - 11:15 am | टवाळ कार्टा
मागल्या जन्मीचे पुण्य कमी पडले मुवि ;)
24 Apr 2015 - 7:54 pm | पॉइंट ब्लँक
छान वर्णन केलं आहे.
25 Apr 2015 - 11:05 am | ज्ञानोबाचे पैजार
परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद.
कसला अफाट खेळला होता सच्या. भारताला फायनल मधे न्यायचेच असा त्याने निश्चयच केला होता बहुतेक.
मॅच संपल्या नंतर सुध्दा रात्री मी आणि माझा भाउ गप्पा मारत बसलो होतो. झोपच येत नव्हती.
सचिन एवढा चांगला खेळला तरी आपण हरलो याचे देखील फार वाईट वाटले होते त्या दिवशी.
जाउ दे...
पैजारबुवा,
2 May 2015 - 11:38 am | फारएन्ड
मस्त लेख, पुन्हा एकदा सगळ्या आठवणी आल्या!
2 May 2015 - 5:24 pm | पैसा
लेख नेहमीप्रमाणेच सुरेख! श्रीरंग जोशी यांची प्रतिक्रियाही आवडली.
16 Jul 2015 - 2:27 pm | shree pavan
Morgan saheb,
Lihite vha.
Aadnya navhe Vinanti.
6 Jun 2016 - 6:55 pm | हकु
आणि वर्णन सुद्धा!!
6 Jun 2016 - 7:46 pm | महामाया
अप्रतिम वर्णन !
9 Jun 2016 - 10:15 am | अभिजीत अवलिया
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. अजूनही ती स्पर्धा आणी त्यातल्या सचिनच्या शेवटच्या दोन खेळी मनात घर करून आहेत.